निर्भयता हा नव्या युगाचा मुद्रालेख आहे. आजचे शिक्षणशास्त्री म्हणतात, “बालकांना कसलीच भीती घालू नका.” शहाणे आणि समजूतदार आईबापदेखील आपली बालके निर्भय व्हावीत म्हणून अनेक तऱ्हेचे उपाय करीत आहेत. आजची बालके निर्भय म्हणजे उद्याची मनुष्यजाति निर्भय.
नव्या युगाची पिढी ज्ञानाच्या पायावर उभारलेले निर्भय जीवन जगण्याची आकांक्षा धरीत आहे. वैज्ञानिक अथवा ज्ञानाच्या प्रगतीबरोबर भयाचा अस्त होत जावा, हे अगदी स्वाभाविक आहे. एका काळच्या मनुष्याच्या जीवनाच्या विविध क्षेत्राच्या मुळाशी भीतीतत्त्वच अधिष्ठित झालेले होते. त्या वेळी मनुष्य मनुष्याला भीत असे. जो बलवान त्याला बाकीच्यांनी भिऊन रहायचे हे जणू काय व्यवहारदक्ष मनुष्यांच्या जगण्यातील रहस्यच होऊन गेले होते. आज व्यक्ती जीवनात थोडा अधिक बदल झाला असला तरी भयाचे अधिष्ठान खूप जबरदस्त आहे हे जागतिक चळवळी लक्षात घेतल्यास कुणाच्याही लक्षात येईल. एक समाज दुसऱ्या समाजाला भीत आहे आणि त्याचप्रमाणे आपल्यापेक्षा दुर्बल लोकांना दरडावीत आहे. राष्ट्रांराष्ट्रांचीदेखील हीच स्थिती. मुसोलिनी, हिटलरसारख्या व्यक्तीदेखील भयासारख्या मनुष्याच्या अवस्थेतील तत्त्वावर स्वतःची प्रतिष्ठा वाढवू पहात आहेत.
भीतीतत्त्वावर उभारलेल्या प्रतिष्ठेची, समाज रचनेची अथवा राज्यव्यवस्थेची एक मौज अशी आहे की जी व्यक्ती दुसऱ्याला स्वतःविषयी भय निर्माण करून आपली प्रतिष्ठा वाढवीत असते. त्याच व्यक्तीच्या अंतर्यामी दुसऱ्याबद्दल भय उत्पन्न झाल्यामुळे त्याच्या हृदयाची धडधडही वाढत्या प्रमाणात सुरू असते. भय दाखवून जगणारांचे मनही मानसशास्त्रदृष्ट्या भयप्रधान असे आढळते. जशीजशी शस्त्रास्त्रांची वाढ होत आहे, कायदेबाजी वाढते आहे, तो तो भयाचे साम्राज्यही वाढते आहे. कारण भयाने ग्रासलेल्या मनुष्यालाच स्वसंरक्षणासाठी किल्ले, कोट, शस्त्रास्त्रे निर्माण करावी लागतील.
आजची शस्त्रास्त्रांची वाढ पाहिली म्हणजे आजचे सुधारलेले जग देखील भयतत्त्वापासून मुक्त नाही असे जे वर म्हटले आहे ते अधिक पटू लागते. किंबहुना आजचा सुधारलेला मनुष्य आणि पूर्वकालीन रानटी मनुष्य ह्यांच्या भौतिक जगांत बदल झालेला असला तरी तत्त्वतः त्यांच्या मनासिक भूमिकेत काहीच निराळेपणा नाही. पूर्वीचा मनुष्य स्वतःच्या रक्षणासाठी कराल फरशी अथवा कुऱ्हाड खांद्यावर टाकून फिरत असे तर सुधारलेला मनुष्य सुधारलेले हत्यार खिशात टाकून फिरत आहे. सुधारणा हत्यारात झाली आहे, मनुष्यात नाही.
शस्त्रास्त्रांच्या खणखणाटातून शांतता, स्वास्थ्य लाभणे शक्य नाही असे अनेक विचारवंताना आज वाटत आहे. शस्त्रास्त्रांच्या सुधारणेपेक्षा मनुष्यात सुधारणा कशी घडवून आणता येईल याचाही ते विचार करीत आहेत. आज शिक्षण शास्त्रज्ञ बालकांना कसलीच भीती दाखवू नका असे जे सांगत आहे त्याच्या मुळाशी मनुष्य सुधारण्याचाच शुद्ध हेतू आहे. तेव्हा बालकांना भीती दाखवू नका याचा अर्थ आणखी स्वतःशी स्पष्ट करून घेण्याची आवश्यकता उत्पन्न झाली आहे.
भीती न दाखवण्याचा एक उद्देश असा की आपले बालक मनाने निर्भय राहावे. भयाच्या पायावर उभारलेल्या म्हणून क्षणोक्षणी भेडसावणाऱ्या जगात त्याने निडर रहावे. कसल्याही डरकावणीला बळी पडू नये. भय भीतीच्या सिद्धान्ताचा येवढाच अर्थ करून काही लोक आपले कार्य साधू पाहात असतात. अशा लोकांना आपले मूल दुसऱ्या बालकांना भीती घालीत असेल तर ते आपल्या बालकाच्या दृष्टीने काही अपायकारक आहे असे न वाटता एक प्रकारचे भूषण वाटते. इतकेच नव्हे तर शास्त्रे म्हणून गाजलेल्या काही जातीत तर आपल्या बालकांनी दुसऱ्याला कसे धमकावे, दुसऱ्यांच्या डरपोकपणाच्या स्वतः निर्भयपणे कसा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा याचे रीतसर शिक्षण देण्यात येते. मानवी समाजात जे कित्येक धटिंगण (Bullies) निर्माण होतात ते अशामुळेच. दुसऱ्याच्या डरपोकपणावर जगावे हाच मुळी ह्या धटिंगणांचा धंदा. हे धटिंगण ज्या समाजात उत्पन्न झाले आहेत त्याच समाजात दुबळी माणसेही उत्पन्न होत असल्यामुळे दोन्ही वर्ग एकमेकाला पोषक होऊन बसले आहेत. धटिंगणाला दुसरा धटिंगण भेटल्याबरोबर दोघेही नरम पडतात हे दृश्य अनेकांच्या परिचयाचे आहे.
