“चढाओढ असल्याशिवाय मुले चुरशीने अभ्यास कसा करणार ? अधिक मेहनत घेऊन अभ्यास करायला मुलांना काही तरी असे तत्त्व असलेच पाहिजे. नाहीतर त्यात काही मजा वाटत नाही.”
सामान्यतः सर्व पालकांचे मत असेच असते व पुष्कळशा शिक्षकांचेही तसेच असते.
“धावा धावा. पाहू कोण पुढे जाते ते. सर्वात पुढे जाईल त्याला बक्षीस!”
असे शब्द जवळ जवळ सर्वाच्या तोंडी असतात. अगदी लहानपणापासूनच घरातच याचे बाळकडू मिळत असते. “तो तुझ्या आधी उठेल. तू जेव लवकर,” “आज मी पहिला पंत” वगैरे प्रकार घरी चालू असतात.
शाळेमध्ये तर स्पर्धेस मानाचे स्थान कित्येक शतके दिलेलेच आहे, व तिचे शैक्षणिकदृष्ट्या समर्थन केले जाते. वर्गातल्या अभ्यासात चढओढ, नाटकात उत्तम अभिनयास बक्षीस, भाषणांची चढाओढ, खेळात तीच, एकूण एक विकासक्षेत्र स्पर्धेने व्यापलेले आहे, व विद्यार्थीअवस्था संपून जगाच्या व्यवहारात शिरले की तिथे फारच निष्ठुर प्रकाराची चढाओढ दिसून येते.
पुष्कळ जण शाळांतून सर्व प्रकारची चढाओढ असलीच पाहिजे असे म्हणतात. त्याचे कारण ते हेच सांगतात की “आपल्याला मुलांना सध्याच्या जगात वागायला शिकवावयाचे आहे. जगाच्या धकाधकीत त्यांनी टिकून राहिले पाहिजे. तुम्ही शाळेत एक अत्यंत सात्विक जग निर्माण केलेत तर ते या
जगाच्या शर्यतीत काय उपयोगाचे? दुसऱ्याला मागे टाकून स्वतः पुढे जाण्याच्या शिकस्तीचा प्रयत्न प्रत्येकाने केलाच पाहिजे व हेच शिक्षण मुलांना प्रथमपासून मिळाले पाहिजे.”
काही जण म्हणतात “स्पर्धा ही एक मनुष्यात स्वभावसहज अशी गोष्ट आहे. जवळून दुसरी गाडी गेली की पहिल्या गाडीचा घोडा जोराने धावू लागतो. आपण पळालो की कुत्रा जोराने पळू लागतो. हीच सहजवृत्ती मनुष्यातही आहेच, व हिचा फायदा मनुष्याने आपला विकास साधण्यात करून घेतला तर त्यास काय हरकत आहे? या प्रमाणे स्पर्धेच्या बाजूने जोराचे मुद्दे ही आहेत, व स्पर्धेचा प्रचार तर सर्वत्र आहेच.
स्पर्धा असल्याशिवाय मुले चांगला अभ्यास करीत नाहीत हे म्हणणे आधी तपासून पाहू.
अगदी लहान मुलांचे थोडे निरीक्षण करावे. त्यांना दुसऱ्याची पर्वाच नसते. “अरे ते मूल पाहा तुझ्या पुढे जाते, तू चल” असे म्हटले तरी मूल जर फुले वेचीत असले तर तेथेच तेच काम करीत बसते. दुसरे पुढे गेले तर जाऊ द्या, आपण मागे तर राहिलो. दुसरी करतात म्हणून आपण करण्याची त्यांची मुळीच
इच्छा नसते. तसेच दुसरे पुढे जाणारे नसले, तरीही ज्याला धावावेसे वाटते ते धावतेच. ज्याला मातीत खेळावयाचे असते ते मातीत खेळतच रहाते. व ज्याला चिऊकाऊ पहायचे असतील ते ती पाहात राहातेच; म्हणजे त्यांना त्यांचा स्वतःच्या जिज्ञासेचा विषय असतो. व त्यावेळी त्याच विषयात ती गुंग असतात. दुसऱ्याच्या करिता ते आपला विषय सोडीत नाहीत, व चुरशीकरिता एखादी गोष्ट करण्यास तयार होत नाहीत.
