बालमंदिरात अडीच वर्षांपासून सहा वर्षे वयापर्यंतची मुले असतात. या मुलांचे सुद्धा भाषा शिक्षण असते. मुलांची अक्षरे पुरी झाली, लिहा-वाचायला लागली म्हणजेच भाषा शिक्षण सुरू होते, अशी कोणाचीही कल्पना असल्यास ती चुकीची आहे. भाषा ही काही नुसती लिहिण्या वाचण्याची गोष्ट नाही, पण मुख्यतः ती बोलण्याची आणि ऐकण्याची गोष्ट आहे. ऐकून ऐकून मूल भाषा शिकते. उच्चार शुद्धीवरच वाचन लेखनाचा मुख्य आधार असतो; कारण अक्षर आणि बाराखडी ही उच्चारावरच बसवली आहे. त्याचप्रमाणे शब्दांचा बरोबर अर्थ समजणे हे सुद्धा भाषा शिक्षणाचे एक महत्त्वाचे अंग आहे. स्वतःच्या मनातील विचार वाक्याद्वारे प्रकट करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. बरोबर उच्चार करणे, शब्दाचा अर्थ लक्षात ठेवून त्याचा संग्रह करणे आणि वाक्यामध्ये बोलता येणे या तिन्ही गोष्टी लेखन वाचनाशिवाय तोंडी करता येण्यासारख्या आहेत. भाषा ही ऐकायची आणि बोलायची असल्यामुळे तिच्या शिक्षणास तोंडीच सुरुवात झाली पाहिजे आणि दोन अडीच वर्षाचे मूल प्रथमच जेव्हा आपल्या जवळ येते तेव्हाच त्या शिक्षणाची सुरुवात झाली पाहिजे. घरी तर जन्मल्यापासून मूल ऐकतच असते. त्याचप्रमाणे पुढे क्रम चालू ठेवला तर त्याला पुष्कळ मदत होते.

येथे आपल्याला बोलून आणि मुलांकडून बोलून घेऊन भाषाशिक्षण कसे देता येते याची थोडीशी उदाहरणे देते. भाषाशिक्षणावरील एखाद्या तात्त्विक लेखापेक्षाही उदाहरणेच शिक्षकांना योग्य मार्गदर्शक होतील, व प्रत्यक्ष बालमंदिरातील शिक्षक अशा रीतीने भाषा शिक्षणाच्या असणाऱ्या या सरळ सोप्या पण आवश्यक अशा मार्गाचा अवलंब करून तोंडी भाषाशिक्षण सुरू करतील अशी आशा आहे.

उदाहरण पहिले

दोन अडीच वर्ष वयाची पाच सात मुले होती. ती जवळजवळ बोलतच नसत. नुसती ऐकायची! काय त्यांना समजत होते कोण जाणे? माझ्यासमोर प्रश्न आला की, या मुलांना बोलके कसे करावे? मी बडबडगीते म्हणायला सुरुवात केली. माझ्याबरोबर कोणी कोणी थोडे थोडे बडबडत असत खरी, पण ती काय बोलतात, ते मला नीट ऐकू येत नसे. उच्चार कसे करतात, एकामागून एक शब्द बोलतात, काही लक्षात येत नसे. सगळेजण माझ्याबरोबर काहीतरी बोलत असत इतकेच! काही दिवस याप्रमाणे मी चालू ठेवले. मी म्हणावे ‘खणखण कुदळी, मण मण माती.’ मुलांनी पण असेच काहीतरी बोलावे. आता याचे उच्चार कसे होतात, ते कसे समजावे? प्राथमिक शाळेप्रमाणे एकामागून एक मुलांकडून बोलवून घेणे तर शक्य नव्हते. दोन अडीच वर्षाची मुले ती! मनात आलं तर बोलायची, नाही तर निघून जायची!
शेवटी मी एक युक्ती केली. बडबड गीत एकदा दोनदा पुरे म्हटल्यावर मग त्यातला एक एक शब्द घेऊन बोलू लागले. जसे की, इथं इथं बस रे मोरा म्हटले की, मी म्हणायची,’आता मी बोलेल ते बोला हो – मोरा.’ ‘मोरा, मोरा,’ मुले सगळी एकदम बोलायची! मोला, मोरा, मोया असं काही काही ऐकू यायचे. ‘बाळ घालतय चारा, चारा, चारा, चारा.’ तरी पण, चाला, चाळा चाया असे काहीतरी निरनिराळेच ऐकू यायचे. अशा रीतीने एक एक शब्द मी बोलायला लागले. त्याची त्यांना मजा वाटू लागली. मनमोकळेपणाने ती बोलू लागली. पहिल्यांदा नुसती ऐकत होती, तेही योग्यच होते कारण ऐकून ऐकूनच भाषा शिकायची असते. पण शब्दांचा उच्चार करण्याचा नाद लागणे ही त्याच्या पुढची अवस्था यायलाच पाहिजे.

