घर व शाळा या एकमेकांना पूरक संस्था असून या दोहोमध्ये ओढाताण कित्येक वर्षापासून चालू आहे. शाळा फारच उत्तम करावीशी वाटते असे शिक्षक शक्य तितकी अधिक कामे व व्यवसाय शाळेतच ठेवू पाहातात. ज्यांना घराचे महत्त्व अधिक वाटते ते शाळा शक्य तितका थोडा वेळ देण्याच्या मताची असतात. त्यामुळे २४ तासांची म्हणजे वसतिगृहांत राहणाऱ्या मुलांचीच शाळा असावी ह्या मतापासून ते एक-दोन तास शाळा असली तरी पुरे या मतापर्यंतची सर्व मते प्रतिपादन केली जातात.
आतापर्यंत हा मतभेद प्राथमिक शाळा व हायस्कूलापरत्वे असे. आता तो बालशाळा म्हणजे पाच वर्षाच्या खालच्या पूर्वप्राथमिक शिक्षणापरत्वेही दिसू लागला आहे. या स्थळी या शेवटच्या म्हणजे बालशाळेविषयी विचार करू या.
घर ही स्वाभाविक भावनेतून उत्पन्न झालेली परस्पराच्या स्वाभाविक प्रेमाच्या पायावर उभारलेली संस्था आहे. उतम शाळा ही यंत्राप्रमाणे काम करणारी संस्था होऊ शकते. कुटुंबात एकसूत्राने बांधले गेल्यामुळे एकमेकांविषयी विशेष आपुलकी, जवळपणा वाटणे व सारखे हितसंबंध असणे या गोष्टी तितक्या प्रमाणांत शाळेत असू शकत नाहीत. शाळेत कायदे, व्यवस्था वगैरेचे नियम सर्वांना सारखे लागू पडत असतात. घरात वैयक्तिक (personal) संबंध असतात, शाळेतील संबंध थोड्याफार प्रमाणात (impersonal) व्यक्तिनिरपेक्ष असतात. प्रत्येक व्यक्तीच्या गरजा भागू शकतात; अवश्य असेल तेथे व्यक्तीच्या विशेष गरजा भागू शकतात. शाळेत तसे काही होऊ शकत नाही. सर्वच व्यक्तींना सरसकट सामान्य नियमांस अनुकूल व्हावे लागते.
घरात व्यक्तिगत लक्ष, लाड, रक्षण विशेष होऊ शकतात. शाळेत अथवा वसतिगृहात त्यास अवसर नसतो. लक्ष, लाड व रक्षण, ही सर्वांना सारखी व सामान्य असतात. या फरकामुळे घराची जागा शाळा केव्हाही घेऊ शकणार नाही हे म्हणणे अगदी खरे आहे. कारण दोन्ही निरनिराळ्या प्रकारच्याच संस्था आहेत.
त्यांचा निराळेपणा स्वीकारूनच शाळावादी असे म्हणतात की मुलांना चांगले वळण लावण्यास याच कारणामुळे शाळा हव्यात. घरांत खूप लाड होतील, विशेष रक्षण होईल, ‘माझा बाळ काय हुशार !’ म्हणून कौतुक होईल. मूल गुदमरून जाईल इतका प्रेमाचा वर्षाव कदाचित त्याच्यावर केला जाईल. अत्यंत निकटच्या नातेवाईकांत मूल कौटुंबिक बंधनाने जखडले जाईल. परंतु मुलाच्या मुक्त विकासास या सगळ्या गोष्टी पुरत्या नाहीत. या सर्व विशेष लाभाच्या अथवा सवडीच्या वातावरणांतून निघून थोडे फार यंत्रवत् व सर्वांनासामान्य व impersonalवातावरणांत वाढणेच मुलांच्या उत्तम विकासास अवश्य आहे असे शाळेच्या तर्फे सांगण्यात येते.
