शिष्ट बालकथांच्या शेवटी तात्पर्य रूपाने काही नीतीबोध असतो. पण आजीबाईंच्या बालकथांच्या शेवटी पुष्कळदा काही तरी ग्राम्य विनोद असतो. उदाहरणार्थ ऊ टू ची गोष्टच घ्या. शेवटी काय? तर पादू कशी? ढम् दिशी! कोल्हा म्हातारीची बोरे खाऊन जात होता. त्या गोष्टीच्या शेवटीही असेच “या या कोल्होबा बोरं पिकली” “नाही नाही म्हातारे कुले भाजले” किंवा आता जरा शिष्ट रीतीने सांगायचे म्हणजे “शेपटी भाजली” असे म्हणायचे आणि आजीबाई खरा शब्द यापेक्षा निराळाच वापरीत असत. सध्याच्या तरुण पिढीने तो कधीच ऐकला नसेल म्हणून येथे देत नाही. नाहीतर त्यांच्या कोमल सदभिरुचीस फारच मोठा धक्का बसायचा.

या जुन्या आजीबाईंच्या गोष्टी शिष्ट कुटुंबातूनही थोड्या फार तरी चालत असतील व मुले ऐकून पोट धरून हसतच असतील. अर्थात त्यांना बराचसा बहिष्कार सहजासहजी मिळाला आहे. कारण आजकालच्या आयांना त्या फारशा येतच नाहीत. व ज्या थोड्या बहुत राहिल्या आहेत त्या अद्भुत बालकथा वगैरे पुस्तकांत अथवा बालमासिके यातून त्यांचे संस्करण होऊन नवीन रूपात आल्या आहेत. आजीबाईच्या तोंडून ज्या भाषेत व ज्या रूपात त्या सांगितल्या जात होत्या तशाच्या तशा त्या आज उपलब्ध नाहीत. निदान त्यांचा ग्राम्य भाग तरी नाही. याचे कारण उघड आहे.

ज्याप्रमाणे सभेमध्ये अथवा वर्गाला जायचे असेल तर स्त्रिया आपले घरचे चुलीपासले लुगडे बदलतात, चोळीवर एक पोलके चढवितात (पूर्वी तर या सर्वांवर गरम शालजोड्या घेत) तशी स्थिती या गोष्टींची झाली. आजीबाई पाय लांब करून बसल्या आहेत, मधून मधून तपकीर ओढताहेत, जवळ पोरे गोळा झाली आहेत, त्यात कोणी उघडीबंब आहेत तर कोणाच्या अंगात नुसता सदराच आहे तर कोणी नुसता परकरच नेसला आहे; कोणी आजीबाईंच्या मांडीवर लोळते आहे, तर कोणी जमिनीवरच आडवे झाले आहे, आणि आजीबाईची गोष्ट चालली आहे. या प्रकारच्या घरगुती वातावरणातून निघून या गोष्टींना आता शाळांमध्ये जावे लागले. आजीबाईंच्या ऐवजी ट्रेंड शिक्षकाच्या मुखांतून बाहेर पडावे लागले. आजीबाईनी त्यांच्या आजीबाईकडून व त्यांनी त्यांच्या आजीबाईकडून नि त्यांनी त्यांच्या आजीबाईकडून ऐकायच्या – वारंवार ऐकायच्या व आपल्या नातवंडांना सांगायच्या व या प्रकारे मुखपरंपरेने गोष्टींनी जिवंत राहावयाचे हा प्रकार जाऊन आता मुद्रणालयात पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने छापून आल्या. अर्थात् त्यांना आपला घरगुती वेश बदलून स्वाभाविकपणे बाहेर जायच्या-यायच्या शिष्ट वेशातच यावे लागले. तेव्हा त्यांचा पूर्वीचा लवचिकपणाही गेला; व त्यांच्यातील हा असला ग्राम्यपणाही गेला. अर्थात पुष्कळांचे मते त्याचे संस्करण झाले, गांवढळपणा जाऊन त्यांच्यात शहरी शिष्टता आली. आमच्या मते त्यांच्यातील प्राण जाऊन, त्यांचा जिवंतपणा जाऊन त्या मृत – शववत् झाल्या. त्यांची खरी मजा गेली. त्यांचे तेज गेले. असो.

