कोणी म्हणते, “ही संस्था चांगली. म्हणून आमच्या मुलाला येथे ठेवण्यास मुद्दामच आलो. तो अगदी पार बिघडला आहे. तरी त्याचे चारित्र्य उत्तम व्हावे म्हणून तुमच्या शाळेत ठेवण्यास आलो.”

कोणी म्हणते, “तुमची शाळा फार नावाजली आहे. तेव्हा म्हटले आमचा मुलगा येथे लवकर लवकर शिकेल. तुमच्या येथे एक वर्षात दोन इयत्ता करवून घेता ना?”

कोणी म्हणते, “आमच्या मुलाने अद्वितीय व्हावे म्हणून तुमच्या शाळेत ठेवले.”

या प्रकारे कोणाची कल्पना काही नी कोणाची काही असते. कोणाला वाटते की शाळेत मुलाला घातले की मास्तरांना हवे तसे त्याला बनवू शकतील. त्याचे चारित्र्य काय, त्याचा बुध्दिविकास काय किवा दुसरा एकंदर विकास काय, शिक्षक ठरवील तसे तो करू शकेल अशी सामान्य समजूत आहे व अशी समजूत शिक्षक करवूनही देतात. “आमची आदर्श संस्था आहे. आम्ही येथे चारित्र्य घडवीत असतो” असे कोणी म्हणतात. कोणी म्हणतात आम्ही जे नियम बनवीत असतो-अलौकिक बुध्दिविकास साधीत असतो” कोणी म्हणते “मोजून चार वर्षात मॅटिक होता येते.” याप्रकारे शिक्षक आपआपल्या शाळेसंबंधी विलक्षण हमी देत असतात व पुष्कळ संस्थेत त्या त्या दिशेने प्रयत्नही होत असतात.

गुरुकुलसारख्या संस्थांमधून चारित्र्य घडविण्याकडे व खडतर बनविण्याकडे विशेष लक्ष पुरविले जाते. निरनिराळ्या आश्रमासारख्या संस्थांचेही ध्येय हेच असते. तर दुसऱ्या काही संस्थांतून असाधारण बुध्दिविकास साधण्याचा प्रयत्न होत असतो. कोणी कलाविकास व भावनाविकासास प्राधान्य देऊन त्याचेच विशेष वातावरण उत्पन्न करतात, तर काही देशभक्त व समाजसेवकच निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्था असतात. मिळून निरनिराळ्या संस्था निरनिराळी विशिष्ट ध्येये आपल्यापुढे ठेवत असतात व प्रत्येक संस्था आपण मुलांना काय बनविणार आहोत ते जनतेच्या मनावर ठसवून देत असते. ज्यांना जे विशेष आकर्षक वाटेल तिथे ते ते पालक आपल्या मुलांना पाठवत असतात व मनात संतोष मानीत असतात की “मी आपल्या मुलास चारित्र्यवान होण्यास पाठवले आहे,” “मी आपल्या मुलास कवी करणार आहे,” वगैरे.

प्रश्न असा उत्पन्न होतो की मुलांना शिक्षक अथवा पालक मनात आणतील ते बनवू शकतात का? शिक्षणाचे क्षेत्र कोठपर्यंत? शिक्षणाने चारित्र्य दीक्षा देता येते का ? शिक्षणाने असाधारण बुध्दिमता देता येते का? शिक्षणाने भावनांचा सागर निर्माण करिता येतो का? शिक्षणाने सेवावृत्ती उत्पन्न करता येते का? असे धरून चालले की उत्तम शिक्षक, उत्तम उपकरणे, उत्तम साहित्य – सर्व काही उत्तम असले तर शिक्षक मनांत आणतील तसे बालकास बनवू शकतील का? हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न हा आहे की समजा शिक्षकास जरी बनवता येत असले तरी शिक्षकाची अथवा पालकाची इच्छा असेल तसे मुलांना बनवणे हे मुलांच्या दृष्टीने न्याय व योग्य आहे का? त्यामध्ये त्यांचा खरा विकास साधला जातो का? त्यांचा खरा आत्मा प्रगट होतो का? की एकप्रकारच्या बाह्य बंधनाने जखडली जाऊन, बाहेरून लादलेल्या नियमांना वश झाल्यामुळे त्यांचा अंतप्राण गुदमरुन जात असतो? त्यांना लावलेल्या वळणाच्या चौकटीत स्वतःला बसवून घ्यावे लागल्याने आपण खरे आहोत तसे बनता येत नाही, पण आपल्याला जसे बनवले तसे राहावे लागत आहे, असे वाटून त्यांचे अंतर्मन असमाधान अनुभवित असते?