शाळेच्या बाजूने दुसरा एक मुद्दा नेहमी सांगण्यात येतो तो हा की शाळेत जशी सर्व बाबतीत तज्ञ माणसे असतात तशी घरी कोठे असतात ? अभ्यास वसतिगृहात जसा होतो तसा घरी होत नाही. कारण वसतिगृहात मुलांची अडचण पाहून मदत करणारे, देखरेख ठेवणारे शिक्षक ठेवण्यात येतात तसे घरी सर्वांना कोण असते देखरेख ठेवायला ? शाळेत व वसतिगृहात जसे खेळणे, व्यायाम, जेवणखाणे, मनोरंजन, सहली, सहकारी कामे वगैरे सर्वच गोष्टी विचारपूर्वक योजल्या जातात व त्यावर तज्ञांची देखरेख राहू शकते तशी घरी योजनाही नसते व देखरेखही नसते.
शिवाय बऱ्याचश्या घरातून अलीकडे मुलांकडे थोडेसुद्धा बघण्यास कोणाला वेळच नसतो. व ही परिस्थिती अगदी मजुरी करणाऱ्या, मध्यम व श्रीमंत अशा सर्वांतच येत चालली आहे.
या सर्वावर घराचा पक्ष धरणारी असे म्हणतात की हे जरी सर्व खरे असले तरी घर ते घर व शाळा ती शाळा. अगदी उत्तम रीतीने योजलेल्या व चालवलेल्या शाळेपेक्षा अगदी सामान्य घरही मुलास अधिक हितावह आहे, कारण ते घर आहे. तेथे कुटुंबभावना आहे; तेथे कुटुंबसहज अशी वत्सलता नांदत असते.
तेथे नैसर्गिक प्रेमाने सर्वजण एकमेकांस जोडले गेले असतात.
याप्रमाणे दोन्ही बाजूंनी भरीव मुद्दे पुढे मांडण्यात येत असतात.
आपल्यापुढे आता प्रश्न आहे अगदी छोट्या मुलांचा. मोठ्या मुलांना म्हणजे प्रथमिक, हायस्कूल व कॉलेजच्या मुलांनाही जेथे घर असावेच असे प्रतिपादले जाते तेथे दोन ते पाच किंवा सातवर्षाच्या अर्भकांची काय कथा ? त्यांना थोडा वेळही घरांतून दूर करणे अयोग्यच असे मानणारी बरीच आहेत.
आपण दोन वर्षाचे मूल स्वाभाविक रीतीने सामान्यतः काय करीत असेल ते पाहू या. मूल चालू लागले, बोलू लागले व साधारणपणे मोठ्यांच्या प्रमाणे हाताने चावून जेऊ लागलेकी मूल त्यांच्या प्राथमिक असहाय अवस्थेतून निघून त्यांच्या दुसऱ्या अवस्थेत प्रवेश करिते. पूर्वी ते अगदी सर्वस्वी आई व घरच्या मंडळींवर अवलंबून होते, आता ते उठून चालू शकते; आपल्याला हवे नको ते, किंवा दुसऱ्या गोष्टीही बोलून दुसऱ्यांना कळवू शकते; त्यामुळे ते बरचसे स्वावलंबी झालेले असते व ह्या नव्या शक्तीचे भान अथवा जाणीव त्याला स्वतःला होऊ लागली की मूल घरातून बाहेर इकडे तिकडे जाण्यास प्रवृत्त होते. आपण घरगुती भाषेत म्हणतो की “त्याला आता पाय फुटले आहेत.”
त्याला आता बराचसा वेळ अंगणांत घालवावासा वाटतो. शेजारी-पाजारी ते पटकन जात असते. इतर मुलांचे खेळ पहाणे, गोष्टी ऐकणे व ती करतील तसे करणे त्यांना फार आवडते. आई त्याला धरून घरी आणीत असते व ते डोळा चुकवून सूं बाल्या करीत असते. मध्यमवर्गातील सुशिक्षित कुटुंबातील हे नेहमीचे दृश्य आहे. कारण मुलांनी घरच्या संस्कारी (refined) स्वच्छ व प्रेमळ देखरेखीच्या वातावरणांत राहावे म्हणजे त्यांना योग्य वळण लागेल व योग्य प्रकारे त्यांचे संरक्षण होईल असे त्यांना वाटते.
