गेल्या आठवड्यांत गुजराथमधील बारडोली तालुक्यांतील एक मोठे कार्यकर्ते श्री. जुगतराभाई दवे बोर्डीस बालवाडीत आले होते. तेव्हा त्यांनी अध्यापन मंदिरातील विद्यार्थ्यांपुढे भाषण केले, त्यात मुलांना सांगावयाच्या गोष्टीसंबंधी विचार करण्यासारखा एक मुद्दा सांगितला. त्यांनी सांगितले की पूर्वीच्या काळी जी नीतितत्त्वे म्हणून मुलांना शिकवली जात होती ती राजनीतीच्या पद्धतीची होती. व्यवहारात एकमेकांना फसवून आपण कसे यशस्वी व्हावे हे मुख्यतः सांगितले जात होते. अगदी मोठ्यातला मोठा गोष्टीचा ग्रंथ म्हणजे पंचतंत्र घेतला, तर त्यांतही हाच प्रकार दिसतो. ती नीती म्हणजे पुष्कळदा कपटनीती व ‘शठं प्रति शाठयं’ ही नीती असे. आपण आज ज्या नीतीतत्त्वांना धरून आपला व्यवहार रचू पाहात आहोत ती सत्य, अहिंसा, सहिष्णुता, धैर्य, वीर्य वगैरे गुणांवर आधारलेली आहे. त्या पूर्वीच्या गोष्टी सांगण्याची पद्धती, त्यांची शैली, भाषा वगैरे सुंदर आहे. परंतु त्यातील नीतीतत्त्वे आपण आपल्या काळास अयोग्य असतील ती बदलली पाहिजेत. त्याच गोष्टी आपण पुढे चालवू नयेत.
श्री. जुगतराम भाईचे म्हणणे अगदी खरे आहे. श्री. गिजुभाईंनी आजीबाईच्या गोष्टींना महत्त्व देऊन पुढे आणले. विसरल्या जात असलेल्या या कंठस्थ साहित्यास त्यांनी पुनर्जीवन दिले. आता त्यांचेच मित्र, बालसाहित्य लेखनांतील सहकारी मित्र श्री. जुगतराम भाईंनी हा जो शुद्धीकरणाचा मुद्दा पुढे मांडला आहे तो विचारणीय आहे. या नव्या दृष्टीने काही जुन्या प्रचलित गोष्टीचे परीक्षण येथे केले आहे.
‘चिमणी पडली खिरीत’ नावाची जुनी एक गोष्ट आहे. आमच्या आजी आम्हांला सांगत.
चिमणा चिमणीला वाटली खीर खावीशी.
चिमण्याने दूध आणले.
चिमणी खीर करायला बसली.
खीर ढवळता ढवळता वाकून पाहू लागली,
तो पडली खिरीत.
ची ची ची मोठ्याने ओरडली.
चिमणा येऊन पाहातो तो चिमणी पडली खिरीत.
बिचारा ! खूप खूप वाईट वाटले त्याला,
सारखी चुटपुट लागली त्याला.
तेथे आला त्याचा मित्र कावळा.
“काय रे झाले चिमण्या ? असा चुटुपुटु का करतोस ?”
“काय करू बाबा?
चिमणी पडली खिरीत,
चिमणा करतो चुटुपुटु
कावळ्याचा डोळा फुटो.”
तशी कावळ्याचा डोळा फुटला.
तो उडत उडत गेला वडाच्या झाडावर.
वड म्हणाला, “काय रे कावळ्या, असा आंधळा कशाने झालास ?”
“काय करू बाबा ?
चिमणी पडली खिरीत
चिमणा करतो चुटुपुटु
कावळ्याचा डोळा फुटो
वडाची पानं झडो.”
तशी वडाची सगळी पानं झडली.
मग तेथे वडाच्या छायेत बसायला गाय येते. ती वडाला पानं झडण्याचे कारण विचारते. वड उत्तर देताना काय काय झाले ती सर्व दुःखपरंपरा सांगून शेवटी म्हणतो “गाईची शिंगे मोडो.” ती नदीवर पाणी प्यायला जाते व नदी तिला शिंगे कशाने मोडली म्हणून विचारते, तेव्हा सगळी हकीकत सांगून शेवटी म्हणते, “नदीचे पाणी आटो.”
याप्रमाणे सहानुभूतीपूर्वक मित्राने केलेल्या चौकशीला प्रत्येकजण शापाच्या रूपात उत्तर देतो. हे सुरुचीस, सभ्यतेस किंवा सहृदयतेस धरून तर नाहीच पण सामान्य मानवता ज्याला आपण म्हणू तिचाच अभाव यात दिसून येतो.