शिष्ट कुटुंबातून या गोष्टी गेल्या असल्या तरी या प्रकारचा ग्राम्य विनोद अगदी पार गेला आहे असे म्हणता येणार नाही. एक नाही दुसरे नाव देऊन अथवा काही खुणांनी पण मुले काही तरी गंमत करीतच असतात व हसाहस चालतच असते. उघड उघड शब्द बोलणे कानाला कसेसेच लागू लागले म्हणून एकाच्या ऐवजी दुसरा शब्द वापरण्यात येतो. पण मूळ विषय तोच रहातो. या संबंधीची आपली भाषाही अशाच रीतीने बदलत आली आहे. तीस बत्तीस वर्षापूर्वी मी जेव्हा हुजुरपागेत प्रथम गेले तेव्हा माझ्या हितचिंतक मैत्रिणींनी मला पहिली गोष्ट ही बजावली की “पहा बरं येथे परसाकडे जायचं आहे की मोरीवर जायचं आहे असं म्हणू नकोस. नंबर टू ला जायचं आहे, नंबर वन् ला जायचं आहे असं म्हणत जा.” हे दोन शब्द तर सर्वांना वापरावेच लागत. म्हणून ते बोर्डिंगमध्ये रीतसर (officially) दाखल झाले होते. पण लहान मुलींनी नंबर थ्री म्हणजे पादणे हा शब्द आपण होऊनच आपआपसात सुरू केला होता.

पण मूळ परसाकडे जाणे अथवा ‘मोरीवर जाणे, ‘ ‘पाय धुवायला जाणे,’ ‘बाहेर जाणे’ वगैरे शब्दही एक वेळ नंबर टू व वन् इतकेच शिष्ट होते; मूळ क्रियांचे सूचकच होते हे त्यावेळी आम्हाला कळत नव्हते, व इतके तर खरे की फार दिवस वापरण्यात आल्यामुळे ते मूळ शब्दाइतकेच ग्राम्य वाटू लागले.

या बोर्डिंगमध्येच काय व आपल्या एकंदर शिष्ट समाजांत काय, हाच प्रकार अद्यापही आहेच. दर दहा वर्षात बहुतेक शब्दप्रयोग बदलत आहेत. चालू मराठीत ग्राम्य वाटते म्हणून प्रिव्ही कौन्सिल, डब्ल्यु सी. वगैरे इंग्रजी शब्द मंडळी वापरू लागली. डॉक्टरांना विचारायचे असले तरी मोशन साफ झाली का वगैरे शब्दात विचारणे अधिक शिष्ट वाटू लागले. कोणी म्हणू लागले मोठे काम व लहान काम. असे अनेक शब्दप्रयोग प्रचारात आले आहेत. इंग्रजी भाषेतही हाच प्रकार आहे.

मूळ गोष्टीतील ग्राम्य प्रयोग चालू ठेवावे की नाहीत यासंबंधी निर्णय करावयाचे आधी ही ग्राम्यता म्हणजे काय आहे याचे थोडे पृथक्करण करू या. फक्त सवय नसल्यामुळेच जर हे शब्दप्रयोग आपल्या कानाला व मनाला कसेसेच वाटत असतील व मूळ वस्तूमध्ये हरकत घेण्याजोगे काही नसेल तर ते वापरण्यास काहीच हरकत नाही. वापरून वापरून सवय होईल. परंतु तसे प्रयोग जोडण्यात व तशा गोष्टींचा उल्लेख करण्यात जर मनाची सुसंस्कृतता जाण्याचा संभव असला व मन असंस्कृतच नाहीतर मलिन होण्याचा संभव असला तर आपण तसल्या ग्राम्य प्रयोगांचा त्यागच केला पाहिजे. अर्थात या विषयांचा विचार आपणांस बालकाचे दृष्टीने करावयाचा आहे.

