मूल बोलू लागते. आपण घरातली मंडळी त्यास शिकवू लागतो. मूल पा-प्पा-प्पा बाब्बाब्बा, मम्मम्म करते. आपण शिकवतो बाबा म्हण, मामा म्हण, मं मं म्हण.
पहिल्यांदा मुलांच्या तोंडात नुसते अर्थरहित उच्चार असतात. पुढे ते अर्थ असलेले शब्द बोलू लागते. कित्येक शब्द आपल्यापासून ते शिकून म्हणते, तर त्याच्या कित्येक शब्दांना आपण अर्थ देतो. म्हणजे आपला अर्थ व्यक्त करण्यासाठी ते नवेच शब्द बनवते. अंगाई, मंमं, दुदु, भूभू, आकू, भुर्, वगैरे शब्द मूळ मुलांनी बनविलेले आहेत. त्यांच्या वेड्यावाकड्या उच्चारांनाच अर्थ आलेले आहेत व आता ते इतके रूढ झाले आहेत की ती सर्वसाधारण बालभाषा होऊन बसली आहे. नव्याने बोलण्यास शिकवणाऱ्या मुलाला आई म्हणते, ‘चल बाळ मं मं करायला.’ मूलही काही दिवसांनी मं मं चा अर्थ समजू लागते व म्हणण्यास सोपे असल्यामुळे मंमं असे स्वतः म्हणू लागते, म्हणजे उच्चार करू लागते.
सारांश, सुरुवातीस आपण मुलास चांगले प्रयत्नपूर्वक उच्चार व भाषा शिकवित असतो. नोकर चाकर, भाजीवाली, दूधवाला, सगळी त्यास थोडी थोडी भाषा शिकवितात.
या भाषाशिक्षणात मूल पुष्कळ गोष्टी शिकत असते. एखाद्या शब्दाचा यथार्थ अर्थ समजून घेणे ही काही साधी व सोपी गोष्ट नव्हे. यासाठी बरेच तार्किक व्यापार व्हावे लागत असतात. उदा. एक घोडा म्हटले तर मुलाला पहिल्यांदा वाटेल की एक चार पायांचे जनावर, मग कधी ते लाल दिसेल, कधी पांढरे दिसेल, तर कधी उंच नी मोठा घोडा दिसेल, कधी रोड मरतुकडा दिसेल, तरी त्या सर्वांना घोडेच म्हणावयाचे हे मुलास समजते. मग गाढव दिसले, उंट दिसला तर ती चार पायाची, शेपटी असलेली जनावरे असून ते घोडे नव्हेत हे ओळखावयाचे. म्हणजे थोडे थोडे निराळे असूनही काही विशेष साम्यावरून काहींना एकाच नांवाने संबोधावयाचे व काहीं विशेष फरकामुळे कितीही साम्य असले तरी त्यास निराळे नांव दयावयाचे, हे बुध्दीचे व्यापार मनामध्ये चालतच असतात. त्याशिवाय मुले भाषा शिकू शकत नाहीत.
दुसरे म्हणजे ती भाषेचे व्याकरणही शिकत असतात. आपण पुल्लिंगी स्त्रीलिंगी वगैरे निराळे प्रयोग करतो. रामा आला म्हणतो व सखुबाई आली म्हणतो. बाबा आले गेले असे अनेक प्रयोग त्यांच्या कानी येतात. लिंग वचन, काळ, प्रयोग वगैरे प्रमाणे रूपे फिरवून शब्द वापरतो. पण मुले ते सर्व हळूहळू ग्रहण करतात. ‘देईन’ म्हणजे काय व ‘रामाचा ‘म्हणजे काय वगैरे सूक्ष्म भेदही त्यांना समजू लागतात. इतकेच नव्हे तर ते प्रयोग त्यांना स्वतःला वापरताही येऊ लागतात.
सारांश, मुलांना शाळेत जाऊ लागण्यापूर्वी कोणी शिकवायचे नसताना स्वतःच्या प्रयत्नाने पुष्कळच शिकावयाचे असते. ते ती शिकतंच असतात व कमी अधिक प्रमाणांत भाषेवर प्रभुत्व मिळवीत असतात.
यावेळी आपण घरांतल्या माणसांनी एक गोष्ट करावास हवी. आपण मुलांचे शब्दभांडार वाढविण्यास मदत करावयास हवी.
