मुलांच्यामध्ये काही काही दुर्गुण अथवा वाईट खोडी पुष्कळदा दिसून येतात. मुलींच्या पेक्षाही काही गोष्टी मुलांच्यात फार आढळतात, त्यापैकी काही खाली दिलेल्या आहेत.
१. बढाईखोरपणा – शाळेतली चार मुले एकत्र बसून गप्पा गोष्टी चालल्या असल्या म्हणजे त्यांत एखादा असा असतो की, सारख्या बढाया मारीत असतो. पहिल्या पहिल्यांदा इतर मुलांवर त्याच्या बोलण्याचा परिणाम होतो, पण पुढे त्यांना कळायला लागते की या तर याच्या पोकळ बढाया आहेत. मग लागतात मुले याची चेष्टा करायला. याची सवय हळूहळू सर्वांना कळायला लागते. काही दिवसांनी याचे नावच बढाईखोर असे पडते; व दुसरी मुले त्याच्या बोलण्याकडे लक्ष देईनाशी होतात. म्हणजे बढाईखोरपणाच्या वाईट सवयीला पुष्कळदा मुलांच्या बाल समाजाकडूनच आळा पडतो. पण कित्येकांची सवय इतकी जडलेली असते की ती सुटत नाही.
२. आत्मश्लाघा – कित्येकांना स्वतःची स्तुती करण्याची सवय असते. पुष्कळदा ती खरी असते. पण पुष्कळदा खोट्या गोष्टी सांगून आपली स्तुती करण्याचीही सवय जडते. “मी पहिला नंबर मिळविला. ते उदाहरण असे सोडवून टाकले. मास्तरांनाही येत नव्हते. मग त्यांनी मला विचारले. मी ते एक मिनिटात सोडवून टाकले.” एकंदरीत मी असे केले, मी तसे केले हेच त्याच्या बोलण्याचे सार असते. आत्मस्तुतीचे पुष्कळदा रूपांतर आत्मप्रौढीत होत असते. आपली स्तुती गाता गाता आपण कोणीतरी विशेष आहोत असे लोकांना भासविण्याची इच्छा होते व त्यामुळे मुले प्रौढी मिरवू लागतात.
३. डौल मिरवणे – आत्मप्रौढीच्याच पुढची पायरी डौल मिरवणे ही होय. आपल्या श्रीमंतीचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या कर्तबगारीचा, आपल्या सर्वच गोष्टींचा डौल मिरवण्याची पुष्कळांना सवय असते. म्हणजे ती मुले नुसती प्रौढी गाऊन थांबत नाहीत. तर तसे करता करता त्यांना एक प्रकारची नेहमीचीच भावना होऊन बसते की आपण म्हणजे कोणी श्रेष्ठ. त्यामुळे त्यांना डौल येतो व त्या डौलात ती सदोदित असतात. समाजात, शाळा कॉलेजमध्ये हा दुर्गण विशेष होतो व तेथे त्या समाजाकडून याचा प्रतिकार विशेष होतो व डौल मिरवणाऱ्याचा चांगलाच उपहास होत असतो.
४. आढ्यता – डौलाचे बरोबरच पुष्कळदा आढ्यता येत असते. आढ्यता म्हणजे ही मोठेपणाची जाणीवच होय. आढ्यताखोर मुले इतरात न मिसळून, कोणाशी फारसे न बोलून, इतरांस तुच्छतेने वागवून आपली श्रेष्ठपणाची जाणीव इतरांस करून देतात व स्वतःही नेहमी ठेवीत असतात. डौल मिरवणाऱ्यांना डौल दाखविण्यास आपल्यापेक्षा ती ज्यांना कनिष्ठ गणतात अशी मुले लागत असतात. सगळी चालत जात असतील तर हीच तेवढी मोटार मधून तेथे जाऊन सर्वाच्या मधोमध मोटार उभी करून ती सगळ्यांच्या लक्षात आणून देतील. पण आढ्यताखोर मुले या पायी जाणाऱ्या मुलांबरोबर जाणारच नाहीत व अशा रीतीने आपला मोठेपणा इतरास भासवतील. आढ्यता व डौल हे दुर्गण मुलींच्यात पुष्कळ प्रमाणात दिसतात.
