मुले खेळता खेळता भांडू लागतात अशा वेळी त्यांच्या भांडणात मोठ्या मंडळीनी मध्ये पडून त्यांचा तंटा तोडावा की नाही ?

प्रश्न विचार करण्याजोगा आहे.

मुलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे असे मानणारे म्हणतील की, “मुलांना मोकळे असू द्या. मध्ये पडू नका.”असे म्हणण्यात बराच सत्यांश आहे. जेथे मोठी मंडळी मध्ये पडून भांडण मिटवण्यास जातात तेथे पुष्कळदा मुलांच्या मूळ भांडणात नसलेले द्वेषबुद्धीचे बीजारोपण होते. खेळता खेळता गोष्ट भांडणावर आली तरी मुलांची स्वभाविक इच्छा खेळण्याची असते. त्यामुळे थोडीशी हमरी तुमरी झाली किंवा क्वचित एकमेकांना लगावून देण्यापर्यंत मजल गेली तरी शेवटी थोड्याच वेळाने पुन्हा खेळावयास लागतात. परंतु जेव्हा मोठी माणसे मध्ये पडतात तेव्हा प्रश्न जिद्दीवर येतो. भांडण लवकर मिटून खेळायला केव्हा सुरवात होते असा जो मुलांचा स्वाभाविक कल असायचा त्याऐवजी आपले म्हणणे बरोबर ठरावे व आपल्याशी भांडणाऱ्या मुलांस मोठ्यांच्या कडून बोलणी अगर मार बसावा अशी इच्छा निर्माण होते. मग मुले नेहमी आपला पक्ष घेऊन जो कोणी दुसऱ्याला रागे भरील अशाच्याकडेच भांडणे घेऊन जातात. आपली कोणच्या प्रकारची भांडणे कोणाजवळ न्यावी ते मुलांना थोड्याशा अनुभवावरून कळून येते. एखादे वेळी मूल आईजवळ गेले असेल व सांगितले असेल, शेजारच्या लखूने त्याला वेडावून दाखवले, व आई जास्त चौकशी केल्याशिवाय शेजारच्या लखूवर रागावली असली व त्याला म्हणाली असली की, “पुन्हा असे करशील तर तुझं थोबाड रंगवीन,” तर त्या मुलास आपली भांडणे तोडावयाचा एक प्रकारचा अनुभव मिळतो.

एखादे वेळी ते बाबाजवळ अशाच प्रकारची कागाळी घेऊन गेले असता बाबाने चौकशी करून आपल्या पुतण्यावर रागवायच्या ऐवजी आपल्या मुलाचीच चूक काढली असती व फिरून असे करू नकोस असे म्हटले असते तर त्या मुलास दुसऱ्या प्रकारचा अनुभव मिळाला असता, व त्याने मनाशी ठरवले असते की, आपल्या कागाळ्या आपल्या आईकडेच नेणे बरे. याचप्रमाणे घरातली कोण व्यक्ती व शाळेतील कोण शिक्षक, आपली बाजू घेऊन भांडणारे याचीही त्याने खूणगाठ बांधून ठेवली असेल. याप्रमाणे मुलांच्या भांडण्यामध्ये साध्या भांडणाऐवजी आपल्या वडील माणसांच्या मदतीने दुसऱ्यास मार किंवा बोलणी बसल्याबद्दल कटुता, वगैरे नको त्या गोष्टी आत शिरतात व त्यामुळे बालकांचे जीवन फार दुःखी होते.

पुष्कळदा मोठी माणसे मध्ये पडून भांडणे मिटवतात तेव्हा मुलांच्यावर एक दुसराही परिणाम होत असतो. आपलेच म्हणणे खरे ठरले पाहिजे अशी एक जिद्द त्या भांडणात येते व जे कोणी आपले म्हणणे बरोबर आहे असे म्हणतील असे त्यांस वाटते त्याकडे मुले भांडण घेऊन जातात व त्याने “याचे म्हणणे बरोबर आहे” असे म्हटले की, त्या मुलामध्ये आपण जिंकल्याचा अभिमान व आनंद उत्पन्न होतो. दुसरे मूल बिचारे निराश होते. दोन मुले सारख्या भूमिकेवर उभे राहून भांडत असताना दोघांपैकी एकाची सरशी झाली व दुसरे हरले तर त्यास त्याचे इतके वाईट वाटत नाही. परंतु आपण दोघे सारखे असताना कोणी मोठ्यांनी येऊन एकाची बाजू घेतल्यामुळे त्याची सरशी झाली म्हणजे हरणाऱ्या मुलास फार वाईट वाटते, निराशा वाटते. कारण त्याच्या मनात अस्पष्ट कल्पना असते की, “हा आपल्या बाबत अन्याय झाला आहे.” नुकसान दोन्ही मुलांचे होत असते. दोघांमधूनही सत्याची आवड निघून जाते. जे खरे असेल ते खरे ठरावे असे न वाटता आपले खरे ठरावे व दुसऱ्याचे खोटे ठरावे अशी वृत्ती त्यांच्यात उत्पन्न होते.

