एका आईबापाच्या पोटची, एका घरात वाढलेली, जन्मापासून एकमेकांच्या अत्यंत निकट संबंधांत आलेली अशी भावंडे असतात. आपल्या भावनामय मनास असे वाटते की बाल्यावस्थेपासून एकत्र वाढलेली, एकाच आईचे दूध प्यालेली, एकाच पित्याच्या प्रेमछत्राखाली मोठी झालेली भावंडे स्वाभाविकपणेच एकमेकांवर अत्यंत प्रेम करणारी असतात – नव्हे, असलीच पाहिजेत.
परंतु जरा सूक्ष्म निरीक्षण केले असता सहज दिसून येईल की भावंडांचे प्रेम म्हणजे आपली एक काव्यमय सुंदरशी कल्पनाच आहे. खोल विचार करून पाहिले असता असे दिसून येतें की भावंडांमध्ये परस्पराविषयींच्या स्नेहभावापेक्षा ईर्षा, असूया, द्वेष, स्पर्धा व तज्जन्य भाऊबंदकीच विशेष असते. या सर्वांची वीषबीजे फारच लहानपणी म्हणजे अर्भकावस्थेत रोवली जातात व त्यांची कडू फळे त्यांना मोठेपणी चाखावी लागतात. मोठेपणी स्वतंत्र होऊन सर्वजण आपआपल्या धंद्यास लागली, कोणाला कोणावर अवलंबून राहावयाची पाळी आली नाही व सर्व जवळ जवळ सारख्याच स्थितीत असली व वडिलोपार्जित मिळकत नसली तर ही कडू फळे चाखण्याची फारशी जरूर राहात नाही. साधारण वरवरचे गोड संबंध तरी निदान कायम रहातात. परंतु जर का यात काही कमीजास्तपणा आला की भाऊबंदकीस ऊत येतो व लोकांना तमाशा पहाण्यास मिळतो. हा अनुभव क्वचित मिळणारा, अपवादात्मक असा नसून हाच सामान्य नियम आहे. भावंडांचे खरोखर अंत:करणापासून प्रेम आहे अशी स्थिती फारच क्वचित पाहावयास मिळते.
हे विधान प्रथम दर्शनी चुकीचे आहे असे पुष्कळांस वाटेल. ह्याचे कारण आता आपण असे गृहीत धरून चालत आहो की भावंडांचे परस्परांवर प्रेम असायचेच, व नंतर असायच्या गोष्टी आहेतच असेही आपण मानू लागतो. पण वास्तविक स्थिती काय आहे ती जरा तपासून पाहिली पाहिजे.
मनुष्याच्या भावना दोन प्रकारच्या असतात. उपजत भावना व नंतर विकास पावलेल्या भावना. अथवा मूलभूत भावना व दुय्यम भावना असा भेद पाडला तरी चालेल. स्वतः जिवंत राहाणे व स्वतःस जिवंत रहाण्यास व जिवंत असण्याचे सुख अनुभवण्यास जी काही साधने लागतात ती मिळविणे व असतील ती टिकविणे ही मूलभूत भावना आहे. आपले सामाजिक संबंध, आपली नाती गोती, स्नेही संबंधी वगैरे जे स्नेहाचे धागेदोरे आपल्या भोवती गुरफटलेले आहेत ते सर्व जीवनभागाहून विकास पावलेले अथवा दुय्यम
प्रकारचे असतात. अर्थात प्रजोत्पत्ती करून आपलेच स्वरूप अधिक विशाल करावे या दुसऱ्या मूळभूत भावनेच्या पायावरच सर्व प्रकारचे स्नेहसंबंध उभारलेले असतात. तेव्हा या दुय्यम भावनांत या मूळभूत भावनेचा पाया असतो ही गोष्ट खरी आहे.