भाषेचा मुख्य आधार शब्दांवर असतो. जितके शब्दभांडार मोठे तितके भाषेवर प्रभुत्वही वाढते व विचार व्यक्त करण्याची शक्तीही वाढते. कारण एकाच अर्थाचे चार शब्द असले तर चारींचा अर्थ अगदी सारखा नसतो – त्यामध्ये सूक्ष्म फरक असतो. काही ठिकाणी त्यापैकी एक शब्द योग्य असतो, तर काही ठिकाणी दुसराच शब्द हवा असतो. उदा. राग, क्रोध, संताप, चीड, कोप, प्रकोप निरनिराळ्या अर्थाचे शब्द आहेत पुष्कळदां आमच्या बाई रागावल्या-संतापल्या-चिडल्या वगैरे वापरण्याची मुलांनाही पाळी येते. हे उदाहरण झाले जरा सूक्ष्म अर्थाचे, पण साध्या वस्तुदर्शक नामांतही असे फरक असतातच. जर मूल म्हणाले, ‘सुपारीचे ताट’ व त्यावेळी आपण म्हटले ‘ते सुपारीचे तबक’ तर ताट व तबक पुष्कळदा अगदी सारखे असूनही हे दोन्ही शब्द मूल शिकू शकते व योग्य जागी वापरू शकते. वाटी, कटोरा, फुलपात्र पातेली, पंचपात्री, वगैरे जवळ जवळ सारख्या दिसणाऱ्या वस्तूंची निरनिराळी नावे मूल शिकते, तेव्हा त्यांच्यामध्ये असलेल्या घाट व उपयोगाचे बारीक फरकही त्याला कळत असतात कित्येक मोठ्या मुलींना तपेले, पातेले, गंज, भगुणे वगैरे मधील फरक व हे निरनिराळे शब्दही माहीत नसतात, याचे कारण योग्य वेळी ते त्यांच्या कानी गेलेलेच नसतात.
लहानपणी मुले जसे खडे, शंख, शिपले, गारगोट्या, काचा वगैरे वाटेल त्या वस्तूंचा संग्रह करीत असतात तसेच ती शब्दांचा संग्रहही डोक्यांत पुष्कळ करू शकतात. फक्त त्यांच्या कानावर योग्य शब्द पडावयास हवेत.
याकरिता मोठ्या मंडळीनी दिवसांतून थोडा वेळ तरी मुलांशी बोलण्याकरिता खास राखून ठेवावा – नुसता गप्पागोष्टी करण्याकरिता. मूल दिवसभर काहीना काही व कोणाशी तरी बोलत चालत असतेच पण घरच्या मंडळींनी प्रयत्नपूर्वक बोलल्याचा फायदा विशेष मिळतो. त्यावेळी मुलांचा शब्दसंग्रह तपासावा व कमी असतील ते शब्द देत जावे.
मुलांना वापरण्यासारख्या शब्दांच्या याद्या करावयास हव्यात. उदा. अवयवांचे शब्द – कान, नाक, डोळे, कपाळ, तोंड, ओट, पोट, पाठ वगैरे सामान्य शब्द बहुतेक मुलांना तीन वर्षापर्यंत येत असतात. पण मग विचारावे, कोपर दाखव, घोटा दाखव, आंगठा, करंगळी, मनगट, पोटऱ्या मान, गळा, बरगड्या, कणा, कंबर, टाच, चवडा, वगैरे अनेक शब्द देता येण्यासारखे असतात, व दिल्यास मुले पटपट ग्रहण करण्यास तयार असतात.
१) कपड्यांची नावे, २) घरातल्या वस्तूंची नावे, ३) घराच्या भागांची नावे, ४)स्वैपाकघरातील वस्तूंची नावे, ५) धान्यांची नावे, ६) जेवणाच्या पदार्थाची नावे, ७) फुलांची, झाडांची, पशूंची, पक्ष्यांची वगैरे नावे, ८) रंगाची नावे, ९) वाहनांची नावे, १०) काही औषधांची नावे, ११) माणसांची नावे, १२) गावाची नावे वगैरे अनेक प्रकारचे शब्द मुलांना सांगता येतात. ही झाली नामे. पण क्रियापदे, विशेषणे, क्रियाविशेषणे वगैरे शब्दांचे सर्व प्रकार आपल्याला सांगता येतात.
आपले वळण याच्या उलट असते. मुलांशी मुलांच्या भाषेत बोलले पाहिजे. याचा अर्थ आपण कोत्या, असमृद्ध भाषेत बोलणे असा घेता कामा नये.
