(पुणे येथील संमेलनांतील श्री ताराबाई मोडकांचे अध्यक्षीय भाषण)
प्रास्ताविक
गुरुवर्य अण्णा, सौ. मालिनीबाई परांजपे व बंधु भगिनींनो, आजच्या शुभदिनी महाराष्ट्राच्या राजधानीवजा असलेल्या या पुण्यनगरीत बालशिक्षणाचे हे संमेलन प्रथमच भरत आहे.
पुणे शहर हे आपल्या प्रांताचे विद्यापीठ आहे. येथे आपल्या थोर देशनेत्यांनी आपल्या राष्ट्रकार्यास प्रथम शिक्षणापासून सुरुवात करण्यासाठी मोठमोठ्या शिक्षणसंस्था स्थापल्या व राष्ट्रोद्धाराचे हे पवित्र कार्य करण्यासाठी स्वतः खरा बाह्मणधर्म स्वीकरला, धनसंपत्ति, हुद्दा, नोकरी, राजदरबारी मानमान्यता वगैरे सर्व जे त्यांच्या अगदी हाताशी होते ते सोडून केवळ राष्ट्रोन्नतीच्या विचाराने त्यांनी आपल्या पुढील पिढीच्या योग्य शिक्षणाने पवित्र कार्य हाती घेतले व आपल्या मागे येणाऱ्या कित्येक पदवीधर विद्वानांना देश कार्याचा हा महत्त्वाचा व शुद्ध मार्ग दाखवून दिला.
या शहराची भूमी ज्ञानसंवर्धनास इतकी अनुकूल झाली की येथे त-हत-हेच्या मोठमोठ्या शिक्षणसंस्था स्थापन झाल्या. महाराष्ट्राच्या व विशेषतः पुण्याच्या मंडळीत मी त्यांची नामावली देण्याची जरूर नाही. परंतु एका लहानशा – कमिट्यांच्या मानाने लहान संस्थेचा थोडा उल्लेख करिते. ती म्हणजे येथील लहान मराठी शाळा.
१९१९ साली मी ती प्रथम पाहिली. पुण्याचे आताचे एक वृद्ध प्राध्यापक ही शाळा त्यावेळी चालवीत होते. आपले प्रो. के. आर. कानिटकर. ती शाळा त्यावेळी मला खरोखर अद्भुत वाटली. तोपर्यंत कधी कोणी विचारही केला नव्हता अशा गोष्टी मला तेथे दिसून आल्या. चौकात एक पाण्याचा हौद व कपडे सुकविण्यास दोरी, आंत शिरतानाच एक मोठा आरसा, वर्गात सुई दोरा व बटणे, शिक्षकांच्या हजेरीपत्रकाबरोबर मुलांचे डोळे, नाक, केस, नखे यांच्या स्वच्छतेची व आरोग्याची नोंद व सर्वात आश्चर्यकारक म्हणजे मुलांना सुट्टीत ऐकण्यासाठी संगीत! वरच्या हॉलमध्ये दुपारचे वेळी संगीतशिक्षक गात होते व ज्यांना कोणाला ऐकायचे असेल त्यांना तेथे जाऊन बसण्याची मुभा होती. मुलांना एक एक वाफा देण्यांत आला होता व टमाटे काकड्या वगैरे घरी नेण्याचीही परवानगी होती. अठ्ठावीस वर्षापूर्वी ती एक साधी प्राथमिक शाळा कोठल्याशा वाड्यात भरत होती. पण तेथेही संचालकांनी मुत्रीची व्यवस्था इतकी अद्यावत केली होती की मी आश्चर्य करीत राहिले.
मी शाळा पहायला गेले त्या दिवशी प्रा. कानिटकरांची व माझी गाठ पडली नव्हती. पण मला सांगण्यात आले की प्राध्यपकांनी माँटेसोरी हे पुस्तक वाचून प्राथमिक शाळेत या सुधारणा केल्या होत्या व अजून पुष्कळच त्यांना करायच्या होत्या.
माँटेसोरी पद्धतीच्या सिद्धांतावर एकदा कॉलेजमध्ये मानसशास्त्राच्या तासांत प्रो.पी. ए. वाडियांनी चर्चा केली होती, ती कानावरून गेली होती इतकेच. त्यानंतर प्रथम या अभिनव पद्धतीशी माझा प्रत्यक्ष संबंध या शाळेत पुण्यात आला व त्याने माझ्या मनावर कायम ठसा उमटविला.
मी म्हणत होते ते हे की या विद्यापीठवजा शिक्षणमय शहरांत इतर अनेक दिशेने अभिनव प्रयत्न झाले व मोठमोठ्या संस्था, महाविद्यालये व विद्यापीठही स्थापन झाले. तेथेच माँटेसोरी पद्धतीचीही किंचित अंशाने सुरुवात झाली होती. त्या या पुणे शहरात आज आपण प्रथमच नूतन बालशिक्षणाची चर्चा करण्यास जमत आहोत त्याबद्धल मला फार आनंद होत आहे.
नवविचारांच्या दृष्टीने पुणे जिंकले म्हणजे सिंहगड जिंकल्यासारखे आहे. अर्थात सिंहगड जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकल्यासारखा आहे. परंतु मी पुणे जिंकण्याची म्हणजे बाहेरून आक्रमण करून पुण्यांत नसलेल्या दुसऱ्याच कांही विचारश्रेणीचे येथे राज्य स्थापण्याची गोष्ट बोलत नाही. पुण्याची विद्वान, अभ्यासू, सखोल विचार व मनन करणारी व नव्या गोष्टी बुद्धीच्या कठीण व सूक्ष्म कसोटीला लावून मग ग्रहण करणारी जनता जे कबूल करील ते महाराष्ट्रास पटणारच अशी एक पुण्याची प्रतिष्ठा आहे. त्यावरून मी पुण्यास पटले की पुणे जिंकले या अर्थाने हा शब्दप्रयोग योजीत आहे.
कोणी म्हणतील की काय पुण्याला नूतन बालशिक्षण पटले नाही की काय ? पटले नाही असे कसे म्हणू? पुण्याला इत्क्या उत्साहाने हे संमेलन भरत आहे, इतक्या मोठ्या संख्येने सभासद आमचे स्वागत करीत आहेत, इतक्या अनेक संस्थांनी आपले प्रतिनिधी पाठविले आहेत व इतके विद्वान व प्रमुख जन येथे आज जमले आहेत. तेव्हा नूतन बालशिक्षणाची आस्था व कळकळ आहेच यात शंकाच नाही. खुद्द पुण्यात आज कित्येक बालशाळा कित्येक वर्षापासून चालल्या आहेत. मतभेद असला तर तो तपशिलांत असेल. बालशिक्षणाची नावीन्यपूर्ण मूलतत्त्वे सर्वांना मनापासून पटली आहेत, म्हणूनच आपण सगळी इतक्या उत्साहाने येथे हे संमेलन भरवीत आहोत.
पुणेकर मंडळीनी आमचे म्हणजे नूतन बालशिक्षणाचे जे हे उत्साहपूर्वक स्वागत केले त्याबद्दल त्यांची मी ऋणी आहे.
ह्या संमेलनाचे श्रेय आपल्या स्वागताध्यक्ष सौ. परांजपे, आमच्या मराठी विभागाच्या चिटणीस सौ. कमलिनीबाई दामले, त्यांच्या कार्यकर्त्या मंत्रिमंडळास व त्यांना पाठिंबा देण्यास तत्परतेने उभे असलेले स्वागतमंडळ यांस आहे. त्यांनी जे इतक्या प्रेमाने आपल्याला बोलावले व स्वागत केले त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. व विशेषतः मला या संमेलनाची अध्यक्ष होण्यास सांगून त्यांनी माझा गौरव केला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. खरं पाहिलं असतां हा गुळाचा गणपती नि गुळाचाच नैवेद्य असे काहीसे आहे म्हणा! तरी या संमेलनाचे धुरीणत्व करताना माझ्यावर जी मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे ती सांभाळण्यात आपण सर्व मला संपूर्ण साहाय्य कराल अशी आशा आहे.
