लहान मूल हळू हळू उभे राहाते व हलकेच एक एक पाऊल पुढे  टाकून चालावयास लागते. आईला त्याचे कौतुक वाटते.  घरातील सर्वजण कौतुक करतात.’अरे पाहा, बाळ चालायला लागला!” म्हणून सर्व त्यास  उत्तेजन देतात. मूलही हौशी-हौशीने चालू लागते. झोक जातो,  पडते,  पुन्हा उभे राहते, पुन्हा चालते. पुन्हा पडते, पुन्हा उठून चालू लागते. अशा प्रकारे त्याच्या मानाने अत्यंत मेहनतीने चिकाटीने व धीराने ते ही क्रिया शिकत असते.  स्वप्रयत्नाने शिकत असते. काही दिवसांनी त्याला चालता येऊ लागते, धावताही येऊ  लागते. अशा रीतीने ती एक नेहमीची गोष्ट होऊन जाते. मोठ्यांचे  लक्ष  आता  त्याच्या चालण्याकडे जात नाही.

मूल दोन अडीच वर्षाचे झाले म्हणजे त्यास सांगितलेले कळू लागते. त्याला काही तरी करण्याची हौस उत्पन्न होते. मोठी माणसेही त्यास ‘हे आण,’ ‘ ते  त्याला दे,’ ‘हे तिकडे ठेव,’ वगैरे सांगत असतात. मूलही हौशीने करावयास जाते. पण जाता येता ते कोठे ठेचा खाते, कोठे आपटते, कधी हातातली वस्तूच पडते, तर कधी रस्त्यातील एखादी वस्तू लाथाडली जाते. त्यावेळी त्याचे चालणे हा कौतुकाचा विषय राहात नाही. तर त्याच्यावर चोहोकडून काहूर उठते. कोणी म्हणते “कसा चालतोस धांदरटासारखा?” कोणी म्हणते “असा उंटासारखा वर डोक करून काय चालतोस?” कोणी म्हणते “पायाला कंदील तरी बांध, म्हणजे दिसेल तुला.” कोणी म्हणते “ह्याचे हे अस्से नेहमीचे – इकडे पड  तिकडे पड. रोज उठून प‌ट्ट्या बांध. जरा सांभाळून चालायला काय होते?” मुलाला बिचा-याला आधीच ठेच लागून, डोके आपटून किंवा पडून लागलेले असते, इजा झालेली असते. आपण मोठ्या हौशीने करायला गेलो पण ते साधले नाही माणून त्याचे मन खट्टू  झालेले असते व त्यात वडील मंडळीच्या अशा बोलण्याचा मारा! मग काय विचारता! बिचारे पुरतेच ओशाळून जाते.

दुसऱ्यांदा पुन्हा मुलास इकडे आण, तिकडे ने, तिकडे ठेव त्याला दे वगैरे प्रकाराची लहानसहान कामे सांगितली जातात. पण मूल पूर्वीइतक्या उत्साहाने ते काम करायला जात नाही. कारण पूर्वीचा अनुभव त्याचा ताजाच असतो. या खेपेस त्यास  ताकीद  मिळत असते की, “नीट घेऊन जा, धांदरटपणा करू नकोस.” कोणी म्हणते “हां सांभाळ, आता कालच्या सारखा पडू नकोस.” कोणी म्हणते, “डोळे उघडून चाल जरा. रस्त्यातले काही दिसतच नाही. जसा काही आंधळाच.” अशा सूचनांनी त्याचा स्वतःविषयीचा अविश्वास (diffidence) अधिकच वाढतो. थोडासा घाबरटपणा (nervousness) येतो. थोडेसे गोंधळल्यासारखेही होते. त्यामुळे त्याच्या त्या लहान प्रवासातील पायगाडीच्या अपघाताचे प्रमाण वाटू लागते, त्या मानाने वडील मंडळीची बोलणी वाढतात. संभाळून नीट चालण्याच्या व डोळे उघडून चालण्याच्या सूचना ही वाढतात. 

मूल बिचारे बावरून जाते. बावचळून जाते. नीट चालणे म्हणजे काय त्याला समजत नाही, संभाळायचे कसे तेही त्याला कळत नाही; डोळे झाकून तर ते कधीच चालत नसते, तरी ‘डोळे उघड’ म्हणून त्याला नेहमी का सांगतात तेही त्याला कळत नाही. परिणामी त्याचे चालणे व इकडून तिकडे काही संभाळून नेणे आणणे सुधारण्याच्या एवजी कामातील बेढबपणा (Clumsiness) व धांदरटपणाच वाढत जातो.