बालकांना निर्भय ठेवा ह्याचा अर्थ दुसऱ्यांच्या भीरुतेवर जगणारे धटिंगण निर्माण करा असा संकुचित नाही. कारण त्यापासून खरोखर भयमुक्ती नाही. आपली बालके भयमुक्त ठेवावयाची असल्यास ती भित्री नकोत, त्याबरोबरच ती दुसऱ्यांना भेडसवणारी, दरडावणारी धटिंगण पण व्हायला नकोत. ती अंतर्बाह्य निर्भय पाहिजेत. त्यांचे ठिकाणी भित्रेपणाचे अधिष्ठान नको. त्याचबरोबर ती भयाचे कारणही होऊ नयेत. पण याचा अर्थ भयाचे अथवा भीतीचे मनुष्य जीवनात मुळीच स्थान नाही असा मात्र नाही.
विकासणाऱ्या बालजीवनात भयाचे एक सुंदर स्थान आहे आणि त्यामुळेच मनुष्ये अथवा बालके स्वतःची भयापासून सुटका करून घेऊ शकतात. ते स्थान म्हणजे भयाचा मानवी मनोरंजनाची वस्तू म्हणून स्वीकार हे होय. वाङ्मयांत भयानक अथवा रौद्र रसाला त्यामुळेच स्थान मिळाले आहे. शिकारीच्या अथवा इतर साहसकथा ह्यामुळेच बालकांना प्रिय होतात. ज्या कथाप्रसंगामुळे मुले स्वतःच भयभीत होतात त्या कथा अथवा गोष्टी बालकांना अप्रिय दिसून येतात. पण जेथे भीतीचा प्रसंग उत्पन्न झाला असतानाही नायक त्या प्रसंगात विजय मिळवीत आहे याचे प्रसंगाच्या वाढत्या भीषणतेबरोबरच बालकांना भान असते, तेथे भयंकर प्रसंगापासून भीती उत्पन्न झाली असताही बालकांना एकप्रकारची मौज वाटू लागते. आत्मबलाचा विजय हा आनंददायक, तसाच बालकांच्या अथवा मनुष्याच्या निर्भयवृत्तीलाही मोठ्या परिणामकारक रीतीने मदत करणारा असतो.
उलट जिथे आत्मबलाचे दुर्बलत्व पुढे मांडले जाते, “बघ घेऊन जाईल नाही तर तो काळा कुत्रा तुला,” तिथे बालके अधिकाधिक दुबळी होत गेल्याचे प्रत्ययास येते. बालकांना मुद्दाम भिववू नका हे सांगण्याचे तात्पर्य तरी हेच आहे. “बघ नाही तर काळा कुत्रा” यात भीतीचे एक खोटेच कारण आपण उत्पन्न केले आहे. भीतीची कित्येक वेळा नैसर्गिक कारणेही असू शकतात. उदाहरणार्थ, एखादे बालक रस्त्याने जात असता जर एकाएकी त्याच्या अंगावर कुत्रा अगर गाय धावून आली तर जरूर खूप भीती वाटेल. पण असली भीतीची कारणे तर निसर्गात पदोपदी उत्पन्न व्हावयाचीच. पण पहिल्या भीतीच्या कारणात आणि दुसऱ्या सहज अथवा नैसर्गिक कारणात महदंतर असते. पहिले भीतीचे कारण मनाचेच मानल्यामुळे ते नाहीसे करून घ्यायला मन मोकळे अथवा स्वतंत्र नसते. त्यामुळे ते अधिकाधिक दुबळे होत जाते. उलट, दुसऱ्या ठिकाणी पहिल्या अनुभवाने सावधपणा येऊन त्या भयापासून बचाव कसा करून घ्यावा वगैरे मार्ग काढण्यास मन स्वतंत्र असते. हातात काठी अथवा तसे काही बुजगावणे घेतल्यास आपला बचाव करता येणे शक्य आहे असे सुचून मनुष्य दुसऱ्यावेळी स्वसंरक्षणाच्या तयारीत राहतो आणि त्या तयारीमुळे एखाद्या प्रसंगात विजय मिळाल्यास तो अधिकाधिक निर्भय होऊ लागतो. बालकांची काय किंवा मोठ्या मंडळींची काय, भयमुक्ती ही सारखीच.
तेव्हा बालकांना भीती दाखवू नका याचा अर्थ बालकांसाठी निष्कारण भीतीची कारणे उत्पन्न करू नयेत हा तर आहेच, पण त्याशिवाय भीतीचा विषय मनोरंजक केला पाहिजे. त्याचप्रमाणे नैसर्गिक भयापासून मुक्त होण्यासाठी त्यांना साहस मार्गाने जाऊही दिले पाहिजे हे त्याबरोबर ध्यानात ठेवले पाहिजे.
(शिक्षण पत्रिका, वर्ष ३, अंक ८, जानेवारी १९३६)

Leave a comment