पूर्वीच्या पद्धतीत पाहिले तर या वयांत आई आंघोळ घालून देते, जेवू घालते व म्हणते, ‘जा आता खेळायला.’ म्हणजे अंगणांत किंवा रस्त्यावर, गल्लीत जेथे इतर मुले आपला सबंध दिवस काढीत असतात तेथे आता तूही जायला लाग. घरच्या बायकांना घरची अनेक कामे व आईला बहुतेक या सुमारास दुसऱ्या छोट्या बाळाचा संभाळ करणे प्राप्त होते. त्यामुळे अडीच-तीन वर्षांनी अंगण अथवा गल्लीतील या बालकांनी चालविलेल्या बालकमंदिरात जाणे शिकावेच लागते.
त्याहूनही खालच्या पातळीवर गेलो तर तेथेही हीच स्थिती दिसते. अगदी लहान मुलांना जरा मोठी म्हणजे पाचसहा वर्षांची मुले संभाळत असतात व ही मधली मुले त्यांच्याबरोबरच इकडेतिकडे हिंडत असतात.
सार काय की हे वय मुलांचे घरांतून बाहेर निघून जरा विशाल जगांत येण्याचे असते. फार संभाळणारी कुटुंबे त्यांना घरात ठेवून घेतात व इतर त्यांना बाहेर जाऊ देतात. त्यांत अधिक नुकसान जी त्यांना बाहेर जाऊ न देता घरात ठेवून घेतात त्यांच्याचकडून होत असते, कारण हा काळच मुळी घरापासून थोडे दूर जाण्याचा असतो.
प्रथम मूल आईच्या अंगावर पीत असते तोपर्यंत झाडावर लटकलेल्या फळाइतकेच जवळ-जवळ ते आईच्या अंगावर असते. त्याचे पोषण त्यास आईकडून मिळते त्यामुळे ते आई दिसली की हसणे खेळणे, तिच्याच मांडीवर झोपणे, वगैरे करीत असते. पण जसजसे ते मोठे होऊ लागते तसतसे त्याची आईपासून सुट्टे होण्याची क्रिया हळूहळू सुरू होते. सात-आठ महिन्यांचे मूल घरातील इतर भावंडे खेळवतात त्यांच्यांत बरेच रमते. वडील किंवा दुसरे कोणी बाहेर नेत असले तर आईकडून त्यांचेकडे झेप टाकूनही जाते. शेवटी शेवटी नुसती भुकेची वेळ झाली की आईकडे जाणे व इतर वेळी तिच्यापासून दूर पण दुसऱ्या नात्याच्या अथवा ओळखीच्या माणसांशी किंवा स्वतःशी खेळणे चालत असते. म्हणजे फांदीला लागलेले फळ पक्व होऊ लागले म्हणजे फांदीवरून गळून पडते, तसे मूल हळूहळू आपल्या आईपासून सुट्टे होऊ लागते.
या सुमारास जर ही सुट्टे होण्याची क्रिया योग्य रीतीने न झाली तर मुलास जन्मभरची ती उणीव राहण्याचा संभव असतो. मूल आईला किंवा आई मुलासच अधिक चिकटून राहिली तरी मुलास ते हानिकारक असते. किंवा मुलाला त्याची आई कोणत्याही कारणाने पुरती मिळालीच नसली म्हणजे योग्य वेळ येण्यापूर्वीच त्यांची ताटातूट (आईच्या आजारीपणाने, मरणाने किंवा कामावर जाण्याने) झाली असली व आईची जागा घेण्यास कोणी योग्य माणूस न मिळाले तर मुलाचे जीवन दु:खी होते. बहुधा आया अथवा मोलकरणी ती जागा घेऊ शकत नाहीत. आजी-मावशी वगैरे थोड्या प्रमाणात घेऊ शकतात. त्यामुळे आजच्या सुशिक्षित कुटुंबांतून जेथे आई नोकरी करण्यास जाते तेथे मुले आईकरिता भुकेलेली दिसून येतात. असो.
हा झाला मुलांचा आईपासून सुट्टे पडण्याचा प्रथम काल. त्यांच्या जीवनातील दुसरा असा काळ ती दोन-अडीच वर्षांची होतात तेव्हा येतो.