सामान्यतः सर्व ठिकाणी, खेड्यांत काय की शहरात काय, गरीबाचे घरी काय किवा श्रीमंताचे घरी काय, अशिक्षितांचे येथे काय, मुलांमध्ये सगळीकडे यासंबंधी काही तरी विनोद चाललेलाच असतो. इतकेच नव्हे तर मोठी माणसेही जरा सूचक शब्दात पण असला काहीतरी विनोद करून हसण्याचा प्रसंग सोडीत नाहीत.

या गोष्टी एकीकडून आपणास नुसत्या ग्राम्यच नव्हे तर घाणेरड्या वाटतात तरी त्यासंबंधी बोलले असता अत्यंत हसू का येते? त्यामध्ये विनोदात्मक असे काय आहे ?

बालके, मग ती कोठल्याही कुटुंबांतली असोत, त्यांच्यामध्ये एक गोष्ट दिसून येते ती ही की त्यांना शरीराच्या सर्व स्वाभाविक क्रिया एकसारख्याच कुतूहल उत्पन्न करणाऱ्या आहेत. खाणे, पिणे, निजणे की शौचादी क्रियांविषयी मोठी माणसे काही निराळ्या प्रकारे बोलतात, उघडपणे बोलत नाहीत वगैरे गोष्टी ध्यानांत आल्यामुळे त्या संबंधीचे त्यांचे कुतूहल अधिक वाढते. त्यामुळे त्यासंबंधी ती अधिक बोलताना अथवा अवलोकन करण्याची संधी मिळाल्यास तसे करताना दिसतात.

स्वाभविकरीत्या पाहिले तर मुलांना त्यात विशेष कुतूहल असते असे नाही. त्यांना इतर बाबींइतकेच यांत कुतूहल असते. परंतु आपल्या मोठ्यांच्या वर्तनाने त्यात काही विशेषपणा, काही निराळेपणा आलेला असतो.

मोठ्यांनी या निसर्गसहज क्रियांना असे निराळे स्वरूप का दिले ? या बाबतीत फार खोलात शिरण्याचे हे स्थान नव्हे. मानसपृथक्करणाचे दृष्टीने या विषयाचा तपास केला असता आपणास अनेक विचित्र व मनास धक्का बसविणाऱ्या गोष्टी दिसून येतील. पण तितके खोल जाण्याची येथे जरूरही नाही.

या बाबतीत आपल्या भावना विशेष नाजूक असण्याची कारणे दोन आहेत. एक तर हे की, मलमूत्रादि आपल्या शरीरास नको असलेल्या गोष्टी असल्यामुळे आपल्यापुरत्या त्या घाणेरड्या असतात. आपल्याला त्या नुसकानकारक आहेत त्यामुळे आपल्या मनालाही त्या घाणेरड्या वाटू लागल्या. होता होता त्याचे नुसते नावही आपल्याला घाणेरडे वाटू लागले व आपल्याला हा विषय किळस उत्पन्न करणारा वाटू लागला. त्यामुळे भावना जो जो अधिक नाजूक बनू लागल्या तो तो या संबंधीची कल्पना देणारे सूचक असे शब्द वापरण्यात येऊ लागले. नुसती ती दिशा सूचक उदा. परसाच्या बाजूस अथवा हिंदीत व गुजराथीत झाडाच्या बाजूस असे म्हणण्यात येऊ लागले. त्यावेळी तांब्या नेतात म्हणून गुजराथीत कळशो म्हणजे तांब्या हा शब्द वापरू लागले. मराठी वगैरे आपली भाषा फार उघड वाटू लागली तेव्हा उर्दू, संस्कृत अथवा आता इंग्रजीमधले शब्द वापरण्यात येऊ लागले व आता इंग्रजीही नेहमीची झाली असल्याने कदाचित फ्रेंच, रशियन किवा जर्मन शब्दही येतील. परंतु हळूहळू हे सर्व शब्द मूळ शब्दाइतकेतच घाणेरडे व कानास अप्रिय होऊ लागतात.

