सेग्विन हा एक फ्रेंच शिक्षण शास्त्री होता व त्याने मंदबुद्धीच्या मुलांमध्ये काम केले. त्यामुळे मध्ये एकही पायरी न गाळता त्याला काम करावे लागत असे. या तीन पदांचा उपयोग सामान्य बुद्धीच्या (Normal) मुलांमध्येही फार उत्तम दिसून आला आहे. यांचा उपयोग जितका शिक्षकांना आहे तितकाच आई-बाबांनाही आहे. खरे म्हटले असता ज्यांचा ज्यांचा बालकांशी संबंध येतो त्या सर्वांनी या संबंधी माहिती करून घ्यावी.
आपला सर्वांचा हा सामान्य अनुभव आहे की मुले आपल्यास अनेक प्रश्न विचारतात “हे काय आहे?” “याचे नाव काय?” “याला काय म्हणतात?” असे त्यांचे नेहमी चाललेले असते. आपण त्यांची उत्तरे देतो; मुले ऐकतात; तेवढ्यापुरते त्यांचे समाधान होते. पण थोड्या वेळाने ती ते विसरून जातात व पुन्हा आपल्याला विचारावयास येतात. असे एकदा दोनदा झाले म्हणजे आपण कंटाळतो व “सांगितले न तुला आता? किती वेळा सांगायचे?” असे म्हणून आपण चिडतो. आपण चिडणे बरे नाही हे खरे, पण मूल वारंवार तोच तोच प्रश्न करू लागले व आपण कामात असतानाही पुन्हा पुन्हा तेच विचारू लागले म्हणजे आपण चिडून जाणे स्वाभाविक आहे. म्हणून मुलांना अशा गोष्टी शिकवण्याकरता थोडासा फुरसतीचा वेळ काढून मुलास नेहमी त्यावेळी “काय विचारायचे ते विचार” असे म्हटले तर आपल्यास शांतपणे उत्तर देता येतात. मूलही शांतपणे ऐकते. दुपारच्या वेळी मातांनी अथवा संध्याकाळी किंवा सकाळी वडिलांनी रोज दहा-पंधरा मिनिटे या कामाकरता ठेवली तर त्यांचाही त्रास वाचेल व मुलांचीही सोय होईल. कामात किंवा घाईत असताना प्रश्न उत्तरे होतात त्यापैकी बरीचशी वाया जातात. असो.
मुले वारंवार विचारतात त्यांचे कारण त्यांना ते ध्यानात राहील असे करावयाचे असते. म्हणून ती जेव्हा काही विचारतात तेव्हा आपण जे उत्तर देतो ते त्यांचे कडून आपणच पक्के करून घेतले म्हणजे अधिक बरे. ते पक्के करून घेण्याच्या तीन पायऱ्या आहेत. त्या रीतीने क्रमाने घेतल्यास मुलांच्या ध्यानात राहते व ते शिकण्याची बरीचशी अडचण नाहीशी होते. मनातील घोटाळा दूर होतो. मुलांचे मन प्रसन्न होते व नवे नवे शिकण्याची त्यांची हौस वाढते.
उदाहरणाने वरील विधान अधिक स्पष्ट होईल. मूल खेळत असते. आपण कामात असतो. मुलास एकदम एखादी नवी वस्तू दिसते. त्याच्या मनात ती काय आहे ते जाणण्याची जिज्ञासा उत्पन्न होते. ते आपल्याजवळ येऊन विचारते, “हे काय?” आपण आपल्या घाईत अथवा कामात असतो. आपला स्वभाव व त्यावेळची मनस्थिती चांगली असली तर आपण घाईत उत्तर देतो. “ते घड्याळ आहे.” मुलाने पुन्हा विचारले तर आपण स्वाभाविकपणे चिडतो, तर असे करण्याऐवजी “बाळा, दुपारी सांगेन,” असे म्हटले तर मूल दुपारी हटकून विचारायला येईल व न आल्यास त्यास बोलावूनही सांगता येईल. त्यावेळी बाळाच्या शिक्षणाकरताच तो वेळ ठेवला असल्यामुळे त्यास जवळ बसवून घड्याळ जवळ घेऊन शांतपणे त्यास नाव सांगावे. दोन तीनदा पुन्हा पुन्हा आपणच ते नाव सांगावे. ‘हे घड्याळ’ ‘हे घड्याळ’ ‘घड्याळ’ ‘घड्याळ’ ‘घड्याळ’ असे आपण म्हणून मुलांकडून ते म्हणून घ्यावे. नंतर ते पक्के करून घेण्यासाठी दुसरा प्रश्न असा विचारावा “घड्याळ कुठे आहे?” अथवा “घड्याळ दाखव.” असे तीन-चार वेळा करावे म्हणजे ‘घड्याळ’ हा नवा शब्द आपण उच्चारून ती वस्तू मुलास दाखवावयास लावावी. तीन-चार वेळा असे झाले म्हणजे एखादे मिनिट जाऊ देऊन मुलास विचारावे की हे काय? मूल म्हणेल “हे घड्याळ.” असे मुलांकडून तिसऱ्या प्रश्नांस बरोबर उत्तर आले म्हणजे त्या दिवसापुरता धडा संपवावा. दुसऱ्या दिवशी पुन्हा विचारावे. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या प्रश्नापासून म्हणजे ‘घड्याळ दाखव’पासून सुरुवात करण्यासारखं नाही. अथवा एकदम तिसऱ्यापासून म्हणजे “हे काय?”म्हणूनही विचारून पहावे, पण मुलास उत्तर देता न आल्यास न रागावता पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी. बहुतकरून मुले एकाच पाठाने अशा गोष्टी शिकून घेतात व जाता येता ते म्हणत असतात. त्यावरूनच त्यांना ते आले आहे हे आपल्याला कळते. तरी एखाद्यास एक दोन दिवस पुन्हा पुन्हा पहिल्या पदापासून घेऊनही ध्यानात राहिले नाही असे जर दिसून आले तर तो धडा सोडून द्यावा. त्याच्याच पाठी लागून मुलास येत नाही म्हणजे काय? आलेच पाहिजे असा हेका धरून त्याला ते शिकवण्याचा अट्टाहास करू नये. आणखी काही महिन्यांनी पुन्हा मूल आपणास विचारावयास येईल तेव्हा पूर्वी जणू काय तो धडा झालाच नाही असे समजून अगदी नव्या धड्याप्रमाणे पहिल्यापासून शिकवावे. शिकवण्यात दुसरी गोष्ट खास ध्यानात ठेवायची ती ही की हा धडा पाच सात मिनिटापेक्षा जास्त लांबवू नये. दोन तीन वेळा विचारून सोडून द्यावे. त्याप्रमाणे कोणत्याही प्रश्नास बरोबर उत्तर आले नाही तर तेथे तो धडा संपवावा. दुसऱ्या दिवशी पुन्हा पहिल्यापासून घ्यावा. मुलास ‘कसं येत नाही तुला? अरे? आत्ता सांगितलं ना,” वगैरे कधीच म्हणू नये. पुन्हा दुसऱ्या खेपेस पहिल्यापासून सुरू करावे.
आपण सामान्यतः मुलांना काही न शिकवता “अरे एवढे माहीत नाही” वगैरे म्हणत असतो. मूल जवळ खेळत असते. आई स्वयंपाक करीत असते. एकदम ती म्हणते, “बाळ, तो डावला दे बघू” अथवा “तो चिमटा दे,” ‘ती चाळणी दे,’ असे काहीतरी मागते. बाळाला ती वस्तू कोणती ते माहीत नसते. बाळ काहीतरी आणतो. आई म्हणते “अरे डावला माहीत नाही तुला? कसा आहेस वेंधळा!” असे काही म्हणायचे आधी आईने विचार करावा की मूल काही पोटातून शिकून येत नसते व आपण कधी त्यात शिकवीत नसतो. त्याला या विविध रंगी विविध रूपी जगात लाखो गोष्टी नव्या शिकायचा असतात, समजून घ्यावयाच्या असतात. शिवाय त्याच्या सोयी करता या सर्व वस्तू, लायब्ररीत पुस्तके ठेवतात अथवा म्युझियम मध्ये वस्तू ठेवतात तशा वर्गीकृत अथवा क्रमवार लावलेल्या थोड्याच असतात! हजारो प्रकारच्या वस्तू व गोष्टी वाटेल तशा एकत्र झालेल्या असतात. त्यातून मुलास शिकावयाचे असते हे ध्यानात ठेवून त्याची अडचण शक्य तितकी कमी करावी व त्यास माहिती मिळवणे शक्य तितके सुलभ करून द्यावे हे आपले काम आहे. “डावला माहीत नाही तुला?” असे म्हणून त्यास हिणवण्यास काय अर्थ? त्या ऐवजी मुलास तो माहीत नाही हे लक्षात आल्याबरोबर जर आई त्याला सांगेल की ‘डावला’ ‘डावला’ किंवा ‘किसणी’ ‘किसणी’ असे दोन तीनदा म्हणून मग जर विचारील, “बाळा, किसणी कुठे आहे दाखव,” अथवा “डावला दाखव” व एक दोनदा असे झाल्यावर जरा वेळाने विचारेल की “बाळ, हे काय आहे रे?” तर बाळ सांगू शकेल की “तो डावला आहे.”
पुष्कळदा आपण शिकवण्याचे मधले पद गाळीत असतो. “ही किसणी” असे सांगितल्यावर लगेच विचारतो की, “हे काय?” व मुलाने ‘किसणी’ म्हणून सांगावे अशी अपेक्षा करतो. पण मध्ये जो नवा शब्द सांगितला असेल तो आपण उच्चारून ती वस्तू मुलास दाखवण्यास लावावयाचे पद फार महत्त्वाचे असते, हे लक्षात ठेवावे.