जेव्हा जेव्हा मूलभूत भावना व दुय्यम भावना यांच्यांत विरोध उत्पन्न होतो तेव्हा मूलभूत भावनांचा जय होतो व दुय्यम दाबल्या जातात. जितक्या प्रमाणांत प्राथमिक (Primitive) अवस्था जास्त तितक्या प्रमाणात मूलभूत भावनांचा जोर जास्त असतो. अथवा तो जास्त उघड अथवा स्पष्ट असतो म्हटल्यास अधिक खरे होईल. बालपणी आपण सामाजिक दंभ, सभ्यता दाखविणे वगैरे प्रकारांपासून अलिप्त असतो. त्यामुळे प्राथमिक अवस्थेतच असतो. Primitive uncivilized – प्राथमिक मनुष्य व बालके सारखीच म्हणजे
आपल्या मूलभूत भावना अनुसरून चालणारी असतात. ही मानसरचना व त्यांच्या व्यापारांचे वळण समजून घेतले असता भावंडांमधील द्वेषादि प्रकार सहज लक्षात येण्यासारख्या व सहज समजण्यासारख्या गोष्टी आहेत.
मुलांच्या जीवनहक्कांच्या, सुखसोयींच्या आड येणारी कोणी असली तर ती त्यांची भावंडेच असतात. इस्टेटीचे वाटे करण्याचे स्वप्नही नसते तेव्हाच प्रथम त्यांना मातापिता व इतर वडील मंडळीच्या प्रेमाचे वाटे करून घ्यावे लागतात. हे वाटे बहुतेक अन्यायाचे होत असतात; व होतात त्याहीपेक्षा अधिक अन्यायाचे मुलांस वाटत असतात. कारण मोठी माणसेही न्याय, अन्याय, समभाग वगैरेचा विचार न करता निराळ्या तत्त्वांवर वाटे करतात. लहानांस अधिक, मोठ्यांस कमी, अशक्तास अधिक, सशक्तास कमी हे प्रकार तर आहेतच. त्याशिवाय काहींचे नाव पडते ‘चांगली’ ‘शहाणी’ ‘गुणी’ व काहींचे नाव पडते ‘आडमुठा’, ‘चहाटळ’, ‘रामोशी’, ‘चोर’. अशी नावे पडायला योग्य कारणे असतातही व नसतातही. ती सर्व तपासत बसलो तर बरेच विषयांतर होईल. पण मोठ्यांनी ठरविलेल्या गुणांच्या मानाने प्रेमाच्या वाट्यात मुलांना कमी-अधिक मिळते. काही मुले सुंदर नाजूक असतात ती स्वाभाविकपणे आपल्याकडे लक्ष व प्रेम अधिक ओढून घेतात. काही बुद्धिवान, हुशार गणली जातात म्हणून त्यांना थोडा जास्त वाटा देण्यात येतो. एकंदरीत इतके खरे की अनेक रास्त अरास्त योग्यायोग्य व विचित्र तत्त्वावर वाटे केले जातात.
