“आमचा मुलगा इतके दिवस शाळेत येतो आहे. पण त्या मानाने त्याच्यात काहीच प्रगती दिसत नाही. पाच वर्षाचा पुरा झाला तरी अद्याप अडखळत वाचतो.”
“अहो तो चित्र खूप काढतो. सध्या त्याचे लक्ष चित्रांकडे विशेष आहे. म्हणून लिहिण्या वाचण्यात जरा मागे दिसतो. लिहिण्या वाचण्यात जाईल पुढे तो. काळजी करण्यासारखे नाही.”
“अहो चित्रे तर घरी सुद्धा काढीत असतो. पण ही सारा वेळ चित्रे काढण्याने काय फायदा? काही लिहिणे वाचणे गणित वगैरे अभ्यासाला लागलं पाहिजे की नाही त्याने आता? इतके दिवस तो लहान होता तोपर्यंत ठीक झाले.”
“पण आता चित्रांमध्ये त्याला किती गोडी आहे? तो काहीच करीत नसता तर मला सुद्धा काळजी वाटली असती. पण तो चित्रात अगदी तल्लीन असतो आणि नव्या नव्या कल्पना काढीत असतो की.”
“पण त्याला शिकणं म्हणता येईल का? लिहिणं वाचणं नको का यायला?”
“येईल की? दोन महिने उशिरा आलं म्हणून बिघडलं कुठे?”
या प्रकारचे आमचे पालकांशी अनेकदा संवाद होत असतात. शाळा पाहायला येणारी मंडळी ही पुष्कळदा म्हणतात की येथे चित्रांवर विशेष भर दिसतो. पुष्कळशी मुले चित्र काढतांनाच दिसतात.
बालजीवनात चित्रांचे स्थान काय आहे व बाल शिक्षणात त्याचे महत्त्व काय आहे हे अधिक स्पष्ट होण्याची जरूर दिसते. काहीजण बोलतात आणि काही बोलत नसतील तरी बऱ्याच आई-बाबांच्या मनात हीच शंका उद्भवत असेल असे वाटते. त्यामुळे आमच्या शाळेत आम्ही चित्रांचे काय महत्त्व समजवतो ते या लेखांत नमूद करण्याचा विचार आहे.
पहिली गोष्ट ही की, सुमारे चार सव्वाचार वर्षाच्या वयास, मूल प्राथमिक इंद्रियविकासक खेळांतून आकार, रूप, रंग वगैरे संबंधीच्या स्वतःच्या कल्पना पक्क्या करून पुढे जाऊ इच्छिते. त्यावेळी आम्ही आकारांची पुढील कक्षा म्हणून त्यांच्यापुढे निरनिराळे अक्षरांचे आकार ठेवतो व त्याचबरोबर काही भौमितिक आकाराच्या मदतीने चित्रकामाची सुरुवात करतो.
भौमितिक आकारांवरून बोटे फिरवून आकाराची कल्पना पक्की करण्याची सवय असतेच. त्यामुळे अक्षरांच्या आकारावरून बोटे फिरवून आकार ग्रहण करणे त्यांना मनोरंजक वाटत असते, व अमुक आकारास अमुक उच्चाराचे नाव आहे हे लक्षात राहावयाचे म्हणजे अक्षरे वाचता येण्याचे पूर्वीच लेखनाची सुरुवात होत असते. आकाराप्रमाणे बोटे फिरवण्यास सुरुवात होते याचाच अर्थ लेखनाची सुरुवात.
परंतु लिहिण्यास नुकते आकार लक्षात राहून काम भागत नाही. हातात पेन्सिल अथवा टाक अथवा खडू काहीतरी घेऊन त्याच्या मदतीने कागदावर अथवा पाटीवर तो आकार काढता आला पाहिजे. पेन्सिल घेऊन तीन बोटांच्या स्नायूंच्या बारीक बारीक हालचालींच्या योगे पेन्सिलीचा उपयोग करता आला पाहिजे. बालकांचे बाबतीत ह्या सूक्ष्म हालचाली त्यांना शिकावयास हव्या असतात. जसे चालणे हिंडणे, फिरणे, ठेवणे, उचलणे वगैरे अनेक क्रिया मुलांना दाखविण्यात येतात व त्या स्नायूंवर ताबा मिळवून त्या उत्तम रीतीने सफाईने करण्यास शिकण्याची संधी देण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे या बोटांच्या स्नायूंचेही आहे. हातात पेन्सिल धरून ती वेडीवाकडी वाटेल तशी नव्हे तर आपल्याला हवी तशीच बरोबर फिरवता येण्यास बालकांना त्याची तालीम मिळावी लागते.