परंतु इतकी नाजूक अशी घाणेरडेपणाची कल्पना व त्याची किळस, याचे मूळ शोधण्यास आपल्यास मानसपृथक्करणांतच शिरावे लागेल. फार खोलात न जाता वर वर पाहिले तरी आपल्याला इतके दिसून येते की या सर्व गोष्टी आपल्यास प्रमाणाचे बाहेर विशेष घाणेरड्या वाटतात, अशिष्ट वाटतात, ग्राम्य वाटतात. त्याचे कारण अगदी दूरचे कां असेना, पण स्त्री पुरुष संबंधाचे जे याच्याशी साहचर्य आहे ते होय. लहान मुले सर्व अवयवांना सारख्या दृष्टीने पाहू शकतात, व त्याच्याविषयी बोलू शकतात. त्या बाबतीत त्यांना मुळीच संकोच वाटत नाही. त्या बाबतीत थोडाही आड पडदा ठेवण्याची त्यांना जरूर वाटत नाही. पण आपणा मोठ्यांची मने त्यांच्यासारखी नसतात. आपल्या मनांत ते शब्द काही निराळेच साहचर्य उभे करतात. त्यामुळे आपल्याला ते आवडत नाही, अथवा उघडपणे बोलणे प्रशस्त वाटत नाही.

मुले निर्व्याजपणे नागडी होतात; एकमेकांना नग्न स्थितीत पाहू शकतात व या विषयातील त्याची जिज्ञासाही पूर्ण शास्त्रीय जिज्ञासाच असते. सर्व अवयव पहाण्याची व त्यांच्या क्रिया जाणण्याची त्यांना सहज जिज्ञासा असते. परंतु मोठी माणसे काही अवयवांना झाकून ठेवतात, व मुलांना झाकण्यास शिकवतात, काहींच्या क्रिया लपवून छपवून ठेवायच्या असतात, इतकेच नाही तर त्याच्यासंबंधी चार चौघांत स्पष्ट बोलायचेही नाही, याप्रकारचे शिक्षण आपण त्यांना देत असतो. आपण आपल्यातील विकृत मानसवृती त्यांच्यातही उत्पन्न करीत असतो. त्यातूनही मुले पुष्कळदा सरळ सरळ बोलतातच. पण तशी ती बोलली तर बहुतेक मोठी माणसे त्यांना चूप चूप तरी करतात, दाबतात, तसे बोलू नये म्हणून सांगतात किंवा हसतात. याप्रमाणे, या बाबतीत हसू येणे याचा जन्म, आपल्या दाबून ठेवलेल्या वृत्तीत आहे.

जुन्या गोष्टींमध्ये अशा गोष्टी येतात या केवळ काही तरी युक्ती किंवा भाषा विनोद म्हणून येतात. मुले त्याची खुबी व विनोद समजून खूष होतात व हसतात. ऊ टू च्या गोष्टीत काय खुबी आहे तर एकदम शेवटी अनपेक्षित गम्मत आहे. भाजीची गोष्ट करता करता एकदम कोठल्या कोठे तिचा अंत झाल्यामुळे मनाला इतकी गंमत वाटते. दुसरे असे की ही गम्मत अनपेक्षित असली तरी ती ओढून ताणून आणलेली नाही. खरोखर शरीरशास्त्रास धरूनच गोष्ट आहे. भाजी वगैरे खाल्ल्याने पुष्कळदा पोटात वायू धरतो व पुष्कळदा कुशीवर निजल्यामुळे जर पोट दाबले गेले तर वायू सरतो ही गोष्ट शास्त्रीय आहे. म्हणजे केवळ एखादी ग्राम्य गोष्ट आणून मुलांना हसविण्याकरिता ती आणली नाही पण क्रमाक्रमानेच आली असूनही त्यांत अनपेक्षितपणामुळे मनास जो चमत्कार वाटतो तो आहे.