यानंतर मी बडबडगीतामधून आणि कधी कधी नुसतेच दुसरे सुटे शब्द बोलायला लागले. कधी कधी तर त्या शब्दांना काही अर्थ पण नसायचा. जसे, ताटली, खाटली, पाटली, वाटली, चाटली, दाटली, हाटली, जे मनाला येईल ते. पण मुलांना असे बोलण्यात खूप मजा वाटू लागली. याप्रमाणे वाटेल तसे शब्द बनवायला मी मुलांजवळच शिकले होते.

नंतर एक दिवस मला एक नवीन युक्ती सुचली. शब्द बोलता बोलता मी अक्षर बोलायला सुरुवात केली. ठो,ठो,ठो,ठो,सू,सू,सू,सू,हा,हा,हा,हा,ही,ही,ही,डु,डु,डु,डु,डु, णी,णी. अशा तऱ्हेने अक्षरे बोलायची तर मुलांना फारच मजा वाटली. मी वर्गात गेले की, मुले माझ्या भोवती जमत आणि म्हणत, ‘चला ना आपण डु डु डु डु करू.’ त्यामुळे रोज मला अक्षरांचा वर्ग प्रथम घ्यावा लागे. ठा, ठा, ठा,की,की,ख,ख,ख. मुलांना याची मजा वाटली. त्यांच्या उच्चार शिक्षणाची गुरुकिल्ली मला मिळाली. कधी कधी घर, घर,घर, सर, सर, सर, सर, सर असे म्हणावे, तर कधी च,छ,ट, ठ,घ,द असेच बोलावे. बाराखड्यांचे उच्चार पण घेत असे. कधी कधी कठीण उच्चारांचे शब्द पण ओठांची हालचाल सावकाशपणे करीत मी म्हणत असे. मुले माझ्या तोंडाकडे लक्षपूर्वक पहात असत आणि तसेच ओठ हलवून उच्चार करण्याचा प्रयत्न करीत.
याप्रमाणे उच्चार शिक्षणाचा माझा वर्ग जोरात चालला होता. बडबडगीतावरून मी शब्दावर आले आणि शब्दावरून अक्षरावर आले. पुढे पुढे कठीण शब्द, जोडाक्षरांचे शब्द, पाच- पाच, सात- सात अक्षरी शब्द असेही बोलू लागले. सीताराम- सीताराम, राधाकृष्ण- राधाकृष्ण, राम-लक्ष्मण, राम-लक्ष्मण, विठ्ठल- विठ्ठल, भीम-अर्जुन, देवकीनंदन, कौशल्या पुत्र, दशरथ पुत्र वगैरे.
त्याचप्रमाणे अहमदाबाद, अहमदनगर, सोलापूर, काठेवाडा, गुजरात, भाजीपाला, मीठ-मिरची, तीळ-गूळ, नदी-नाले, दरी-खोरी, नदी-काठ वगैरे शब्दही बोलू लागले. त्यासाठी घरी विचार करून शब्दांची यादी बनवावी लागत असे.
अशा तऱ्हेने शब्द आणि अक्षरे यांचा खेळ झाल्यावर मुले चांगल्या तऱ्हेने बडबडगीत म्हणू लागली. पहिल्यांदा काहीतरी बडबडत ती आता स्पष्ट उच्चार करू लागली. राम- लक्ष्मण, जानकी, जय बोलो हनुमान की, असे मी म्हणायची तेव्हा मोठ्या आवाजाने, आणि स्पष्ट उच्चार करून मुले ही माझ्या मागून म्हणायची.
पुढे पुढे तर त्यांना इतका आत्मविश्वास वाटू लागला की, त्यांच्यापैकी कोणीतरी प्रथम बोले, आणि त्याचा उच्चार पाठीमागून सर्वजण करीत. तेव्हा तर खूप मजा यायची. कोणी तेच तेच बोलायचे तर कोणी ‘सीताराम’ किंवा एखादा साधा शब्द सांगायचे. एकाने तर अनुताई म्हणून आमच्या तेथील एका शिक्षिकेचाच जप करून घेतला! कोणाकोणाला खाण्याच्या वस्तू फार प्रिय! मी पण गूळ, खोबरे, गुळदाणी वगैरे बोलवून घेत असे; म्हणून एकाने खजूर दे, खोबरे दे, गूळ दे असेच मुलांच्या पुढे हात करून म्हटले. मी पण गूळ घ्या, खोबरे घ्या, खजूर घ्या असे बोलून एका हातातून घेऊन दुसऱ्या हाताने देण्याचा अभिनय केला. त्याबरोबर सर्व मुलांनीही तोंडाने बोलून हाताने तसाच अभिनय केला.
याप्रमाणे उच्चार शिक्षणाचा आमचा पाठ रोज चालायचा. मुले त्याची वाट पाहात. हा पाठ घेतल्याशिवाय काम पुढे चालायचेच नाही. पण पुढे पुढे मी सांगू लागले की आता काम झाल्यावर अथवा मधल्या फराळाच्या वेळी हा खेळ घेऊ या. तेव्हा ती त्या वेळेची उत्सुकतेने वाट पाहत बसत आणि मला आठवण करीत.