खरे म्हटले वर्षा दीड वर्षाचे  मूल चालू लागले म्हणजे त्यास चालण्याची  क्रिया पूर्ण अवगत झालेली असते असे नव्हे. त्यावेळी ते चालण्यास शिकू लागते. म्हणजे ते  शिकण्याचा प्रारंभ होतो. तीन चार वर्षापर्यंत ती क्रिया त्यास पूर्णपणे अवगत करावयाची असते. त्याच्या पायांच्या  स्नायूंना व ज्ञान-कर्मतंतूंना त्या  क्रियेचे प्राथमिक (elementary) चलन वलन (movements) साधलेले असते व म्हणून आपल्याला वाटते की त्याला चालावयास  येऊ लागले.  पण पुढेही अडचणी बऱ्याच असतात. अडीच तीन वर्षाच्या वयास  मुलाच्या  पायाच्या मानाने शरीर अधिक जड असते. पायांची हाडे अद्याप कोवळी असतात, त्यामुळे शरीराला एकंदर समतोलपणा (balance) आलेला नसतो. ज्याप्रमाणे सायकलीवर बसावयास नवीनच शिकलेला  मनुष्य  सायकलिंग येत असतानाही नवीन परिस्थितीमध्ये एकदम घाबरून जातो व त्यामुळे त्याचा तोल जातो व तो पडतो, तोच प्रकार मुलांचा होत असतो. रस्त्यात एकदम एखादे मनुष्यच आडवे येते, एखादी वस्तूच पडलेली असते व ते पाहून ते एकदम मनाच्या सायकलीचा दांडा सोडून देते. अर्थात तोल जाऊन ते पडते. कधी कधी आजूबाजूस कोणी काही बोलत असतात तिकडे त्याचे लक्ष जाते व त्यामुळे इकडे त्याचा तोल जातो. नव्या सायकलिस्टला जसे प्रारंभी एका सरळ रेषेत सायकल नेणे कठीण पडते, तसेच मुलासही सरळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे कठीण पडते. पुष्कळदा सरळ दृष्टी ठेवून मूल चालू लागते. पण शरीराचा तोल सांभाळून चालता चालता एकदम मधल्या राउंड टेबलावर नाही तर खुर्चीवर ते आदळते. त्याचे कारण ते उठून चालू लागले तेथून सरळ जाऊ शकले नाही. या सर्व क्रिया त्यास अजून शिकावयाच्या असतात. त्या शिकवण्याच्या ऐवजी “नीट चाल, डोळे उघडून चाल, असा  कसा धांदरट,” वगैरे बोलून काय फायदा? या वयाच्या मुलांना चालण्यास शिकवले पाहिजे.

चालण्यास शिकवण्याकरिता अतिशय उत्तम साधन म्हणजे जवळ जवळ तीन चार इंच  जाड व पाच इंच रुंद  व १५/२० फूट लांब अशी लाकडाची फळी आंगणामध्ये टाकून ठेवावी. मुंबईसारख्या शहरात जेथे घरोघर अशा फळ्या  ठेवणे शक्य नाही तेथे मुलांना खेळण्याच्या जागा करून तेथे अगदी लहान मुलांकरिता अशी एक फळी ठेवावी, त्याच्यावर कसे चालावयाचे ते मोठ्या माणसांनी त्यांना दाखवावे. हात बाजूला अथवा पाठीमागे घेऊन पावलाला पाऊल लावून चालावयाचे दाखवावे.  म्हणजे उजवे पाऊल आधी ठेवले असले तर डाव्या पावलाची टाच उजव्याच्या अंगठयास लागली पाहिजे आणि पुढच्या पावलास उजव्या पावलाची टाच डाव्याच्या अंगठ्यास लागली पाहिजे. असे चालण्यास शरीराचा तोल सांभाळावा लागतो. नाहीतर पाय लाकडावरून खालीच पडतो. पुन्हा पुन्हा चालून मुले छान तोल संभाळून त्यावर चालू लागतात. इतकेच नव्हे तर त्यावर धावूही लागतात. बाहेरगावी आगगाडीचे रूळ असल्यास गाडीची वेळ नसताना  रुळावर चालण्याचा खेळ मुले करतात, तोही चांगला. इतकेच की रूळ जरा अरुंद असतात. घराच्या ओसरीचा कठडा फार उंच नसल्यास त्यावर मुलास चालू द्यावे. पण जर आधी अशा लाकडावर मुले चालावयास शिकली तर कठड्यावर वगैरे अगदी हात सोडून उत्तम रीतीने चालू लागतात.

