लहान मुले घरी असावीत की शाळेत ? घरी किती वेळ व शाळेत किती वेळ ?
अडीच तीन वर्षांनंतर मुलांनी घर सोडून अंगणात जावे व त्याहीपलीकडे वाटल्यास जावे. हा स्वाभाविक क्रम आहे. त्यावेळी घराच्या अंगणासारखीच जर शाळा असली तर मुलांनी अवश्य शाळेत जावे. शाळेचा यंत्रवतपणा; शाळेची ठोकून बसविलेली शिस्त; शाळेचा नको असलेला अभ्यास करवून घेण्याचे कर्तव्य, वगैरे बाबतीतून मुक्त मुले अंगणात जशी खेळतात तशी म्हणजे त्याच मोकळेपणाने, त्याच निर्भयतेने, त्याच स्वावलंबनाने, तशीच स्वतःच्या मर्जीने खेळू शकतील अशी आणि अंगण व गल्ली यांची जागा घेऊ शकेल अशी शाळा असेल तर त्या शाळेत मुलांनी अवश्य जावे असाच जबाब वरील प्रश्नास दिला पाहिजे.
पूर्वीची परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. खेड्यापाड्याचे रस्तेही आता मोटारीचे व गाड्याघोड्यांचे झाले आहेत. त्याप्रमाणे गरीबगुरीबच नव्हे तर बहुतेक मध्यमवर्गाच्या व बऱ्याचशा वरिष्ठ वर्गाच्याही स्त्रिया बाहेर कामास जाऊ लागल्या आहेत. आजचा काळच स्त्रियांना कामास बाहेर बोलावतो आहे. पूर्वीची संयुक्त कुटुंबरचना तुटल्यामुळे अनेक कारणांनी माणसे आपली जुनी गावे व घरे सोडून एकएकटी गावी परगावी जाऊ लागली. या सर्व बदललेल्या परिस्थितीत मुलांच्या घरांचे अंगण अथवा गल्ली हे त्यांचे विशाल जगात प्रवेश करतांना खेळण्याचे स्थान राहिले नाही. आज घरांना अंगणे राहिली नाहीत. त्यामुळे गावांला बालक्रीडांगणे असण्याची जरूर भासू लागली आहे.
पण अशा बालशाळा किती वेळ चालाव्यात ? कोणी म्हणते एक दोन तास तर कोणी म्हणते चोवीस तास. चोवीस तास तर नकोच कारण मूल अद्याप अगदी सूक्ष्म धाग्याने घराशी बांधलेले असते. घरात आई, वडील, भावंडे, व घरातील नातलग माणसे यांनी भरलेले, इतर जगापासून वेगळे, आपले स्वतःचे असे घर त्यांना हवे असते. व ही जरूर तर मोठ्या व म्हाताऱ्या माणसांनाहि असतेच. शिवाय व्यक्तिगत विशेष लक्ष जे घरी पुरवले जाते, ते (विशेष प्रेम, लाड वगैरे) सर्व या वयाच्या मुलांस हवेच असते. इतर मंडळीने दिलेल्या पेढेबरफीपेक्षांही आईचा प्रेमाचा कोरडा हात पाठीवरून की तोंडावरून फिरला तर तो अधिक आहे यात काही शंका नाही. चोवीस तासांची लहान मुलांची शाळा कितीही उत्तम असली तरी ती निराश्रित अर्भकालयासारखी होणार.