उदाहरण दुसरे

शब्दसंग्रह – एकदा मी एक नवाच खेळ काढला. आमच्या खेड्यात रस्त्यावर भाजीबाजार भरतो. प्रत्येक जण स्वतःचे पोते अंथरून बसतो, आणि भाजीपाला पुढे मांडून ठेवून विकतो. मी म्हटले, ‘चला, आज मी भाजीवाली. ज्यांना जे पाहिजे ते येऊन घेऊन जावे. सगळे एकदम आली तर नाही देणार. एक एक जण येऊन घेऊन जा; आणि एकच प्रकारची भाजी मागा, नाहीतर माझी भाजी संपून जाईल.’ माझ्याजवळ मुळे, गाजर,भेंड्या, बटाटे, कांदे, वांगी, तोंडली, मेथीची भाजी, मिरची, दुधी इतकी भाजी होती.
पाळीपाळीने एक एक मूल येऊ लागले. कोणी म्हणे, तोंडली द्या. मी विचारले, किती पाहिजे? पाच. मी मोजून दिली व म्हटले, मोजून घे हो. एका मुलीने मिरच्या मागितल्या. मी म्हटले, कशा मिरच्या पाहिजेत? तिने हात लावून ‘ह्या’ म्हणून सांगितल्या. ‘हिरव्या मिरच्या पाहिजेत, लाल नकोत ना?’ मी म्हटले, व हिरव्या मिरच्या तिला दिल्या. लाल व हिरव्या हे शब्द मुलांनी लक्षात ठेवले. दुसऱ्या एकाने येऊन म्हटले, ‘लाल मिरच्या द्या.’ ‘किती देऊ?’ मी विचारले. ‘सात.’ याप्रमाणे मी बोलत होते. मुलेही बोलत होती. पुढे मुले आपापसात हा खेळ खेळू लागली. मुळ्याची आणि मेथीची जुडी मागत. लाल कांदे पांढरे कांदे, मोठी वांगी, लहान वांगी, आखूड भेंड्या अशा निरनिराळ्या विशेषणांचा उपयोग मी करीत गेले व मुले ते शब्द लक्षात ठेवीत गेली. कित्येकांनी त्या शब्दाचा उपयोग पण केला; इतकेच नव्हे तर स्वतःचे काही शब्दही त्यात घातले. नंतर निरनिराळ्या मालाची दुकाने निघू लागली. कधी धान्याची, कधी कपड्याची, कधी किरकोळ वस्तूंची. माझ्या घरातील प्रत्येक वस्तू मी जपून ठेवीत असे. कारण दुकानाच्या खेळाला पाहिजे ना!
अनेकदा विशेषण व एकवचन-अनेकवचनाचा खेळ मी घेतला. माझ्याकडे घड्याळाची दोन रिकामी डबडी पडली होती. एकाचा रंग पांढरा होता आणि एकाचा रंग निळा होता. टूथपेस्टची अशीच दोन रिकामी डबडी पडली होती. एक लाल अन एक पिवळे. त्याचप्रमाणे भोवरा, भिंगरी वगैरे घेऊन आम्ही खूप खेळलो. सगळ्यात मोठा निळा डबा दे. लाल आणि पिवळे डबडे दे. एक भोवरा दे. दोन भिंगऱ्या. याप्रमाणे बांगडी, बांगड्या, किल्ली, किल्ल्या वगैरे कितीतरी वस्तूवरून पुढे चालले.