ज्यांना शिक्षणाचे क्षेत्र अत्यंत विशाल आहे असे वाटते, ते शिक्षण ही प्रभावी किमया समजतात व पहिल्या प्रश्नाचे उत्तर छाती ठोकून “हो” असे देतात. त्यांच्या मते उत्तम शिक्षक मनात आणील तसे विद्यार्थ्यास बनवूच शकतो. जेथे तसा परिणाम दिसत नाही तेथे तो शिक्षक उत्तम नसेल, अथवा शिक्षणसाहित्य बरोबर नसेल, पद्धती बरोबर नसेल वगैरे गोष्टीत दोष पाहातात, परंतु आपल्या मूळ सिद्धांतांच्या शक्याशक्यतेबद्धल ते शंका आणत नाहीत.

खरे म्हटले असता शिक्षणाने क्षेत्र बरेच लहान आहे हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे. अर्थात अद्याप सिद्धांत निघणार नाही व नवे प्रयोग होणार नाहीत असे नव्हे. परंतु एवढे तर खासच की शाळांच्या सारख्या संस्थांचा प्रदेश तर फारच संकुचित आहे. गुरुकुलासारख्या संस्थांचा प्रदेश काही अंशाने मोठा आहे. तथापि तोही मर्यादितच आहे. कारण प्रत्येक मूल जन्मास येते वेळीच मुला- मुलात फरक असतो. आनुवंशिक कारणाने, जन्मकाळच्या आईबापाच्या प्रकृतीच्या व मानसिक अवस्थेप्रमाणे वगैरे अनेक कारणाने जन्मकाली सर्व मुले सारख्या शारीरिक व मानसिक शक्ती घेऊन जन्माला येत नाहीत. काही विशिष्ट मानसिक वळण मूळपासून असते. ते वाटेल त्या पुढच्या संस्कारांनी अथवा विरुद्ध परिस्थितीमध्येही बदलत नाही. याला दोन्ही बाजूची उदाहरणे आहेत. भांगेत तुळस म्हणतात तशी अगदी वाईट वातावरणात जन्मास येऊन अत्यंत उत्तम चारित्र्य असलेली मुले दृष्टीस पडतात व अत्यंत चांगल्या वातावरणात राहात असून मूऴ वळणामुळे गंगेत राहून कोरडी असलेली मुलेही आढऴून येतात.

सारांश: पाठीमागच्या संस्कारापेक्षा व शिक्षणापेक्षाही मूळ वळण फारच बलवत्तर दिसून येते. त्यांना शाळा, गुरुकुले अथवा आश्रम मुळीच बदलू शकत नाहीत. आता शाळांच्या ऐवजी मानसशास्त्राच्या प्रयोगशाळा सुरू झाल्या व तेथे क्रिया प्रतिक्रिया वगैरेंच्या मापीव प्रयोगांनी आपल्यास हवे तसेच वळण देणे शक्य झाले तर कोण जाणे!