चालावयास शिकवताना एक गोष्ट ध्यानात ठेवावी – चालावयाचे दाखवल्यावर मूल चालू लागले म्हणजे मध्ये, आपण काही बोलू नये. कठड्यावर वगैरे चढले असल्यास “ए संभाळ, पडशील” असे म्हणून त्याचा तोल जाण्यास मदत करू नये.  त्याचे आपल्या चालण्याच्या क्रियेवर चित्त एकाग्र  असण्याची जरूर असते. त्यावेळी आपल्या सूचना मदत करण्याच्या ऐवजी त्याला घातक होतात. ‘ए पडशील’ असे मोठी म्हणतात म्हणूनच मुले बऱ्याच वेळा पडतात. त्यांना एकदा दोनदा कसे चालावयाचे ते दाखवून मग त्यांचे त्यांना ते शिकू द्यावे.

लाकडावरचे चालणे झाले म्हणजे रेघेवर चालण्याचे दाखवावे. मुलांना हा खेळ होतो व त्यात शरीराचा तोल संभाळून सरळ रेषेत चालण्याची सवय लागते. घरातही जर चालावयाकरिता खडूच्या रेषा काढून ठेवल्या तर मुलास चालताना त्या उपयोगी पडतील. चालता चालता कपाटावर अथवा टेबलावर आपटण्याचे प्रसंग येणार नाहीत.

हात बाजूला ठेऊन चालण्याचा खेळ चांगल्या रीतीने मुले खेळू लागली व तसे सफाईने चालता येऊ लागले म्हणजे मुलाना वस्तू  घेऊन चालण्याचा पुढचा खेळ दाखवावा. पुस्तक पाटी दप्तर पेला बशी भांडे वगैरे काहीतरी हातात घेऊन त्या लाकडावर चालावयाचे. आरंभी पडले तरी फुटणार नाही अशा वस्तू द्याव्या. पण  शेवटी पेले बशा ग्लास बाटली वगैरेसारख्या धक्का लागला असता फुटणाऱ्या वस्तूही हातात देऊन मुलास खेळू द्यावे. अशा नाजुक वस्तू घेऊन चालण्याने अधिक नाजूकपणे व सफाईने  चालावे लागते याची त्यांना सवय होते. चालता चालता समजा झोक जाऊन मूल पडले  अथवा वस्तू पडली व फुटली तरी त्याचा विषाद मानू नये. आपण जरूर नसताना गरज आहे असे मानून मुलांच्या कॉलेजच्या शिक्षणाकरिता शेकडो रुपये खर्चित  असतो. तर चार ग्लास फुटून मूल जो नाजूकपणा शिकत असते तो शिकण्याची तेवढी फी  झाली असे समजावे. एकदा एक दोन वस्तू फुटल्या तरी फुटणे, पडणे, आपटणे वगैरे कायमचे बंद होऊन मुलास आत्मविश्वासपूर्वक इकडून तिकडे जाता येता येऊ लागले तर ही काही लहान सहान गोष्ट नव्हे. शिवाय मातीची लहान मडकी वगैरे  कमी किमतीच्या वस्तूही वापरता येतील.

पण मुलासही जर असे वाटले की ह्याला काही किंमत नाही, फुटले तरी हरकत नाही, तर चालावयाचे नाही. ही वस्तू जपून नेली पाहिजे, न  नेल्यास ती फुटेल व फुटली तर  ठीक नव्हे  एवढी भावना त्यांच्या मनात असली पाहिजे.