या वाटे करणाऱ्यांच्या असमतेच्या जोडीला कोणत्याही रीतीने का होईना पण आपल्याला सर्व अविभाजित वाटा मिळावा ही इच्छा मुलांना असतेच. त्यामुळे अगदी योग्य रीतीने वाटे झाले तरी वाटा करावा लागला, पूर्ण न मिळता अर्धे घ्यावे लागले ही गोष्ट स्वतःच असंतोष उत्पन्न करण्यास पुरेशी आहे. याप्रमाणे
घरामध्ये दुसऱ्या बालकाचा जन्म होताक्षणीच विरोधास सुरुवात होते; व त्या विरोधास पोषक अशी कारणांवर कारणे होतच जातात. मुख्य गोष्ट म्हणजे आईच्या सहवासास मुकावे लागते. आईचे लक्षही प्रथम प्रथम तर सर्वस्वी धाकट्या बाळाकडेच असते. आईस सारा वेळ त्याच्याशीच प्रेम करण्यात
गुंगलेली पाहून कोणाही बालकांस “आता हे बाळ मरेल कधी?” किंवा “येथून त्याला कोणी घेऊन जाईल तर बरे !” असे वाटल्यास काय नवल? परपुरुषास आपल्या स्त्रीशी लघळपणा करताना पाहून कोणीही पुरुष त्वेषाने वेडा होऊन गेला तर त्याचा राग योग्यच होता असे कायदाही स्वीकारतो. पण आपल्या हक्काची आई दुसऱ्याची झालेली पाहून मुलास तितकाच त्वेष येत असेल हे पुष्कळांच्या लक्षात येत नाही. मूळ वर्मी जखम झालेली असते, त्यात इतर मंडळी पुष्कळदा थट्टेत म्हणून त्या मुलास वर चिडवत असतात की “आता आई तुझी नाही,” किंवा “आता तू आईचा नाहीस,” वगैरे. या प्रकारची सर्व थट्टा, थट्टा नसून दुःखावर डागण्या असतात. त्यामुळे त्या कोवळ्या वयात असह्य वेदना उत्पन्न करणाऱ्या असतात. त्या लहान बालकांस आपले सर्वस्व गेलेले वाटत असते पण त्याचे रडणे चिडणे पाहून मोठी माणसे मात्र हसत असतात ! खरे म्हटले असता त्यांचे हे करणे अत्यंत निर्घृणपणाचे म्हटले पाहिजे. अर्थात त्याच क्षणापासून भावंडांच्या ईर्षेस व द्वेषास सुरुवात होते; व पुढे लहानमोठे अनेक प्रसंग बनतच जातात. मोठ्यांचे वर्तन काही सर्व विचार करून होत नसते व बालकाच्या मनावर काय परिणाम होतो याचा विचार त्तर मुळीच होत नसतो. त्यामुळे वीषवीजास चांगलेच पोषण मिळून वीषवृक्ष फोफावत असतो. पुढे या द्वेषाच्या जोडीस प्रेमाची साथ मिळते. तेव्हा प्रेम व द्वेष यांचेमध्ये लढा चालू होतो.
लहान मुलांतही वात्सल्य असतेच. छोटेसे बाळ घरात खेळता, रांगतांना पाहून, त्याला जवळ घ्यावे, त्याचे मुके घ्यावे, त्याची जतन करावी, त्याला संभाळावे ही बुद्धी जागृत होते. त्यावेळी या बुद्धीस पुरती वाट मिळाली तर काही तरी बरे असते. पण पुष्कळदा वडील मंडळी त्याच्या हातून धाकट्यास अपाय होईल म्हणून त्याला बाळाच्या लालन पालनात योग्य तो भाग घेऊ देत नाहीत. त्यामुळे त्याची मूळची चीड अधिकच वाढत असते. बिचाऱ्या कोवळ्या मनाच्या चिंधड्या उडत असतात. त्याला धरणी खायला धावली किंवा आकाश कोसळले असे होत असल्यास काय नवल ? जवळ जवळ घरोघर आपल्या कानी हे उद्गार येत असतात “हा बाबू अगदी वाईट झाला आहे ! पहिल्यांदा असा नव्हता!” “आताशी याला काय झाले आहे कोण जाणे ! अगदी चिडखोर नी किरकिऱ्या झाला आहे.” कोणी म्हणते, “एवढा द्वाड झाला आहे. सारखा मारीत फोडीत असतो!”