याला कदाचित कोणी म्हणतील की जगात असेच चालत असते. दांभिकतेमुळे असे कोणी स्पष्ट म्हणत नाही. पण आपले नुकसान झाले तर दुसऱ्याचेही तसेच काही नुकसान व्हावे असे प्रत्येकास वाटत असते. निदान तरी नुकसान झाले तर बरे वाटते. किंवा ज्याचे काही वाईट झाले आहे, त्याला प्रत्येक जण विचारायला गेले की त्यांच्या आधीच दुखावलेल्या मनास ते आवडत नाही व त्यामुळे गांजलेल्या मनाचा उद्धार “मर तूही” याप्रमाणे पुष्कळदा असतो. त्याला कथाकाराने या गोष्टीत स्थान दिले आहे.
दांभिकपणापेक्षा मनाचे खरे उद्गार बोलणेच बरे असेही कदाचित कोणी म्हणेल व कोणी नवीन मानसशास्त्राचा आधार घेऊन म्हणेल की याप्रमाणे मनातील हलकी भावना उद्गाराच्या रूपाने काढून टाकल्याने मन जास्त विशुद्ध राहील, नाहीतर सामाजिक दंभ जसजसा वाढत जातो तसतसा मनाचा दुष्टपणा आतून वाढत जातो. वरवर दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी झाल्याचे ढोंग करणारी कित्येक माणसे मनातून खूश होत असतात व जाणूनबुजून दुसऱ्याचे वाईट करण्यास प्रवृत्त असतात ही स्थिती तरी रहाणार नाही.
वरील विचारसरणी बरोबर नाही. भावनांचे संस्कारीकरण हलक्या भावनांच्या सेवनाने होत नाही. सामाजिक सभ्यता ही मनुष्यातील उच्च गुणावर उभारलेल्या व्यवहारांवर रचलेली असते. कित्येकजण तितक्या उच्च भूमिकेपर्यंत पोचू शकत नाहीत. ते दांभिकपणाने तोंडदेखले चांगले बोलतात, पण मनापासून त्यांची वृत्ती तशी झालेली असते. अशा रीतीने सामाजिकदंभ वाढतो हे खरे.
म्हणून लहान मुलांच्यापुढे खऱ्या संस्कारी भावना मुळापासूनच ठेवण्यात आल्या, तरच त्यांच्या मनोवृत्तींना तसे वळण लागण्याचा संभव असतो. कथा कादंबऱ्या मनुष्याला योग्य वर्तनाचे व योग्य भावनांचे वळण लावण्याचे एक प्रभावी साधन आहे यात शंकाच नाही. फक्त तेवढ्यानेच भागत नाही. त्याच्या जोडीस घरातील वडील मंडळीचे वर्तन जी मुले पहातात त्याचीही जोड मिळत असते. तरीही कथांमधून संस्कारी भावनाच याव्यात यात दुमत असणे शक्यच नाही.
याकरीता वरील गोष्ट जर खालीलप्रमाणे फिरवून सांगितली तर सहृदयेची भावना पोसली जाईल. अर्थात गोष्टीत कोणत्याही गोष्टी अतिशयोक्तीच्या रूपात येतात. त्याप्रमाणे यातही अतिशयोक्ती तर आहेच. उदाहरणार्थ, मित्राच्या दुःखाने कितीही दुःखी झाले तरी कोणी काही स्वतःचे डोळे फोडून घेत नाही. पण गोष्टीमध्ये तसे होऊ शकते. ते अक्षरशः खरे धरायचे नाही हे मुले समजून घेत असतात. पण मित्राच्या दुःखाने सहृदयतेने दुःखी होण्याच्या भावनेची मात्र छाप ऐकणाऱ्यांवर रहाते.
चिमण्याला जेव्हा कावळा विचारायला येतो तेव्हा त्याने म्हणावे.
“काय करू बाबा,
चिमणी पडली खिरीत
चिमणा करतो चुटुपुटु”
कावळ्याला हे ऐकून इतके वाईट वाटले की तो खूप रडला.
रडून रडून त्याचे डोळेच फुटले.
तो तसाच वडाच्या झाडावर बसून राहिला.
कुठे जाईना की येईना.
वडाने त्याला विचारले, “काय रे कावळ्या, काय झाले तुला ?”
“काय सांगू बाबा,
चिमणी पडली खिरीत
चिमणा करतो चुटुपुटु
कावळ्याचा डोळा फुटु”.
“अरे ! अरे ! फारच वाईट झालं.”
वडाला खूप वाईट वाटले.
तो खूप हालला. इतका हालला की त्याची सगळी पाने झडून गेली.
वडाच्या सावलीत बसायला रोज एक गाय यायची. ती म्हणाली, “काय रे वडदादा, हा असा कसा झालास?”
