
मागील लेखांत चित्रकामाचा ज्ञानार्जनाशी कसा निकट व महत्त्वाचा संबंध आहे त्यासंबंधी विचार केला.
आता बालजीवनात चित्राचे स्थान पाहू या. आम्ही शाळेच्या मुलांस किहिम येथे पर्यटनास नेले. मुले समुद्र, नारळाची वाडी, डोंगर, बोट वगैरे गोष्टींनी इतकी खूश झाली की त्या सर्व गोष्टीची खोल छाप मनावर बसली. घरी आल्यावर त्यासंबंधी पुन्हा पुन्हा बोलली, भाषणे केली. वर्गात लेखनातही तोच विषय. “आम्ही किहिमविषयी लिहू का?” म्हणून तेच लिहिले. आवडलेल्या गोष्टीचे स्मरण करावयास आवडते, त्याप्रमाणे त्यांना झाले होते व त्यांनी केलेही.
प्रवासाला जवळ जवळ महिना होत आला. शाळेत वार्षिक परीक्षा चालल्या होत्या. चित्राची परीक्षा आली. मुलांना सांगण्यात आले “ तुम्हाला हवे ते सुंदर चित्र काढून आणा.” सर्व मुले विचारू लागली, “आम्ही किहिमचे चित्र काढू का?” एका आवाजात सर्वांचे एकच म्हणणे पाहून आश्चर्य वाटले.
“काढा, वाटेल ते काढा.”
कोणी बोट, कोणी किहिमचे घर, कोणी समुद्र, कोणी नारळाची वाडी – अनेक चित्रे काढली. चित्रकला पुरती अवगत नसल्यामुळे चित्रकलेच्या दृष्टीने अर्थात अनेक दोषयुक्त व अपूर्ण, अविकसित अशी होती. पण चित्र काढण्याचा चित्रकारांचा आनंद मात्र बेहद्द होता. यापेक्षा निराळी चित्रे काढली असती तर परीक्षेत मार्क अधिक मिळाले असते. आपल्याला काढायला न आल्यामुळे परीक्षेत नापास होऊ वगैरे विचार त्यांना शिवलेच नाहीत. त्यांची अंत:स्फूर्ती इतकी जोरदार व किहिमची चित्रे काढण्याचा इतका आनंद व चित्र काढल्याचा संतोष इतका संपूर्ण होता की तेथेच तो विषय पुरा होत होता.
याचे कारण काय ?
पहिले कारण अर्थात परीक्षेच्या मार्काच्या व नंबर वर मिळवण्याच्या वातावरणात ही मुले वाढलेली नसल्यामुळे तो विचार त्यांना आलाच नाही हे साहजिक होते.
दुसरे कारण मनाच्या आनंदाकरता चित्रे काढण्याची सवय झाल्यामुळे एकदम मनपसंत विषय घेतला गेला व सुखमय अनुभव आठवून ते व्यक्त करण्याने ( emotional release )भावनांचा बांध फुटून वाहण्यासाठी अवकाश मिळाल्यामुळे त्यांना त्या चित्रकामात खूप आनंद वाटला.
कलेच्या दृष्टीने कोणती कृती अधिक श्रेष्ठ ठरेल? चित्र काढण्याचे शास्त्र अवगत असून शास्त्रोक्त रीतीने बरोबर काढलेले चित्र? की शास्त्रदृष्ट्या अनेक चुका अथवा शास्त्राचा जवळ जवळ अभावच असूनही भावनेच्या ऊर्मी उचंबळून आल्यामुळे जे सहजासहजी निघून जाते ते चित्र ?
कलाकोविद काहीही म्हणोत, बालके तर चित्राचा उपयोग भावनांना व्यक्त करण्यासाठी करतात. भावना उंचबळून आल्या म्हणून त्यांना वाट करून देण्याची जरूर त्यांना भासते. मनुष्याने याच कारणांनी अनेक विविध कल्पनांना जन्म दिला, नाही का ?
काव्य का उत्पन्न झाले? संगीत, चित्र, नाट्य, नृत्य या कला का उत्पन्न झाल्या? भावनाविष्करणासाठीच. आधी कला जन्मास आली व नंतर तिचे शास्त्र जन्मले. या निर्मितीच्या मुळाशी कोणत्या प्रकारचे नियम आहेत ते पाहण्यात आले. तेव्हा ऊर्मीयुक्त कलाकृतीच प्रथम स्थान आहे असे दिसते.
