आजकाल आमच्या शाळेत ऊ टू ची गोष्ट खूप चालते आहे. शाळेत गेल्याबरोबर मुले “बाई, गोष्ट सांगा ना” म्हणून पाठीस लागत असतात व कोणाची गोष्ट सांगू म्हणून विचारले की “ऊ टू” चा असा सर्वांचा एक आवाज येतो.

ऊ टू ची गोष्ट घरीही मुलांना फार आवडते व शाळेतही जर सांगितली तर ती लगेच बालप्रिय होते असे अनुभवास आले. याचे कारण त्या गोष्टीत बालप्रिय होण्याचे पुष्कळच गुण आहेत.

वाचकांपैकी बहुतेकांस ती माहीत असेलच. पण आजकाल घरी रात्री आजीबाईच्या जवळ बसून गोष्टी ऐकण्याचा प्रघात बंद पडत चालला आहे. कारण घरांत बहुधा आजीच नसते, एकटी आईच असते व ती स्वैपाकात तरी गुंग असते, नाहीतर बाबांबरोबर फिरायला अथवा क्लबमध्ये गेलेली असते किंवा शेजारणी पाजारणींच्याशी गप्पा मारण्यात गुंतलेली असते व शाळांतून असली ग्राम्य गोष्ट बहुतेक सांगत नसतील. त्यामुळे कदाचित् गेल्या पंचवीस वर्षात वाढून मोठ्या झालेल्या आजच्या मातापित्यांपैकी काहींना गोष्ट माहीत नसण्याचा संभव आहे म्हणून गोष्ट खाली देत आहे.

ऊ टू ची गोष्ट

एक होती ऊ

तिला झाली टू

ती गेली जेवायला

तिला मिळाला पैसा

“आई, आई, पैशाचं काय आणूं?”

“भाजी”

“चिरू कशी?

“चरा चरा”

“शिजवू कशी?”

“रटा रटा”

“खाऊ कशी?”

“मटा मटा”

“निजू कशी?”

“डाव्या कुशी”

“पादू कशी?”

“ढम् दिशी”

गोष्टीचा शेवट आला की सर्व मुले एका आवाजात ढsम् दिशी असे म्हणतात व जिकडे तिकडे हंशा पिकतो.

थोड्याच वेळात “फिरून सांग बाई, फिरून सांग बाई” अशी मागणी होऊ लागते. असे आज आठ दहा दिवस चालले आहे तरी मुलांना अजून तिचा कंटाळा आला नाही. याचे मला नवल वाटू लागले, व मनात आले की या गोष्टीत अशी जादू तरी काय आहे ?

खरोखरच बालकथा या दृष्टीने ही गोष्ट संपूर्ण आहे. म्हणजे तिच्यात बाल कथेत असावयास हवेत ते सर्व गुण आहेत.

अगदी लहान मुलांस गोष्ट केवळ गद्यात असण्यापेक्षा पद्यवजा गद्य म्हणजे इंग्लिशमध्ये ज्यांना rhymes म्हणतात किंवा गुजराथीत ज्यांना जोडकणा म्हणतात त्या तऱ्हेची अधिक पसंत असते. आपल्या लहान मुलांची खेळण्यातली गाणी अशाच प्रकारची असतात. ऊ टू ची गोष्ट सबंध अशाच प्रकारची आहे. तिला गाणे म्हणता येणार नाही, तरी इतर गोष्टीप्रमाणे ती केवळ गद्यही नाही. तिच्यात एक प्रकारची तालबद्धता आहे व अनुप्रासही आहेत.

अगदी लहान मुलांच्या गोष्टीत काय किंवा गाण्यात काय अर्थापेक्षा शब्दांचीच गम्मत त्यांना जास्त हवी असते. ती इतकी की एक वेळ अर्थ नसला तरी त्यांना चालतो. एक होती ऊ व तिला झाली टू. टू म्हणजे काय? काही नाही. तिला मुलगी झाली असे म्हटले तर ते रुक्ष गद्य होईल व गोष्टीतली बरीच मजा निघून जाईल. आपल्या छोट्या रसिक श्रोत्यांस एक होती ऊ नी तिला झाली टू असेच हवे असते.