याच हेतूने त्यांना या सुमारास कागद आकृती व पेन्सिल देण्यात येतात व लोखंडी आकृतीच्या मदतीने सफाईदार आकृती काढून तिच्यात सुट्ट्या हाताने आडव्या उभ्या तिरप्या रेघा काढण्याचे दाखविण्यात येते.
बहुतेक मुलांना हे चित्रकाम आवडते व त्यात ती खूप रंगून गेलेली दिसतात. त्यामुळेच सहजगत्या पाहता शिशुवर्ग मोठा व बालवर्ग या वर्गातून पुष्कळशी मुले पुष्कळ वेळ पर्यंत चित्रकाम करीत असलेली दिसून येतात.
अर्थात त्यावेळी खरे पाहिले असतांना चित्रकाम करीत नसून लेखनच शिकत असतात असे म्हटले पाहिजे. तीन बोटात पेन्सिल धरून ती आपल्याला हवी तशी वळविण्यास ती शिकत असतात.
तेव्हा शाळेत चित्रकामास फार महत्त्व आहे व लेखन वाचण्यास कमी आहे अशी प्रथम दर्शनी छाप पडली तरी ती चुकीची आहे हे सहज लक्षात येईल.
प्रथम सुरुवातीस लेखनाची पूर्वतयारी रूपे जरी चित्रकाम सुरू होत असले तरी ती चित्रकामांचीही सुरुवात असतेच. त्या योगाने हातात पेन्सिल घेऊन तिच्या मदतीने कागदावर निरनिराळे आकार काढण्याची शक्ती मुलांच्यात येतच असते. त्यामुळे याच कामांतून चित्रकामही जन्म पावत असते. तयार होत असलेल्या हाताचा उपयोग काही लेखनाकडे करतात, तर काही चित्रे काढण्याकडे करतात, याप्रमाणे या सुमारास आमच्या येथे लेखक व चित्रकार असे दोन वर्ग पडतात. अर्थात काहींचे वळण दोन्हीकडेही असते.
याचा अर्थ आम्ही असा समजत नाही की आता जे चित्रकार दिसून येतात ते पुढे महान चित्रकारच होणार आहेत. परंतु सध्या तरी त्यांना लेखनापेक्षा चित्रे काढणे अधिक पसंत असते व पुढेपर्यंत चित्रकामाकडचा कल कायम राहण्याचा संभवही त्यात दिसून येतो.
अशाप्रकारे प्रारंभ झाल्यावर काही दिवसांनी मुलांची अक्षरे पुरी होतात व लिहिण्यासाठी हातही तयार होत असतो. म्हणजे लेखन वाचनाची तयारी होते.
लिहिणे वाचणे येऊ लागल्यावरही वर म्हटल्याप्रमाणे काही मुले चित्रकामात विशेष रंगतात व काही लेखन वाचनात विशेष रंगतात असे दिसून येते.
याचे कारण काय?
माझ्या मते या वयात लेखन वाचनाचे मोठ्यांच्या दृष्टीने जे महत्त्व आहे ते बालकास नसते. त्यांना ज्ञानपिपासा अत्यंत तीव्र असते. त्याचप्रमाणे आपल्या मनातील विचार व भावना व्यक्त करण्याचीही तितकीच तीव्र जरूर असते. ज्ञान मिळवण्यास व स्वतःचे विचार व भावना व्यक्त करण्यास त्यांना साधन हवे असते.