दुसरे; लक्ष लागणे, मेहनत घेणे, पुनः पुनः प्रयत्न करणे, सततपणे पुष्कळ वेळ काम करीत राहाणे वगैरे सर्व प्रकार त्यांच्यांत तीव्रतेने दिसून येतात. पण हे सर्व कशामुळे होत असते ? तर त्या कामात त्यांना जी आतून गोडी वाटते, आवड वाटते, आकर्षण वाटते, त्यामुळे. दुसऱ्या कोणत्याही बाह्य कारणाने ती
इतका वेळ, इतक्या एकाग्रतेने, इतक्या मेहनतीने काम करण्यास तयार नसतात.
याच स्वाभाविक स्थितीत जर त्यांना वाढू दिले तर दिसून येते की मुले आपल्या आवडीची कामे पसंत करू शकतात. पसंत केलेल्या कामात खूप एकाग्र होऊ शकतात, पुष्कळ वेळपर्यंत त्याच कामात बसू शकतात. ते चांगले येईपर्यंत पुनः पुनः करीत सुटतात. चुकत असल्यास खूप प्रयत्न व मेहनत
घेतात, व चांगले प्रावीण्य मिळवितात. दिवसेंदिवस त्यांच्या आवडीचे क्षेत्र विशाल होत जाते. नुसती माती, ठोकळे व मणी यात न राहाता वाचन, लेखन, गणित, विज्ञान वगैरे अनेक क्षेत्रात ती आवडीने प्रवेश करतात व मेहनतीने ती जिंकून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. यावेळी त्या प्रदेशात जी प्रगती होते, जे अधिकाधिक ज्ञान मिळते त्यांच्याच ती आनंद अनुभवीत असतात. म्हणजे प्राणीमात्रांत असलेली जिज्ञासा, निरनिराळ्या प्रदेशात प्रवेश करून शोध करण्याची वृत्ती, अडचणी आल्या की त्यांच्यावर चढाई करून सरशी
मिळविण्याची वृत्ती, व एकंदरीत नैपुण्य मिळविण्याची लालसा या ज्या स्वाभाविक वृत्ती आहेत त्यांच्याच मदतीने मूल मेहनत करते व प्रगती करते.
तेव्हा चुरस असल्याशिवाय मूल अभ्यास मेहनत घेऊन करणारच नाही, केला तरी थोडा करील व चुरशीने मुले खूप अभ्यास करतात हे म्हणणे सर्वथैव खरे नाही. चुरस नसतानाही मुले पुष्कळच अभ्यास, कामे, नैपुण्य मिळवणे वगैरे गोष्टी करताना प्रत्यक्ष पहावे म्हणजे खात्री होते.
खरे म्हटले तर प्रत्येक मनुष्य बहुतेक तसेच करीत असतो. सर्वांना सामान्य अभ्यासक्रम असल्यामुळे वाटेल तितके इतर विषय तो शिकतो, चढाओढीत सापडला तर थोडी अधिक मेहनत घेऊन न येणारा विषय परीक्षेपुरता तो करतो पण शेवटी त्याच्या बरोबर राहातात, व बाकीचे साफ धुऊन जातात.
आता प्रश्न येतो जगाच्या धकाधकीचा – जगाच्या स्पर्धामय व्यवहाराचा. जिकडे पहावी तिकडे (Keen competition) तीव्र स्पर्धा, तेव्हा तिच्यात टिकून रहाण्याची शक्ती यावयास हवी. म्हणून प्रथम मुलांना दुसऱ्याच्या पुढे कसे जावयाचे याचे शिक्षण देणे.
जगाच्या जढाओढीत एक भाग असतो स्वतःची प्रगती करून पुढे जाण्याचा; दुसरा भाग असतो स्वतःची प्रगती न करता भल्याबुऱ्या मार्गाने पुढे जाण्याचा.