पूर्व प्राथमिक शिक्षण
नूतन बालशिक्षणाचे अनेक पैलू आहेत व ते सर्वच अत्यंत महत्त्वाचेच आहेत. आपल्याला नवे राष्ट्र घडवायचे आहे. नव्हे, नवे जग बनवायचे आहे. नव्या विचारश्रेणीवर उभारलेले समाजजीवन रचायचे आहे. आपल्याला अनेकानेक सुधारणा करावयाच्या आहेत. या सर्व दृष्टीने नूतन बालशिक्षणाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा व पायाभूत आहे. परंतु आपण सगळीच त्याचे महत्त्व तितकेसे अजून मानू लागलो नाही हे आपण कबूल केले पाहिजे. आपण अजून वरवरच विचार करीत असतो. कॉलेज शिक्षणास सर्वात अधिक महत्त्व, त्याच्या खालोखाल हायस्कूलच्या व सर्वात खाली प्राथमिक शिक्षणास देतो. पैसाही त्याच मानाने खर्चिला जातो. घरांत मुलांच्या शिक्षणाकडे लक्षही त्याच मानाने दिले जाते व संस्थेत अध्यापकही त्याच मानाने नेमले जातात.
प्राथमिक शिक्षणापर्यंत उतरत यायचे किंवा चढायची पहिली पायरी प्राथमिक शिक्षण ही ठरल्यावर – शिक्षणाचा मूळ पायाच प्राथमिक शिक्षण ठरल्यावर – त्याच्या आधीच्या शिक्षणास – पूर्व-प्राथमिक शिक्षणास कितपत महत्त्व दिले जाणार? अशी आपल्या बालशिक्षणाची अथवा पूर्व प्राथमिक शिक्षणाची अवस्था आहे.
आजची बालमंदिरे
अर्थात् पुणे-मुंबईसारख्या शहरातून आज पूर्व प्राथमिक शिक्षणाची पुष्कळच आवड उत्पन्न झाल्यासारखी दिसून येत आहे. कॉलेजमध्ये किंवा हायस्कूलमध्येच नव्हे तर आज शिशुविहारांतूनही मुलांना प्रवेश मिळवून घेण्यासाठी पालकांना बरीच धडपड करावी लागते. परंतु केवळ यावरून शहराच्या सुशिक्षित लोकांमध्ये पूर्व प्राथमिक बालशिक्षणाविषयी खरी आस्था उत्पन्न झाली आहे किंवा त्याचे महत्त्व त्यांना पटले आहे असे म्हणता येणार नाही. शहरामधून याची आवश्यकता अधिक भासू लागली असेल कदाचित, परंतु त्याची कारणे निरनिराळी असतील. मुंबईच्या दहा अकरा वर्षाच्या अनुभवावरून मी सांगू शकते की बालशिक्षणाचे खरे महत्त्व समजल्यामुळे मुलांना बालशाळेत पाठविणारे पालक शेकडा तीनही मिळणे कठीण आहे व महत्त्व समजल्यावर त्यासंबंधी स्वतः पूर्ण माहिती मिळविण्याची जिज्ञासा असणारे त्याहून कमी व थोडी जिज्ञासा उत्पन्न झालीच तर त्यासाठी मेहनत करणारे त्याहूनही कमी. सांगण्यास आनंद वाटतो की अगदी हळूहळू, पण ही संख्या वाढते आहे. आमच्या येथील अध्यापन मंदिराच्या पहिल्या वर्षापासून मी अध्यापनाची व्याख्याने शिशुविहारांत येणाऱ्या बालकांच्या मातांकरिता फुकट ठेवली होती. पण त्यावेळी एक अपवाद -सौ. इंदुमती जोगळेकरांचा सोडल्यास कोणीच आले नाही. आता दरवर्षी १२५-१५० मुलांच्या सुशिक्षित मातांपैकी दोन तीन तरी जिज्ञासेने अध्यापन मंदिरात फी देऊन दाखल होतात. एवढी प्रगती नक्की आहे. परंतु ही प्रगती किती मंद गतीने होत आहे हेही आपल्या लक्षात येईलच.
आज शहरांमधून जी शिशुविहारासारख्या बालशाळांची गरज वाढत आहे त्याचे मुख्य कारण बऱ्याच स्त्रिया नोकरी करण्यास जातात व त्यांच्या बालकास २।४ तासच नाही पण ६।७ तास जर कोणी सांभाळले तर त्यांना ते हवे असते. कारण बहुतेक सकाळी १०-१०॥ पासून संध्याकाळी ५॥-६ पर्यंत त्या बाहेर असतात. ही मध्यम वर्गाच्या सुशिक्षित स्त्रियांच्या बालकांची गोष्ट झाली. गिरणीत व कारखान्यात कामास जाणाऱ्या स्त्रियांची बालके तर सकाळी सात पासून संध्याकाळी ६ पर्यंत बालशाळेत ठेवली पाहिजेत. अर्थात त्यांच्या आयांना अजून त्यांच्याकरिता बालशाळा असाव्यात असे वाटू लागले नाही. घरी खेळली काय नी बालशाळेत जाऊन खेळली काय, सारखेच, असे त्यांचे मत असते. परंतु शिकलेल्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांना मात्र अशा बालशाळांची खरी खरी आवश्यकता वाटत असते. त्याचे एक कारण बालशाळा स्वस्त पडते. मुलांना एकटेच सोडून जाण्यास त्यांचे मन घेत नाही. त्यांच्या करिता एक बाई अथवा स्वतंत्र गडी ठेवण्यापेक्षा आपण बाहेर पडू तेव्हा मुले पोचवली व परत येऊ तेव्हा परत आणली व मुलामागे ४-५ रुपये फी दिली तर ते पुष्कळच सोयीचे होईल असे त्यांना वाटते. कारण दिवसेंदिवस घरगडी मिळतही नाही व मिळाल्यास फारच जास्त पगार द्यावा लागतो.
बाकी इतर स्त्रियांची दृष्टी स्वतःला दोनतीन तास विश्रांती मिळावी अथवा तेवढ्या वेळात शिवणाच्या किंवा अशाच काही वर्गात जाता यावे किंवा घरच्या कामास, शिवणे, टिपणे वगैरे फुरसत मिळावी ही असते. हा जो लाभ मिळतो त्या मानाने ४-५ रुपये मुलामागे खर्चण्याची ज्यांना ऐपत असते त्या या बालशाळांचा लाभ घेतात.
बाकी तेथे काही शिकणे नाही, सवरणे नाही, उगाच खेळण्याकरता एवढाली फी कशाला द्यायची असेच पुष्कळांना वाटत असते.
पण जर या शाळेत इंग्रजी शिकवले जात असेल किंवा एका वर्षात दोन इयत्ता करून घेण्यात येणार असल्या किंवा असाच काही विशेष लाभ झाला असता, तर मात्र वाटेल तितकी अधिक फी देऊन या शाळांतून मुलास पाठविण्यात येते. आतापर्यंत नर्सरी स्कूल ही एक श्रीमंतांच्या गरजांतली अथवा फॅशनपैकी एक समजली जात होती. कारण १२-१५ रुपये फी भरून कॉन्व्हेंटच्या नर्सरी शाळांत श्रीमंतांची मुले पाठविण्यात येत असत.