भाषा हे एक साधन त्यांना मिळालेले असते. तथापि काहींना शब्दापेक्षा प्रत्यक्ष आकार, रंग वगैरे अधिक हृदयस्पर्शी वाटते. त्यांच्या जिवाला मांजर अथवा पोपट हे शब्द म्हणून अथवा लिहून किंवा वाचून फारसे समाधान होत नाही. त्यांनी पोपट पाहिला असला व त्याचे पुन्हा पुन्हा स्मरण करून पोपटासंबंधीची कल्पना दृढ करावयाची असली तरी ती पोपटाचा धडा वाचण्याऐवजी पुन्हा पुन्हा पोपटाचे चित्र पाहणे अधिक पसंत करतात. पोपटाची चोच लाल आहे व पंख हिरवे आहेत असे लिहिण्यापेक्षा लाल चोच व हिरवा पक्षी चित्रण्यात त्यांच्या मनात अधिक संतोष होतो. कदाचित या दोन माणसांत असा फरक असेल की, एकाचा स्वतःच्या कल्पनाशक्तीवर जास्त आधार असेल, नुसते मन:चक्षूंसमोर चित्र उभे झाल्याने त्यांना समाधान होत असेल तर दुसऱ्यांना ते चित्र प्रत्यक्ष चर्मचक्षूंसमोर उभे झाल्यावाचून चैन पडत नसेल, किंवा भाषाप्रधान बालकास शब्दांचीच गोडी इतकी वाटत असेल की पोपटाचे चित्र मनःचक्षूंसमोरही अस्पष्ट असले तरी चालत असेल. लेखकांमध्ये हा फरक आपणास नेहमी दिसतो की काही लेखक शब्दांच्या साहाय्याने तादृश्य आपल्यापुढे उभे करतात म्हणजे कल्पना चक्षूंसमोर ते स्वतःची ती गोष्ट प्रत्यक्षच पाहात असतात. त्यामुळेच ‘शब्दचित्र’ हा शब्दप्रयोग भाषेत रूढ झाला. हे लेखक जरी शब्दांच्या साहाय्याने व्यक्त करीत असतात तरी ते रंगरूपच पाहत असतात व दाखवीत असतात.
याच्या उलट काही चित्रकारही असे असतात की रेखा व रंगछायेच्या मदतीने तादृश्य चित्र आपल्यापुढे उभे करण्याऐवजी काही विचार, काही तत्वे, काही भाव वगैरे प्रत्यक्ष चित्रांपेक्षा काही विशेषच – काही निराळेच काढत असतात.
या विषयात येथे फार खोल शिरण्याचे येथे स्थान नाही परंतु या उदाहरणावरून इतके स्पष्ट होईल की मनुष्याचा याबाबतीत निरनिराळा कल असतो. काहींना भाषा हे साधन अधिक जुळते, काहींना चित्र अधिक साधतात, काहींना भाषेच्या मदतीस चित्र हवी असतात. काहींना चित्रांच्या मदतीस भाषा हवी असते. काही चित्रांचे द्वारा भाषेने करावयाचे काम करतात तर काही शब्दांचे द्वारा चित्राने करायचे काम करतात.
या प्रकारचा मनुष्या मनुष्या मध्ये फरक असतो व तो न स्वीकारता फक्त लेखन वाचन यांसच ज्ञानार्जनाचे साधन म्हणून स्थापण्यात आपली मोठी चूक होते.
दुसरी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की चित्रांचे मार्फत बालक आपले ज्ञान पक्के करण्याचेही काम करीत असते.
येथे एका चित्राचे उदाहरण घेऊ. एक बालक जवळजवळ साडेतीन वर्षाच्या वयात पेन्सिल घेऊन कागदावर नुसते गोल गोल वर्तुळे काढू लागले. त्यावेळी त्याच्या या कृत्याचा अर्थ लक्षात आला नाही. रोजच्या रोज वर्तुळे दिसत. काही दिवसांनी या वर्तुळाची आगगाडीची चाके म्हणून उपयोग होऊ लागला. हळूहळू त्याच्या आगगाडीला डबे दिसू लागले. इंजिन आले, डब्यात माणसे दिसू लागली. इंजिनचे मागे कोळसे दिसू लागले.रूळ, लाल रंगाचे सिग्नल वगैरे पुष्कळ तपशील दिसू लागले.
