अपशकुनाच्या अथवा भुताखेतांच्या गोष्टी आपण बालकांना सांगाव्या की नाही? असल्या गोष्टी सांगाव्या आणि सांगू नयेही. खरोखरच आपण स्वतः जर शकुनापशकुन मानीत असलो आणि त्यामुळे तसली सार्थ भाषा आपण जर वापरीत राहिलो तर मात्र बालमनावर असल्या गोष्टींपासून अनिष्ट परिणाम होतो.

बरेचदा लेखक शकुनापशकुन खरोखर मानीत नसतो. पण आजकाल साहित्यात एक रसोत्कर्षाला अनुकूल म्हणून, लेखनातील प्रसंग चांगला रंगावा म्हणून “घुबडाचे घुत्कार चालू होते,” “इतक्यात एक मांजर इकडून तिकडे निघून गेले,” असली वर्णने लेखक करीत असतात. शकुन हे अशा लोकांकडून साहित्यात प्रासंगिक रसोत्कर्षक म्हणूनच वापरण्यात येतात. त्यात सत्यापेक्षा लाक्षणिक अर्थालाच प्राधान्य असते. अशा प्रकारे साहित्यात केवळ अलंकार म्हणून शकुन आले तर काही वावगे नाही व त्यामुळे काही नुकसान होईलसे वाटत नाही. कारण शकुनापशकुनांतील मान्यता, त्यातून उत्पन्न होणारी भीती वगैरे गोष्टी घरांतील शकुन-अपशकुनाच्या प्रत्यक्ष मान्यतेवर अधिक अवलंबून असतात.

मला आठवते, माझ्या बालपणी आमच्या घरी भुताखेतावर अथवा शकुनावर कुणाचाच विश्वास नसे आणि तसे कुणीच मानीत नसे. तसल्या गोष्टीच कधी घरात होत नसत. नंतर दहा वर्षाची असता बोर्डिंगमध्ये असल्या गोष्टी माझ्या कानी येत. तेव्हा त्या मला ऐकाव्याशा वाटत, वाचाव्याशा वाटत; पण त्यामुळे भीती किंवा तसला कोणताच परिणाम माझ्या मनावर होत नसे. “पिंपळावरचा मुंजा” म्हणून एक गोष्ट माझ्या मैत्रिणींबरोबर माझ्याही वाचण्यात आली. बोर्डिंगजवळच्या त्या पिंपळाखालून रात्री जाताना माझ्या मैत्रिणी भीत असत पण मला काहीच वाटायचे नाही. याचा अर्थ साहित्य म्हणून असल्या गोष्टी, भयानक रसाला परिपोषक होत असल्यामुळे मनाचे रंजन होत असे पण त्याची भीती मनात उत्पन्न होत नसे.

ज्यावेळी घरात मोठी मंडळी अमूक एक मान्यतेमुळे प्रत्यक्ष भीत असलेली मुलांना दिसतात, तेव्हाच भीतीचा तो संसर्गजन्य रोग मुलांनाही जडतो. घरात जेव्हा आपल्या वर्तनाने भाऊ बहिणी माता वगैरे मंडळी भिताना दिसतात, तेव्हा त्यांच्याच आश्रयाने असणारी मुलेही भिऊ लागतात आणि अशा प्रकारे लहानपणी भीतीची बीजे मनात पेरली गेल्यानंतर गोष्टीच्या वाचनामुळे अथवा ऐकण्यामुळे देखील मुलांचे त्या रौद्र रसामुळे रंजन होण्याऐवजी ती भिऊ लागतात. आणि अशा स्थितीत ह्या गोष्टीचा वाईट परिणाम होतो.

आपल्या समाजात अशी भित्री कुटुंबेच पुष्कळ आहेत. आपल्या कुटुंबातील माता भगिनी त्याबरोबर भांवडेही शकुन-अपशकुन मानणारी, भुताखेतांवर विश्वास ठेवणारी अशी असल्यामुळे भीतीची निष्कारण रोग बीजे मुलात लहानपणीच पेरली जातात, तेव्हा अशा स्थितीत आपले साहित्य शकुनापशकुनाच्या, भुताखेतांच्या भरमसाट गोष्टीपासून दूर राहिलेलेच बरे.

शिक्षण पत्रिका, वर्ष ३, अंक ७, डिसेंबर १९३५

Leave a comment

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.