बहुतेक वेळा मोठी माणसे मुलांचे म्हणणे मुलांच्या दृष्टीने पाहात नाहीत. मोठ्यांच्या दृष्टीने ती त्यास गंभीर स्वरूप देतात. त्यामुळे पुष्कळदा ज्या गोष्टी मुले साधारणपणे काही क्षणानंतर विसरून जायची त्या गोष्टी त्यांच्या मनावर कायमच्या ठसून जातात.

पुष्कळदा मोठ्या मंडळीत मुलांची दृष्टी नसल्यामुळे त्यांचा निर्णय मुलास समाधानकारक वाटत नाही. ती मोठी असल्यामुळे तो निर्णय स्वीकारावा लागतो, खरा मानावा लागतो. जरी पटला नाही तरी पटवून घ्यावा लागतो व असे वारंवार होत गेले तर त्याचा नुकसानकारक परिणाम होतो. मुले विचारात व निर्णय करण्यात परावलंबी बनतात. एकदा मोठ्या मंडळीनी न्याय करून देण्याची सवय पडली की मुले स्वतः विचार करीनाशी होतात. मोठी माणसे जो निर्णय देतील तो मान्य करावयाचा. वडील मंडळीनी म्हटले की, अमका अगदी भांडखोर आहे, अमुक अगदी गरीब आहे, तर ते मनाला न पटले तरी स्वीकारावयाचे. एकदंरीत मोठ्या मंडळींच्या तराजूने सर्व तोलावयाचे अथवा खरे म्हटले तर तोलल्याशिवाय स्वीकारावयाचे अशी मुलांची स्थिती होते. असे होता होता मुलांची स्वतः विचार करण्याची शक्ती मंद झाल्यामुळे मुलांना नेहमीच वडीलांच्या निर्णयाची आवश्यकता भासू लागते. ती नेहमीची परप्रकाशित होऊन राहतात. मनुष्यास स्वतः विचार करण्याची, हकीगत तपासण्याची व तोलण्याची व त्यावरून स्वतः निर्णय करण्याची शक्ती असेल तर केव्हाना केव्हा तरी त्यास आपली स्वतःची बाजू सदोष आहे हे दिसून येईल. आपल्यामधील दोष त्याच्या नजरेस येतील. कोणास अन्याय होत असल्यास तो त्यास कळेल. भांडणांमध्ये आपला भाग काय काय होता, आपण क्रोध, द्वेष वगैरे वृत्तीच्या आवेशात काय बोललो, काय केले, काय व्हावयास नको होते असे आपल्या हातून काय काय झाले व योग्य असे काय झाले वगैरे गोष्टींचा शांतपणे विचार करण्याची सवय असल्यास, शक्ती असल्यास मूल केव्हा तरी भांडणाचा योग्य निकाल लावण्यास शिकेल. परंतु ती शक्ती गेल्यावर मूल परावलंबी, विचारशून्य बनते व तेच पुढे मोठे झाले म्हणजे त्याच्यावर मुलांच्या भांडणात निकाल देण्याची वेळ येते अशा स्थितीत वाढलेल्या बहुतेक वडील मंडळींचे निर्णय, हे अपरिपक्व, एकतर्फी, कोत्या बुद्धीचे असतात याचे कारण यावरून सहज लक्षात येण्यासारखे आहे.

मुलांच्या मध्ये न पडता बाजूस राहून बालजीवनाचे निरीक्षण केले तर असे दिसून येते की, मुलांची भांडणे फार थोडा वेळच टिकतात त्याचप्रमाणे त्याची भांडणे मिटवण्याच्या रीतीही सरळच व खेळाडू वृत्तीच्या असतात. एकमेकांना दोन चापट्या मारल्या अथवा गुद्दे मारले किंवा दंड थोपटून कुस्ती केली की तेथे बरेचसे तंटे समाप्त होतात.