जो अधिक निपुण तो अधिक पुढे असणे यात जगाचे कल्याणच आहे. उत्तम शस्त्रवैद्य उत्तम ठरावा; एंजिनियरींगमध्ये ज्याची बुद्धी उत्तम प्रकारे चालते तोच उत्तम ठरावा; उत्तम गाणाराच उत्तम ठरावा हे योग्यच आहे. त्याकरिता ज्यांच्यांत जी शक्ती स्वाभाविकपणे आहे तिची पूर्ण वाढ होऊ देणे व त्या क्षेत्रात त्या मनुष्यास शक्य असेल तितके नैपुण्य मिळवू देणे व त्याने ते मिळवणे जरुरीचे असते. परंतु प्रत्येकाने आपल्या शक्तीप्रमाणे अधिकांत अधिक नैपुण्य मिळविल्यावरही माणसा माणसात हुशारीचा कमी अधिकपणा राहाणारच. तेव्हा आपण पहिला नंबर मिळविण्याइतके हुशार नसताना इतर रीतीने प्रयत्न करून तो नंबर मिळविणे याचे नाव सध्याच्या जगाची चढाओढ आहे. शिफारसी लावणे, वशिले बांधणे, परीक्षकांवर भीड आणणे, लांच लुचपत देणे, खोटे नाटे काय वाटेल ते करून पास होणे, वर नंबर मिळविणे,
Selection grade मध्ये खास पसंतीत निवडले जाणे याचे नाव जर जगाच्या धकाधकीत टिकणे असे असेल तर शिक्षकाने तरी असेच म्हणावे की आम्ही मुलांना धकाधकीत न टिकण्याचेच शिक्षण देऊ. जग असे आहे म्हणून आपण तसे झाले पाहिजे असेच जर सर्व म्हणू लागली तर जगाची चढाओढ अधिक अधिकच बिघडत जाईल. तिला विद्यामंदिरांनी तरी उत्तेजन देता कामा नये.
जगात चढाओढ आहे व तीस (तिच्यासाठी) मुलांनी तयार झाले पाहिजे या म्हणण्यात तथ्य आहे.
प्रथम तर मुलांनी तुलना करण्यास शिकलेच पाहिजे, व इतर मुलांत मिसळले म्हणजे त्यांच्यात आपण कोठे आहोत ते त्यांना सहज दिसून येते. रामाची सर्व उदाहरणे नेहमी बरोबर येतात व आपली एक-दोन तरी चुकतातच; गोविंदाचीही चुकतात. पण आपण जर लक्ष देऊन जरा सावकाशीने केली तर रामाच्या बरोबरीने करू शकू, असे गोपाळला जर कळले व शिक्षकांनीही त्याच्या लक्षात आणून दिले, तर गोपाळ रामाप्रमाणे सर्व उदाहरणे बरोबर करण्याचा प्रयत्न करील व यशस्वीही होईल. पण गोविंदाची तशी
शक्तीच नसेल तर शिक्षक अथवा वडील मंडळी त्याला कितीही बोलली व त्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याची सर्व उदाहरणे बरोबर येणे शक्य नाही. गोविंदा या चढाओढीने अधिक हुशार व्हायच्या ऐवजी अधिक निराश, अधिक घाबरलेला, व दीन मात्र होत जाईल. पण तेच शिक्षकांनी त्याची ज्या विषयांत चांगली प्रगती होऊ शकते त्या विषयांत त्याला पुढे जाण्याचे सुचविले, उत्तेजन दिले तर त्या विषयात पारंगत होऊन इतर मुलांच्यामध्ये आत्मप्राशन अथवा स्वतःचे विशिष्ट स्थान घेऊ शकेल.
जशी उंची मोजून कोणी उंच, कोण ठेंगणे, कोण मध्यम हे मुले पाहू शकतात तशी प्रत्येक विषयातील आपापली शक्ती ती मापू शकतात. आपल्याकडून आपल्या शक्तीप्रमाणे शिकस्त प्रयत्न करून जास्तीत जास्त प्रावीण्य मिळविण्याची शिक्षकांनी त्यांना मदत करावयास हवी. स्वतःची आधीची स्थिति, नंतरची स्थिती यांची तुलना करावयास शिकविले पाहिजे.