सारांश काय की, आता सांगितलेल्या कारणांनी बालशाळांचा प्रसार शहरांमधून होतो आहे. पण त्यापैकी एकही खरे बालशिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे नाही. श्रीमंतांमध्ये फॅशन आहे म्हणून शिकलेल्या लोकांत लवकर शिकवून वर्षे वाचविता येतात म्हणून, व कामकरी लोकांत सांभाळायला घरी कोणी नसते म्हणून, अशा प्रकारे मुले सांभाळायच्या संस्था निघण्याची वाढती गरज दिसून येते म्हणून बालशाळा वाढत आहेत.
यापैकी एकही प्राथमिक शाळांइतकीच यांची आवश्यकता आहे असे सिद्ध करू शकत नाही.
बालमंदिरांची आवश्यकता
बालशाळांची आवश्यकता आहे याचे दुसरे एक असे कारण सांगतात की आज माता आजाण आहे, पित्यास वेळ नाही, विभक्त कुटुंबे झाली आहेत. त्यामुळे मुलांस वळण लावण्यास घरात कोणीच उरले नाही म्हणून या लहान मुलांच्या शाळा हव्यात. बाकी आया सर्व शिकल्या, त्या आदर्श माता झाल्या म्हणजे त्या घरोघर आपआपल्या मुलांना शिकवतील मग अशा शाळांची जरूर उरणार नाही.
माझ्या मते श्रीमंतांकरिताच नव्हे तर राजापासून रंकापर्यंत सर्व बालकांकरिता बालशिक्षणाच्या शाळा हव्यात. ऐपत असेल त्यांनी शाळेचा खर्च द्यावा, नसेल त्यांनी देऊ नये. मुलांचे प्राथमिक शिक्षण लवकर करण्याकरिता बालशाळा नसाव्यात, त्यांची अक्षरे बाराखडी नी आकडे लवकर संपवून देण्यासाठी किवा इंग्रजी शिकवण्यासाठी या शाळा नाहीत. पण प्राथमिक शाळेत जाण्यापूर्वीच्या वयात लहान मुलांना काही विशेष शिकायचे असते, त्याकरिता या शाळा हव्यात. कामकरी स्त्रियांच्या मुलांकरिता बालघरे म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुले राहू शकतील अशी व्यवस्था असलेल्या शाळा हव्यात. पण त्या नुसत्या मुले संभाळण्याच्या जागा नसून मुलांच्या शाळा अथवा घरेच होत. शिवाय अशिक्षित व आजच्या अजाण मातांच्या बालकांसाठी बालशाळा हव्यात व उद्या सर्वजणी शिकून बालशिक्षणतज्ञ झाल्या तरी त्यांच्या मुलांकरिताही बालशाळा लागतीलच.
अर्भकावस्थेतील वाढ
मूल दोनअडीच वर्षाचे होईपर्यंत त्याची अर्भकावस्था असते. गर्भावस्थेपासून त्याच्या मनावर काही काही संस्कार घडत असतात. जन्माला येऊन ते जसजसे मोठे होत जाते, तसतसे ते बाह्य जगाची छाप अधिकाधिक संग्रहित करू लागते. परंतु त्या काळात त्याला दुसरे एक कार्य असते. मूल दीर्घ काळापर्यंत असहाय व अविकसित स्थितीत असते. कुत्र्यामांजरांची पिले ८-१० दिवसात डोळे उघडून मोठ्यांसारखी धावू पळू लागतात व थोड्याच दिवसात सर्व खाऊ पिऊ लागतात. आपल्या बालकांस आपल्यासारख्या सर्व क्रिया करता यावयास सामान्यतः पहिली सबंध दोन वर्षे लागतात. कधी सहा महिने, वर्ष, अधिकही लागते. या काळात त्यांची प्राथमिक, शारीरिक वाढ जेव्हा होत असते तेव्हा बौद्धिक वाढही चालूच असते. आपण सर्व मुलांची पहिल्या दोन वर्षाची वाढ फार कौतुकाने पाहात असतो व एकमेकांना सांगत असतो. मूल जन्मल्या दिवशी अगदीच लोळागोळा असते, तेव्हापासून दोन वर्षापर्यंत सुट्टे धावू पळू लागेपर्यंतचे सर्व टप्पे आपण कितीतरी कौतुकाने व बारकाईने पाहात असतो. आज बाळ मान धरू लागले, कुशीवर वळू लागले, पालथे पडले, उभे राहिले, सुट्टे चालू लागले वगैरे वगैरे.
त्याचप्रमाणे डोळ्याने ते पाहू लागले, माणसे ओळखू लागले, आवाज ओळखू लागले, साडी ओळखू लागले, वगैरे अनेक नव्यानव्या कोणत्या गोष्टी बाळ शिकले ते आपण अगदी न कंटाळता बघत असतो व त्याच्या प्रत्येक बारीकसारीक प्रगतीचा आपल्याला आनंद होत असतो!
पहिल्या दोन वर्षांतही मुलाला एकंदरीत बराच मोठा अभ्यासक्रम पुरा करावयाचा असतो व तो ते झपाट्याने करीत असते. त्यात मुख्यत्त्वे शारीरिक विकास व निरनिराळ्या अवयवांचा उपयोग करावयास शिकणे ही कामे असतात. उदाहरणार्थ, आपल्यासारखे बहुतेक दात दाढा वापरून चावून खाता येणे ही एक मोठी गोष्ट असते. ती पुरी होण्यास वर्ष दीड वर्ष लागते. नंतर नीटपणे उभे राहून चालणे, धावणे, उड्या मारणे, चढणे व उतरणे ही दुसरी फार महत्त्वाची गोष्ट मुलांना ‘माणसासारखा माणूस’ होण्यासाठी शिकायची असते. दात येणे, उभे राहून चालणे या दोन्ही बऱ्याच अंशाने शारीरिक विकासात मोडतात.
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली भाषा शिकून बोलायला लागायचे काम मुले याचवेळी करीत असतात. ‘भाषा शिकणे’ हा लहान मुलाच्या बुद्धीचा अचाट प्रयोग असतो हे आपल्या लक्षात येत नाही. अक्षरे उच्चारता येणे हे तर एक त्यांना शिकायचेच असते. पण त्या निरनिराळ्या आवाजाच्या समूहांना निरनिराळे अर्थ आहेत ते समजून घेऊन बरोबर त्याच अर्थाने ते वापरायला लागणे म्हणजे फार मोठे कठीण काम यावेळी प्रथमच मुले करीत असतात.
या दोन अडीच वर्षांच्या अर्भकावस्थेत मुलांच्या शिक्षणात आपण वडीलमंडळी त्यांना पुष्कळ मदत करीत असतो. त्या काळात त्यांना बऱ्याच अडचणी त्यांना जाणवतात. त्या दूर करण्यासही तयार असतो. व मूल त्याच्या प्रगती पथावर जसजसे पुढे जाते त्या प्रत्येक गोष्टीची मोठ्या मंडळींकडून फार आनंदाने नोंद केली जाते.
