मित्रहो,
दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना अर्भके म्हणतात. पुढे दोन ते सहा-सात वर्षांपर्यंतची छोटी मुले म्हणजे शिशु.
आपली मुले आधी आपल्या अंगाखांद्यावर व पाळण्यात वाढत असतात. ती जरा मोठी झाली की अंगणात खेळू लागतात. तेच शिशुपण आपण जरा बारकाईने पाहू लागलो तर ती कशी वाढत असतात ते आपल्याला दिसते. आज मी शिशुपणात मुलांची वाढ कशी होते, ती काय काय काय व कसे कसे शिकतात ते सांगणार आहे. तुम्हीही जरा लक्ष देऊन पाहिलेत तर मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतीलच.
नुकतेच जन्मलेले मूल अगदीच लोळागोळा असते. त्याला हालता, चालता की बोलता काहीच येत नसते. पण तेच दोन वर्षात कितीतरी शिकते. आपल्यासारखे सगळे काही करू शकते. ते उभे राहते, धावते, उड्या मारते, दात आलेले असतात, त्यामुळे आपल्यासारखे भाकरी खाऊ लागते, शिवाय बोलायला येते त्याला. अगदी आपल्यासारखे नाही, पण कामचलाऊ बरेच येते.
आता ते पहिल्यासारखे पराधीन नसते. लोक उचलतील तेव्हाच इकडून तिकडून जायचे असे नसून, दुडदुड धावून स्वत: जाते. तेव्हा आता त्याच्यात भलतीच शक्ती आलेली असते. सगळ्याच प्रकारे त्याचा जोर वाढतो व ते भराभर नव्या नव्या कितीतरी गोष्टी शिकू लागते.
पहिली गोष्ट म्हणजे आता त्याला घर लहान पडते. ते उठते की निघते हिंडायला. शेजारी पाजारी, रस्त्यांच्या टोकापर्यंत, समोरच्या भाजीवाल्याकडे, वाटेल तिथे हिंडायला जावे, असे त्याला वाटते. शिवाय आता त्याला बोलायला येत असते. तेव्हा तऱ्हेतऱ्हेच्या गप्पा मारायला मजा वाटते. त्याला कुणी खाऊ दिला की छान चावून खाताही येतो.
याप्रमाणे घराच्या बाहेर हिंडावे, निरनिराळ्या लोकांशी बोलावे, इतर मुलांशी खेळावे, नव्या वस्तू, नव्या जागा पहाव्या असे त्यांना वाटते. थोडक्यात म्हणजे ती जुनी एक पेढ्याचीच गोष्ट आहे ना, की एक पेढा होता, त्याला जग पाहायची इच्छा झाली, तेव्हा त्याने टुणकन् परातीतून उडी मारली नी तुरुतुरु निघाला जग बघायला, तशीच स्थिती असते या आपल्या २-४ वर्षाच्या बाळाची.
यावेळी त्याला नवेनवे पाहायला आवडते. कारण सगळेच नवे. रस्त्यात मोटारी, ट्राम, बस दिसतात. गाई, म्हशी, घोडी, कुत्री दिसतात. कावळा, चिमणी, घार, पोपट, तरतऱ्हेची झाडे, पाने, फुले, फळे, सगळेच दिसतात. निरनिराळी माणसे दिसतात. या सगळ्याच गोष्टी नव्या व मजेदार. थोडक्यात म्हणजे त्यांची जिज्ञासा खूपच तीव्र झालेली असते. त्याला प्रत्येक वस्तू नवी; त्यामुळे ती उचलावी, आपटावी, वर-खाली हात लावून पाहावी असे स्वाभाविकपणे वाटते.
दुसरी गोष्ट म्हणजे त्याला हातपाय सारखे वापरावेसे वाटतात. पळावे, चढावे, उड्या माराव्या, कठीण नी अडचणीच्या जागी जावे, लोंबकळावे, एक ना दोन अनेक गोष्टी त्याला सुचत असतात.
शिवाय ते आजूबाजूला पाहाते तेव्हा त्याची आई, बहीण, भाऊ, वडील, घरातली व बाहेरची माणसे काही ना काही करीत असताना त्याला दिसतात. त्यालाही आपण काही तसे करावे असे वाटते. त्याच्या हातापायांची चळवळ वाढते. घरीदारी जे मिळते ते उचलावे, वाहून नाही तर ओढीत न्यावे, ढकलावे, ओढावे, असे सारखे काहीतरी करीत राहावेसे वाटते.