५. मुजोरी – ज्याच्याजवळ डौल अथवा शेखी मिरविण्यास एकदम नजरेत येतील अशा काहीच गोष्टी नसतात त्यांना आपला श्रेष्ठपणा प्रस्थापित करण्यास त्यांची जीभ मदतीस येते. कोणी काही म्हटले की ती उत्तरास प्रत्त्युतर ठेऊन देतात. कोणी म्हणाले की ‘तू मूर्ख आहेस’ तर ती म्हणतील ‘तू मूर्ख आहेस.’ वडील मंडळीनाही ही मुले उत्तरे देत असतात. त्यांना कधीच कोणाचे काही बोललेले ऐकून घेववतच नाही. मोठ्याने बोलण्याचे धैर्य न झाले तर तोंडातल्या तोंडात पुटपुटतील.
६. बाताडेपणा – यातही जिभेचाच जोर असतो. हातून काही होवो न होवो ही, मुले बाता मारीत असतात. वाटेल तशा गप्पा टोकून देत असतात. अशा खोट्या गप्पांमध्ये खोटे बोलण्याचा उद्देश नसतो. पण आत्मप्रस्थापनाच मुख्यत्वेकरून असते. ते साधण्यास खोट्यानाट्या गप्पा मारण्याचा मार्ग स्वीकारलेला असतो.
ह्या व अशा अनेक सवयी मुलांना जडतात, त्या आपण वाईट समजतो. मुलांचा समाज त्याची चेष्टा करून, अथवा त्याच्या तोंडावर त्यांना स्पष्ट सांगून त्यांच्या वाईट सवयी काढीत असतो. तरी पुष्काळांच्या त्या राहूनच जातात व त्यामुळे मोठ्या मंडळीतही आपल्याला तेच प्रकार दिसून येत असतात.
हे असे प्रकार कशामुळे होत असतात.?
या सवयी म्हणजे खरे म्हटले असता काही अनिष्ट गोष्टींच्या प्रतिकाराच्या स्वरूपाच्या असतात.
प्रत्येक व्यक्ती आपल्या समाज वर्तुळात आपले असे विशिष्ट स्थान घेण्याचा प्रयत्न करीत असते. काहींचा स्वभावच असा असतो की त्यांना आपले अस्तित्व फारसे भासविण्यची इच्छा नसते. आपल्याकडे कोणाचे लक्ष जाऊ नये, आपण कोणाला दिसूही नये, अशी त्यांची इच्छा असते. त्याचे उलट काहींच्या स्वभावात आपले अस्तित्व क्षणोक्षणी जगाचे निदर्शनास आणून देण्याची लालसा असते. या दुसऱ्या प्रकारच्या स्वभावाची मुलेच या वरील दोषांस बळी पडतात. आत्मप्रस्थापन करण्याची तीव्र इच्छा त्यांच्यामध्ये स्वभावतः असते. परंतु परिस्थिती अनुकूल नसते. मग वरीलपैकी एखाद-दुसरा प्रकार होण्यास सुरुवात होते.
वरील सर्व प्रकार आपला श्रेष्ठपणा प्रस्थापित करण्याचे आहेत. मनुष्यास आपला कनिष्ठपणा भासू लागला की श्रेष्ठपणा प्रस्थापित करण्याकडे त्याचा कल व प्रयत्न होऊ लागतो, व श्रेष्ठपणा प्रस्थापित करणयास योग्य असे साधन मिळाले तर बरे असते. उदाहरणार्थ, एखादया मुलाचे अभ्यासात डोके चालत नसते; पण क्रीडांगणावर त्याची सरशी कोणी करू शकत नाही असे असले तर त्या मुलास आपला दुसऱ्या बाजूचा कनिष्ठपणा विशेष जाणवत नाही. कोणी चित्रकामात तर कोणी शिवणात, कोणी गाण्यात तर कोणी कशात
असे कोठेतरी प्रावीण्य दाखवितात व त्यामुळे त्यांना कनिष्ठपणाची भावना उत्पन्न होत नाही. परंतु यापैकी एकाही रीतीने ज्यांना आपल्या समाजात स्थान मिळविता येत नाही तेथे मग वर दिलेल्या एखाद्या मार्गाने ती आत्मप्रस्थापन करू पहातात, म्हणजे विकृत मार्ग पत्करतात.