बाल्यावस्थेचा संस्कारक्षम काळ
दोन अडीच वर्षाच्या वयाला मूल आपली प्राथमिक वाढ संपवून लहान प्रमाणात संपूर्ण मनुष्य बनतो. मुलाच्या शरीराची उंची व जाडी, त्याचप्रमाणे मुलाच्या बुद्धीसामर्थ्याचीही अद्याप पुष्कळच वाढ व्हायची असते. परंतु त्याला चालता बोलता व खाता येऊ लागलेले असते म्हणजे ते अर्भकावस्थेतून बालअवस्थेत येते. यावेळी ते त्याच्या आयुष्याच्या महत्त्वाच्या काळात प्रवेश करते. या काळात मूल जास्तीत जास्त शिकत असते. याच काळात त्याची जिज्ञासा अत्यंत तीव्र असते. ग्रहणशक्ती सर्वात अधिक सतेज असते. सामाजिक संबंध बांधणे म्हणजेच त्या संबंधाची मनाची घडण याचवेळी तयार होत असते. वर्तनाचे व काही अंशी विचाराचे वळण अथवा छाप (Pattern) ह्याचवेळी बनत असते. मनाच्या आवडीनिवडी, विरोध, शारीरिक सवयी, मनाचे कल, एकमेकांशी वागण्याच्या रीतीभाती वगैरे सर्व बहुतांशी या अडीच ते सात किवा आठ वर्षाच्या वयात मुलाच्या विशेष संस्कारक्षम काळात घडत असते. बौद्धिक, भावनाविषयक, क्रियाशक्तीविषयक सर्वप्रकारचे वळण सामान्यतः त्याला या काळात मिळत असते. स्वतःच्या प्रयत्नाने, दुसऱ्याच्या मदतीने व बालमित्रमंडळीच्या साहाय्याने शिकायला मूल या काळात अत्यंत उत्सुक असते. ते सहसा थकतच नाही, जागेपणी काम व थकवा आला की झोप या दोन अवस्था त्याला स्वाभाविक असतात. अशी ही त्याची बाल्यावस्था असते. याकाळात त्याला ज्ञानाचा एकही प्रदेश कंटाळवाणा वाटत नाही. त्याला खगोलशास्त्र सांगा, भूगर्भशास्त्र सांगा, शारीरिकशास्त्र काय, भूमिती काय, भाषेतील काव्य काय की व्याकरण काय – प्रत्येक प्रदेशात उत्सुकतेने त्यांची बुद्धी वावरण्यास तयार असते. कारण ही सर्वच नव्याची नवलाई असते. हे काय? हे काय? हे काय? नव्या जगाची अद्भुतता त्याच्या मनाला जादूप्रमाणे भारून टाकत असते.
त्यांच्या बुद्धीला जसा व्यापार हवा असतो व कितीही दिला तरी कमीच पडतो, त्याच्याहीपेक्षा अधिक त्याचे हातपाय क्रिया मागत असतात. मूल एका जागी बसून मास्तराने तोंडाने शिकवलेले कानाने ऐकून शिकायला तयार नसते. ते म्हणते, मला स्वतः अनुभव घेऊन बघू द्या. मला स्वतःला त्यावर विचार करून माझा अनुभव ताडून पाहू द्या. त्यावरून सिद्धांत शोधून काढू द्या.
आपण म्हणतो हा बाब्या आता फार अवखळ झाला आहे. एक क्षण स्वस्थ बसत नाही. अत्यंत खोडकर झाला आहे. त्याच्या खोड्यांनी आमचे डोके पिकवले, आता त्याला धाक दाखवलाच पाहिजे. मग काहीजणी म्हणतात, ‘बाब्या, थांब हं, आलेच मी काठी घेऊन.’ काहीजणी म्हणतात, ‘बाब्या, हे संध्याकाळी घरी येऊ देत. तुला असा मार देववीन!’
बिचारा बाब्या! नि बिचारा बाबी!
त्यांना लागते बकासुराची भूक. त्यांचे हातपाय लागतात चळवळायला, जणू खोपोलीच्या विजेचा पट्टा चढवला आहे त्यांचा हातापायावर! व आपण त्यांना सांगतो गप्प बसायला. फक्त बाहेर जाऊन खेळायचे. गडबड करायची नाही; कपडे मळवायचे नाही; कारण चढले तर पडून हातपाय तुटायचा संभव असतो; कुठे काहीच करायचे नाही साधारणपणे; सरकार सांगते सात किंवा सहा वर्षापर्यंत शाळेतही यायचे नाही. शिकलेले लोक सांगतात, त्यांना मोकळं राहू द्या शक्य तितके जास्त दिवस. कशाला हवा तो कोंडवाडा इतक्या लवकर? याप्रमाणे या काळात या बालकांची कुचंबणा होत असते. बालक निष्क्रिय राहू शकत नाही, त्याचे हातपाय त्याला स्वस्थ बसू देत नाहीत, त्याची जिज्ञासा त्याला कशाला तरी हात लावल्याशिवाय, उचलल्याशिवाय, उलटेपालथे केल्याशिवाय, आपटल्या धोपटल्याशिवाय, चढल्या पडल्याशिवाय राहू देत नाही; मग बाब्या करतो बंड. मार खातो. शिव्या खातो. कोडगा होतो. पण करायचे ते करीतच असतो. शेवटी आई हात टेकते. वडिलांना सांगते, “याला कोठे तरी अडकवून टाका. तो काही मला ऐकत नाही.”
अशी कित्येक मुले शिशुविहारात येतात. आई अगदी प्रामाणिकपणे व विश्वासाने आमच्या कानांत सांगते, “खरे सांगू का? मुलगा फारच व्रात्य आहे. तुम्हाला अगदी विशेष लक्ष ठेवावे लागेल. जरा त्रासाचे होईल सुरुवातीला. मी अगदी हरले नी म्हणून आणला आहे इथं.”
आम्ही म्हणतो, ‘काही हरकत नाही. आम्ही अगदी विशेष लक्ष ठेवू.’ अशा शंभरापैकी ९९ मुले त्यांना योग्य उद्योग मिळाल्यामुळे, जिज्ञासा तृप्तीची साधने मिळाल्यामुळे, शरीराच्या योग्य हालचालीला वाव मिळाल्यामुळे, इतर मुलांचा सहवास, त्यांच्याशी थोडीशी धडपड, गडबड, मारमारीही करून शक्ती अजमावून घेण्यास व मैत्री साधण्यास अवकाश मिळल्यामुळे व एकंदर व्यवस्थित नियमनशील (disciplined) जीवन जगण्यास मिळाल्यामुळे अगदी सुखी व अगदी सरळ झालेली दिसतात. त्यांचा अवखळपणा, व्रात्यपणा, खोडकरपणा, हट्टीपणा पार नाहीसा होतो. आईला नकोनकोसे करणारे मूल हेच की काय अशी शंका वाटू लागते.
सारांश काय? दोन ते सात वर्षातील काल हा सर्व परीने अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत नाजूक व अत्यंत संस्कारक्षम काळ आहे. व बाबीच्या वयाच्या मानाने हाच काल सर्वात अधिक शिक्षण घेण्यास योग्य असतो. हाच बालशिक्षणाचा काल होतो. तो आपण तात्त्विकदृष्ट्या शिक्षणाच्या पुस्तकातून मान्यही करतो. व्यवहारात मात्र ही वर्ष घरीच इकडेतिकडे कशीतरी काढण्यासारखी समजली जातात. हा काल निघून गेल्यावर आपण त्यांच्या शिक्षणास सुरुवात करतो व प्राथमिक, माध्यमिक व उच्चशिक्षणास उत्तरोत्तर चढत्या प्रमाणात महत्त्व देत असतो. ही आहे वस्तुस्थिती.
अद्याप आपण बालशिक्षण खरेखुरे स्वीकारले नाही मग त्यातील नूतनतेची तर गोष्टच कशाला?
शिक्षणशास्त्राची प्रगती
आपण तेथे नूतन बालशिक्षणाचे संमेलन भरवीत आहोत. अर्थात आपला भर नूतनतेवर आहे. प्रत्येक दिशेने विज्ञान अथवा शास्त्र नवे शोध अथवा विचार करित आहेत. शिक्षणशास्त्रातही तशी विचारांतरे झाली. त्यात मुख्यतः दोन युगे कल्पावी लागतील. शिक्षणविषयक विचारात प्रथम विचारक्रांती केली किंडर गार्टनने किंवा बालोद्यान पद्धतीने व दुसरी माँटेसरी पद्धतीने. दोन्ही बालशिक्षणाच्या पद्धती, पण त्यांनी शिक्षणविषयक विचारांत मूलतः क्रांती घडवून आणली.