उदाहरण तिसरे
एकदा आम्ही जंगलात फिरायला गेलो. एका ओढ्याच्या काठी बसलो. मुले म्हणून लागली.”चला, मागायचा खेळ खेळूया.” मी विचार केला की, आता इथे काय बरे मागावे? पण तेवढ्यात मुलांनीच खडे, काड्या, फुले, शंख वगैरे गोळा केले आणि खेळू पण लागली.
मी मुळासकट एक जंगली रोपटे उपटून आणले. त्याला फुले होती आणि लहान लहान फळे पण होती. काटेरी झाड होते ते, म्हणून जरा जपून धरावे लागत होते.
मुले बसली होती. तेथे मी गेले व म्हटले, “आज मागायचा खेळ नाही पण दाखवायचा खेळ खेळू या. हे मूळ, हे खोड. हरीभाई, मूळ दाखव, जगन भाई खोड दाखव.” पाने, फुले, फळे वगैरे शब्द तर त्यांना माहीतच होते. सहा शब्दावरून खेळ चालू झाला. माझ्या मागून हरीभाई झाडाजवळ बसला. नंतर कुंदा. याप्रमाणे एका मागून एक चालू लागले. थोड्या वेळाने मी म्हटले, सगळ्या झाडांना असे तर असतेच!

मुले इकडे तिकडे पाहू लागली. जरा दूर एक चिंचेचे झाड होते जगनभाई पळत गेला नी झाडाला हात लावून म्हणतो, ‘हे खोड काय?’ मी म्हटले, हो! नंतर मुले एकमेकांना विचारू लागली, दाखवू लागली. पाने, फुले, फांद्या. बया म्हणते, ‘पण याला फळ कुठे आहे?’ मी म्हटले,’हे काय फळ.’ ‘वा, ही तर चिंच!’ ‘हेच फळ! फळ शेंगासारखे सुद्धा असते.’ ‘शेवग्याच्या शेंगा?’ ‘हो हो शेवग्याच्या शेंगा, गोवारीच्या शेंगा.’ जगन म्हणे, ‘पण याला मूळ कुठे आहे?’ लगेच निसिंग म्हणाला, ‘झाड उपटले की जमिनीतून मुळ्या निघतील.’ दुसरी मुले, ‘ही पहा मुळे’ म्हणत आजूबाजूची लहान-मोठी रोपटी उपटू लागली.
मला भीती वाटली की, हे वानरसैन्य आता सगळी झाडे उपटणार की काय? मुळ्या पाहण्यासाठी केळ्यांची नी पपयांची रोपे ही उपटतील ही मंडळी! त्यावेळेला तर खेळ तसाच चालू दिला. पण फराळ करते वेळी सूचना दिली की, मुळासकट झाड उपटले तर झाड मरून जाते, म्हणून अगदी जरूर असेल तेव्हा झाड उपटावे. नाहीतर उगीचच्या उगीच झाडाला कशाला दुखवावे?
‘हो हो.’
‘मेथीला फळ येते का?’
‘पाहू या, फळ फूल येते की काय?’
याप्रमाणे बोलता बोलता कितीतरी तोंडी भाषाशिक्षण देता येते. आपल्या मनावर भाषा शिक्षण हे पुस्तकाद्वारेच होते, अशा तऱ्हेची छाप कित्येक वर्षापासून पडली आहे, ती काढून टाकली पाहिजे. भाषा म्हणजे बोलायची व ऐकायची असते, ही गोष्ट लक्षात ठेवून ‘बोलून’ आणि ‘बोलवून’ भाषाज्ञान वाढवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. बालशिक्षकांनी ही गोष्ट विसरताच कामा नये.

(शिक्षण पत्रिका, वर्ष 17, अंक 2, फेब्रुवारी 1948)

Leave a comment

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.