मुले या गोष्टीतील विनोदात्मक बाजू खरोखर बाल्यसहज अशा निर्व्याजतेनेच अनुभवतात. त्यामुळे या विनोदात काहीही दूषितपणा नसतो. उलट मोठ्या मंडळीनी कृत्रिमपणे उत्पन्न केलेल्या दूषित वातावरणांतून मुलांना जरा मोकळेपणा मिळतो. दाबांतून जरा मुक्ती मिळते. तेव्हा अशा प्रकारचा विनोद करू देण्यात हरकत नाही. एवढेच नव्हे तर तो मुलांच्या निकोप विकासास लाभकारक आहे. सुधारलेल्या कल्पनांच्या नावाने सुधारलेल्या समाजात जे मनावर दडपण घालण्यात येते, त्यातून त्यांना जरा मन हलके करण्यास अवकाश मिळतो. म्हणून अशा गोष्टी चूप चूप (Hush Hush) करण्याऐवजी मोकळेपणाने होऊ द्याव्या हेच अधिक श्रेयस्कर आहे.

याचा अर्थ असा नाही की अशा प्रकारच्या गोष्टींना उत्तेजन द्यावे. पण स्वाभाविकपणे मुले जर बोलली किंवा गोष्टीत उल्लेख आला तर त्यात काही विशेष आहे असे न दाखवता सहजपणे त्या होऊन जाऊ द्याव्या.

इतकेच लक्षात ठेवावे की ग्राम्य गोष्टीत अश्लीलता येऊ देऊ नये. ग्राम्यता व अश्लीलता यांच्यामध्ये फार थोडा फरक आहे. मध्ये एक बारीकसा पडदा आहे. त्यामुळे ग्राम्यातून अश्लीलतेत लगेच प्रवेश होतो. अश्लीलता ही जातीय भावनांची (Sex Emotions) विकृत (Perverted) अवस्था आहे. मुलांच्या गोष्टी ग्राम्यही असतात व कधी कधी अश्लीलही असतात. तरी आपण या दोन्ही ओळखण्यास शिकले पाहिजे व विकृत गोष्टींना योग्य उपायाने काढून टाकल्या पाहिजेत. आपल्यास ग्राम्य पण मुलांस सहज व स्वाभाविक लागणाऱ्या गोष्टी निर्दोषपणे चालू दिल्या पाहिजेत. पुष्कळदा निर्दोष गोष्टी दाबण्यानेच सदोष वृत्तींचा जन्म होत असतो हे लक्षात ठेवले पाहिजे.

आजीबाईच्या गोष्टीत हगण्यापादण्याच्या गोष्टी येतात ते एक त्यांचे निर्दोष व सहज अंग आहे. त्यात बालमनास शोभेल अशी स्वाभाविकता आहे व निर्व्याजता आहे. मुलांना पुढे ठेवूनच गोष्टी बनल्या असल्याने, मुलांच्या जगातल्या सर्व गोष्टी सहजपणे या गोष्टीतही गोवल्या गेल्या आहेत. त्या मोठ्या मंडळींनी तितक्याच सरळपणे लाजत लाजत किंवा आचके खात नव्हे, तर सहजपणे सांगितल्या असता त्या आहेत तशा निर्दोष राहातील व बालकांस निर्दोष आनंद व गंमत मिळेल. त्यामध्ये मोठेपणाच्या निराळ्या विचार साहचर्याचा गंधही असू नये म्हणजे झाले.

आजकालच्या मंडळीस हे फार कठीण जाते. आमच्या लहानपणी आमचे पणजोबा आम्हाला पादासंबंधी ‘उत्तमे पादे…. मध्यमे’ हा संस्कृत श्लोकाचा पूर्वार्ध म्हणून दाखवीत व त्याचा अर्थ सांगत खूप हसवीत, तसे आजचे आजोबा किंवा पिता, आजीबाई किंवा माता फार थोड्या करू शकतील. कारण आपल्या मनावर सुधारलेल्या म्हणून समजल्या गेलेल्या कल्पनांचे आवरण पडलेले आहे. तरी यासंबंधीचे विचार आपण जितक्या मोकळेपणाने करू, आपले स्वतःचे मानस जितक्या उघडपणे तपासू तितके आपल्या बालकांच्या जीवनातील दडपण आपण कमी करू शकू यात शंका नाही.  

(शिक्षण पत्रिका, वर्ष २, अंक ५, ऑक्टोबर १९३४)

Leave a comment

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.