आपण साधारणपणे किंडरगार्टन, माँटेसरी सगळे एकाच अर्थाने शब्द वापरीत असतो. दोन्ही पूर्वप्राथमिक बालशिक्षण पद्धती आहेत. त्या दृष्टीनेही दोन निरनिराळी युगे आहेत. व एकाच्या पुढचे दुसरे आहे असे म्हटले पाहिजे.
सक्तीचे अंधारे युग
मध्यांतरी शिक्षणविषयक जुलूमाचा काळ सर्वत्र चालू होता. मुलाला मारून सक्त शिक्षा करूनच शिकवण्यात येत असे. व ही स्थिती सर्वत्र सारखीच होती. शिक्षणाचे विषय धर्मशास्त्रेही असत. भाषा संस्कृत, लॅटिन अथवा ग्रीक असावयाची. काही थोडे हिशोब, सुंदर अक्षरात नकला करणे हेही शिक्षणाचे एक महत्त्वाचे अंग असे. सर्वात महत्त्वाचे कार्य असे तोंडपाठ करणे. छडीचा उपयोग मुक्तहस्ते होत असे. कारण प्रचलित समजूतच तशी होती की मनुष्य हा स्खलनशील प्राणी आहे. अधोगामी आहे. दुष्प्रवृत्त आहे. त्याचे दमन केलेच पाहिजे. दंडन केले पाहिजे, ताडन केले नाही तर विद्या येणे शक्य नाही. सन्मार्गावर मुलांस ठेवण्यासाठी व त्यास शिक्षण देण्यासाठी देहदंड हा आवश्यक आहे.
शिक्षणशास्त्रज्ञ व शिक्षणखाते काहीही म्हणोत, सामान्य जनता आजमितीपर्यंत ह्याच तत्त्वाचे अनुरोधाने वागत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की सामान्य जनता मनाच्या आवेगाप्रमाणे वागते. क्रोधाच्या आवेशात प्रथम मारणे, मुलाच्या हिताच्या दृष्टीने मारले पाहिजे असे नंतर म्हणणे ही अगदी रोजचे परिचयाची गोष्ट आहे.
किंडरगार्टन युग
त्यावेळी केवळ मुलांचे हे हाल पाहावेनात, पटेनात, मूल प्रसन्न असावे, प्रसत्र चित्तानेच ते शिकू शकते या तत्त्वावर फ्रोवेलने एक नवाच उपक्रम केला. मुलाला आनंदात ठेवून काय शिकवायचे ते मी शिकवीन, त्याला जे जे प्रिय आहे ते ते पाहून त्याच्या द्वारा शिकवीन असा या जर्मन शिक्षणतज्ञाने चंग बांधला. तेच किंडरगार्टन पद्धतीचे प्रणेते होते.
ते महान बालप्रेमी होते. मुलांची शाळा म्हणजे फुलांच्या फुललेल्या बगीचासारखे एक आनंददायक स्थळ असावे या कल्पनेने त्यांनी शाळा हे नाव काढून टाकून बालोद्यान – किंडरगार्टन – असे नाव बालशाळेस दिले व बालशाळेत शिकविण्याची पद्धतीही पार बदलून टाकली.
या वेळेपासून शिक्षणक्षेत्रात एक महान युगपरिवर्तन झाले. शिक्षक मुलाकडे निराळ्या दृष्टीने पाहू लागला. त्याला काय आवडते? ते प्रसन्न कशाने राहू शकते? त्याचे लक्ष एकाग्र कशाने राहू शकते? कशावर राहू शकते? किती वेळ राहू शकते? मुलांच्या संबंधीच्या या बाबींचा आता तो अभ्यास करू लागला. आता बालक हे शिक्षणाच्या केंद्रस्थानी आले व त्याला प्रसन्न ठेवून कसे शिकवता येईल याचा विचार होऊ लागला. याच्यामधून आमच्या प्रत्येक शिक्षणपद्धतीचा जन्म झाला. मुलाला प्रश्न कसे विचारावे, त्याला काय सांगावे? किती सांगावे? समजावून कसे द्यावे वगैरे वगैरे. याशिवाय शिक्षणसाहित्यही यामधूनच जन्माला आले. बालकाचे लक्ष आकर्षित करून घेण्यास व त्याला समजावून देण्यास सुगम करण्यासाठी काळ्या फळ्यापासून नकाशे, चित्रे, नमुने आदि अनेक शिक्षणसाहित्य (teaching aids) यामधूनच विकास पावले.
थोडक्यात म्हणजे आज प्राथमिक शाळेपासून सेकंडरी ट्रेनिंग कॉलेजमध्ये विद्वान प्रोफेसर जे जे सांगत असतात ते सर्व या किंडरगार्टन युगाचे फळ आहे. शिक्षणपद्धती व साहित्य यांचा इतका शोध झाला व जवळ जवळ त्यांना पूर्णत्वाला पोचविले तरी शिक्षकांपुढे वर्गात अनेक प्रश्न उभे राहूच लागले व त्याकरिता त्यांना काहीतरी नव्या युक्त्या शोधाव्या लागल्या. स्पर्धा, मार्क, नंबर, बक्षिसे, पास नापास, नंबर खाली वर उतरवणे, जाहीर समारंभात बक्षिसे देणे वगैरे अनेक नव्या युक्त्या शिक्षकांनी मुलांचे लक्ष अभ्यासाकडे वेधून घेण्यास, त्यांना कसोशीने प्रयत्न करायला लावण्यास व अभ्यासात गोडी उत्पन्न करण्यासाठी काढल्या. इतके करूनही शिक्षा ही राहिलीच. बरीच कमी झाली, तिचे रूप बदलले, शारीरिक शिक्षा कमी झाली. छडी मारायचा अधिकार फक्त हेडमास्तरांनाच राहिला. शरीरदंडाऐवजी अपमान करणे, चारचौघात फजिती करणे, वर्गात अथवा बाहेर उभे करणे, मागाहून थांबवणे वगैरे अनेक प्रकारे शिक्षेच्या स्वरूपात उत्क्रांती झाली, पण शिक्षेचे उच्चाटन झाले नाही. या ना त्या रूपात ती राहिली खरी. प्रमाण कमी झाले असेल कदाचित, पण शिक्षणशास्त्रांनी तिची आवश्यकता मानली. त्याप्रमाणे दंडयुगामधून किंडरगार्टन युग निघाले. त्याने शिक्षणक्षेत्रात फारच मोठी क्रांती होती.
माँटेसरी युग
त्यानंतरची मोठी विचारक्रांती ती माँटेसरी विचारांची. माँटेसरी पद्धतीच्या शाळांचा आज जगभर फार मोठा प्रचार झाला नसेल कदाचित. परंतु माँटेसरी नूतन सिद्धान्तांची छाप आजच्या शिक्षणविषयक सर्व सुधारणांवर आहे यात शंकाच नाही. मॅडम माँटेसरीचे सिद्धांत अत्यंत क्रांतीकारक आहेत व मानसशास्त्रास धरून आहेत. त्यांनी चार अगदी नव्या सिद्धान्तांवर आपली पद्धती रचली आहे.
