(१)
एका घरात रोज संध्याकाळ झाली की मुले किरकिर करायची, रडायची आणि मग
आईकडून त्या मुलांना मार मिळायचा. त्यामुळे अधिक रडत ओरडत अखेर ती निजायची.
रडायचे कारण काय असेल?
कारण भुकेचे दु:ख होते. अशी आईची सवय की ती स्वयंपाकाला लवकर लागायचीच नाही.
खेळासाठी बालकांना कितीतरी मोकळी जागा होती. खेळायला देखील कसल्याच प्रकारची त्यांना
मनाई नव्हती. तेव्हा ही मुले दिवसभर कुदाकुदी, धावाधाव करीत; झाडावर चढत आणि दुसरे
धिंगामस्तीचे कितीतरी खेळ खेळत. संध्याकाळ झाली म्हणजे ती साहजिकच थकत. अन् मग
लगेच झोप यायची, भूक खूप खवखवायची, आणि अशा वेळी जेवायचे तयार नसल्याने रडायची
आणि भाकरी पोळी ऐवजी मार खाऊन निजायची.
पुष्कळ वेळा लहान मुले, इतर सर्व बोलता आले तरी “भूक लागली आहे,” “तहान लागली
आहे,” “थकवा आला आहे,” “झोप येते आहे,” “उकडते आहे,” वगैरे शरीरधर्म बरोबर ओळखून सांगू
शकत नाहीत. अगदी सात-सात आठ-आठ वर्षांची मुले होतात तरी देखील असे आढळून येते.
पुन्हा असे की मुले पुष्कळ वेळा असे काही बोलतात तरी मोठी मंडळी स्वत:च्या उद्योगधंद्याच्या
गडबडीत तिकडे विशेष लक्ष देत नाहीत. बिचारे बालक मग रडेल नाही तर दुसरे काय करू
शकेल?
(२)
एक मूल नेहमी रडायचे. त्याची आई इकडे तिकडे घेऊन फिरे. घरातली सगळी माणसे
त्याला खेळवून पहात, आई पुन्हा वारंवार पाजून पाही. तरी देखील ते सारखे रडायचे. काय असेल
बरे त्याच्या रडण्याचे कारण?
कारण आईचे अज्ञान होते. मूल सहा महिन्याचे होते. त्याची आई देखील अजून मुलीसारखीच होती. अगदी लहान वयात मातृपद आलेले आणि त्यातून पुन्हा निरक्षर. घरातील मोठी माणसे म्हणतील तसे ती करी. मूल रडायला लागले म्हणजे मोठी माणसे म्हणायची, “घे ना त्याला. जरा पाज ना. त्याचा गळा रडून रडून कोरडा पडला.” बिचारी ह्या आज्ञेप्रमाणे जेव्हा मूल
रडे तेव्हा त्याला पाजी.
पण बालकाच्या पोटात काही कळा येत असतील म्हणून ते रडत असेल तर? किंवा ढेकूण
डास त्याला त्रास देत असतील तर, अथवा कान दुखून रडत असेल तर? अथवा मुंग्या मुंगळे
त्याचा चावा घेऊन त्याला रडवीत असतील तर? पण ह्याची बिचार्या पोर मातेला कसली
कल्पना?
आईने पाजले म्हणजे बालकाला जरा ठीक वाटते. पण रडण्याचे मूळ कारण नाहीसे न
होईपर्यंत रडणे कसे बंद व्हायचे? आणि भूक नसता बळे बळे इतक्या वेळा पाजल्याने मुलांचे पोट
बिघडून अथवा बिघडलेल्या पोटावर आणखी दुधाचा डोस चढविल्याने आणखीच बिघडायचे. शेवटी
आईच्या अशा अज्ञानामुळे बिचार्या बालकाला रडल्याशिवाय उपाय काय?
(३)
असेच एक आणखी उदाहरण.