परंतु सध्या तरी असेल त्या मूळ मुद्दलात भर घालता येते, ते बदलता येत नाही. नेहमी सर्व शाळा चार-दहा विशेष बुद्धिवान मुलांच्या उत्तम निकालावरच प्रतिष्ठा मिळवत असतात. बाकी जी नापास होणारी असतात ती दोन दोन वर्षे एकेका वर्गात राहातच असतात. त्याचप्रमाणे सामान्य मध्यम मुले चारित्र्य वगैरेच्या बाबतीत सरळ मार्गाने चालणारी असतात. त्यांच्यावरच चारित्र्य पटवण्याचे प्रयोग होत असतात. बाकी कित्येक अशी मुले असतातच की, त्यांना कोणत्याही आश्रमात अथवा गुरुकुलात वाटेल तितक्या कडक शिस्तीत व उपदेशांमृताच्या कुंडात ठेवा, ती आपल्याच मार्गाने चालत असतात व विरुद्ध वळणाच्या संस्थेत अशा मुलांचे हालच होत असतात. त्यांच्या आत्म्याची कुचंबणा होत असते तेव्हा ती बंड करूनही आपल्याच धोरणाने चालत असली तर ते एकपरी बरे असेच म्हणायची पाळी येते. बौद्धिक, नैतिक, कलात्मक, धार्मिक सर्वच बाबतीत मूळ वळणाच्या विरुद्ध वातावरणात जबरदस्तीने मुलास जेव्हा घडवण्यात येत असते. तेव्हा त्या मुलाच्या वेदना व कुचंबणा अत्यंत हृदयविदारक असतात. त्यावेळी असे वाटते की भांगेत तुळस उगवली असली तरी तिला तुळस म्हणून वाढू द्यावी व गुलाबाच्या ताटव्यात कांदा उगवला असला तरी त्याला चांगला कांदाच होऊ द्यावा. यातच शिक्षक, गुरू, वडील यांची इतिश्री आहे.

सारांश : सध्याच्या शाळा, आश्रम वगैरे संस्थांनी आम्ही मुलांना असे बनवणार आहोत नी तसे चारित्र्यवान करणार आहोत वगैरे म्हणणे म्हणजेच वृथा वल्गना आहेत. इतकेच नव्हे, तर वळणाच्या विरुद्ध जाऊन जर मुलांना ती होवू इच्छितात, त्यापेक्षा निराळे बनवण्याचा जी कोणी घाट घालतात ती मुलांवर जुलूम करतात व त्यांचे पूर्णपणे नुकसान करतात. जे आईबाप आपल्या मुलास आपल्या कल्पनेप्रमाणे काही बनवू पाहतात तेही आपल्या बालकांवर भयंकर अन्याय करतात व त्यांचे गंभीर नुकसान करतात. ज्यांचा जीव मुळात विलासी आहे त्यांना गुरुकुलात किंवा आश्रमात पाठवून त्यांच्या आत्म्याची कुचंबणा करणे पाप आहे असेच आईबापांनी समजले पाहिजे, याचप्रमाणे सर्व बाबतीत समजावे.

याप्रमाणे वर उपस्थित केलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारात आहेत. एक तर आम्ही बालकांस असे हुशार करतो, तसे कलावान बनवतो आणि चारित्र्य घडवतो वगैरे म्हणणेच वृथा आहे. दुसरे, असा प्रयत्न मुलांना हितावह नसतो. त्यांच्या मूळ वळणास अनुसरून त्यांचा विकास होऊ देणे इष्ट व गुणकारक आहे.

पुढचा प्रश्न निघतो की, तर मग शाळांनी उत्तम असणे म्हणजे काय? त्यात उत्तमता कोणत्या बाबतीत असावी? त्यांच्या मूळ वळणास योग्य वाव देऊन त्या दिशेने बालकास वाढू देऊन त्या दिशेने पूर्ण विकसित होण्याची संधी देणे यातच समाविष्ट होते. बालकाचा प्राण ओळखणे व त्यास वाढीस लावणे यातच शिक्षकाची शिताफी आहे.