अर्थात कलेचा अथवा ज्ञानाचा जो आतापर्यंत विकास झाला त्याचा फायदा आपल्याला बालकांस मिळावयास हवाच व शास्त्र माहिती नसल्यामुळे जो ओबडधोबडपणा व चुका राहून जातात त्या तशाच राहाव्यात; कलेची प्राथमिक अवस्थाच नेहमी राहू द्यावी हे कोणासच पटणार नाही. कलेचे सुंदर नमुने व शास्त्रोक्त नियम त्यांना जसजसे मिळत जातील तसतसे त्याच्या भावनाविष्करणास सरलता मिळेल व खरा संतोष मिळेल. जसे भाषेतील जास्त शब्द व शब्दप्रयोग कळत जातात तसा विचार व्यक्त करण्यास मदत होते व योग्य रीतीने व पूर्णपणे विचार दर्शविल्याचा संतोष वाटतो, नाहीतर मनास असमाधान रहाते. तसेच चित्रकलेतही पूर्णपणे व बरोबर रीतीने विचार व्यक्त झाल्यास मनाचा असंतोष राहातोच. असो.
प्रश्न हा आहे की बालजीवनात चित्रकलेचे स्थान काय आहे ?
नवनिर्मितीचा व आत्माविष्करणाचा आनंद हा एक अनमोल सात्विक आनंद मनुष्य प्राणी अनुभवीत असतो व तोच कलांच्या द्वारा मनुष्य मिळवीत असतो.
सर्व कलांत बालप्रिय अशा कोणत्या कला म्हणून पाहू गेले तर प्रथमपद नृत्यास मिळेल. बालभावना इतक्या एकदम उत्कट होतात की त्या शब्दात रंग किंवा रेषेत, अथवा सप्तसुरांत व्यक्त करण्याच्या पूर्वी बालक थयथया नाचून प्रथम व्यक्त करते. नृत्यकलेचे शास्त्रही इतर कलांच्या शास्त्राइतकेच व नियबध्द व संज्ञापूर्ण झाले असले तरी बालनृत्य व जानपदनृत्य यास स्वतंत्र स्थान द्यावेच लागेल व बालक जे अंगविपक्ष स्वाभाविकपणे करील त्यासच वळण द्यावे लागेल. बालनृत्याचाच विकास आपणांस बालपणाच्या खेळांत दिसत आहे. दुसरे स्थान चित्रकलेस येईल. कारण नृत्याच्या खालोखाल चित्रकलेत प्रत्यक्षपणा (vividness) असतो. कोणी हसतो, एवढे म्हणण्याने तितका प्रत्यक्षपणा येत नाही जितका मुक्त हास्य करीत असलेल्या मनुष्याचे चित्र पाहून अथवा काढून येतो. तीच हास्य विनोद अथवा आनंदाची भावना स्वरातून व्यक्त करण्यास एकबाजूने भाषेची व एकबाजूने स्वरांची मदत घ्यावी लागते व हा हा हा करून हसण्याची तबकडी काढली तर ते हास्य गायन होत नाही. ते प्रत्यक्ष हास्यच होते. गाण्याची रीत, चाल, राग व शब्दाचे उच्चार वगैरेच्या मदतीने भाव व्यक्त करण्यास बरीच शास्त्रसाधना लागते.
त्यामुळे या बाबतीत संगीतकलेपेक्षाही चित्रकला अधिक बालप्रिय असते. आमचा अनुभवही असाच आहे की गाणे वा चित्र यामध्ये पसंत करण्याची वेळ आली तर बरीच मुले चित्राकडे वळतात. याचे कारण चित्रकामात त्यांना स्वतः निर्मिती करणे वगैरे जास्त सोपे पडते व झालेल्या कृतीमध्ये आपल्या भाव व्यक्त आहे हे त्यांना दिसते.
संगीतकला ही बालभोग्य व बालप्रिय नाही असे नाही. बालकांस योग्य अशी गाणी व चाली त्यांच्या पुढे आल्या तर ती तितक्याच मस्तीने व हृदय ओतून गाणी म्हणतात. त्याचप्रमाणे मधुर संगीताने तितकीच मुगधही होऊ शकतात. संगीताने रंजित होणे ही शक्ती तर तान्हेपणापासून बालकांत दिसून येते. चित्रांचा आस्वाद घेण्याची शक्ती आलेली नसते तेव्हांच बाळ आईची गाणी ऐकण्यास उत्सुक असते. यावरून बाल्यावस्थेत ती संगीतपरत्वे संस्कारक्षम असतातच. त्याचप्रमाणे त्यांना गाणी गावीशीही वाटतात. तथापि सामान्यतः बोलायचे म्हणजे संगीत हे चित्रकलेपेक्षा जरा अधिक सूक्ष्म आहे. कारण चित्रांत प्रत्यक्ष वस्तूच असतात व संगीतात सुरांच्या मदतीने तो भाव उत्पन्न करावयाचा असतो. त्यामुळे प्रारंभिक चित्रकलेकडे बालकांचे अधिक आकर्षण असणे साहजिक आहे.