संध्याकाळ झाली की घरी, सकाळ-दुपार खाण्यापिण्यास न्हाण्याधुण्यास घरी व अंगणात, खेळण्याचा काळ तेवढा त्यांनी क्रीडांगणांत घालवावा व तेथेही शाळा, शिक्षक व शिकविण्याचे विषय असे नसून ते खेळण्याचे अंगणच असावयास हवे. मुलांना वाटेल तेथे ती हिंडतील. त्यात त्यांच्याकरिता ठेवलेल्या कामांपैकी ती हवे ते व हवे तितका वेळ करतील. इतर मुलांशी ओळख व दोस्ती करतील. त्यांच्याशी अंगणात खेळतात तशीच फुगडी, झिम्मा, लपालपी खेळतील. कावळे, चिमण्या, कुत्री, मांजरी, पोपट, मैना, गाय, घोडा वगैरे बालमित्रांशी खेळणे; त्यांना खाऊपिऊ घालणे; बाग, वाडी वगैरे संभाळणे, पाणी घालून, गवत काढून, खणून त्याची जोपासना करणे; व इतर हस्तउद्योग घरगुती कामे वगैरे सर्व जर घरासारखेच वातावरण, घरासारखा मोकळेपणा व बालशाळेत येण्याजाण्याचे बाबतीतही तितकाच मोकळेपणा असला तर बालशाळा सकाळपासून संध्याकाळपर्यंत असली म्हणून काही बिघडत नाही.
बोरीवलीच्या बालवाडीत सकाळी ९ ते १२ व संध्याकाळी ४ ते ६ चा वेळ ठेवला होता. पण कित्येक मुले सकाळी उठूनच तेथे येत. काही दुपारी जेवून लगेच एक वाजल्यापासून तेथेच असत व काही सकाळी ९ ते १२ पर्यंत आल्यानंतर संध्याकाळी येतच नसत. अशा प्रकारचा मोकळेपणा व लवचिकपणा शाळेच्या वेळाचे परत्वे असावयास हवा. कारण येणाऱ्या मुलांची व घरची परिस्थिती व व्यक्तिगत स्वभाव व गरजा व वेगवेगळ्या असणारच.
शहराची परिस्थिती त्यापेक्षाही निराळी असते. काही ठिकाणी मजूर वगैरे वर्ग सकाळी जातो तो संध्याकाळी परत येतो. तेथे अशा शाळेची वेळ सकाळी ८ पासून संध्याकाळी ६ पर्यंत ठेवावी लागणार. खेड्यांतून पुष्कळ ठिकाणी आईबाप अशीच कामास जात असतात. मुलांचे दांतण, स्नान वगैरे काही करण्यास त्यांना फुरसत नसते. तर दुसऱ्या कित्येक कुटुंबांतून आई, आजी, भावजय वगैरे कोणीतरी घरी असतेच; व मुलांचे जेवणखाण, आंघोळी, कपडेधुणे वगैरे घरी होऊ शकते. ती मुले शाळेत आंघोळीच्या वेळी येणार नाहीत, व यायची जरूरही नाही.
सारांश, वेगवेगळ्या परिस्थितीप्रमाणे बालशाळेचा कमी अधिक वेळ राहू शकेल. व लहान गावात किंवा खेड्यात जेथे एकच बालशाळा असेल तेथे जास्तीत जास्त वेळ सुरू ठेवावे की नाही याबद्दल सूट असली पाहिजे. त्यांच्या आंघोळी जेवणे घरी होऊ शकतात, त्यांनी शाळेत त्याकरिता येण्याची सक्ती नाही. कपडे धुणे, केस विचरणे, नखे कापणे, वगैरे सगळी मुलांची कामे येथे घरी होऊ शकतात तेथे ती शाळेत ठेवण्याची मुळीच जरूर नाही. फक्त शाळेत त्याकडे मुलांचे लक्ष वेधण्यापुरते त्यांचा काही भाग शाळेत असावयास हवा.