दीड वर्षांनी त्या आगगाडी विषयीच्या स्वतःच्या कल्पनेत म्हणजेच ज्ञानात किती भर पडली ते या चित्रमालेवरून दिसून येते. त्याने जवळजवळ 100 चित्रे काढली. त्यात पहिल्या चित्रात नुसती वेडीवाकडी वर्तुळे होती. शेवट-शेवटच्या चित्रात इंजिन ड्रायव्हर, धूर, सिग्नल, आकाश, ढग, पक्षी, विमान, विमानातून आगगाडीवर पडणारे बॉम्ब, आगगाडीच्या खिडक्या, आतील माणसे, नदीच्या पुलावरील गाडी वगैरे अनेकानेक गोष्टी दिसून येतात.
या बालकाचे अवलोकन अजब वाटते. चित्रे काढून तो अस्पष्ट अशा कल्पना कशा स्पष्ट करीत गेला ते पाहून कोणालाही खात्री पटेल की या मुलाने चित्र कामात वेळ व्यर्थ घालविला नसून ज्ञानार्जनाचे काम केले आहे.
थोडक्यात म्हणजे ज्ञानार्जनाचे व आत्माविष्कारणाचे साधन म्हणून एक लेखन वाचनच न समजता चित्रकलेसही ते स्थान द्यावयास हवे. शब्द हे चिन्ह आहे. या चिन्हांच्या साहाय्याने मूळ वस्तूची कल्पना घ्यावयाची असते. मांजर म्हणा, बिलाडी म्हणा, कॅट म्हणा – या अक्षर समुच्चयाने दर्शवलेली वस्तू लक्षात घ्यावयाची असते, मांजर या अक्षरांत काहीच खुबी अथवा जादू नाही. त्यात मुलांना आवडण्या नावडण्यासारखे काही नाही. पण मांजर मुलांना आवडत असते अथवा कोणाला नावडत असते. सारांश, भाषेच्या मागे जग आहे, त्याचा परिचय बालकास करावयाचा असतो. तो मांजर या तीन अक्षरांपेक्षा मांजराच्या चित्राने केव्हाही अधिक होईल व चित्रांपेक्षा प्रत्यक्ष मांजर पाहून त्याहून अधिक होईल. पण सोयीचे दृष्टीने प्रत्यक्षापेक्षा नमुना चांगला, नमुन्यापेक्षा चित्र चांगले व चित्रापेक्षा शब्द चांगला. परंतु बालकांपुढेही हाच क्रम असावयास हवा.
शब्दभाषा व चित्रभाषा या दोहोंमध्ये तुलना करावयाची असल्यास शब्दभाषा देश देश, प्रांता प्रांताप्रमाणे निराळी असते. परंतु चित्रभाषा सर्वदेशीय आहे. या दृष्टीने मुलांना ती अधिक पसंत असल्यास त्यात काहीच वावगे नाही.
सारांश, चित्र हे ज्ञानार्जनाचे सुंदर साधन आहे. व पाच सहा वर्षाच्या वयाच्या बालकांनी चित्र काढणे अधिक पसंत केले व वाचनापेक्षा चित्र पाहणे पसंत केले तर त्यात पालकांस अथवा शिक्षकांस चिंता करण्याचे काहीच कारण नाही.
चिंता वाटते त्याचे कारण आपली शिक्षणासंबंधीची कल्पना फार संकुचित आहे. मुलांच्यामध्ये ज्ञानतृष्णा आहे की नाही, ज्ञानार्जनाच्या मागे मेहनत घेण्याची त्यांच्यात इच्छा आहे की नाही, विचार व भाव व्यक्त करण्यास त्यांचेजवळ साधन आहे की नाही, हे पाहून ते नसल्यास चिंता करावयास हवी. त्याऐवजी मूल अद्याप लिहीत का नाही, अजून पाढे कसे येत नाहीत या प्रकारची वृथा चिंता पालक करीत असतात.
बालकाचा सर्वांगीण अस्खलित विकास म्हणजे काय ते समजून घेण्याचे आता किती दिवस टाळून चालेल? ‘जुने ते सोने’ ही विचारसरणी बालक शिक्षणाचे क्षेत्रात किती दिवस राहणार कोण जाणे!
(शिक्षण पत्रिका, वर्ष ७, अंक १०, मार्च १९४०)

Leave a comment