भांडण मिटवण्याच्या या रीतीमध्ये न्यायान्याय तोलण्यापेक्षा एक प्रकारची खेळाडू वृत्तीच असते. मोठ्यांनी मध्ये पडून भांडण मिटविले तर त्यात एकाला अन्याय झाला अथवा दुसऱ्याचा पक्षपात झाला वगैरे भावना मुलांचे मनात जागृत होण्यास जसा अवकाश मिळतो तसा या मुलांच्या रीतीमध्ये बहुतेक नसतो. कारण भांडण म्हणजे मतभेद व मतभेदांत आपले म्हणणे दुसऱ्यास रूचले नाही हाच दुसऱ्याचा गुन्हा असतो. दोघेही एकमेकांचे असतात त्यामुळे दोघांनाही एकमेकांनी मारले म्हणजे एकमेकांना योग्य न्याय मिळाल्याचे समाधान त्यांना वाटते. तेवढ्या पुरते भांडणाला तीव्र स्वरूप आल्यासारखे वाटते, तरी मनावर त्याचा कटु परिणाम फार वेळ राहात नाही.

मुलांच्या मध्ये पुष्कळ न्यायबुद्धी दिसून येते. मुलांना स्वतः विचार करू दिल्यास ती पुष्कळ बारीक बारीक भेद पाडू शकतात व खऱ्याचा निर्णय देऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांच्या समाजात ती जुलूम करणाऱ्या अथवा अरेरावी गाजवणाऱ्या मुलास, समूहबळ एकवटून ताब्यात ठेवू शकतात असे दिसून येईल. मोठ्या माणसांप्रमाणे लहान मुलांच्या समुदायांतही बलवान मुले अशक्त मुलांना दाबून टाकण्यास पाहातात, श्रीमंत अथवा सत्ताधाऱ्यांची मुले गरीबावर आपल्या वरचष्मा चालवितात. त्याचप्रमाणे बुद्धिशाली मुले मंदबुद्धि बालकांवर आपल्या बुद्धीच्या प्रभावाने अधिकार गाजवू पाहातात व निर्बल, गरीब, मंदबुद्धि बालके आपल्या जुलमी मित्रांना लाच लुचपत देऊन अथवा अन्य रीतीने त्यांची मर्जी संपादन करून स्वतःला त्यांच्या त्रासांतून वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना आढळतात. अर्थात अशा गोष्टी मुलांच्यामध्ये पुष्कळदा मोठ्यांच्या मधूनच येत असतात. जी मुले घरी मार खातात तीच मुले बहुदा आपल्यापेक्षा लहान बालकांस मारताना दिसतात. ज्या मुलांना हट्ट न करण्याबद्दल अथवा न रडण्याबद्दल घरी खाऊची लाच देण्यात येते, तीच मुले इतर मुलास आपली पेन्सील अथवा आपल्या वाटणीचा खाऊ देऊन खूष ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

वर म्हटले त्याचप्रमाणे मुलांच्या समूहात समूहबळ आले असल्यास ती अशा प्रकारचा अन्याय सहन करीत नाहीत व जुलमी व्यक्तींना दाबात ठेवतात. तरी पण मोठ्या समूहात होते त्याप्रमाणे या समूहातही कधी कधी सबंध समूह, एखाद्या व्यक्तीच्या शहामधे येऊन जातात. तेव्हा त्यांना त्या जुलमी व्यक्तींच्या जुलमातून मोकळे करण्यास मोठ्यांची जरूरी असते. त्याचप्रमाणे व्यक्तिव्यक्तींच्या मध्ये जेव्हा बलवान अशक्तास जुलमी रीतीने ताब्यात ठेवू पाहातात, बुद्धिमान मुले निर्बुद्ध मुलांवर अन्याय्य रीतीने सत्ता चालवितात अथवा श्रीमंत मुले आपल्या बडेजावीने गरीब मुलांना आपले गुलाम बनवू पाहतात; मोठ्या वयाची मुले जेव्हा अशीच सत्ता गाजवू पहातात तेव्हा अशा प्रत्येक प्रसंगी वडील मंडळीनी लहानांचे, अशक्तांचे, कमी बुद्धीच्या बालकांचे व गरीब बालकांचे त्यांच्या जुलमी मित्रांपासून रक्षण केले पाहिजे. मुलांना मोकळे राहू द्या. पण याचा अर्थ असा नाही की लहान व अशक्त मुले मोठ्या मुलांच्या जुलमाखाली चेंगरत असली तर चेंगरू द्यावं किंवा मोठ्या मुलांच्या चुकीच्या वर्तनाने लहानांच्या विकासास अडथळा येत असला व ती केवळ परावलंबी बनत असली तर बनू द्यावं. अशा वेळी वडील मंडळीनी मधे पडून लहानांना मोठ्यांच्या जुलमांतून वाचवलेच पाहिजे. त्यांना रक्षण मिळालेच पाहिजे. मात्र रक्षण इतक्या अधिक प्रमाणातही मिळता कामा की ती रक्षणाकरिता नेहमी वडील मंडळीवर अवलंबून राहून कायमची परावलंबी बनतील. तर स्वतःची भांडणे स्वतः भांडून जुलमी मुलांपासून स्वतःचे रक्षण करून घेण्याची शक्ती त्यांना येईल अशा प्रकारची मदत आपल्याकडून मिळवावी. त्याचे व्यक्तित्व विकास पावेल, व त्यांना समूहात स्वतःच्या बळावर राहता येईल, हे आपले ध्येय असावे. त्यांचे अविकसित व्यक्तित्व विकसण्यास योग्य अशी साधने द्यावी व ती शांतपणाने वापरण्यास संधी द्यावी.