. एक ना दोन अनेक उद्गार निघत असतात. अशा कुचंबणेने बालकांची मनःस्थिती रोगी वनते व वाईटपणा, चिडखोरपणा, किरकिरेपणा, हट्टीपणा व इतर अनेक लक्षणे त्यांच्यांत दिसू लागतात. त्यांचे मन उल्हसित नसते. आपल्यास प्रेमाचे कोणी नाही असे त्यास वाटू लागते. बंड करून तरी आपले हक्क मिळवून घ्यावेसे वाटू लागते. त्यामुळे ती असे प्रकार करू लागतात व त्या प्रकारांमुळे बिचारी जास्तच बोलणी खातात, मोठ्यांच्या तिरस्कारास पात्र होतात. पण पुष्कळदा मुळीच कोणाचे लक्ष नाही असे होऊन गुपचूप पडून रहाण्यापेक्षा मोठ्यांचा राग, मार तिरस्कारादि त्यांना अधिक परवडतात. ह्या रीतीने तरी वडील मंडळींचे आपल्याकडे लक्ष वेधले तर तेवढेच त्यांना समाधान असते. पुष्कळदा हे करू नको म्हणून सांगितले असते ते ती मुद्दाम करतात व पुष्कळदा अजूनतरी कोणी बोलत नाही या कुतूहलाने वडील मंडळीच्याकडे पाहाताना दिसतात. जितका जास्त आरडाओरडा होईल, जास्त वेळ आपल्यासंबंधी चर्चा चालेल तितके त्यांना बरे वाटते. कारण तितका वेळ तरी धाकट्या बाळाचे महत्त्व कमी होऊन आपण कोणी महत्त्वाची व्यक्ती आहो अशा रीतीने मोठी माणसे आपल्याशी वागत आहेत असे त्यास वाटते.
एका अर्थाने पाहिले तर गोष्ट अगदी साधी आहे. घरोघर नेहमी घडणारी आहे. पण नेहमीची आहे म्हणून त्यात काही नाही अशी मानण्यासारखी नाही. कारण ती दीर्घ परिणामी व कटु परिणामी आहे व त्या वेळीच आपल्याच अर्भकास अत्यंत दुःखांतिक वेदना देणारी आहे यात तर शंकाच नाही. या बाबतीत वेळीच योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
पहिली गोष्ट म्हणजे मोठ्या मुलास त्याचे हक्क गेले असे वाटणार नाही अशा रीतीने वागणे. आईस मोठ्यापेक्षा लहानाकडे अधिक लक्ष द्यावे लागणारच; पण त्यामुळे शक्यतो मोठ्यास “आता आपल्याला कोणी नाही,” असे वाटणार नाही अशी योजना केली पाहिजे. आजीने किंवा वडिलांनी त्यास अधिक जवळ घेऊन त्याला आपल्या आईस मुकावे लागले आहे हे त्यास फारसे भासणार नाही असे केले पाहिजे. निदान प्रेमात तूट पडत नाही असे त्यास दिसून आले पाहिजे. आईचा वियोग त्यास शक्य तितका कमी जाणवेल असे केले पाहिजे. त्याशिवाय आईनेही त्यास अगदी दूर न करता मधून मधून जवळ बोलावून त्याची चौकशी करून प्रेमाने जवळ घेऊन त्याला आई आपली आहे याची खात्री पटवून देत गेले पाहिजे. थोडेफार त्याचेही काम मुद्दाम ध्यानात ठेवून करणे जरुरीचे असते. नोकर माणसे असली किंवा घरची मंडळी असली तर पुष्कळदा आईला कामे करण्याची जरूर नसते. तरी पण प्रेमाची खूण म्हणून मुलीची वेणी घालून देणे किंवा मुलास कपडे घालून देणे की चड्डीत नाडी घालून देणे अथवा जवळ बसवून घेऊन भात कालवून देणे वगैरे लहान लहान गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे एकदम पदच्युत झाल्यासारखे मुलास वाटत नाही. मानाचे दृष्टीने अथवा प्रेमाचे दृष्टीने त्याच्या जीवनात एकदम काही फरक झाला आहे असे त्यास वाटू देता कामा नये.