पहिल्या काळात जर आईपासून सुट्टे होणे हळूहळू व योग्य रीतीने झाले तर मुले काही प्रमाणात स्वतंत्र व स्वावलंबी होतात व हे त्यांचे सुट्टे होणे त्यांच्या विकासास अवश्यच असते. तसेच या दुसऱ्या काळातील सुट्टे होणे त्यांच्या विकासास अवश्य व पोषक असेच आहे. मात्र ते पहिल्याप्रमाणेच नाजूक व उत्तम रीतीने व्हावयास हवे.
पहिला काळ मुलास आईच्या अंगावरून सोडविण्याचा अथवा मुलाने सुटण्याचा असतो. पहिल्यापासूनच काळजी घेतल्यास तो स्वाभाविकपणे येतो, व मुले स्वाभाविकपणे व सहजपणे सुटतातही. त्यांत दोन गोष्टी व्हावयास हव्या असतात. एक तर मूल जेव्हा पिऊन तृप्त होऊन आईपासून दूर जाण्यास तयार होते तेव्हा त्याला आईने दूर केले पाहिजे. व दिवसेंदिवस आपल्या अंगास कमी कमीच चिकटवून घेणे बरे. त्या उलट प्रेमाने अथवा लाडाने अथवा आजारीपण वगैरे दुसऱ्या काही कारणाने आईच्या अंगास जर ते अधिक प्रमाणात चिकटून राहिले तर मूल अंगावरून सुटणे कठीण जाते. बहुतेक आया आपल्याकडे रात्रभर पिणाऱ्या मुलास जवळ घेऊन निजतात, व मुलाने मधून मधून स्तनास तोंड लावावेच अशी सवय असते. ही व अशा सवयी मुलास आईपासून सुट्टे पडण्याच्या आड येत असतात.
दुसरे म्हणजे आईपासून ते सुट्टे होते तेव्हा त्याची शारीरिक भूक तृप्त झालेली असते. तशी ती झाल्यावर त्याला मानसिक भूक असते. इकडे-तिकडे पहावे, निरनिराळी माणसे पाहावी, त्यांच्याशी खेळावे, ती काय बोलतात ते ऐकावे वगैरे. त्याचप्रमाणे स्वतःही खेळत बसायचे असते. पालथे पडणे, रांगणे, उभे राहणे, चालणे वगैरे अनेक क्रिया करावयाच्या असतात. त्याचप्रमाणे त्यांना इतरांचा सहवासही हवा असतो. तरी या सुमारास जेव्हा ते आईपासून सुट्टे होत असते तेव्हा जर त्याला इतर प्रेमळ व खेळकर मंडळींचा सहवास मिळाला तर त्यास आईपासून सुट्टे होणे कठीण जात नाही. पण इतर भावंडे अथवा घरची मंडळी कोणी नसली किंवा मुलाशी खेळत नसली तर मूल आईपासून लवकर सुट्टे होत नाही. त्याचप्रमाणे इतर अनेक मनोरंजक व्यवसाय व आसपासच्या जगांत मुलाला जसजशी जास्त गोडी वाटू लागते तसे त्याला आईपासून सुट्टे होणे सोपे जाते. कारण लगेच इतर गोष्टीत त्याचे मन रमू लागते. याच्या उलट इतर गोडी वाटण्यासारख्या गोष्टींचा अभाव, किंवा एकसारखे आईचे स्तन अथवा अंगठा वगैरे चोखीत पडण्याची सवय – व्यसनच ते – लागल्यास आईपासून सुटण्यास कठीण जाते. याशिवायही अनेक सूक्ष्म व परिणामी भयंकर गोष्टी मुलाच्या या काळच्या जीवनांत घडतात की ज्यामुळे सुट्टे पडणे जड जाते अथवा मुलास असहाय व अरक्षित आहोत असे वाटून ते अधिक घाबरते.
सुट्टे पडण्याच्या क्रियेचे हे पृथःकरण इतक्या विस्ताराने करण्याचे कारण हे की पुढे २॥-३ वर्षाच्या वयात मूल घरापासून सुट्टे पडते ती क्रिया आईपासून सुट्टे पाडण्यासारखीच असते. व त्या काळी ज्या चुका होतात अथवा उणिवा रहातात त्या आयुष्यभर जाचक अशा असतात.