पुष्कळ मुलांची कमनशिबाने परिस्थितीच अशी वाईट असते की, त्यांच्यांतील गुणांचे चीजच होत नाही. सामान्यतः अगदी काही कर्तबगारी नाही असे सहसा नसते. एक नाही तर दुसरी बाजू तरी प्रत्येकास असतेच. परंतु एखादे मूल असे दुर्दैवी असते का त्याला आपली कर्तबगारी दाखविण्याची संधीच मिळत नाही. गरीबीमुळे अथवा पोरकेपणामुळे, अथवा सावत्र आईच्या अवगुण पाहण्याचा नजरेमुळे अथवा कुरूपामुळे किंवा व्यंगामुळे बिचारी आपले स्थान मिळवूच शकत नाही. परंतु त्याचा आत्मा आत्मप्रस्थापनासाठी तळमळत असतो. इच्छा दुर्दम्य असते. मग त्यास असा एखादा मार्ग मिळून जातो. शरीरास रोग जडणे व मनास एखादी वाईट खोड जडणे सारखेच समजले पाहिजे. रोग निवारण्यास उपाय रोगाचे कारण नाहीसे करणे. मानसिक विकृत सवयींचीही मूळ कारणे दूर व्हावयास हवीत.
लहान मुलांचे बाबतीत अर्थात् मोठ्यांवरच ही जबाबदारी येते. नुसते मुजोर मुलास ‘तू मुजोर आहेस’ असे सांगून त्याची मुजोरी जात नाही, व बाताड्याच्या बाताही बंद होत नाहीत. पण ही मुजोरी अथवा ही घमेंडखोरी कोठून व का आली याचा आपण विचार करून या मुलाचा आत्मा कोठेतरी दबला जात आहे व योग्य वाट मिळण्याचे अभावी हा खोटा मार्ग त्यास मिळत आहे एवढे जर मोठी माणसे लक्षात घेतील तर कोठे उपाय व्हावयास हवा तेही लक्षात येईल.
एक मूल होते. दुर्दैवाने लहानपणीच वडील वारले. आईला लहान वयातच दुसऱ्यांकडे काम करण्याची पाळी आली. मुलास वार लावून जेवण्याची पाळी आली. हळूहळू त्याच्यामध्ये मुजोरी दिसून येऊ लागली. कोणीही वडील अथवा मोठ्या माणसास तो चटकन् उत्तरास उत्तर देई व प्रत्येक वेळी त्याचे नाक ठेचले जाई. श्रीमंतांच्या घरी वार लावून जेवायचे तेव्हा त्यांच्या मुलांबरोबर बरोबरीच्या नात्याने वागविले जावे असे त्याला वाटे. पण ते कसे होणार? त्याच्यात कित्येक गुण होते. कित्येक बाबतीत तो मूर्खही होता. परंतु त्याच्या गुणाचे चीज करणारे कोणीच नव्हते! दोषाबद्दल बोलणारी सर्वच होती ! मग काय त्याने मानसिक मरण पत्करावे? मन मरू इच्छित नाही. ते आत्मप्रस्थापनाचा रस्ता शोधून काढते. मुजोरीबरोबर या मुलात बाताडेपणाही संचारला तर नवल नाही. कारण डौल, आढ्यता वगैरे श्रीमंतांना करता येतात. गरीब, असहाय्य मुलास केवळ खोट्या खोट्या गप्पा मारणे व शब्दास शब्द ठेवून देणे या गोष्टी शक्य असतात.
तरी मुलांमध्ये अशा प्रकारच्या सवयी येऊ लागल्यास त्याच्या जीवनओघाचे अस्खलित वाहणे कोठे तरी कुंठित झाले आहेत असे नक्की समजावे व तपासून पहावे. बहुतेक फारशा मेहनतीवाचून कारण हातावेगळे करता येईल व ते दूर करण्याचा उपाय सुचेल.
(शिक्षण पत्रिका, वर्ष ८, अंक १, जून १९४०)

Leave a comment