अशा प्रकारचे शिक्षण फक्त शाळेतच द्यावयाचे असते असे नाही. शाळेत तर हवेत हवे. परंतु वरील दाखल्यावरून कळेल की दोन अडीच वर्षाच्या मुलास घरी हजारो नव्या वस्तूंचा, माणसांचा व नव्या गोष्टींचा परिचय करून द्यायचा असतो. तो करून देताना आपण अशा पायरी पायरीने चाललो तर मुलाच शिकणे सुलभ जाते, व थोड्या वेळात बऱ्याच गोष्टी ध्यानात ठेवता येतात. घरची दोन-चार माणसे ओळखीची होतात तो दोन पाहुणे येतात. घरची माणसे म्हणतात “यमे, तुझी मामा-मामी आली” व तेवढ्याने यमीला मामा मामी कळल्या असे आपण धरून चालतो. अशाच प्रकारे प्रत्येक बाबतीत आपण मानून घेतो की मुलास एकदा सांगितले की झाले. पण असे करता कामा नये. ‘ही चिमणी’ किंवा ‘हा कावळा’ म्हणून सांगितले म्हणजे ‘चिमणी कुठे?’ ‘कावळा कुठे?’ असे दोन-चारदा विचारून मग ‘हे काय?” असे विचारून तो शब्द पक्का करावा. अशाने मुलास नवे शब्द शिकणे फार सोपे जाते.
पुष्कळदा साधारण हुशार मुलांच्या बाबतीत इतका कीस काढीत बसण्याची जरूर नसते. जर असे दिसून आले की, ही गोष्ट तर एकदा सांगितल्याबरोबर अथवा एकदा ऐकून मुलास माहीत झाली आहे, तर पायरी पायरीने घेऊन प्रश्न विचारीत बसण्याची जरूर नाही. त्यावेळी ते प्रश्न उलट कंटाळवाणे होतात. जे ध्यानात ठेवण्यास कठीण पडते तेच प्रश्न अशा रीतीने शिकवावे.
याप्रमाणे दोन वर्षाच्या लहान मुलास घरातल्या वापरण्याच्या वस्तूंची नावे, माणसांची नावे, आसपासच्या नेहमी पाहण्यात येणारी फुले, झाडे, प्राणी वगैरेंची नावे, रंग, आकार वगैरेंची नावे शिकविता येतात.
शिकवताना एक वस्तूपेक्षा दोन एकमेकांशी विरुद्ध अथवा एकमेकाहून बऱ्याच निराळ्या अशा वस्तू घेऊन शिकवणे अधिक सोपे जाते. उदा. फक्त एक लाल वस्तू घेऊन ही लाल आहे, एवढेच सांगण्यापेक्षा लाल व पिवळी अशा घेऊन ‘ही लाल,’ ‘ही लाल,’ असे दोन तीनदा सांगितल्यावर ‘ही पिवळी’ असे दोन तीनदा सांगून दोन्ही वस्तू मुलास दूर ठेवून येण्यास सांगावे व मग ‘लाल आण’ ‘पिवळी आण’ असे म्हणून दोन तीनदा ती त्याच्याकडून आणून घ्यावी. मग “ही कशी?” म्हणून विचारावे. अशा रीतीने दोन्ही वस्तूंची नावे काढून घेणे अधिक चांगले.
रंग आकार वगैरेंची नावे शिकवण्याच्या आधी खरे म्हटले असता मुलास त्या रंगाचा व आकाराचा प्रथम परिचय झाला पाहिजे, व तोही योग्य साधनांशी खेळत असता योग्य प्रकारे व्हावयास हवा. मुलांना प्रथम त्या वस्तूशी खेळून जो अनुभव मिळतो त्यास नाव देण्याचे काम नंतर शिक्षकास करावयाचे असते. याकरता त्यांना मॉन्टेसोरी शाळाच हवी असते. तेव्हा एखाद्या फुलावरून अथवा साडी चोळीच्या रंगावरून किंवा चित्रावरून मुलास चार रंगांची नावे शिकवली म्हणजे आपण मॉन्टेसोरी पद्धतीप्रमाणे मुलास योग्य ते शिक्षण दिले असे समजू नये. पण काहीच नाही त्यापेक्षा जेवढे झाले तेवढे पुष्कळ असे मानावे.
इतक्या खोल पाण्यात शिरले नाही तरी मुलाचे घरगुती असे साधारण प्रश्न अनेक असतात. अनेक वस्तूंची नावे वगैरे मुलास शिकावयाची असतात. तर त्यावेळी आपण शिकवण्याकरता या तीन पदांचा उपयोग करावा म्हणजे मुलांस ते ध्यानात ठेवणे व शिकून घेणे सोपे जाते. शाळांमधून तर त्यांचा उपयोग अवश्यच व्हावा.
(शिक्षण पत्रिका, वर्ष १, अंक ११, एप्रिल १९३४)

Leave a comment