शिवाय आता त्याला बोलायला येऊ लागलेले असते. त्यामुळे सारखी बडबड करावीशी वाटते.कोणी काय बोलेल ते पटकन् ते बोलते नी घोकून घोकून शिकून घेते. पुष्कळदा तर ऐकलेल्या शब्दांचे गाणेच गातात ती मुले. एकदा ऐकले, तर पोरे ओरडत होती, “शेजारीन बाईची कोंबडी हरवली रे हरवली.” सकाळी उठून कानावर शब्द पडले असतील; ते गाणे दिवसभर पुरले या मुलांना. लोक काय बोलतील ते ऐकायचे नी बोलायचे अशा रीतीने त्यांचे मायबोली शिकण्याचे काम चालू असते.
एकंदरीत काय की मूल दोन अडीच वर्षांचे झाले की ते आई व घर यांपासून दूर जाऊन खेळू लागते. त्याचे या वयातले खेळणे म्हणजे शिकणेच असते. मूल शाळेत जाऊन पाटी पेन्सिल घेऊन ग म भ न लिहू लागले म्हणजे आपल्याला वाटते की ते शिकते. पण खरे पाहिले तर शाळेत जाण्यापूर्वीच्या या शिशुवयात ते कितीतरी अधिक शिकत असते. या वयात मूल जी धडपड करते ते त्यांचे नसते उपद्व्याप किंवा नुसत्या माकडचेष्टा नसतात, तर अनेक गोष्टी शिकण्याची धडपड असते.
मुलांची ही धडपड पुष्कळदा आपल्या कामाच्या आड येते. इकडे चढ, तिकडे हात लाव, असे ती करतात. कधी लागते; मग डॉक्टरकडे न्यावे लागते, म्हणून आपण त्यांना काय सांगतो की “देवासारखे गप्प बसा. उगाच चढ-पड करू नका.” पण असे केल्याने त्यांचे शरीर मजबूत कसे होणार? त्याची बुद्धी चलाख कशी होणार ?
तसेच त्यांना हातांनी तऱ्हेतऱ्हेची कामे करायला हवी असतात. ती आपण कोठे करू देतो ? आपल्याला आपली कामे उरकण्याची घाई असते हे खरे. आपल्या वस्तू सांभाळावयाच्या असतात. मुलांच्या हातून पडते, फुटते, सांडते, बिघडते, त्यामुळे आपण त्यांना देतो चूल बोळकी. त्यांनाही अशा खेळाची थोडा वेळ मजा वाटते. पण त्यात काही खरी कामे होत नाहीत. लुटपुटीचा खेळ होतो. हातांनी ज्या अनेक गोष्टी करायला शिकणे, ते होत नाही. लहानपणी हात, बोटे जशी वळू शकतात तशी मग मोठेपणी वळत नाहीत. त्यामुळे कामातील सुबकपणा, चलाखपणा, कौशल्य तितकेसे येत नाही.
आजकाल घरोघर आईबाबांना कामावर जावे लागते. तशात सगळ्यांच्या घरी पुरती जागाही नसते; आणि मुलांना हवे ते आणून द्यायला महागाईमुळे कोठे सवड होते? म्हणून काही काही ठिकाणी मुलांना खेळण्याची सोय सरकारकडून किंवा लोकांकडून केली आहे. गिरण्यातूनही पुष्कळ ठिकाणी मुलांसाठी बालमंदिरे आहेत. आपण कामावर जाताना मुलांना तिथे सोडले नी परत येताना घरी घेऊन आलो तर मुलांची किती सोय होईल. शिवाय आपण नसताना ती काय काय करीत असतील, मोटार लॉरीखाली सापडणार तर नाही ना, अशी काळजी नको. परदेशात सर्व कामगार आपल्या मुलांना बालशाळेत पोहोचवतात; व त्यांच्या खाण्यापिण्यासाठी रोजचा एक रुपया किंवा अशी फी देतात. कारण फुकट खाण्यापिण्याची सोय घेणे त्यांना आवडत नाही. अशी काही सोय जर जवळपास नसेल तर सरकारकडे, किंवा कारखान्याकडे किंवा अशी शाळा चालविणाऱ्या खाजगी मंडळाकडे अर्ज करून शाळा काढण्याची खटपट करायला हवी. मुंबई-सोलापूरसारख्या शहरांतून अशी बालमंदिरे असणे आवश्यक आहे.