एक अडीच वर्षांचे मूल आहे. दिसायला सव्वा किंवा दीड वर्षांचे ते दिसते. त्याचे पोट मोठे
अन् हाता पायाच्या काड्या झालेल्या आहेत व तोंडावर थोडे देखील तेज नाही, प्रसन्नता नाही.
रडून रडून त्याने स्वत:चा आणि दुसर्या त्याच्या संबंधात असलेल्या माणसांचा जीव जिकिरीला
आणला आहे. सर्वांनी त्याचे नाव ‘रडक्या’ ठेवले आहे. आईला स्वत:चा कामधंदा करायचा असतो,
थोडी विश्रांती पण तिला हवी असते, पण करणार काय? रात्री-रात्री जागरणे तरी तिने किती
करावी? मुलाच्या हातात काहीतरी खायचे देऊन अंमळ त्याचे रडणे थांबवते, कधी तोंडात चोखणी
देते. फार फार तर वारंवार पाजून त्याला शांत करते; कधी इकडे तिकडे फिरवते नाहीतर दोन चार
खेळणी त्याच्या पुढे टाकते. पण मूल रडतेच, कारण?
कारण बालकाची शारीरिक हीन दीन स्थिती आहे; त्याची शारीरिक अस्वस्थता आहे. पुन्हा
त्याला शांत करण्यासाठी केव्हा ना केव्हा खायला मिळत असते. त्यानेही त्याला अस्वस्थता येते.
त्यामुळे पोटात कळा येतात अन् त्यामुळे झोप पण येत नाही. शारीरिक अस्वस्थतेमुळेच खेळ
खेळणी काही त्याला सुचत नाही. कुठेही त्याचे लक्ष वेधले जात नाही व त्यामुळे त्याच्या आसपासची माणसे कंटाळतात आणि कधी त्रासून मारतातही. रडक्या आणि इतर असल्या विशेषणांची लाखोली वाहिली जाते त्याचे कारण त्याची अशी शारीरिक दशा हेच. आईबाप त्याला औषधपाणी देतील, शरीराच्या इष्ट व्यायामाकडे लक्ष देतील, खाण्यापिण्यात
नियमितता ठेवतील तर रडणे बंद होऊन बालक सुखी होईल.
(४)
एक दुसरे मूल आहे. त्याचे शरीर पुष्ट होण्याऐवजी सुकत चालले आहे. घरात किती तरी खायला
प्यायला आहे आणि त्याला हवे तेव्हा मिळूही पण शकते. शिरा, मिठाई, पेपरमिंट वगैरे आईबाप
त्याला घालीत असतात. तरी पण ते सारखे रडत असते. त्याला स्वत:लाही समजत नाही आपण
का रडतो ते; आणि आईबापांना तर नाहीच नाही. त्याला कोणी रागावत नाही; मारीत नाही; जी
मागेल ती खेळणी त्याला मिळतात, तरी देखील दिवसाचा मोठा भाग त्याचा रडण्यात आणि हट्ट
करण्यात जातो. रात्रीचा पुष्कळसा वेळदेखील असाच. आई बाप त्याचे हवे ते लाड पुरवायला तत्पर
असूनही त्याचा काही उपयोग होत नाही.
याचे कारण?
येथे त्याचे आईबाप त्याची फाजील आणि निष्कारण काळजी करीत असतात, हे कारण
योग्य होय. बालकाला धष्ट पुष्ट करण्याचा उपाय डॉक्टरच्या सल्ल्याने शोधला पाहिजे. खायला ते
ज्याचा हट्ट घेईल ते पुरवीत गेल्याने बालक धष्टपुष्ट होण्याऐवजी खादाड आणि अतृप्त बनत
आहे. त्यामुळे शरीर असे बिघडत चालले आहे आणि हीच कारणे त्याच्या रडण्याच्या मुळाशीही
आहेत.
(शिक्षण पत्रिका, वर्ष ३, अंक २, जुलै १९३५)

Leave a comment