कित्येक बालके समाजसेवकाचे बीज घेऊन जन्मास येतात. लहान 3 वर्षाच्या कोवळ्या वयातही समाजसेवेचे कोंब फुटलेले व पालवी आलेले त्यांच्यात दिसून येते. स्वत:चा अभ्यास करण्यापेक्षा कोणी मूल रडत असल्यास त्याला समजावणे, कोणाचे काही हरवले असल्यास त्याला शोधू लागणे, कोणाला काही उचलता येत नसल्यास त्याला धावत जाऊन मदत करणे यात त्यांचा जीव खरा रममाण होत असतो. दुसऱ्याची आपत्ती पाहून ते कळवळत असते. त्याला तशी पुण्य कामे करण्यास अवकाश न देता लिहायला बसवणे, अंक काढून घेणे यात शिक्षक आपल्या कर्तव्यात चुकला असेच म्हटले पाहिजे. काही बालके कलाकाराचा आत्मा घेऊन जन्मास येतात. तर काही तिकडे ढुंकूनही न पाहता सदा वाचनालयात पुस्तकात डोके खुपसून असतात. कोणी लेखक लेखिका असतात. तर आपल्या शाळेत कलावान कोण आहेत, पंडित कोण आहेत, व्यवहारकुशल व कामे पार उतरवणारी कोण आहेत, पाटीवर आकडेमोडी करण्यात गुंग होणारी कोण आहेत ती ओळखून त्यांना आपापल्या परीने प्रवीण होण्यास अवकाश देण्यातच शाळेची उत्तमता आहे.

दुसरे, जशी शारीरिक, मानसिक, नैतिक विकासास योग्य असे वातावरण एकत्र करून ही सर्व बीजे उत्तम प्रकारे पोसली जातील असे करण्यात शिक्षकाची कुशलता आहे. तशीच बालविकासाच्या आड येणाऱ्या गोष्टी ओळखून त्यांना दूर करून बालकांचा मार्ग सरळ करून देण्यात शिक्षकाचे कौशल्य आहे. प्रसंगोपात कोणत्याही प्रकारची विकृती उत्पन्न झाल्यास तिचे पटकन निदान करून त्यावर उपाय देणे हे एक शाळेचे मोठे व महत्त्वाचे क्षेत्र आहे. कित्येक मुलांत हट्ट दिसू लागतो;  कित्येकांमध्ये असामाजिक गुण दिसू लागतात; कित्येकांत अनैतिक वळण दिसू लागते; ते वेळीच ओळखून योग्य उपाय व उपचार केल्यास वरवरची विकृती असल्यास खात्रीने जाते. मूळची आनुवंशिक अथवा जन्मत: व्यंग असल्यास मात्र शाळेच्या थोड्या वेळाच्या संसर्गाने व उपायाने जात नाही व कधी कधी ते कधी न जाणारे असते. तशा केसेस वगळल्यास सामान्य बालकांच्या मार्गातील शारीरिक पडशा-खोकल्याच्या कोटीतील मानसिक विकृतींना शाळेमधून उपचार होऊ शकतो व हे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र असून त्या बाबतीत अद्याप शाळांमधून पुरता अभ्यासही झालेला नाही व लक्षही दिले नाही.

तिसरे महत्वाचे क्षेत्र म्हणजे कायमची विकृती होण्याचे प्रसंग बाह्य वातावरणातून या कोवळ्या वयात पुष्कळदा बालकांवर येत असतात. विशेषतः न्यूनगंड उत्पन्न होणे वगैरे प्रकार शिक्षक जर जागृत असेल तर टाळू शकेल. अर्थात या बाबतीत पुष्कळशी तत्त्वे काम करीत असतात. त्यात शाळेत पुरती जबाबदारी शिक्षक घेऊ शकतो. बाकी घरच्या वातावरणासंबंधी पालकांची तयारी असल्यास सूचना देऊ शकतो व काही अंशी तरी या गंडांपासून बालकांस बचावू शकतो. परंतु या क्षेत्रात काम करण्यास शिक्षकाने निराळ्या प्रकारे अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. त्याची सध्याची परीक्षा व निकाल यावर केंद्रित झालेली दृष्टी बालकांच्या विकासावर केन्द्रित झाली पाहिजे. व पालकांसही यांचे महत्त्व कळले पाहिजे.

एकंदरीत शाळांचे म्हणजे शिक्षणाचे क्षेत्र फार मर्यादित आहे हे जरी खरे आहे तरी ते महत्त्वाचे आहे. व योग्य प्रकारे झाल्यास बालविकासास मदतरूप व उपकारक होऊ शकेल यात संदेह नाही.

(पूर्वप्रसिद्धी – शिक्षण पत्रिका, वर्ष 6, अंक 6, नोव्हेंबर 1938)

Leave a comment

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.