
धाकट्या बाबूला माझ्या हातांतून टॉवेल घ्यावयाचा होता. माझ्यापुढे येऊन माझ्या हातातून तो ओढू लागला. मी जरा घट्ट पकडून ठेवला व तो खेचाखेची करू लागला. बाबूच्या मदतीला लवकरच कमू आली व वसंतही येऊन पोहोचला. धाकटी शरयूही मधे मधे लुडबुडत होती. थोड्यात वेळात ओढाओढीला खेळाचे रूप आले. सर्वजण टॉवेल ओढू लागली व हळूहळू सर्वजण मिळून मलाच ओढून खुर्चीच्या खाली आणतात की काय असे वाटू लागले. मी हळूच टॉवेल सोडून दिला व ती सर्व एकमेकांवर पडली. सर्वजण हसू लागली व उठून म्हणू लागली,“चला आता पुन्हा,”“फिरून धरा,”“आम्ही ओढतो.” हळूहळू ओढाओढीला व्यवस्थित रूप आले. मध्ये एक रेघ काढून दोघादोघांनी टॉवेल ओढावयाचा असा खेळ सुरू झाला. वसंताने बाबूला ओढून कुठल्या कुठे नेले व बाबू रडू लागला. मला मध्ये जाऊन व्यवस्था करूण देणे भाग पडले.
आम्ही खेळाचे नियम नक्की केले. विधिनिषेध नक्की झाले. एक,दोन,तीन म्हटल्यावरच ओढण्यास सुरुवात करावयाची. ओढताना दोघांपैकी एकजण मधल्या रेघेवरून पलीकडे ओढला गेला की तो डाव पुरा झाला. मग दुसऱ्या दोघांनी नवीन डाव सुरू करावा असे ठरले. सर्वांना नियम पटले व खेळ चालू झाला व आनंदात चालला. ओढाओढी चालू असेतोपर्यंत ओढणारे बरोबर ओढण्यांत जोर करीत असत व पाहाणारेही आता काय होईल ते पाहाण्यात गर्क असत. दोहोंपैकी एक ओढला गेला की सर्वजण हसत. ओढणाराही हसे व पाहाणारेही हसत. थोड्याच वेळात दुसऱ्या दोघांचा डाव सुरू होई.
नियम करून देतांना मी जर थोडीशी निराळी भाषा वापरली असती तर त्यांच्या त्या निर्भेळ आनंदात अनेक कटू तत्त्वे मी मिसळून दिली असती. त्यांच्या खेळाचे रूपांतर होऊन रडारडी, चुरस, अहंभाव, दुखावलेला स्वाभिमान अशा अनेक गोष्टी पाहावयास मिळाल्या असत्या. मी म्हणाले असते की, ‘रेघेच्या पलीकडे ओढला जाणारा हरला व ओढणारा जिंकला’ तर एवढ्या एकाच शब्दप्रयोगाने खेळास निराळे स्वरूप आले असते.
हरणे अगर जिंकणे याबरोबर, जो जिंकेल त्यास पैसा बक्षीस असे म्हणून त्यांच्या त्या खेळाच्या शुद्ध आनंदात अधिक विरस करता आला असता व जिंकणाऱ्यास शाबासकी देऊन हरणाऱ्यास तुच्छ दर्शवून या निर्दोष खेळाचे परिणाम त्या बालकांच्या जीवनांत अधिक खोल उतरवण्यास मदत झाली असती. बाबू अगदी निरुत्साही बनला असता. कारण वसंत व कमूने त्याला केव्हांच ओढला असता व त्याचा राग त्याने आपल्या धाकट्या भावंडावर काढला असता. त्याला शरयूला ओढून आपला विजय सिद्ध करावा लागला असता. कमू अभिमानाने खुलली असती. कारण ती तिच्या बरोबरीच्या वसंतालाही ओढू शकत होती. परंतु वरील खेळांत हरणे अगर जिंकणे हे तत्त्व नसल्यामुळे त्या सर्वांसच सारखा आनंद होत होता. धाकटी शरयू कमूच्या पुढे उभी राहून टॉवेल ओढण्याचा शक्यतो प्रयत्न करीत होती व ओढली गेली तर सर्वांच्या बरोबर तितक्याच आनंदाने हसू शकत होती. सर्वजण हसत असल्याने अधिक शक्तिवान मुले पुष्कळदा ओढली जाण्याचा आनंद घेण्यासाठी ढिला सोडीत असत, व त्यामुळे लहानांना ओढण्याचा आनंद मिळे. एक हरण्या-जिंकण्याचे तत्त्व काढून टाकल्यामुळे खेळात निर्भेळ आनंद येऊ शकला व एकमेकांविषयी सद्भाव राहून खेळ चालू शकला. त्याऐवजी हरणे-जिंकणे म्हणजे स्पर्धा दाखल केली असती, तर हसण्याऐवजी खेळाचा शेवट कोणाच्या तरी रडण्यात, अथवा चिडवण्यात झाला असता व एकमेकांविषयीच्या द्वेषाची व ईर्षेची बीजे रोवली गेली असती.
आपल्या क्रीडांगणामधून खेळांतील हे विषारी तत्त्व निरंतर काढून टाकण्यात आले तर किती बरे होईल ! बालजीवनातील बरीच कटुता निघून जाईल. आपण जिंकलो याचा अभिमान व श्रेष्ठतेची भावना, व आपण हरलो त्यामुळे येणारा निरुत्साह व हलकेपणाची भावना, या बालविकासास विरोधक अशा गोष्टी आहेत, त्या निघून जातील. प्रेक्षकांकडून शाबासकी मिळवून घेणे, वाहवा करून घेणे व काही बक्षीस मिळेल अशी आशा करणे वगैरे सर्व बहिर्मुखतेचे व लालचीपणाचे दोषही बालस्वभावांत येणार नाहीत व क्रीडांगणावरील बरीचशी असभ्यता, असत्य व भांडणे यास रजा मिळेल.
कोणी म्हणतील स्पर्धा नसली, वाहवा नसली, काही कमावण्या गमावण्याचे नसेल तर या खेळांत खेळण्यासारखे राहिले तरी काय ?
स्पर्धारहित खेळ खेळणाऱ्या वरील मुलांचा आनंदकल्लोळ त्यांना गर्जना करून सांगील की-
“खेळ व आनंद”
“आनंद व खेळ”
शुद्ध खेळ, शुद्ध आनंद.
(पूर्वप्रसिद्धी – शिक्षण पत्रिका, वर्ष १, अंक ७, डिसेंबर १९३३)
(लेखातील चित्र AI वापरून तयार केले आहे.)

Leave a comment