मुलांमध्ये फरक तर असतोच. काही नादप्रधान असतात. ती संगीताकडेच अधिक आकर्षिली जातात. तर काही भाषाप्रधान असतात, व लहानपणापासून नवे नवे शब्द पकडणे व ते वापरणे यांकडे त्याचा कल असतो. अशा मुलांनी गाणी म्हटली तरी चाल ताल यापेक्षा ती गाण्याच्या शब्दावरच मोहित असतात. त्यांची चित्रे पहिली तरी चटकन त्या चित्राचे वर्णन भाषेत करतात. म्हणजे इंग्रजीतला धडा मराठीत भाषांतर करून घ्यावा त्याप्रमाणे ती चित्रभाषेस शब्दभाषेत उतरवितात. त्या उलट जी चित्रप्रधान मुले आहेत ती मुले शब्दात सांगितलेल्या गोष्टी, प्रसंग, ऐतिहासिक गोष्ट वगैरे काहीही ऐकल्या की त्या चित्राच्या भाषेत भाषांतरित करून घेतात म्हणजे त्यांची चित्रे काढून मोकळी होतात.
याप्रमाणे बालकांना एकतर सामन्यातः चित्रकला प्रारंभी अधिक आकर्षक वाटते. तिच्या मध्ये संज्ञा नसून प्रत्यक्षपणा असतो. हिरवा पोपट या शब्दावरून भाव उत्पन्न होण्यास हे दोन शब्द म्हणजे हिरवा रंग व पोपट हा पक्षी व्यक्त करणाऱ्या संज्ञामार्फत कल्पनेच्या जोरावर समजून घ्यायचा असतो. चित्रात प्रत्यक्ष हिरवा रंगच दिसत असतो व पोपटही प्रत्यक्ष दिसत असतो. म्हणजे प्रत्यक्ष जिवंत पोपटाशी जास्तीत जास्त साम्य असणारे व तो पोपट जास्तीत जास्त प्रत्यक्ष करणारे त्याचे चित्र असते. म्हणून बाल जीवनांत व त्यामुळे बालशिक्षणात चित्राचे स्थान फार महत्त्वाचे आहे.
त्याचप्रमाणे रूपरंग-प्रधान म्हणजे रूपरंगाकडे ज्याचे लक्ष प्रधानपणे वेधले जाते अशा बालकांस तर चित्र हे प्राणरूपच होऊन बसते. संगीत प्रधान अथवा भाषाप्रधान बालके जशी त्या त्या कलेकडे वळतात तशी चित्रांकडे विशेष वळणारी बालके रूपरंगप्रधान असतात.
या दृष्टीने चित्रकलेचे बालशिक्षणतील महत्त्वाचे स्थान ओळखले पाहिजे. आतापर्यन्त चित्र ज्ञान मिळण्यास उपयोगी आहेत हे स्वीकारले गेले आहे त्यामुळे मुलांच्या शाळेत चित्रे असावीत (चाटर्स) तक्ते असावेत ही गोष्ट मान्य झाली आहे.
मुलांना चित्र काढता यावीत असेही थोडेसे गुळमुळीत स्वीकारले गेले आहे, त्यामुळे शिक्षकांच्या मदतीने काठी, पेन्सिल, भोवरा, दऊत वगैरेची चित्रे घेण्यात येतात. परंतु भाषेच्या प्रमाणात चित्राचे स्थान वरच्या प्रतीचे आहे. हे फार थोड्यांच्या लक्षात आले आहे. व आलेले असेल तरी राज्यमान्य – सर्वमान्य झाले नाही.
विचार अथवा भावना व्यक्त करण्यास व नवनिर्मिती, नवरचना करण्यास बालक चित्रकलेचा उपयोग करू शकते व तसे करण्यास सवड करून देणे बालशिक्षकांचे काम आहे ही गोष्ट कोठेच स्वीकारण्यात आलेली दिसत नाही. त्यामुळे ज्या शाळेत हे तत्त्व स्वीकारण्यात येते ती मूर्ख ठरते. तुमच्या शाळेत मुले लिहिण्यापेक्षा चित्रेच करीत बसतात हा त्या शाळेवर आरोप असतो व तो दुर्गुण म्हणून दाखवण्यात येतो.
शाळेत गणित शिकवण्यास मास्तर लागतो, वाचन लेखनास मास्तर हवा, परंतु संगीत शिक्षक, चित्रशिक्षक, नृत्याशिक्षक कशाला हवा? ते पुष्कळांना समजत नाही. याचे कारण बालजीवनात नृत्य, चित्र, संगीत वगैरेचे काय स्थान आहे ते बहुतेकांना समजलेले नाही व याचे कारण आपल्या शिक्षणाचा पाया अद्याप शास्त्रीय नाही.
(शिक्षण पत्रिका, वर्ष 7 अंक 11, एप्रिल 1940)
(मुलांनी काढलेली चित्रे क्वेस्ट संस्थेच्या संग्रहातून)


Leave a comment