पुढल्या लहान लहान प्रश्नोत्तरांमध्ये या गोष्टीची खरी गम्मत आहे. चिरू कशी? चरा चरा, शिजवू कशी? रटा रटा, खाऊ कशी? मटा मटा वगैरे शब्द ध्वनिसूचक आहेत व असले शब्द बालकांस फार आवडतात. शिवाय या प्रश्नोत्तरांमुळे गोष्टीचा गद्यपणा जाऊन त्यास थोडेसे पद्याचे रूप आले आहे. त्यामुळे मुलांस ते लक्षात रहाण्यास सोपे जाते; व पुनः पुनः म्हणण्यात मजा वाटते. निजू कशी? डाव्या कुशी, पादू कशी? ढम् दिशी. या ओळी म्हणण्यास मुलांस अधिक गोड वाटतात. याप्रमाणे या गोष्टीची रचना व शब्द प्रयोग बालकांस प्रिय व योग्य असे आहेत. छोटी छोटी वाक्ये; उगीच पाल्हाळ न करता मुद्द्याशी गाठ; उत्तरांची समर्पकता व योग्य शब्दांची योजना; एकंदर सबंध गोष्टही विनाकारण लांबलचक नसून बेताची असणे वगैरे सर्व गुण या गोष्टीत असल्यामुले भाषा व रचना या दोन्ही दृष्टीनी ही गोष्ट उत्कृष्ट ठरते.

आता प्रश्न राहिला अर्थाचा. अर्थाचे दृष्टीने पुष्कळांस ही निरर्थक व ग्राम्य वाटेल. यात काही बोध? काही तात्पर्य? भाजी चिरून, शिजवून खाण्यासारखा केवळ प्राकृत व क्षुल्लक विषय, ऊ टू सारखी हलकी पात्रे; व त्यात पादण्यासारख्या ग्राम्य गोष्टी. अर्थात गोष्ट सर्वथैव त्याज्य ठरेल.

आरोप खरे आहेत. या गोष्टीपासून फायदा काय? असे विचारल्यास काय सांगणार? मुलांच्या ज्ञानात हिच्यामुळे काही भर पडली? काही नाही. मुलांस हिच्यापासून काही नीतिशिक्षण, काही बोध मिळाला? नाही. भाषाशिक्षणास मदत झाली? नाही. मग ही गोष्ट केवळ वायफळ आहे. ही मुलांना सांगण्यात काही अर्थ नाही असे कदाचित पंडितांनी म्हटल्यास योग्यच आहे.

परंतु आम्हाला तसे वाटत नाही. ज्ञान अथवा बोध मिळेल तेवढेच सांगावे व तेवढेच ऐकावे अशा केवळ व्यापारी धोरणावर गोष्टी सांगणे आम्हाला पसंत नाही. निव्वळ मनाचा आनंद, मौज, हास्य, विनोद यांनाही जीवनात अवश्य स्थान आहे म्हणून शिक्षणातही असले पाहिजे. किंबहुना गोष्टी ऐकण्यात यांनाच प्रथम स्थान मिळाले पाहिजे. अप्रत्यक्षपणे, त्यांच्यातून ज्ञान मिळाले तर मिळो; अथवा न मिळाले तर न मिळो; त्यातून बोध निघो की न निघो; भाषा शिक्षणास लाभ होवो की न होवो. या सर्व गोष्टी गौण समजून बालशिक्षणात गोष्टीस स्थान केवळ एकाच कारणाने द्यावे व ते म्हणजे बालकांचा आनंद. त्यांची मौज. मुलांना गोष्टी सांगाव्यात का? तर त्यांना गोष्टी ऐकणे आवडते, त्यात मजा वाटते. त्यात आल्हादजनक अशी तत्वे आहेत म्हणून व एवढ्याच करता आम्ही शाळेतील गोष्टी सांगण्याची पद्धतीही नापसंत करतो, सामान्यतः गोष्टींची पसंतीही फारशी सुंदर नसतो. आपल्या शिक्षणशास्त्रास ज्ञान व नीतिबोध याचे इतके वेड लागले आहे की त्याचेकरीता आपण बालजीवनातील पुष्कळ सुंदर व नाजुक गोष्टीचा होम केला आहे. बालकांपासून त्यांची रसिकता, विनोद, मौज, आनंद वगैरे सर्व आपण हिरावून घेतले आहे. गोष्टीसारखा विषय अभ्यासक्रमात दाखल करून, गोष्टीच्या परीक्षा घेऊन, त्याची तात्पर्ये बोलावून, आपण गोष्टीचा खून मात्र केला आहे.

