आमच्या बालमंदिरात एक मुलगी होती. सहज इकडच्या तिकडच्या गोष्टी चालू असता
स्वप्नाच्या गोष्टी निघाल्या. तेव्हा ती मुलगी म्हणते, “मला किनई नेहमी डाकिणीची स्वप्ने
पडतात आणि मग मी अशी घाबरून जाते.” “हं त्या परीच्या गोष्टी वाचतेस त्यातल्या डाकिणी
येत असतील तुझ्या स्वप्नात. कशी असते ग डाकीण तुझी?” जरा आठवून ती मुलगी म्हणते,
“किनई माझ्या स्वप्नातली डाकीण थोडी थोडी माझ्या आईसारखी दिसते.”
या मुलीसारखी कित्येक मुलांना स्वप्ने पडत असतील व कित्येकजण घामाने डबडबून
जात असतील, व कित्येकांच्या स्वप्नात शाळेतल्या ‘बाई’ सारख्या दिसत असतील. कित्येकांना
राक्षसांची स्वप्ने पडत असतील व त्या राक्षसांची तोंडे बहुतेक वडील अथवा शिक्षकांसारखी दिसत
असतील! मुलांच्या मनात बहुधा राजा, शिपाई, वाघ, राक्षस वगैरे चिन्हे (Symbols) त्यांचे वडील
अथवा शिक्षकासंबंधी असतात. ती सर्व भीतीजनक असतात, व सत्ता दर्शविणारी असतात. आपले
विद्यार्थ्यांच्या जीवनांत आपले स्थान डाकीण अथवा राक्षसांचे असावे ही किती दुर्देवाची गोष्ट
आहे! बालकांना खरे व काल्पनिक असे अनेक प्रकारचे भय वाटतच असते. ज्यापासून भिण्याची
मुळीच जरूर नाही अशा गोष्टींना ती खूप भीत असतात, उदाहरणार्थ वस्तू, मनुष्य अथवा जागा
अगदीच नवी असल्याने, फार मोठी असल्याने, जरा विचित्र दिसल्याने; त्याचप्रमाणे तेथे अंधार
असल्याने ती भितात, व अशा स्थितीत त्यांना आपल्याकडून रक्षण व आधार हवा असतो. त्यांच्या
जीवनात त्यांचे भयापासून रक्षण करण्याचे आपले स्थान असते परंतु जेव्हा आपल्या वर्तनाने
आपणही त्यांच्या अनेक भयस्थानांपैकी एक बनून बसतो तेव्हा त्यांचे जीवन किती असहाय्य व
करुणाजनक बनत असेल? आपण त्यांच्या जीवनातील आधारस्तंभ असण्याच्या ऐवजी एक महान
संकटासारखे त्यांना भासतो तेव्हा त्यांनी आधार अथवा रक्षणासाठी कोणाकडे पहायचे?
शिक्षक व आई वडील यांच्याच मृत्यूची इच्छा त्यांची मुले कित्येक वेळा करत असतील!
अर्थात स्पष्टपणे ती आपले आईवडील मरावे असे म्हणणार नाहीत, पण नकळतपणे अशी इच्छा
कित्येक वेळा त्यांच्याकडून प्रगट केली जाते. त्याचे कारण ती दुष्ट आहेत असे नव्हे. त्यांना
आपले आईबाप व शिक्षकांनी मरावे असे वाटते याचा अर्थ त्यांचे आयुष्य कमी व्हावे अथवा
त्यांना जीवन उपभोग मिळू नये असे वाटत नसते. पण मुलांच्या जीवनातील या महान आपत्ती दूर
व्हाव्या इतकेच वाटत असते. शिक्षकांनी व आईबापांनी आपल्या मुलांनी मनमोकळेपणाने सांगितलेली स्वप्ने ऐकली व तपासली तर मुलांच्या जीवनात आपण किती त्रास व संकटे उत्पन्न
करितो, त्यांना भीतीने किती असहाय्य व नि:शक्त बनवितो, ते दिसून येईल. त्यांच्या उगवत्या
कोवळ्या आशाआकांक्षा आपण निर्घृणपणे तोडून टाकीत असतो. एकंदरीत त्यांच्या मनावर अनेक
प्रकारे ठेवलेल्या दाबामुळे त्यास पुरतेपणी विकासणे अशक्य होते व त्यामुळे मानसिक विकृती
उत्पन्न होण्यास आपणच कारणीभूत होत असतो व त्यांना आपल्यात काहीच शक्ती नाही,
आपल्याला करमत नाही, आपल्यास काही येत नाही, आपण मूर्ख, आपण मठ्ठ, आपण निरुपयोगी
वगैरे प्रकारची भावना रूढ करून त्यांना खरोखरच निरुपयोगी बनवित असतो. या कोवळ्या वयात
त्यांच्या मनात भीती व कनिष्ठपणाची भावना (Fear complex व Inferiority complex) शिरली
म्हणजे मोठेपणी ते पुढील आयुष्याची जबाबदारी अंगावर घेण्यास नालायक बनतात. हे दोन महान
रोगच त्यास जडतात म्हटले तर चालेल व वडील मंडळी त्यांना वेळी अवेळी तऱ्हेतऱ्हेची भीती
दाखवून व “मूर्ख आहेस”, “काही समजत नाही” वगैरे अनेक प्रकारे हिणवून या दोन रोगास नेहमी
आमंत्रण धाडीत असतात. हे दोन रोग एकदा जडले म्हणजे मनुष्याची कर्तृत्वशक्ती मंद होते.
संकटास अथवा अडचणीस धीराने तोंड देऊन त्यांना ओलांडून पलीकडे जाण्याची त्यांची शक्ती
अथवा इच्छाच नाहीशी होते. अर्थात जीवन कलहांत ती मागे पडतात; दु:खी होऊन कुठे तरी
कोपऱ्यात खितपत पडतात. खरोखर हे रोग मनाच्या शक्तीस क्षयासारखे नि:शक्त बनविणारे
आहेत. आपणास त्याच्या भयंकरपणाची जाणीव जितक्या लवकर होईल तितकी चांगली.
आईबापांनी व शिक्षकांनी आपला प्रत्येक शब्द व प्रत्येक कृती ही नीट परीक्षून पहाण्याची
व आपण आपल्या मुलांच्या स्वप्नात डाकीण अथवा राक्षस म्हणून येणार नाही अशी खबरदारी
घेण्याची फार आवश्यकता आहे.
(शिक्षण पत्रिका, वर्ष १, अंक ९, फेब्रुवारी १९३४)

Leave a comment