साधारण घन वस्तू झाल्या म्हणजे प्रवाही वस्तू वाटीमधून, तांब्यामधून वगैरे नेण्याचे दाखवावे. वाटी अथवा फुलपात्र भरून पाणी नेण्याची मुलांना नेहमी जरूर पडते. मोठी माणसे सांगतात, “अरे बाबू, प्यायला पाणी आण पाहू.” बाबू आणताना  सांडतो व मग नमुना दाखविला आहे तशा प्रकारची सर्व बोलणी सुरू होतात. त्यापेक्षा बाबूस अथवा बबीस दुपारी काही खेळ हवा असतो तेव्हा  फुलपात्रात पाणी घेऊन लाकडावरून अथवा सरळ रेषेरून जाण्याचा खेळ खेळण्याचे दाखविल्यास आपल्याही कामास ती चांगल्या रीतीने उपयोगी पडू शकतात व त्यांच्या हुशारीत भर पड़ते. असेच पुढे पुढे दाखवत गेल्यास जरा मोठी म्हणजे ४/५ वर्षाची मुले तूप वाढणे, दुधाचे अथवा  चहाचे पेले नेऊन देणे, फार काय पण कढी  व आमटी वाढण्याचीही कामे सफाईने  करू लागतात. त्यावेळी त्यांना अशी कामे करण्याची हौसही असते. आज घरोघर “तू नको घेऊस ते – सांडशील,”  असे म्हणून आया आपल्या मुलामुलीच्या हातातून तुपादुधाचे काढून घेत असतील व तेवढ्यापुरते चमचाभर तूप अथवा डावलाभर दूध वाचवीत असतात, पण तसे करण्याने मुलांना शिक्षण घेण्याची संधी त्या फुकट दवडीत असतात व  “तू सांडशील” “तुला नाही येणार ते” वगैरे  म्हणून मुलांमध्ये आपल्या स्वत:च्या शक्तीबद्दल अविश्वास उत्पन्न करतात. त्यामुळे मुलांचे किती नुकसान करीत असतात त्याचा आढावा काढल्यास वाचवलेल्या चमचाभर  तुपापेक्षा व डावभर  दुधापेक्षा त्याची किंमत कितीतरी जास्त होईल. बापही चार थेंब शाई वाचवून जमिनीवर डाग न पडू देण्याची खबरदारी घेण्यात मुलांनी शिक्षण घेण्याची केवढी मोठी संधी दवडीत असतात.

पाणी नेण्या-आणण्याचा खेळ दाखवताना बरोबर सांडलेले पाणी पुसण्यासाठी एक फडके घ्यावे  व खेळाचा एक नियम म्हणूनच हा सांगावा की  पाण्याची वाटी इकडून तिकडे नेल्यावर जमिनीवर सांडलेले पाणी फडक्याने पुसून टाकायचे. अर्थात अंगणात धुळीत हा खेळ खेळत असल्यास अथवा मातीची जमीन असल्यास फडके उपयोगात आणता येणार नाही.

याप्रमाणे दोन अडीच वर्षाच्या मुलास तोल सावरून चालवयाचे, सरळ रेषेवर चालावयाचे व वस्तू इकडून तिकडे नेण्याचे शिकवावे म्हणजे खरे म्हटले तर शिकू द्यावे. आपण दाखवून मग त्यांनाच ती क्रिया पूर्णपणे हस्तगत करू द्यावी. सायकल जशी कोणी एका दिवसात शिकतात व कोणाला आठ दिवसातही येत नाही, तसे ह्या क्रियाही येण्यास निरनिराळ्या मुलांस कमी अधिक वेळ लागतो व तो तितका लागू द्यावा. “त्याला बघ कसे आले? तुला अजून येत नाही. तू अगदी बुद्दू.” असे किंवा अशा प्रकारचे इतर काही बोलून त्यास हिणवू नये. त्याचप्रमाणे “कोण आधी जाते पाहू या, कोण लवकर करते पाहू या,” वगैरे म्हणून स्पर्धाही उत्पन्न  करू नये. मूल सफाईने  चालू लागले म्हणजे शाबासकी  देण्याचीही जरूर नाही. त्याला स्वतःला त्या गोष्टी सुंदर रीतीने करता आल्याचा जो आनंद होतो तो त्याला अनुभवू द्यावा. त्यात स्तुती-निंदेची अथवा  स्पर्धा व चढाओढीची माती कालवू नये.

(शिक्षण पत्रिका वर्ष १, अंक १०, मार्च १९३४)

One response to “मुलांचे चालणे”

  1. Jyoti Avatar
    Jyoti

    अतिशय सुंदर शब्दात सांगितले आहे. खरच ही किती महत्त्वाची गोष्ट आहे पण एवढा विचार कोणी करत नाही .. बरेच पालकाना असे वाटते की कधी एकदा हे मूल मोठे होईल..आणि हे सगळे कामं कमी होतील… खूप खूप आभार 🙏🙏

    Like

Leave a comment

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.