याशिवाय दुसरा एक विचार करावयास हवा. आपण अडीच ते सहा वर्षापर्यंतच्या सर्व वर्गाच्या सर्व ठिकाणच्या मुलांकरिता जर पूर्व प्राथमिक शाळा असावयास हवीत असे म्हणतो तर त्यांत काही अगदी मागासलेल्या वर्गाच्या मुलांचाही आपणास विचार करावा लागेल. कातकरी, कैकाडी, वगैरे अनेक वर्ग असे आहेत की जे रोज काय पण कित्येक दिवसांत आंघोळी करीत नाहीत. केसही आठपंधरा दिवसांनी विंचरतात. उवा तर डोकीतच नव्हे तर कपड्यांवरही नेहमी असायच्याच. अंगावर फोड खरूज, नाकात शेंबूड, डोळ्यांत चिपडी, अंगावर बुरशी, व कपड्यांना भयंकर घाण, अशाच स्थितीत जी मुले नेहमी असतात, त्यांची ही स्थिती बदलण्यास बालशाळेत आंघोळ व कपडे धुण्याची व्यवस्था; जेवणे खाणे, स्वैपाक करणे वगैरे बऱ्याच घरातील गोष्टी शाळेत दाखल केल्याशिवाय चालायचेच नाही. नाहीपेक्षा आज खेडेगांवच्या शाळांतून जशी मळकी सडकी मुले येऊन आपल्या घरच्या सर्व घाणेरड्या सवयी कायम ठेवून फक्त थोडेसे अक्षरज्ञान व विज्ञान घेऊन जातात, तशीच स्थिती या बालशाळांची होणार.
घरात घरातील संस्कार व रीतीभाती शिकणे स्वाभाविकपणे होते हे खरे. परंतु जेथे घरात दिवसभर म्हाताऱ्या कोताऱ्याशिवाय कोणीच नसते; जेथे घरीच रीत नसते नी भात नसते; काही असले तर चोरून कसे आणावे, मारावे कसे व फुरसतीचा वेळ निष्क्रियपणे घालवावा कसा हेच असते; अशा घरातील एक पिढी जर अधिक वेळ शाळेत काढील, तरच त्यांच्या जीवनात ही पिढी मोठी झाल्यावर काही सुधारणा होण्याचा संभव आहे. आईबापांचे प्रेम, घरांचे प्रेम इत्यादी भावनांना मुले मुकू नयेत पण जास्तीत जास्त वेळ मुलांचा जर बालशाळेत गेला तर ते अवश्य समजले पाहिजे.
खेड्यांतून मुले मोकळ्या हवेत, शेतांत, बागवाडयांत, झाडाखाली स्वैरपणे खेळत असतात. धूळ, दगड, माती, पाने, काटे वगैरे मधून त्यांना पुष्कळसा खेळ मिळत असतो; त्यामुळे बालवाडीची त्यांच्याकरिता आवश्यकता नाही असे काहीचे मत आहे. तेही बरोबर नाही कारण या सर्व खेळांमध्ये त्यांना जे सुचेल अथवा जे करण्याचे ती वळण दाखवतील त्यांतून पुढे सरकून त्यांत प्रगती करण्याचा मार्ग मिळत नाही. घरगुती जीवनात मुले थोडी अधिक उपयोगी अशी कामे करीत असतील, व त्यामुळे सुरुवातीस ती खूप चपळ, कामसू व कल्पकही दिसतात. पण ते सर्व त्यांचे तेथेच थांबते. तरी त्यांच्यातील अविकसित शक्ती विकसेल असे जेथे वातावरण आहे अशा बालशाळेतच त्यांनी जाणे अधिक आवश्यक आहेत. अर्थात् त्यांची मोकळी हवा, शेते, वाड्या, पशुपालन, धूळ, माती, दगड वगैरे साधने हिरावून घेऊन त्यांना जर एखाद्या अंधाऱ्या कोठडीत कोंडण्यात येणार असेल, त्यांची स्वकल्पनेने खेळ शोधून काढून खेळण्याची मोकळीक जाणार असेल, त्यांना ज्या विशाल जगाच्या विविधतेचा परिचय साधावयाचा असतो तो त्यांना चार भिंतीच्या आतच काही कृत्रिम साधनांनी मिळणार असेल, तर अशा बालशाळेपेक्षा ती आपल्या आईबापांबरोबर शेतावर की जंगलात जाऊन मनाला वाट्टेल तसे मोकळे खेळलेली बरे असेच म्हणावे लागेल. परंतु योग्य प्रकारची बालशाळा हे स्वैर मार्गदर्शनाशिवायच्या खेळांपेक्षा केव्हाही अधिक हितावह आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला असता बालकांच्या बालशाळा व घर या संबंधी खालील मुद्दे निश्चितपणे नोंदता येतील.
