
“तुमच्या बालशाळेमध्ये मुलांच्या व्यायामाची काय सोय आहे? त्यांच्या शरीर विकासाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. नाही का?”
“शरीर विकासाकडे या वयात विशेष लक्ष दिले पाहिजे ही गोष्ट आम्हास पूर्ण संमत असून ती आम्ही नेहमी डोळ्यांसमोर ठेवतो व त्याकरिता व्यायामाची साधने ठेवण्याऐवजी विश्रांतीची साधने ठेवतो व विश्रांती घेण्यास शिकवतो.”
“म्हणजे? मुलांना व्यायाम नकोत असे तुमचे म्हणणे आहे की काय?”
“नव्हे, तसे आमचे म्हणणे नाही. पण मुले स्वाभाविकपणे व्यायाम घेत असतात व कमी पेक्षा जास्त करण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते. म्हणून व्यायामासाठी उत्तेजन देण्याची तर जरूर नसते पण त्यास वळण देण्याची, विश्रांती घेण्यास शिकवण्याची जरूर असते.”
“ते कसे करता?”
“वळण असे देतो की ती वाटेल तशी इकडून तिकडे चालत असतात, धावत असतात. तर त्यांना चालण्यासाठी एक फळी व रेषा काढून देतो. बरोबर त्यावरून चालल्यास त्यांना आपल्या स्नायूवर विशेष ताबा मिळवावा लागतो व समतोलपणाही साधावा लागतो.”
“आणि विश्रांती घेण्यास काय शिकवायचे?”
“वा! ते तर फारच आवश्यक आहे.”
बहुतेक मुलांना आपण थकलो आहोत की काय हे कळतच नाही. दुसरे, ती थकली असली आणि स्वस्थ बसली तर जास्तच अस्वस्थ वाटते, घाम येतो, गरमी वाटते, म्हणून शांत बसण्यास शिकवावे लागते व मधून मधून शांत अथवा स्वस्थ बसून विश्रांती घेण्याची सवय लावावी लागते.
“विश्रांती घेण्याचे काही प्रकार शिकवायचे असतात की नुसते विश्रांती घ्या म्हणून सांगायचे?”
“प्रकार असतात. पण सर्व प्रकारात स्नायूंना ढिले सोडणे व मन शांत करणे या दोन गोष्टी आवश्यक असतात. त्या वारंवार दाखवणे व करून घेणे जरुरीचे असते.विश्रांत होण्याची दोन-चार आसने अथवा प्रकार त्यांना शिकवावयास हवेत.
१. पाठ ताठ ठेवून, आसन मांडी घालून, मांडीवर हात ठेवून, डोळे झाकून, शरीराचा कोणताही भाग न हलवता शांत बसणे.
२. कठीण बिछान्यावर अथवा जमिनीवर पाठीवर पाय लांब करून हात बाजूला घेऊन स्वस्थ पडणे. त्यावेळी पाय वगैरे काही हलवत बसायचे नाही.
३. जमिनीवर अथवा घसरणीवर पोटावर घसरणे अथवा सरकणे.
४. पारंब्या अथवा दोरीला लोंबकळणे.
५. पाय लांब करून जमिनीवर बसून आपलेच पाय हळूहळू दाबणे.
६. पाय ताठ लांब होतील अशा झोपळ्यावर बसून झोका घेणे. पाय लोंबकळत ठेवून अथवा उभ्याने नव्हे.
एकंदरीत बालकास दोन प्रकारची विश्रांती हवी असते. (१) पायावर धडाचे वजन फार येऊ नये म्हणून पायांना विश्रांती. (२) ज्ञानतंतू फार उत्तेजित होतात त्यांना मधून मधून शांती देणे.
याशिवाय मुद्दाम जास्त व्यायाम करवणे, चुरशीने जास्त धावायला पळायला लावणे, दाखविण्याकरिता निरनिराळ्या कवायती तयार करून घेणे, आपण त्यांचेबरोबर खेळून त्यास जास्त उत्तेजित करणे, ती खेळतात ते पाहायला बसून, कौतुक करून व शाब्बासकी देऊन जास्त खेळायला लावणे वगैरे तर अतिशय हानिकारक आहेत.
“तर मग मुलांच्या व्यायामाचे बाबतीत काहीच करावयास नको. असेच ना? पण कित्येक मुले आळशी असतात, हातपाय हलवीतच नाहीत. त्यांना तसेच राहू द्यायचे का?
“आपण होऊन मूल खेळत नसले, चळवळ करत नसले की डॉक्टरला दाखवावे. कारण शोधून औषधोपचार करावं. आळशी आहे असे वाटत असल्यास खाणे नियमित करावे व पोट साफ आहे की नाही याकडे लक्ष द्यावे. शरीराचे काही कारण नसल्यास मानसिक कारण आहे किंवा काय ते तपासवे व उपचार करावा.
पूर्ण निरोगी मूल खेळेच पाहिजे, आपण होऊन धावले नाचलेच पाहिजे. त्याकरता काही करावयास नको.
शिक्षण पत्रिका, वर्ष ५, अंक ६, नोव्हेंबर १९३७
(मुले खेळतानाचे चित्र क्वेस्टच्या ‘माझी अंगणवाडी’ पुस्तिकेमधून घेतले आहे.)

Leave a comment