ताराबाई मोडक यांचे शिक्षणाबद्दलचे विचार एका ठिकाणी उपलब्ध व्हावेत यासाठी ही वेबसाईट Quality Education Support Trust (QUEST) या संस्थेने पुढाकार घेऊन बनवली आहे. शिक्षणकर्मींना आजही उपयुक्त ठरेल असे बरेचसे साहित्य ताराबाईंनी त्यांच्या कार्यकाळात लिहिले होते. ‘शिक्षण पत्रिका’ या नियतकालिकामध्ये त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले होते. इंटरनेटवर मात्र त्यांनी लिहिलेले हे लेख फारच तुरळक प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसून येते. हे काम सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा उपक्रम.
ताराबाईंनी माँटेसरी शिक्षणपद्धतीचा कायम आग्रह धरला. बालकांचे स्वातंत्र्य, स्वयंस्फूर्तता या तत्त्वांवर आधारित शिक्षणाचा एक नवा दृष्टीकोन त्या जनमानसात रुजवू पाहात होत्या. शिक्षक-शिक्षण आणि पालक प्रबोधन या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले. या सगळ्याच्या मागची त्यांची प्रेरणा ‘बालक’ हीच होती.
या वेबसाइटवर आम्ही ताराबाईंचा एकेक लेख ठराविक कालांतराने प्रकाशित करणार आहोत. वाचकांच्या संग्रही त्यांचे काही लेख, भाषणे, त्यांनी लिहिलेली पत्रे किंवा इतर काही अप्रकाशित साहित्य असेल, तर कृपया ते आमच्याकडे पाठवावे. आम्ही या वेबसाइटवर ते पाठवणाऱ्याच्या नावासहित प्रकाशित करू.