पहिल्या काळात ते आईपासून बरेचसे सुट्टे होते. आईच्या अंगावर पिण्याचे बंद होण्यापूर्वीपासूनच हळूहळू आईपासून सुट्टे होत असते. मग अंगावरचे पिणेही पुष्कळदा एक वेळ वरचे दूध व नंतर अंगावरचे सोडवत आणतात, व शेवटी अगदी पार सुटते.
२॥ वर्षाचे मूल घर सोडताना सर्व वरील प्रकार होत असतात. ही क्रिया योग्य वेळी व योग्य प्रकारे झाली तर मुले आई व घरापासून वेगळी होऊन स्वावलंबी व स्वतंत्र होऊ शकतात. पण त्यांत जर घोटाळे झाले तर त्यांचा परिणाम जन्मभर भोगावा लागतो.
सुट्टे होण्याच्या पहिल्या काळात व दुसऱ्या काळात एकसारख्याच असलेल्या गोष्टी पाहू. पहिल्या काळात मूल तृप्तीने स्वतः आईपासून दूर जाऊ इच्छिते. तशीच स्थिती दुसऱ्या काळात केव्हा तरी येते. त्यावेळी मूल घराबाहेर, दाराबाहेर, रस्त्यावर, गल्लीत जाण्यास उत्सुक असते. हा काळ बहुधा मूल एक-दीड वर्षाचे असतानाच येतो. त्यावेळी सुशिक्षित व मुलांच्या सुरक्षेविषयी विशेष जपणारी मंडळी मुलास वाहेर जाऊ देत नाहीत. रस्त्यावर गाडीघोडा येईल; ते जिन्यावरून पडेल; अंगणात दुसरी मुले घाणेरडी असतील, ती काही घाणेरडे खेळ खेळत असतील, घाणेरड्या भाषा बोलत असतील म्हणून त्यांच्यांत आपल्या मुलाने जाऊ नये; किंवा बुवाबैरागी मुलाला उचलून घेऊन जाईल, किंवा कुत्रे मांजर त्यास चावेल, अशा अनेक कारणांनी लहानपणीच त्यांना न जाऊ देण्याची खबरदारी घेतली जाते. व पुष्कळदा ती मोठी म्हणजे तीन-चार वर्षाची झाली तरी त्यांना घराबाहेर किंवा अंगणांत जाऊ देत नाहीत. म्हणजे मूल जेव्हा घरापासून सुट्टे पडू इच्छिते तेव्हा त्याला पुष्कळदा घरासच चिकटून रहावे लागते.
त्याचप्रमाणे अधिक लाडामुळे, प्रेमाने, सरंक्षणाच्या विशेष लालसेने किंवा आजारीपण वगैरे कारणांनी जर मूल घरापासून वेगळे होण्याच्या काळात घरातच राहिले तर त्याला घर, कुटुंब व घरचे प्रेम अधिक मिळाल्यामुळे त्याचा विकास अधिक चांगला न होता ते घरापासून सुट्टे होऊन स्वावलंबी होण्याच्या व स्वतःच्या शक्तीवर राहण्याचे शिकण्याच्याऐवजी त्याला घराच्या व घरच्या वडील मंडळींच्या आधाराने राहण्याची सवय होते व पुढे पाच-सहा वर्षाच्या वयातही घरातून शाळेत जाण्यास पुष्कळदा ती मुले तयार नसतात.