दुसरे म्हणजे “तू आता मोठा झालास; तू आता आईच्या मांडीवर निजायला लहान का ?” वगैरे उद्गार काढून त्यास हिणवू नये. २/३ किंवा ४ वर्षाचे मूल म्हणजे काही फार मोठे झालेले असते असे नाही. उलट त्यास आई पुष्कळशी मिळू शकत नाही हे लक्षात घेऊन थोडीशी तरी ती त्याच्या वाट्यास येण्याचा त्याचा हक्क आहे हे लक्षात घेऊन वागावे.
तिसरे म्हणजे, “आई तुझी नाही” किंवा “तू नाही आवडत आईला; आईची बेबी लाडकी” वगैरे प्रकारची निष्ठुर थट्टा करून त्याच्या मनात नसत्या वेदना जागृत करण्याचे अथवा जागृत भावनांस अधिक डिवचून पोसण्याचे प्रकार कधी करू नये. उलट “हे बाळही आपलेच आहे”, “ते लहान आहे म्हणून
आईला त्याचे करावे लागते”, “तूही माझे तेही माझे” “तूही लाडके तेही लाडके” अशी विचारसरणी त्याच्यापुढे नेहमी ठेवली पाहिजे. वर्तनानेही ती त्याच्या प्रत्ययास आणून दिली पाहिजे.
चौथी गोष्ट – स्पर्धेचे तत्त्व दाखल न करण्याची खबरदारी घेतली पाहिजे. बालकांना मागच्या पुढच्या गोष्टी बोलत बसायची सवय असते. त्यात पुष्कळदा एका मुलाचे गुण गाणे, एकाचे अवगुण काढणे वगैरे चालत असते. इतिहास या दृष्टीने मागच्या गोष्टी ऐकणे मुलांसही मौजेचे वाटते. त्यांत कोणी लहानपणी रडके असलेले सांगितले तर त्याचे काही वाटत नाही. पण कित्येक वेळा लहानपणच्या गोष्टी अद्यापही जणू काय त्याचे दोषच आहेत अशा पुढे आणल्या जातात. तेव्हा ते मुलास टोचते. “अमुक ना ? अगदी जन्मल्यापासून मला छळतो आहे. दोन महिन्याचा नाही झाला तो झाला डांग्या खोकला. सारखी जाग्रणं करावी लागली,” हे व असे कितीतरी अनेक प्रकारचे प्रकार रोज ऐकू येतात. जणू मुलांच्या दुष्टपणामुळे त्यास डांग्या खोकला झाला व आईची झोप मोडली ! आपल्या बोलण्याचालण्यांत एका मुलाचा पाणउतारा व दुसऱ्याचे गुणवर्णन येऊ नये. त्यामुळे भावंडामधील प्रेमभाव जाऊन स्पर्धा व ईर्षा वाढते. त्याच प्रमाणे “कोण लवकर करते पाहू, लवकर करील ते हुशार अथवा शहाणे” अशी स्पर्धाही लावू नये. एकंदरीत भावंडांमध्ये स्पर्धा किंवा चढाओढ लागेल असे काही बोलू किंवा वागू नये.
पाचवी गोष्ट म्हणजे भावंडामध्ये असमता दिसेल असे वर्तन वडील व्यक्तींनी चुकूनही दाखवू नये. मोठी माणसे अन्याय करतात, पक्षपात करतात, त्यांना अमूक जास्त आवडतो व आपण कमी आवडतो ही भावना फार खोल जाऊन मनुष्यास जन्मभर डाचत रहाते. पुष्कळाच्या घरी मुलास एका प्रकारे व मुलीस निराळ्या रीतीने वागवायचे अशी रीत असते. खाण्यापिण्यात काही काही ठिकाणी फरक करण्याची चाल असते. काही घरी विशेषतः इनामदार वगैऱ्यांच्याकडे मोठा मुलगा व इतर मुले यांच्यात फारच मोठा फरक पाडला जातो. कधी कधी काही कारणाने आईचे अथवा बापाचे अथवा दोघांचेही एखादे मूल अधिक लाडके होऊन बसते व त्यामुळे नेहमी बारके बारके पक्षपात होत असतात. ते दुसऱ्यास डोळ्यांतल्या कुसळासारखे वाटतात. गृहराज्ये जरी प्रेमाच्या पायावर उभारलेली असली तरी तिथेही न्याय, समता व निःपक्षपात यांना प्रथम स्थान हवे ही गोष्ट राज्यकारण चालविणारांनी लक्षात ठेवली पाहिजे.