अलिकडे तात्पर्ये थोडीशी कमी झाली असली तरी मुलांकडून गोष्टी सांगवून घेणे वगैरे चालतेच. औषधात कडू गोळ्यावर साखरेच्या वेष्टणाचे जे स्थान असते ते स्थान अभ्यासात गोष्टींना मिळाले आहे. वाचन पाठ काय की तोंडी सांगावयाच्या गोष्टी काय, ज्ञान व बोध सरळ घेण्यास मुले तोंडे वेडीवाकडी करतात म्हणून गोष्टींच्या रूपात देण्याचा प्रघात आहे.

खरे म्हटले असता आपल्या मोठ्यांच्या जीवनात नाटक, सिनेमा, संगीत, जलसा, चित्र प्रदर्शन वगैरे जसे मनाला आनंद, विसावा व रसिक मौज देणाऱ्या गोष्टी म्हणून स्थान आहे, तेच स्थान बालजीवनात गोष्टींना असावे. हे जर कबूल केले तर ऊ टू ची गोष्ट बालकथा या दृष्टीने उत्तम आहे असे म्हणता येईल. कारण त्यात बुद्धीस विराम आहे; भाषेची मौज आहे; मनास आल्हाद आहे; व ती हास्योत्पादकही आहे. ऊ टू सारखी पात्रे विनोद पोषक आहेत. जेवायला जाणे, पैसा मिळणे, भाजी आणणे वगैर जीवनातील परिचित गोष्टी असल्यामुळे समजून घेण्यास डोक्यास त्रास द्यावा लागत नाही. त्यामुळे गोष्ट ही गोष्टच रहाते. अभ्यास बनत नाही. शिवाय भाजी आणून करून खाणे यासारख्या सामान्य घरगुती विषयास इतक्या सुंदर रीतीने गोष्टीत गुंफल्याबद्दल गोष्ट बनविणाऱ्या विषयी आपल्यास कौतुक वाटल्यावाचून रहात नाही.