दुसरे, आईपासून सुटले तर तिची जागा घेण्यास इतर प्रेमळ मंडळी व मन रमेल अशा खेळाच्या व इतर गोष्टींची जरूर असते. जगाची चित्रविचित्रता पाहाण्याची स्वाभाविक जिज्ञासा तृप्त होण्यास बाहेर जाणे, घरीही काही काही खेळत बसणे वगैरे मिळाले तर मुले आईपासून चटकन सुट्टी होतात. तोच नियम २॥-३ वर्षाच्या मुलास लागू आहे. घराच्या बाहेर घरच्यासारखीच प्रेमळ व जपणारी मंडळी असली, व मनास रुचणाऱ्या अशा गोष्टी, कामे, वगैरे जर बाहेर मिळत गेले तर घरापासून सुट्टे पडण्याचे काम अगदी सहज होते. मुलास आपण घरच्या अवलंबनातून केव्हा मुक्त झालो ते कळतही नाही. या अंगणांत किंवा गल्लीत त्यांना त्यांच्याबरोबरचे मित्र मिळत असले की त्यांच्याकडे पाहणे, त्यांच्याशी बोलणे-खेळणे त्यांना फारच आवडते; झाड, पान, फूल, जनावरे, पक्षी, कीटक, दगड, घोडे अनेक चित्रविचित्र जग पहाण्याची व परिचय करून घेण्याची भरपूर साधने असली, तर मुलांचे मन तेथे स्वाभाविकपणेच रमेल. शिवाय मुलांना या वयात अनेक उद्योग, क्रिया, कामे करावीशी वाटतात ते सर्व जर त्यांना तेथे मिळाले तर मूल स्वाभाविकपणे घरापासून सुट्टे होईल.
अर्थात जसे पहिल्या काळात ते स्थूलपणे आईपासून दूर गेले असले तरी आईचा व त्याचा संबंध असतोच, तसेच या दुसऱ्या काळातही मूल वाटेल तितका वेळ घराचे बाहेर खेळत असले तरी घराचा संबंध पार तुटलेला नसतोच. उलट घर हे निवाऱ्याचे स्थान आहे, घरात आपली आई वगैरे आहेत या ज्ञानानेच ते बाहेर स्वस्थपणे खेळू शकते. आमचा शेजारचा मुलगा अगदी एक वर्षापासून आमच्याकडे येणारा, बालमंदिरांत जाणारा, रस्त्यावर मित्रमंडळीत तासन् तास खेळणारा पाच वर्षांचा झाला असता एक दिवस संध्याकाळी खेळून घरी आला व पहातो तो घराला कुलूप. मला माहीत असल्याने मी त्याला घरी घेऊन आले. आई कोठे कशाला गेली, केव्हा येणार वगैरे सर्व सांगितले तरी त्या मुलास अश्रू आवरेनात व आई येईपर्यंत अत्यंत कष्टाने व अस्वस्थ मनाने तो आमच्याकडे राहिला. म्हणजे मुले अदृश्य अशा सूक्ष्म धाग्याने घराशी जोडलेली असतातच. परंतु प्रत्यक्ष घरातच बसून राहणे त्यांस नको असते. घराच्या आसपास मित्रमंडळीत विशाल जगात ती फिरू लागतात. व खेड्यापाड्यांत पहावे तो घरापासून दूर अंतरावर ती खेळत असतात. मध्ये भूक लागली तर घरी येऊन खाऊन पुनः बाहेर जातात व संध्याकाळी अंधार झाली की ती घरी निजावयास येतात. त्या वेळी मात्र घरची मंडळी व कौटुंबिक वातावरण, त्यांची सुरक्षिततेची खात्री करून देणाऱ्या सर्व गोष्टी डोळ्यांना दिसल्या म्हणजे त्यांना पुरे असते.
यापेक्षा अधिक काळ जी घरी राहतात, ज्यांना घर व घरची माणसे व त्यांचे प्रत्यक्ष संरक्षण अधिक काळ मिळते, ती मुले त्या प्रमाणात कमी स्वावलंबी, कमी स्वतंत्र, कमी धाडशी, कमी जिज्ञासा असलेली व बांडगुळांसारखी मोठी होतात.
सारांश, २॥-३ वर्षाच्या वयास मुलाचा घरातून अंगणात येण्याचा काळ असतो. त्या काळात त्यांना घरातून बाहेर येण्यास पूर्ण मुभा पाहिजे. इतकेच नव्हे तर या काळात ती जर बाहेर जात नसली – घर सोडीत नसली तर यात काही विकृती आहे असे समजून त्याची चिकित्सा करावयास हवी.

(शिक्षण पत्रिका, वर्ष १३, अंक ८, ऑगस्ट १९४५)
(लेखातील फोटो क्वेस्टच्या संग्रहातून)

Leave a comment