या बालमंदिरांचा मुख्य फायदा असा आहे की या वयात म्हणजे दोन ते सहा वर्षापर्यंत मुलांना चांगल्या सवयी चटकन लागतात. मुख्यत: स्वच्छतेच्या व व्यवस्थेच्या सवयी लागणे फार आवश्यक आहे. आपले हात, पाय, नाक, डोळे, दात स्वच्छ ठेवण्यास ती तेथे शिकतात, हे किती चांगले? उगाच बाहेर टिवल्याबावल्या करीत हिंडण्यात काय फायदा?
शुद्ध भाषा बोलायला व चांगले उच्चार करायलाही या वयात जीभ चांगली वळते. ती चांगली गाणी शिकतात. गोष्टी ऐकूनही भाषा शिकणे होते. तेव्हा नुसते पाटी पेन्सिल घेतली नी त्यांनी क ट प केले म्हणजे आपली मुले शिकली असे समजू नये. हे लिहिणे, वाचणे, शिकायच्या आधी त्यांनी हातपाय वापरायला शिकले पाहिजे. त्यांचे डोळे, कान चांगले बघू, ऐकू लागले पाहिजेत. आपआपली कामे स्वत: करता येवू लागली म्हणजे त्यांना स्वाभिमान वाटू लागतो. ‘मला सगळे येते,’ असे वाटून आनंद होतो.
याशिवाय आणखी ही एक फार मोठी गोष्ट मुले बालमंदिरात शिकतात. ती कोणती म्हणाल, तर दुसऱ्या त्यांच्याच एवढाल्या मुलांबरोबर न भांडता न तंडता खेळायला शिकतात. एकमेकांना मदत करतात. बरोबर काम करतात, हसतात खेळतात नी मैत्री करतात. आपल्या घरी साधारणपणे या बाबतीत अगदीच वाईट शिक्षण त्यांना मिळत असते. आपल्या येथे नेहमी शिवीगाळ होते. उणे दुणे काढून हातवारे करून भांडणे होत असतात. थोड्याथोड्यातच आपण हमरीतुमरीवर येतो. इतकेच काय, पण दुसऱ्या जातीच्या व धर्मांच्या लोकांविषयी अगदीच तुसडेपणाने बोलत असतो. आपले पाहून व ऐकून मुलांनाही तशीच सवय लागते. ही गोष्ट तर अवश्य सुधारायला हवी. बालमंदिरात एकमेकांशी खेळीमेळीने कसे राहावे, कामे करावी, वगैरे गोष्टी ती शिकतात. आपण घरीही तेच वर्तन चालू ठेवले पाहिजे.
आणखी एक दोन गोष्टी सांगून पुरे करते.
एक तर ही की पुष्कळदा आपण कातावून जातो नी पोरांना बडवतो. कधी आपला राग असतो दुसऱ्यावर, पण काढतो मात्र बिचाऱ्या छोट्या बाळांवर. कधी ती दंगा करतात, चुका करतात, हट्ट करतात, पण त्याकरता मारणे व वाटेल तसे बोलणे चांगले नाही. समजावून सांगावे, नाही तर पुष्कळदा आपण गप्प बसलो की ती समजतात. ‘आई बोलत का नाही?’ याचे त्यांना फार वाईट वाटते. दुसरे म्हणजे त्यांनी आपले ऐकावे म्हणून भीती घालणे – शिपायाची भीती, साहेबाची भीती, भुताखेताची नी प्रेताची भीती, अंधाराची भीती. छे छे. मुलांना अशी भित्री करून काय फायदा? आपण तर त्यांना निर्भय व शूर बनवले पाहिजे. त्यांना जर कसली भीती वाटत असेल तर ती काढून टाकली पाहिजे.
याप्रमाणे ही छोटी मुले वाढून मोठी मुले होतात व शाळेत जाऊन शिकू लागतात. ती चांगल्या रीतीने वाढत असली म्हणजे रोज किती तरी नवे शिकून येतात. आपल्याला त्यांची हुशारी पाहून अगदी आनंदाचे भरते येते.
कधी वेळ काढून एखाद्या बालमंदिरात मुले कशी कामे करतात, कशी एकमेकांशी मैत्री करतात ते जाऊन पाहा. तेथे खोटे लाड करून मुलांना फूस लावून किंवा पेपरमिंट देऊन त्यांना डोकीवर चढवत नाहीत. तसेच उगीच कडकपणा करून त्यांना धाकात ठेवीत नाहीत. छान शिस्तीत असतात ती. तुम्हाला पाहून खूप आनंद वाटेल. पाहा बरं. रामराम !
(दि.२३ डिसेंबर १९५१ या दिवशी कामगार सभा कार्यक्रमात मुंबई रेडिओवरून दिलेले भाषण)

Leave a comment