अप्रत्यक्षपणे गोष्टीमधून ज्ञान, बोध, भाषाशिक्षण वगैरे मिळतेही. जसे वर्षानुवर्षे ऐकलेल्या प्रवचनापेक्षा (Sermons), उपदेशापेक्षा एखादे वेळी पाहिलेल्या नाटकाचा अथवा चित्रपटाचा प्रेक्षकांचे मनावर अधिक परिणाम होतो; वर्षानुवर्षे घेतलेल्या व्याकरण आणि भाषाशिक्षणाने होत नाही असे सुंदर भाषाशिक्षण पुष्कळदा सुंदर नाटके पहाण्याने अथवा गोष्टी वाचण्याने होते; (एनसायक्लोपीडीया) ज्ञानकोश पाठ केला असता मिळणार नाही इतकी इतिहास भूगोल विज्ञान वगैरे अनेक प्रकारची माहिती व ज्ञान, लोकांना आज सिनेमाद्वारा मिळत आहे, त्याप्रमाणे गोष्टीद्वारा बालकांस या सर्व प्रकारचे फायदे होतीलही. पण म्हणून ते ध्येय ठेवून गोष्टींना शर्करावेष्ठित ज्ञान व बोध यांची गोळी बनविता कामा नये. ती एक कलाकृतीच राहिली पाहिजे. एक साहित्यकृती या दृष्टीनेच तिची पसंती झाली पाहिजे व एखादा उत्कृष्ट नट जसा अभिनय आवाज व कृती यांनी भाषेमध्ये असलेला अर्थ पूर्णपणे बाहेर आणून श्रोत्यांच्या मनावर बिंबवीत असतो, तसेच कथाकाराने योग्य हावभावासहित गोष्ट सांगितली की तेथे त्याचे काम संपले. त्यानंतर ती गोष्ट मुलांकडून सांगून घेणे, न आल्यास त्यांना प्रश्नांनी टोचून टोचून ती बाहेर काढणे वगैरे अत्यंत हास्यास्पद प्रकार शाळेत होत असतात ते पाहून मुलांची कीव येते, व गोष्टीसारख्या गोष्टीचे असे हाल झालेले पाहून वाईट वाटते. गोष्टी, कथा वगैरेंना जर वाणी आली तर त्या खात्रीने एकच आक्रोश करतील की “Save us from these teachers” “या शिक्षकांपासून आमचा बचाव करा.” वर्गातील गोष्टीचा तास म्हणजे गोष्टीचा प्राण घेण्याचा तास असतो. शिक्षकांच्या हातात ती गोष्ट नुसती तडफडत असते व ऐकणाऱ्यांची स्थितीही तितकीच करुण असते.

हे असले दृश्य पाहिले म्हणजे असे वाटते की आपल्या हातात सत्ता असावी व या सर्व प्राथमिक शाळेच्या शिक्षकांस व विशेषतः त्यांना गोष्टी कशा सांगाव्यात हे शिकविणाऱ्यांस एक वर्षपर्यंत रोज नाटकसिनेमास पाठवावे व रोज ती पाहिल्याबरोबर काय पाहिले ते व त्यातील भाषणे, म्हणून दाखविण्यास सांगावे व पहिल्या एक दोन वेळा मदत करून; तीनदा, फार झाले तर चारदा ऐकले की सर्व बरोबर आलेच पाहिजे असा नियम ठेवावा व वर्षाअंती त्यांची परीक्षा घेतली जावी. ती नुसती म्हणून दाखविण्याची नाही तर अभिनय करून दाखविला पाहिजे व विशेषतः त्यापासून काय बोध घेतला ते त्यांनी सांगितले पाहिजे. म्हणजे वर्षाचे अंती ते सर्व नाटक-सिनेमास करमणुकीचे, विश्रामाचे, कलात्मकवृत्ती पोसण्याचे स्थान मानीनासे होतील, नाटकद्वेष्टे होतील व कदाचित मुलांकडून गोष्टी म्हणून घेण्याचे बंद करतील.

शाळेत जर गोष्टी नीट रीतीने सांगितल्या तर चांगल्या फिल्मस जशा आठवडेच्या आठवडे चालतात व जितके जास्त आठवडे फिल्म चालली तितकी ती अधिक चांगली समजली जाते, तशीच गोष्टही आठवडेच्या आठवडे चालत असते. एखादी गोष्ट फार आवडली म्हणजे मुले ती पुनः पुनः ऐकण्याची इच्छा दाखवितात व शिक्षकाने ती पुनः पुनः सांगितली म्हणजे संतुष्ट होऊन त्या गोष्टीतील वाक्ये आपल्याशीच म्हणत म्हणत उठून जातात व वातावरणात गोष्टीतील गंमती व मौज दुमदुमत असते.

शेवटी सर्व गोष्टी पटल्याच कदाचित, तरी ऊ टू च्या गोष्टीसारख्या गोष्टीतील ग्राम्य विनोद पुष्कळांच्या कानाला कटु लागणार व शाळेच्या वातावरणात तर तो अगदीच अक्षम्य वाटणार.

(शिक्षण पत्रिका, वर्ष २, अंक ४ सप्टेंबर १९३४)

Leave a comment

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.