रमा रोज उठून दुपारी बालमंदिरात परसाकडेल जायची. आणि जायची तरी कशी ? एकटी दुकटी नव्हे, तर
एक टोळी जमवून आणि त्या टोळीचे आधिपत्य स्वत:कडे घेऊन अगदी लष्करी थाटात.
संगीताचा पहिला तास संपला की रमाचा हा जवळ जवळ दुसऱ्या सबंध तासाचा एक आपला कार्यक्रमच
होऊन बसलेला. पहिल्यांदा ती आपल्या सैनिकांची व्यवस्थित जामजमाव करायची. काही मैत्रिणी व मित्र
तिला असे मिळत की नुसती तिने खूण करायचाच उशीर, की झाले तिच्या टोळीत सामील. काहीना ती
रीतसर बोलावणे करीत असे, काहीना आग्रह करून ती टोळीत आणि कित्येकांना तर ती धमकावणी
घालायलाही कमी करत नसे. एवढीशी पोर पण कुणाशी कसे वागावे हे तिला चांगले ठाऊक होते.
अशी टोळी पांच सहा जणांची जमली म्हणजे टमरेल घेणे, त्यात पाणी घेणे, वगैरे क्रिया सुव्यवस्थित होत
असत. नंतर ती सर्व सेना मंदिराच्या पाठीमागल्या बाजूने असल्या तसल्या गप्पा गोष्टी करीत करीत
उतरायची. अर्धा तास सहज या कार्यक्रमात जाई. नंतर वर येऊन बाकीच्या उत्तरविधीत पंधरा वीस मिनिटे
जात. आणि पुन्हा जो तो आपल्या कामाला लागेपर्यंत एकूण असा एक तास दररोज रमा काढत असे,
आणि आपल्याबरोबर बाकीच्या मुलांचाही.
मला प्रश्न पडला : परसाकडे सारख्या नैसर्गिक गोष्टीत मी कसा अडथळा करायचा ? आणि तिच्या
कार्यक्रमाला हरकत न घ्यावी तर हळू हळू रमाचे सैन्य वाढून शाळा वर्गाच्या खोल्यात न भरता रमाबरोबर
अशीच परसात भरू लागली तर त्याचे काय करायचे ? गावातून शाळेत आल्यानंतरही बालके असा वेळ
परसात घालू लागलीत तर मग शाळा अन् गाव यात फरक तरी कसला ?
प्रथम मी रमाला सूचना केली की तिने शाळेच्या गाडीत बसण्याच्या अगोदरच घरीच परसाकडेला जाऊन
येत जावे. रमा वयाने लहान पण तिची बुध्दि मात्र एखाद्या मोठ्या माणसासारखी. मी सूचना दिली
म्हणजे कबूल करायची आणि पुन्हा म्हणायची ‘घरी तर गेले होते पण पुन्हा लागते अन् जावे लागते.’
मी तिला म्हटले “एक एक जण पाळीने जात जावे. सर्वांनी एकदम कशाला जायचे ? हवी तर तू एकटी
जात जा पहिल्याने.”
रमाच्या मुद्दाम आग्रहाने अथवा धमकावणीने बालके ह्या प्रकारामुळे जाईनातशी झाली. पण बाकीची मुले
कामातून जमेल तसा वेळ काढून एकत्र होत आणि जात. काही दिवस असाच क्रम चालू राहिला. रमाला

पुरेसे सोबती न मिळत गेल्यामुळे तिच्या वेळी जी दुसऱ्या वर्गातील मुले तिथे परसात असतील त्यांच्या
बरोबर बोलूनच ती आपला बराचसा वेळ काढी.
रमाला तपासण्याचे ठरविले. एक दिवस गायनाचा तास झाल्यानंतर मी तिला म्हणले “रमा तू परसाकडेला
जाऊन ये, मग माझ्याकडे ये.”
रमा जाऊन परत आली. मी थोडीशी तिच्याशी बोलले. किती वेळ जेवतेस, काय काय खातेस, घरी
परसाकडे कितीदा जातेस वगैरे तिची चौकशी केली.
नंतर स्वत:च तिला वर्गाच्या खोलीत नेले. सर्व साधने तिला दाखवून त्यांची नावे विचारली. तिच्यापुढे
एकेक साधनही ठेऊन पाहिले. प्रत्येक साधनाशी ती एक वेळ खेळून त्यास बाजूला टाकीत गेली. एक दोन
दिवसांत तिने सर्व साधने हाताखालून घातली. त्यात निरनिराळ्या गुड्यांच्या चौकटीशी ती जास्त वेळ
खेळत होती. दोन दिवस तिने स्वत: होऊन चौकटी घेतल्या.
पण पुन्हा दोन दिवस गेले. रमा आपल्या टोळीसह परसात दिसू लागली.
नंतर दररोज मी तिला सांगायची “तू एकदा खाली परसात जाऊन मग माझ्याकडे ये.”
रोजच्या चौकशीमुळे असे आढळून आले की रमा साधनाशी खेळून खेळून कंटाळली आहे. त्यांत तिला
आता काही विषेश वाटत नाही. तिचे परसाकडेला जाणे नैसर्गिक नसून तिला खोलीत कांही काम न
राहिल्यामुळे तिने हा दुसरा उद्योग शोधून काढला होता.
दुसरे दिवशी संगीतानंतर लगेच मी तिला बोलावून म्हटले “रमा तुझ्यासाठी एक पेन्सिल आहे. मी तुला
चित्रे काढावयाची असली तर दाखवते.”
रमा चित्रे काढायला बसली. थोडे काम करून पुन्हा ती मागल्या परसात गेलीच.
तिसरे दिवशी गाडीतून उतरल्यावर शाळेत येता येताच मला म्हणते “मला आज पण चित्रे काढायची
आहेत. पेन्सिल द्याल ना?”
“संगीत झाल्यावर देईन,” तिची उत्कंठा आजमावयासाठी मुद्दामच मी तिला उत्तर दिले. संगीतानंतर रमा
माझ्याकडे आपण होऊन आली.
रमा आता चित्रात किती तल्लीन असते! रमाचे ते कलामग्न प्रसन्न वदन पाहून मला देखील किती आनंद
होत असतो!

Leave a comment

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.