चार सिद्धांत
पहिला सिद्धांत आहे बालकाचे स्वातंत्र आणि स्वयंस्फूर्ती. काय शिकायचे, किती शिकायचे, केव्हा शिकायचे, किती वेळ शिकायचे ते मुलावर सोडले पाहिजे. त्याला अभ्यासक्रम व वेळापत्रक याने बांधून टाकू नका. त्या बाबतीत त्याला स्वतंत्र राहू द्या. त्याच्या अंतःस्फूर्तीला अनुसरून त्याला स्वतः आपला विषय पसंत करू द्या. त्याला गोडी आहे तोपर्यंतच शिकू द्या. गोडी संपली की तो तो पुरा करील. आपण घंटा करून ठरवायचे की हा विषय ठेवायची वेळ झाली आहे व दुसरा द्यायची वेळ झाली आहे, हे हास्यास्पद आहे. या एका गोष्टीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी येतात. सर्वांची यथासांग चर्चा येथे उपयोगी नाही परंत मुख्य म्हणजे शिक्षकाचे काम मुलाने अमुक शिकावे व इतक्या वेळात शिकावे हे नक्की करण्याचे नाही. मूल वाढत असते, त्याची विशिष्ट काळात विशिष्ट वाढ होत असते व त्याप्रमाणे त्याची विशिष्ट शिकण्याची तयारी आतून आलेली असते, त्याला शिकण्यास अनुकूलता करून देणे एवढेच शिक्षकाचे काम आहे. याप्रमाणे डॉ. माँटेसरीनी पहिलाच सिद्धान्त पूर्वीच्या सर्व विचारांना उलटून देणारा मांडला आहे व तो अगदी खरा दिसून येतो.
आपण वर्षानुवर्षे जगभर सर्वांना सारखा अभ्यासक्रम ठेवून सारख्या वेळात तो करून घेण्याचा प्रयत्न करण्याचा फार मोठा जागतिक प्रयोग अगदी अट्टाहासाने केला. पण त्यात निष्फळच ठरलो. व्यक्ती आतून स्वतःच्याच गतीने वाढत असते हे आपल्याला आज स्वीकारावे लागत आहे.
दुसरी मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी वर्गपद्धती काढून टाकली. प्रत्येक व्यक्तीत प्रगतीची व शिकण्याची गति सामान्यतः वेगवेगळी असते व निरनिराळ्या कालावधीत पण वेगळी असते. याचा अर्थ असा नाही की, मुलांनी एकमेकांत मिसळायचेच नाही, पण शिक्षकाने नक्की केलेला वर्ग नसायचा व वर्ग बदली शिक्षकाने करायची नाही. नापास म्हणून मागे ठेवणेही शिक्षकाने करायचे नाही. पुष्कळदा स्वतः मुलांना स्वतःच शिकू देणे, स्वतःच्या प्रयत्नाने,स्वतःच्या विचाराने, अनुभव ताडून तोलून त्यावर सिद्धान्त बांधून शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तिसरी गोष्ट स्वतःनियमन (Self-discipline), ही फारच महत्त्वाची पायाभूत गोष्ट आहे. चारित्र्य घडणाच्या पायांत मनुष्याने ते स्वतः बनवून त्याला तो एक स्वभावधर्म झाला आहे की वरून लादलेल्या शिस्तीच्या, नियमांच्या व शिक्षेच्या भयाने आलेली ती तात्पुरती शिस्त आहे. ही फार बाब महत्त्वाची आहे.
माँटेसरीनी एक दोन आणखी नव्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या आहेत. त्यांनी शिक्षणाचे वय २ ते २॥ ला सुरुवात करण्याचे ठरविले. ते मुलाच्या सायकॉलॉजिकल अवलोकनावरूनच त्या ठरवू शकल्या. आमचाही अनुभव आहे की याच वयात मूल बालशाळेत आल्यास जास्तीत जास्त लाभ मिळवू शकते. दुसरे म्हणजे इंद्रिय शिक्षणावर त्यांनी दिलेला भर व त्याकरिता त्यांनी साधने रचली ती फारच शास्त्रीय आहेत. गेली २५ वर्षे मी रोज मुलांच्या हातात ती वापरली जाताना पाहाते व रोजच्या रोज मला ती अधिकच पटत जातात.
थोडक्यात म्हणजे बालशिक्षणात नूतनता अथवा जे नवे युग आहे ते या सिद्धांतावर उभारलेले आहे. अद्याप याचा प्रचार व्हावा तितका झाला नाही. परंतु मनुष्याची खरी प्रगती या दिशेनेच आहे असा विश्वास वाटू लागतो. जो जो जास्त विचार करावा व हे सिद्धांत अमलात आणावेत व नवीन मानसशास्त्र, मनोविश्लेषणशास्त्र वगैरे आधुनिक विज्ञानाचा जो जो अभ्यास करावा तो तो शिक्षणक्षेत्रातील हे युग बरोबर योग्य सिद्धान्तावर सुरू झाले आहे अशी खात्री पटू लागते.
दोन बाजू
या युगाच्या दोन बाजू आहेत. एक घर व एक शाळा. कोणतीही एक घेऊन बोलायचे नाही. दोन्हीही घ्यायला पाहिजे. आज मॅडमनी शाळेचीच बाजू अधिक विकसविली आहे. तर त्यांच्या सुझन ऐझाक सारख्या शिष्येने याच्याविषयीही पुष्कळ लिहिले आहे, पण शाळा म्हटली तरी त्यांत शिक्षक व मातापिता दोघांच्या सहकाराचा प्रश्न येतोच. तेव्हा हा फक्त शिक्षकांचा प्रश्न नसून सामान्य जनतेचा व विशेषतः मातेचा आहे असे मला आज येथे जमलेल्या सर्व भगिनीच्या लक्षात आणून द्यायचे आहे.
पुरुष वर्गाची बाजू
मी भगिनींना उद्देशून आता बोलते म्हणजे बंधूंचा याच्याशी काही संबंध नाही असे नाही. बालकांचा प्रश्न सबंध मनुष्य जातीचा प्रश्न आहे. बालकांचे मानसिक संवर्धन एकट्या मातेकडून किंवा एकट्या पित्याकडून नेहमी अपुरे राहील. स्त्री व पुरुष तत्त्व मिळूनच संपूर्ण कुटुंब होते व बालकास संपूर्ण कुटुंबाचे वातावरण त्याच्या शारीरिक व मानसिक संवर्धनासाठी हवे असते. यासाठीच बालशाळेतही मी फक्त शिक्षिका ठेवण्याच्या पक्षाची नाही. पुष्कळांना वाटते की अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये आहे म्हणून आपल्याकडचे प्राथमिक शिक्षण, निदान पूर्व प्राथमिक शिक्षण तरी केवळ स्त्रियांच्याच हातात असावे. मी म्हणते, एखाद्या मुलाच्या दुर्भाग्याने वडील वारले तरी मुलाच्या काका किंवा मामाला वडिलांची जागा भरून काढावी लागते. परंतु नुसत्या स्त्रियाच असलेल्या घरांत मुलांचे संवर्धन नीट होतच नाही. तेव्हा पुरुषांनी याकडे मुळीच लक्ष न देऊन कसे चालेल? शिवाय आतातर प्रत्येक प्रश्न राष्ट्र उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तेव्हा बालशिक्षणाची उभारणी कोणत्या सिद्धांतावर करावी हा प्रश्न तर विशेषच महत्त्वाचा आहे. शिवाय आपल्या स्त्रिया शिक्षणात व नियमन चालविण्यांत अजून जोपर्यंत बऱ्याच मागे आहे तोपर्यंत बरेच दिवस पुरुषांनी बालकांच्या घरच्या शिस्तीत शिक्षणाच्या बाबतीत व स्त्रियांना नूतन सिद्धांत समजावून देण्याच्या कामी प्रामुख्याने भाग घेतला पाहिजे. अर्थात ‘घरी येणे झाले की मार देववते’ असे म्हणून स्त्रियांनी पुरुषांकडून मुलांना मार देण्याची अपेक्षा ठेवायची व पुरुषांनी ती पूर्ण करायची ही भूमिका आता त्यांनी सोडून द्यावी. व स्वतः या बाबतीत जरा डोके घालून थोडा फार शास्त्रीय अभ्यास करावा अशी माझी त्यांना विनंती आहे.