सहावी गोष्ट म्हणजे मोठ्या मुलास लहानाच्या जोपासनेत पहिल्यापासूनच योग्य तो भाग घेऊ द्यावा. त्याच्याने होईल तितके पण लहानग्या भावाचे किंवा बहिणीचे काम त्यास करू द्यावे व स्वतः करता आले नाही तर जवळ बाबा-आई व ते मिळून छोट्यास सांभाळीत आहेत असे करावे. “तू जा तिकडे,
इकडे त्रास देऊ नकोस किंवा कटकट करू नकोस. मी बाळाला निजविते आहे,” असे म्हणून ओरडून त्यास तोडून टाकण्यापेक्षा ‘चल आता बाळाला निजवू हं ! तू थोपट बरं हळू हळू, गाणं म्हण बरं.” वगैरे म्हटले तर ते इतक्या चांगल्या रीतीने सर्व करते व स्वस्थ शांतही राहाते, गडबड होऊ नये म्हणून हळू बोलते, सर्व काही करते. वात्सल्य त्यांच्यात सहज उत्पन्न होण्यासारखे असते. त्याची जोपासना केल्यास आईचे कामही सरळ होते व भावंडाच्या मनांत द्वेषादि विषारी भावना जागृत अगर वृद्धिंगत होण्याचे कारण राहात नाही.
याशिवाय मोठ्या मुलास त्याची मित्र मंडळी व त्याची शाळा यांमधे स्थान मिळविण्याची संधी दिली पाहिजे. अगदिच वर्षाच्या अंतराने धाकटे जन्मले नसले (व तसे होऊ द्यायची खबरदारी घेणे आईबापांचे कर्तव्य आहे) तर मोठे मूल बालक्रीडांगण किंवा बालमंदिरामध्ये जाण्यास लायक झालेले असते. त्यावेळी त्याला बाहेरच्या खेळण्यात, मैत्री जोडण्यात वगैरे गोष्टीत वेळ घालविण्यास व मन गुंतविण्यास मिळाल्यास आई धाकट्या भावंडाचे लाड करीत बसते हे त्यास फारसे सलण्याचे कारण रहात नाही. घरातच राहून घरकोंबडे झालेले मूलच जास्त इर्षाखोर बनते असा सामान्य अनुभव आहे.
एकटे मूल असते तेव्हा त्याचे फारच लाड करणे, सर्व वेळ त्याच्याच सेवेत रहाणे, त्याचेच कौतुक करीत बसणे वगैरे प्रकार झाले असल्यास पुढे त्याचे ते हक्काचे स्थान गेल्याने त्यास विशेष वाईट वाटते. त्यामुळे एक असो की जास्त असो मुलास योग्य ते स्थान व लक्ष मिळालेच पाहिजे व अयोग्य असे मिळता कामा नये हे धोरण ठेवले असता मुलांस ते लाभकारक असते.
ही बाब दिसावयास लहान दिसते तशी ती नाही हे लक्षात घेऊन घरोघर आईबापांनी मुलांचे या संबंधी अवलोकन करून काही चुका होत असल्यास त्या लगेच सुधारून बालकांचे जीवन विनाकारण दुःखी होऊ नये याबद्दल खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
शिक्षण पत्रिका, वर्ष ४, अंक ३, ऑगस्ट १९३६

Leave a comment