पुष्कळदा वडिलांच्या रक्षणाने बलवान बनलेली अशक्त अथवा लहान मुलेच खऱ्या बलवान मुलांवर जुलुम गाजवतात. कारण वाटेल तेव्हा वडिलांची मदत आपल्यास मिळेल हेच त्याचे मोठे शस्त्र असते. “आईला सांगेन”“मार बसवीन” किंवा “पहा हं, मार, मी रडेन, मग बाबा रागावतील तुला” अशा धमक्या आपल्या कानी कित्येक वेळा पडतात. मोठ्या मुलांनाही माहीत असते की वरच्या कोर्टापर्यंत फिर्याद गेल्यास आपल्या विरुद्ध निकाल लागणार व आपलाच पाणउतारा होणार म्हणून अंगात शक्ती व बुद्धी असून त्यांना, त्या लहानांना भिऊन चालावे लागते.

असे प्रसंग शाळेपेक्षा घरी जास्त येतात. कधी योग्य कारणामुळे अथवा कधी कारणाशिवाय आईबापांचे एखादे मूल अधिक लाडके असते व त्यामुळे त्या जोरावर आपल्या इतर भावंडावर जुलूम करीत असते. पुष्कळदा आपल्या समाजात भाऊ बहिणीवर अशा तऱ्हेचे जुलूम करीत असतात त्याचप्रमाणे सर्वात धाकटे मूल पुष्कळदा मोठ्यांच्यावर अधिकार गाजवित असते. या बाबतीत आई बाप व इतर वडील मंडळीनी स्वतःच अवलोकन केले पाहिजे व निर्णय नि:पक्षपातीपणे दिले पाहिजेत. अशक्त, सशक्त, सुबुद्ध, निर्बुद्ध, सुंदर, कुरूप सर्व मुलांची कोणत्याही प्रकारच्या बाहेरच्या दडपणाशिवाय योग्य वाढ होईल असे वातावरण त्यास मिळू देणे हेच वडील माणसांचे कर्तव्य आहे.

वरील विवेचनावरून दिसून येईल की, मुलांची भांडणे नेहमीच आपण मध्ये पडून दाबली पाहिजेत अथवा मिटवली पाहिजेत असे नाही. योग्य रीतीने (HEALTHY) भांडलेली भांडणे मुलांस शरीराने व मनाने मजबूत बनविण्यास साह्यभूत होतात त्याचप्रमाणे मुलांच्या भांडणांत कधीच न पडता सशक्त वगैरेचा अशक्तांवर जुलूम होऊ देणे हेही बरोबर नाही. त्याप्रमाणे जास्त रक्षण देऊन अशक्त मुलांना उलटपक्षी जुलमी बनविणे हेही ठीक नाही. तरी या बाबतीत आपले सूक्ष्म अवलोकन चालू असावे व जरूर असेल तेव्हा तितक्याच प्रमाणात मध्ये पडून जरूर असेल त्या बाजूस आपली मदत पाहिजे शाळातून आणि घरांमधेही मुलांच्या भांडणावर निर्णय देण्यासाठी मुलांचीच न्यायसभा भरविल्यास त्यांची सूक्ष्म न्यायबुद्धी किती आहे, भांडणासंबंधी त्यांची दृष्टी काय आहे हे समजून येईल, व मुलाच्या अल्प बुद्धीमुळे कधी कधी त्यांचे निर्णय असावेत त्यापेक्षा अधिक कडक स्वरूपाचे असल्यास त्यांना आपण थोडसे मार्गदर्शक होऊन त्यांच्या निर्णयाम सौम्य स्वरूप देण्यास आपणास संधी मिळेल.

(शिक्षण पत्रिका, वर्ष १, अंक ९, फेब्रुवारी १९३४)

Leave a comment

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.