“काय सांगू बाई !”
चिमणी पडली खिरीत
चिमणा करतो चुटुपुटु
कावळ्याचा डोळा फुटु
वडाची पानं झडु”
गाईला ते ऐकून इतकं वाईट वाटलं की ती सारखी झाडावर डोकं आपटू लागली. तेव्हा तिची शिंगच मोडून गेली.
ती जात असे रोज कृष्णेवर पाणी प्यायला. तशी ती गेली तेव्हा कृष्णा म्हणाली, “काय ग गाई, ही अशी का झालीस ?”
ती म्हणाली, “काय सांगू बाई,
चिमणी पडली खिरीत
चिमणा करतो चुटुपुटु
कावळ्याचा डोळा फुटु
वडाची पानं झडु”
गाईची शिंग मोडु”
नदीला हे ऐकून इतके वाईट वाटले की ती खूप खळबळली. सगळा चिखल वर आला नी पाणी रेंदा झाले.
नदीवर संध्याकाळी मोर आला. मोर म्हणाला, “काय ग कृष्णाबाई अशी का झालीस ?”
“काय करू बाबा
चिमणी पडली खिरीत
चिमणा करतो चुटुपुटु
कावळ्याचा डोळा फुटु
वडाची पानं झडु”
गाईची शिग मोडु.”
कृष्णा रेंदा.”
मोराला इतके वाईट वाटले की त्याची पिसेच गळून पडली व तो लांडा झाला.
अशा प्रकारे गोष्टीही तपासून त्यात योग्य तो फरक करावयास हवा.
उदाहरणार्थ, उंदराच्या टोपीची प्रसिद्ध गोष्ट घ्या. उंदीर, शिंपी, रंगारी वगैरे सर्वांना शिपायांची भीती दाखवून आपली टोपी शिवून घेतो.
त्याला रस्त्यात एक फडके सापडते. त्याला वाटते टोपी शिवावी. म्हणून फडके धुवून घेण्यास धोब्याकडे जातो. धोबी म्हणतो, पैसे पडतील किंवा “मला वेळ नाही.” तेव्हा उंदीर म्हणतो.
“कचेरीमें जाऊंगा,
चार शिपाईको बुलाऊंगा
बडा मार देऊंगा.”
त्याबरोबर धोबी घाबरतो व म्हणतो, “नको रे बाबा कचेरीत जाऊ नको, शिपायाला बोलावू नकोस. मारबीर देऊ नकोस, आण तुझे फडके धुऊन देतो.”
अशीच धमकी देऊन त्याने शिंपी वगैरे सर्वांना शिपायाचा धाक दपटशा देऊन आपले काम करून घेतले. सरकारी लोक वेठीला धरून जशी कामे करवून घेतात, पैसे वगैरे काही देत नाहीत तसे हे उंदराचे काम. हे काही वाखाणण्यासारखे नाही. आपापली कामे करून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या धंदेदार लोकांनी शिपायाच्या भीतीने उंदराच्या जुलमाला बळी पडण्याचीही जरूर नव्हती. एकंदारीत शिपायाला भिऊन वाटेल ते करण्यास तयार होणे व शिपायाची भीती घालून कामे करवून घेणे या दोन्ही गोष्टी चांगल्या म्हणून मुलांपुढे मांडण्याजोग्या नाहीत व गोष्टीचा नायक म्हणून अशा गोष्टी उंदरास शोभत नाहीत.
त्यापेक्षा एका उंदराला टोपीची हौस आहे व तो म्हणतो आहे म्हणून या सर्वांनी त्याला हौसेने करून देणे अधिक शोभादायक आहे.
उंदीर म्हणतो, “धोबीदादा, धोबीदादा, हे फडके एवढे धुऊन देतो? मला राजासारखी टोपी करायची आहे.”
धोबी – “ओहो, कोण उंदीरभाऊ का? राजासारखी टोपी हवी का? वा, छान, छान. आण, धुऊन देतो.”
तो पुढे शिंप्याकडे जातो. “शिंपीदादा, शिंपीदादा, मला या फडक्याची टोपी शिवून देता का? मला राजासारखी टोपी करायची आहे.”
शिंपी – “कोण? उंदीरभाऊ का? राजासारखी टोपी ? हो-हो अगदी बरोबर राजासारखी करतो. आण ते फडके.”
याप्रमाणे लहान मुलांची हौस जशी मोठी माणसे पुरवतात तसे हे सगळे छानशी टोपी करून देतात व मग तो कचेरीपाशी जातो, असे या गोष्टीचे रूप फिरवले पाहिजे.
(पूर्वप्रसिद्धी – शिक्षण पत्रिका, वर्ष १४, अंक ७, जुलै १९४६)

Leave a comment