स्त्रियांना संदेश
भगिनींना मात्र माझे आग्रहाचे सांगणे आहे की ईश्वराने आपल्या बालकांना आपल्या पोटी नऊ महिने वागवून जन्म देण्याचा जो विशेष अधिकार दिला, पुरुषांपेक्षा आपल्यांत एवढी श्रेष्ठता ठेवली, आपल्यावर अधिक जबाबदारी सोपविली, त्या मानाने आपण अधिक पुढे असायच्या ऐवजी प्रत्येक बाबतीत मागे राहिलो. आपण शरीरप्रकृतीने खालावलो आहोत. खरे पाहिले असता उत्तम सुदृढ बालकांना जन्म देण्याचे आपले काम आहे. त्याकरिता आपण आपली शरीरप्रकृती सुदृढ ठेवणे अवश्य आहे. आपली मानसिक प्रकृति आपण त्याहून अधिक वाईट करून घेतली आहे. आपला मानसिक (ज्ञानतंतूंचा) समतोलपणा, शहाणपणा, स्थिरपणा बऱ्याच अंशी आपण गमावून बसलो आहोत व त्यामुळे आपल्या मुलांनाही तसाच वारसा देत आहोत. खरे पहाता आज आपण जगाला आपल्या पोटी जन्म देऊन आपल्या मांडीवर व आपल्या अंगाखांद्यावर वाढवीत आहोत, सबंध जगाला – जगातील हिटलरांना, जगातील गांधीना- एकूण एकांना आपण आपले दूध पाजून हिंदोळून, गाणी गाऊन वाढवतो आहोत, तर जगाला वळण लावण्याची केवढी महान शक्ती आपल्या हातात आहे याची आपण कधी कल्पना केली नाही. आदिशक्ति म्हणजे केवढी शक्ती आहे ते आपण विसरतो. आपण काय, बायका! आपल्या हातात काय आहे? असे म्हणून आपण गप्प बसतो. ते उपयोगाचे नाही. पुरुषांनी प्रत्येक गोष्टीचे शास्त्र बनवले. पत्ते पळायचे शास्त्र, टेनिसचे शास्त्र, फार काय चोरी करायचेही शास्त्र, एकमेकांचे जीव घेण्याचे तर महान शास्त्र व त्यात महान वैज्ञानिक शोध त्यांनी केले. आपण फक्त एकाच शास्त्रात संशोधन केले व त्या शास्त्रावर पूर्ण प्रभुत्त्व मिळवले तर पुरे आहे, ते म्हणजे मुलांना वाढविणे. खरोखर ! किती महत्त्वाची गोष्ट आहे ही! पण आपल्यापैकी चांगल्या चांगल्या शिकलेल्याही या शास्त्राकडे थोडे लक्ष देतात असा माझा अनुभव आहे. कोणी व्यक्तिगतपणे लावून घेऊ नये. परंतु माझा सर्वसाधारण अनुभव आहे की या गोष्टीचा सखोल शास्त्रीय अभ्यास, प्रयोग, संशोधन वगैरे आपल्या देशांत अद्याप सुरूच झाले नाही. सामान्यतः त्या त्या वेळच्या भावनेच्या आवेगात जे सुचेल तसे आपण वागत असतो. कधी पूर्वनियोजित तर नसतेच. बहुतेक प्रथम ‘नाही’ म्हणायचे. मग मूल फार रडू लागले की ‘हो’ म्हणायचे, चिडायचे, रागवायचे, मारायचे, लालूच दाखवायची, स्पर्धा उत्पन्न करायची, तोंडावर स्तुतिनिंदा, टीका करायची, रूपावरून बोलायचे, व्यंगावरून बोलायचे, हुषारीवरून, मंदतेवरून बोलायचे – एक की दोन? अनेकगोष्टी आपण उलगडून अथवा विचारांच्या अभावाने करीतच असतो. शिस्त म्हणजे काय याची तर आपल्याला मुळीच कल्पना नाही. कधी उगीच कडक तर कधी उगीच नरम. पुष्कळदा आपणच मुलांबरोबर मूल होत असतो. त्यांच्याचसारखा आपणही हट्ट करीत असतो. आपणच अगदी अव्यवस्थित असतो. आपल्याला की आपल्या घराला काही वळण नसते व मग एखादे वेळी मुलांना खूप बोलतो. मुलांच्यापुढे खरी मूल्ये तर बहुधा ठेवीत नाही. आपलीच मूल्ये मुळी कोठे योग्य असतात ढोग, दंभ, असत्य, लोकांना दाखविण्यापुरते त्यात कितातरी असते? असामाजिक किती असतो? एक की दोन की पंचवीस? किती गोष्टींचा येथे उल्लेख करू ? खरोखर मनापासून अत्यंत दुःख होते आयांचे हे अज्ञान पाहून. बाकीच्या सर्व बाबतीत अज्ञानी राहिल्या व एक शरीर व मन सुंदर बनवायचे एवढे एकच शास्त्र स्त्रिया शिकल्या तर त्या जगात आज आहेत तेवढ्या मागासलेल्या राहाणार नाहीत.
आपण पुरुषांपेक्षा कमी आहोत, त्यांच्या मागे आहोत असे जेव्हा स्त्रीच्या लक्षांत आले तेव्हापासून पुरुषांच्याबरोबर येण्यासाठी तिने खूप प्रयत्न केला. पण ती अजून मागेच्या मागेच राहिली कारण तिने फक्त पुरुषांचे अनुकरण केले. परंतु अनुकरण करून कधीच बरोबरी होत नाही. स्त्रीने पुरुष होण्याचा प्रयत्न केला. पुरुष जे जे करितो ते ते करण्याचा प्रयत्न केला. पण मनात आपण स्त्री आहोत याची तिला लाज वाटतच राहिली. खरे पाहिले असतां तिने सबळ स्त्री होण्याचा प्रयत्न केला असता तर ती पुरुषाच्या बरोबरीनेच नव्हे, त्यांच्यापेक्षा पुढे जाऊ शकली असती. कारण तिच्यांत भावनांची संस्कृति अधिक येऊ शकते, विकारांची पाशवता कमी असून आत्म्याची अध्यात्मिकता तिला गाठता येण्यासारखी आहे. जगाला नवे वळण लावणे तिला शक्य आहे. सामाजिक व्यवहार मानवतेच्या पायावर रचावयास मनुष्याला शिकवणे तिला शक्य आहे. तिने आपली शक्ति ओळखली पाहिजे. जगाच्या व्यवहारांत आपले विशेष स्थान कोणते आहे ते शोधले तर जगाच्या व्यवहारात पुरुषाने ठरविलेली मूल्ये आत्मसात करून ती आपल्या बालकांना शिकवून त्यांच्यामार्फत जगाचे चित्र बदलण्याची महत्त्वाकांक्षा तिने ठेवली पाहिजे.