काही विचार, काही गोष्टी व त्यामुळे काही शब्द मुलांना समजत नाहीत. त्यामुळे मोठ्यांची भाषा निराळी पडते. उदा. तरुणपणच्या भावना, प्रौढपणचे अथवा म्हातारपणचे पुष्कळसे विचार, विशाल जगाचे अनेकविध व्यवहार वगैरे मुलांना माहीत नसल्याकारणाने त्यांची भाषाही त्यांना कळत नाही. हे साहजिक आहे. पण ज्या गोष्टी ती पाहू शकतात, करू शकतात, अनुभवू शकतात ते शब्द त्यांच्या कक्षेच्या बाहेर नाहीत. त्यांतील अनेकविध शब्द शिकणे म्हणजे भाषेची व विचारांची सूक्ष्मता शिकणे होय व ते सर्व मुले शिकू शकतात. आपण त्यांच्यापुढे ते शब्द अर्थपूर्वक वापरले पाहिजेत व त्याकडे त्यांचे लक्ष वेधले पाहिजे. जेवणात भाजी असते. पण त्यातच आपण किती प्रकाराने बोलतो. कोरडी भाजी, तळलेली भाजी, रसाची भाजी, गोळा भाजी, पळीवाढी भाजी, पातळ भाजी, वगैरे भाज्यांचे प्रकार असतात. जेवताना सर्वांमधील फरकांकडे मुलाचे लक्ष जाऊ शकते. पण आपण मुलांशी बोलताना या सर्वांना एक भाजीच म्हणू लागलो तर मुलांच्या लक्षात यामध्ये असलेले बारके फरक यावयाचेच नाहीत. पण तेच निरनिराळे शब्द वापरले तर फरकही लक्षात येतील.
सामान्य अनुभव असा आहे की मुले शब्द पकडण्यात फार जबर असतात. जितकी समृद्ध भाषा आपण वापरावी तितकी ती पकडून ठेवीत असतात. मोठे मोठे संस्कृत शब्दही ती शिकतात व योग्य ठिकाणी वापरतात.
आपल्याकडून आपल्या भाषेचा पूर्ण वारसा मिळण्याचा सर्व मुलांना सारखा हक्क आहे. मिळकतीच्या वारशांत वाटणी करून द्यावी लागली तरी हा वारसातरी सर्वांना पूर्णपणे मिळालाच पाहिजे. शब्द म्हणजे नुसती अक्षरे नसतात. तर प्रत्येक शब्द म्हणजे विचार असतो. हे लक्षात घेऊन मुलांचे शब्दभांडार भरपूर भरण्याची आपण काळजी घ्यावी.
एक गोष्ट मात्र चांगली लक्षात ठेवावी की मुलांचे हे भाषाशिक्षण कंटाळवाणे व त्यांना त्रासदायक होता कामा नये. म्हणजे युक्ती प्रयुक्तीने, लक्ष चुकवून, नकळत शिक्षण द्यावे असे नाही. पण जसा वस्तू गोळा करण्याचा नाद लागेल अशा रीतीने गंमत, आवडता खेळ म्हणून हे झाले पाहिजे.
दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवावी की मुलांमुलांमध्ये आवडी नावडीचा अनेक तऱ्हेचा फरक असतो. काहींना मोटार विमाने वगैरे यंत्रांमध्ये इतकी गोडी वाटते की त्याच्यासंबंधी जितके शब्द सांगावे ते सर्व ती ग्रहण करतात, पण शिवणाच्या वस्तूची अथवा डाळ दाण्यांची नावे त्यांच्या लक्षात रहात नाहीत. तर काही स्वैपाकघरातील एकूण एक शब्द आई-आजीला येतात तितके शिकतील पण त्यांना रंगांची नावेच ध्यानात राहात नाहीत. असा व्यक्तीपरत्वे फरक असणारच. तेव्हा मुलांचा कल व गोडी ही प्रथम पाहिली पाहिजे. शिवाय मुलांमुलांमध्ये दुसराही फरक असतो. काही भाषाप्रधान असतात, काही क्रियाप्रधान असतात. काहीना नवे नवे शब्द शिकणे फार आवडते. त्यांच्या ध्यानात चटकन शब्द रहातात व वापरताना ते आठवतात, बोलावेसे वाटतात. तर काहींना ते जुळतच नाही.
तरी शब्दभांडार वाढविण्याची सर्वच मुलांवर सक्ती होऊ नये हे पाहिले पाहिजे. आपण योग्य शब्द देत असलो व रोज गप्पागोष्टी करीत चार सहा शब्द देत असलो तर जी भाषाविमुख असल्यामुळे जरूरीच्या शब्दांवरच काम भागवीत असतील, त्यांचाही शब्दसंग्रह १०/२० शब्दांनी तरी वाढलेच.
घरचे भाषाशिक्षण हे एक शाळेतील अनेक नावडत्या प्रकारांपैकी एक न होता आपण मुलांना आवडीने देण्याची गोष्ट आहे. हे लक्षात ठेवून आपल्याकडून होईल ती मदत करण्यास चुकू नये.
(शिक्षण पत्रिका, वर्ष ९, अंक ६, नोव्हेंबर १९४१)

Leave a comment

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.