१. २॥ वर्षाच्या सुमारास मुलांच्या जीवनात असा काळ येतो की ती घरापासून वेगळी होऊन थोडयाफार विशाल जगात प्रवेश करू इच्छितात. त्यामुळे मुलांनी घरापासुन सुट्टे पडणे हेच त्यांच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे.
२. बालवाडी किंवा बालशाळेने घराच्या अंगणाचे रूप घेतले पाहिजे म्हणजे अंगणात मुले खेळायला जातात त्यात शाळेची बंधने नसतात; व अंगण हे घराचाच विस्तार असतो. मुलाला आपण घर सोडून कोठे परक्या ठिकाणी गेल्यासारखे वाटत नाही. बालवाडीही तशीच असावी.
३. मूल अंगावरून जसे हळूहळू सोडविण्यात येते व ती सुटण्याची क्रिया आधीपासूनच सुरू होते, तशीच ती घरापासून हळूहळू सुटावी. सुरुवातीस मुले थोडा वेळ नुसती बघण्यासच येतील. किंवा अर्धापाऊण तासच राहतील व पुढेही काही सहा सहा तास घालवतील तर काही दोन तासच घालवतील.
४. बालवाडी हे घराचे पूरकस्थान असावे, घराचे ऐवजीचे स्थान म्हणून असावे जेथे जितके पूरक व्हावे लागेल तितके तिला स्थान घ्यावे लागेल.
५. बालवाडी म्हणजे शाळा नव्हे पण आपले घरच आहे असे मुलास वाटणे अत्यंत जरुरी आहे. त्यामुळे घरच्या सारखेच सर्व व्यवहार तेथेही असावेत. अंघोळी, जेवणे, स्वैपाकघर, धुणी, भांडी वगैरे सर्व कामे घरच्यासारखी तेथेही असावीत. व्यवस्थितपणे चालणाऱ्या घरासारखे ते असावे.
६. तेथील विशेष म्हणजे वातावरणातील शरीराचा, वाणीचा व मनाचा स्वच्छपणा, व्यवस्थितपणा व उद्योगीपणा असावा.
७. मुलांना या काळात करण्यास हवे असतात असे अनेक उद्योग तेथे असावेत. पण कोणी कोणता उद्योग घ्यावयाचा तो ज्याचा त्याला पसंत करू द्यावा व त्यातील गोडी कमी झाल्यास त्याला तो सोडून दुसरा घेण्याचीही मोकळीक असावी.
८. मुलांना निसर्गाचा परिचय अत्यंत आवडतो. त्यासाठी बाग, पशुपालन, व जंगलात हिंडणे या गोष्टी अवश्य असाव्यात.
थोडक्यात म्हणजे बालवाडीने व्यवस्थित (organised) अंगण व्हावे. ती शाळा तर नाहीच नाही. पण घराचे अंगण अथवा अधिक म्हणजे अंगणाचाच विस्तार असावा. या दृष्टीने विचार केला असता घर व शाळा यातील वाद बालवाडी म्हणजेच सहा वर्षाचे आतील मुलांचे शिक्षण यापुरता तरी रहात नाही.

शिक्षण पत्रिका, वर्ष १३, अंक १०, ऑक्टोबर १९४५
(बालशाळेचे फोटो क्वेस्टच्या संग्रहातून)

Leave a comment