भगिनींनो, आपल्याकडे नवे जग घडवण्यांचे हे अत्यंत महत्त्वाचे काम आले आहे. ते आपण हौशीने, अभिमानाने, जबाबदारीने व सज्ञानपणे स्वीकारू या. बालकाला जन्म देणे ही आपल्या प्रगतीच्या मार्गातील एक धोंड आहे असे म्हणून, आपल्या कार्यक्षेत्रातील – करियर मधला तिला एक विक्षेप समजून चिडू नये अथवा त्याबद्दल लाजू नये. आपल्या स्त्रीविद्यापीठातील एकमेव विशेष अभ्यास व संशोधनाचा हा विषय आपण केला. याकरिता ठिकठिकाणी मानसशास्त्रीय प्रयोगशाळा उभारल्या, याकरिता सतत चर्चा व वादविवाद करून आपण सत्यसंशोधनाच्या मागे लागलो तर ते सर्व अशक्यच आहे. आपण जितक्या शिकलेल्या स्त्रिया आहोत तितक्या सर्व या एकाच कामावर लक्ष देऊन त्या कार्यास लागलो तरी कमीच पडू. या माझ्या कथनात थोडीही अतिशयोक्ती नाही. कारण हा मनुष्यजातीचा, अर्थात आपल्या देशापुरता म्हणायचा झाल्यास राष्ट्राच्या दृष्टीने पहिल्या प्रतीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण या देशात अज्ञानी माता असंख्य आहेत. परंतु अद्याप स्त्रियांच्या या अत्यंत जिव्हाळ्याच्या व अत्यंत निकटच्या प्रश्नाकडे पुरते लक्ष दिलेले नाही असे म्हणावे लागते. परवा चोपब्यास महाराष्ट्र महिला परिषद झाली त्यात मात्र थोडे फार मनावर घेतलेले दिसते. तसेच कटकला अखिल हिंद महिला परिषद (N.C.W.L.) ची द्विवार्षिक परिषद झाली त्यांनी बालहित विभाग विकसविण्याचा विचार केला आहे. पण खरे पाहाता याच्या मागे खूपच जोराने लागावयास पाहिजे. विद्यापिठांतून हा अभ्यासक्रम सर्व स्त्रियांना तरी निदान अवश्य उपलब्ध झाला पाहिजे. सिनेमा वगैरेमधून या संबंधी लोकशिक्षण व्हावयास हवे, मानसशास्त्रीय प्रयोगशाळा अधिकाधिक निघून अधिक संशोधनकार्य व्हायला हवे.
एक लहानसाच घरगुतीच प्रश्न घेतला मुलांचा हट्ट. ‘मुले हट्ट करणारच,’ किंवा ‘ही बगी ना, फार हट्टी आहे.’ एवढे म्हणून आपण जणू त्या प्रश्नावरील अखेरचा शास्त्रीय निर्णय येऊन गेला असे मानतो. मुलांना शिक्षा करण्याबाबत, त्यांना मार द्यावा किंवा नाही; त्यांना भीती घालायला हवी की नाही; शिस्त कशी लावायची; एक की दोन शेकडो प्रश्न आपल्यापुढे खरे पहाता रोज उभे राहतात. पण आपण अजून त्यांना प्रश्न म्हणून ओळखूच लागलो नाहीत. मुलाच्या टाँसिल्स वाढल्या आहेत की काय नी ऑपरेशन करायला हवे की काय वगैरे आपल्याला कळू लागले आहे. परंतु मुलांचे अनेक मानसिक रोग, वर्तनाचे कूट प्रश्न, (Behaviour problems) व अनेक प्रकारचे गंड – हीनगंड, भीतीगंड वगैरे संबंधी आपण अजून विचारच करू लागलो नाही. फार झाले तर थोडी थट्टा करू लागलो आहोत. पण जन्मल्यापासून मुलांची निरोगी मानसिक वाढ होण्यास कोणत्या प्रकारची परिस्थिती हवी व त्याकरिता आई व वडिलांनी काय करायला हवे याचा आपण अद्याप गंभीरपणे विचार करू लागलो नाही.
हे सर्व प्रश्न नूतन बालशिक्षणातच येतात. शाळा घर व समाज या त्रयीचा मेळ मिळून प्रत्येक बालकाने शरीराने व मनाने सुदृढ व निरोगी रीतीने त्याला वाढण्यास पूर्ण अवकाश मिळावा, त्याच्या आईवडिलांची श्रीमंतीही त्याच्या वाढीच्या आड येऊ नये; त्याच्या आईवडिलांची गरिबीही त्याच्या आड येऊ नये; प्रत्येकास त्याला अवश्य अशी सर्व प्रकारची संधि मिळावी आणि शिक्षकाने त्याच्या मार्गातील अडचणी दूर करण्यास मदत करावी. जरूर असेल तेथे त्याला पुढचा मार्ग दाखवावा. परंतु नेहमी शिक्षकांच्या तोंडाकडे पाहाण्याची बौद्धिक गुलामी मुलांत येऊ नये हे नूतन बाल शिक्षणाचे ध्येय आहे.
हे नुसते शहरात होऊन चालायचे नाही. नुसते फी देणाऱ्या मुलांसाठी होऊन चालणार नाही. राष्ट्रांतील सर्व बालके ही राष्ट्रांची संपत्ती आहे. जसे राष्ट्रांच्या खनिज संपत्तीचा पूर्ण उपयोग करण्याचा प्रयत्न होत आहे, जसे आपले वाया जाणारे पाणी साठवून शेतकीकडे वापरण्याच्या मोठमोठ्या कोट्यवधी रुपयांच्या योजना घडवल्या जात आहेत, त्याचप्रमाणे राष्ट्राची मोठी संपत्ती येथील मानवधन व भावी संपत्ती ती मानव बालके – मग ती शेठियांची असोत, सुशिक्षितांची असोत, ऑफिसरांची असोत की भिल्लांची असोत, दुबळ्यांची असोत, हरिजनांची असोत, कामकरी-शेतकऱ्यांची असोत. सर्वांनी शरीर व मनाने सुदृढ असले पाहिजे. व सर्वांना आपल्यात असलेल्या सुप्त शक्तींचा विकास करून घेण्यास पूर्ण अवकाश मिळाला पाहिजे. याच तत्त्वावर आपण कामास लागले पाहिजे.
नूतन बालशिक्षण
नूतन बालशिक्षण म्हणजे मुलांचे लाड नव्हेत. त्यांच्याशी अत्यंत कोमलपणे वागणे नव्हे. ती जे मागतील ते शक्य असो वा नसो पुरवीत सुटणे नव्हे. मुलांना शिस्त व नियमनाच्या अभावी डोक्यावर चढवून ठेवणे नव्हे. बालकांविषयी नुसती काव्ये करणे नव्हे. बालकांचे नुसते कौतुक करणे नव्हे.
नूतन बालशिक्षण म्हणजे बालकांना वाढविण्याचे शास्त्र बालमनाचे रहस्य शास्त्रीयरीत्या समजून घेणे व आपण त्यांच्याशी व त्यांनी आपल्याशी एकमेकांवर अन्याय न करिता न्यायाने, प्रेमाच्या पायावर, वागण्याची रीत.
येथे जर कोणाला नूतन बालशिक्षणाविषयी काही गैरसमजूत असेल तर त्यांना माझी विनंती आहे की, या तीन दिवसांत आपण सर्व मोकळेपणाने, खेळीमेळीने, मताग्रहाशिवाय बालहिताच्या दृष्टीने आपले विचार स्पष्ट करून घेऊ.
या तीन दिवसांचे विविध कार्यक्रम संपवून आपण शेवटी जेव्हा आपल्या या संमेलनाच्या कार्याचे सिंहावलोकन करू तेव्हा माझी खात्री आहे की आपण सध्याच्या महत्त्वाच्या काळातील एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा यथासांग विचार करून पुढील कार्याची दिशा आखून व विशेषतः एक प्रकारचे विचार करणारे व मनसुबे करणारे सर्व एकत्र बसून एकमेकांस एकमेकांच्या कार्यास व त्यामुळे सबंध कार्यास बळ प्राप्त करून दिले आहे असे आपल्याला वाटेल. अशी संमेलने व परिषदा यशस्वी झाल्या असे केव्हा म्हणता येते ? फक्त आखलेला विशिष्ट कार्यक्रम निर्विघ्नपणे व निश्चित केल्याप्रमाणे पार पडला म्हणजे नव्हे. तर त्याची परिणती प्रत्यक्ष कार्यास अधिक वेग व अधिक उत्साह आणून देण्यात होते तेव्हाच. या दृष्टीने आपले हे संमेलन यशस्वी होईल अशी मला बळकट आशा आहे.
(शिक्षण पत्रिका, वर्ष १६, अंक १-२, जानेवारी – फेब्रुवारी १९४८)

Leave a comment