सारांश, एकमेकांचे नैपुण्य पाहणे, व त्यामुळे आपल्यात ज्या प्रकारचे नैपुण्य नसेल ते मिळविण्याचा प्रयत्न करणे यात काहीच गैर नाही. दुसऱ्यांनी काही चांगलेसे शिवण केले की ते पाहून आपणही तसेच करावेसे वाटणे साहजिक आहे व तशाच रीतीने मुले एकमेकांचे पाहून करीत असतात. दुसऱ्याचे चांगले पाहून ती खूष होतात व आपणही तसे करण्याचा प्रयत्न आपोआप करू लागतात. अशी चढाओढ इष्ट आहे. पण स्पर्धेत एक प्रकारचा कडवटपणा असतो. आणि या मार्गाने पुढे सरकण्याचा प्रयत्न करताना जसे जसे त्याला यश मिळत जाईल तसतशी त्याला एक प्रकारची धुंदी चढते. जिथे मुलांनी दुसऱ्याचे उत्तम काम पाहून खूश व्हायचे, कौतुक करायचे व आपणही तसेच करण्याचा प्रयत्न करायचा, तेथे दुसऱ्याचे चांगले काम पाहून पुष्कळांना वाईट वाटते. त्याला येते अथवा त्याने केले व आपल्याला येत नाही अथवा आपण
केले नाही म्हणून त्याची वाहवा होत आहे; त्याला बक्षिसे मिळतात, त्याची सगळेजण पाठ थोपटतात व आपल्याला काही नाही, असे वाटून कित्येकजण निराश व दुःखी होतात. त्याचप्रमाणे जो उत्तम काम करणारा असतो, पहिला नंबर मिळविणारा असतो तो तरी मोठ्या आनंदात असतो का? त्याला नेहमी
भीती असते की आपले पाहून दुसरे कोणी आपल्याइतकेच चांगले करील की काय ? कोणी आपल्यापेक्षा अधिक चांगले तर करणार नाही ना? या चिंतेमुळे त्याच्या जिवाला चैन नसते. त्याला चांगले येत असून तो कोणाला मदत करण्यास तयार नसतो. आपले कोणाला दाखवीत नाही. मग इतर मुलांची त्याच्या वह्या चोरण्यापर्यंतही मजल जाते किंवा त्याच्या चांगल्या कामावर डाग पाडून किंवा ते घाणेरडे करून टाकण्यासही प्रवृत्त होतात. कित्येकांची ईर्षा, द्वेष मनांतल्या मनात दबा धरून असतातः तो मुलगा परीक्षेच्या वेळी आजारी पडला तर किती तरी जणांना आनंद होतो.
याप्रमाणे स्पर्धा अथवा चुरस ही हानिकारक असते. मुलांच्या निर्व्याज सुखी जीवनात ती विष कालवते.
दुसरे, स्पर्धेमुळे नेहमीच उत्तम प्रावीण्य मिळविले जाते असे नाही. शक्यतो जास्तीत जास्त चांगले काम करण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये न येता वर्गातल्या मुलांत सर्वात चांगले केले की झाले, असे त्यांस वाटू लागते. यामुळे कित्येक हुशार मुले, की ज्यांच्यात पुष्कळ अधिक काम करण्याची शक्ती असते. ती साधारण थोडा अभ्यास करून बसून राहतात. कारण वर्गात पहिला नंबर ठेवला की झाले अशी त्यांची वृत्ती होते.
तेव्हा स्पर्धा याचा अर्थ जर तुलना, एकमेकांचे काम पाहून अधिक चांगले करण्यास प्रवृत्त होणे, एकमेकांकडून शिकून घेणे, असा असला तर ती चांगली आहे. घरच्या घरी व एकटे राहून मूल जितके शिकेल त्यापेक्षा जास्त ते चांगल्या हुशार मुलांत राहिल्यास शिकेल हे उघडच आहे. परंतु स्पर्धा याचा अर्थ असा नसतो. दुसऱ्याला मागे टाकणे, हरप्रयत्नाने आपण पुढे जाणे, काही चांगली गोष्ट प्राप्त करावयाची असेल तर ती दुसऱ्याला मिळू न देता आपण मिळविणे, असाच तिचा अर्थ असतो.
इतकेच नव्हे, तर स्पर्धेत जिंकतो त्यास मात्र मानपान, वाहवा, शाबासकी व त्याच्यापेक्षा एक पाऊल मागे असणाऱ्यास मात्र काही नाही! स्पर्धेमुळे सर्वच मुलांना अधिक मेहनत घ्यावीशी वाटण्याऐवजी स्पर्धेत भाग घेणारी दोनचारजण असतात व बाकीची निराश व काहीच न करणारी होतात. आपल्याला कोठे बक्षीस मिळविता येणार आहे? आपण कोठून वर येणार? त्यापेक्षा आपण काहीच प्रयत्न करू नये अशा विचाराने हताश व निष्क्रिय होतात.
स्पर्धा स्वभावसहज आहे. प्रत्येकात ती जन्मत: असतेच. तिचा फायदा का करून घेऊ नये, असे कित्येकजण म्हणतात. वर म्हटल्याप्रमाणे, एकाचे पाहून दुसऱ्याने तसे करण्यास प्रवृत्त होणे, दुसऱ्याचे मिळविलेले प्रावीण्य पाहून आपण तसेच प्रावीण्य मिळविण्यास प्रवृत्त होणे, दुसऱ्याचे मिळविलेले प्रावीण्य पाहून आपण तसेच प्रावीण्य मिळविण्यास प्रवृत्त होणे, यात काहीच वावगे नाही, व या वृत्तीचा फायदा मुलांना अवश्य घेऊ द्यावा. चार मुले वाचीत असली तर पांचव्यालाही वाचावेसे वाटते हे ठीक आहे. परंतु शाळांतून चालू केलेल्या चढाओढीत दुसरीत तत्वे प्राधान्यतः असलेली दिसतात. पहिला येणाऱ्याची, बक्षीस मिळविणाराची जाहीर रीतीने वाहवा होत असल्यामुळे त्याला आढ्यता, गर्व वगैरे वाटण्याचा संभव असतो, व बाकीच्यांना निराशा व दु:ख वाटते व आपल्यात काहीच नाही असेही वाटून त्यांत न्यूनप्रवृत्ती उत्पन्न होण्याचाही संभव असतो.
स्पर्धा नसली तर मुले जास्तीत जास्त एकमेकांना मदत करतात, ज्याला चांगले येते त्यांच्याकडून दुसरी शिकायला तयार असतात, तोही शिकवायला तयार असतो, व खूप नैपुण्य मिळवू या असे वाटून वर्गातील सर्व मुले खूप प्रयत्न करू शकतात. कारण सर्वात पहिले येणे सगळ्यांना शक्य नसले, तरी काल आपण होतो, त्यापेक्षा आज अधिक निपुण होणे शक्य असते व प्रत्येकाला आपल्याला काल येत नव्हते ते आज आले, आज काही नवे शिकलो, आज कालच्या पुढे गेलो याचा आनंद आस्वादता येतो.
स्पर्धेची दुष्ट तत्त्वे काढून टाकली असता शर्यती करीता येतात, परीक्षा घेता येतात, प्रदर्शने करीता येतात, व त्यांत कशात कोण निपुण आहे हेही पाहता येते. त्याचप्रमाणे चुरस असल्याशिवायही मनुष्यात जी स्वाभाविक तीव्र जिज्ञासा आहे, व नैपुण्य मिळविण्याची आवड आहे, त्यांच्या बळावर मुले अनेक नव्या गोष्टी आवडीने शिकतात व पुष्कळांत नैपुण्य मिळवितात.
(शिक्षण पत्रिका, वर्ष ११, अंक ७, डिसेंबर १९४३)

Leave a comment