लक्ष्मी स्वतःच्या वस्तू जपून ठेवण्यात फारच दक्ष. वयाने केवळ चार वर्षाची मुलगी. अन् दिसायला तर
त्याहीपेक्षा आणखी लहान. दुसऱ्या तिच्या इतर अवतारावरून तिला फार बुद्धिवान नाही म्हणता यायचे; पण
स्वत:च्या वस्तू जीव की प्राणासारख्या वापरण्यात तिच्या बुद्धीची कुशाग्रता विशेष दिसून यायची. आपली वस्तू
ती कुठे कधी विसरायची नाही. आपल्या वस्तूला कधी हात देखील ती दुसऱ्याला लावू द्यायची नाही. ह्या तिच्या
दक्षतेबद्दल मला पण तिचे किती वेळा कौतुक वाटायचे !

परंतु हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले की लक्ष्मी स्वत:च्या वस्तूंचा जितका काळजीपूर्वक संभाळ करते
तितकीच ती दुसऱ्याच्या वस्तूबद्दल अगदी बेदरकार आहे. एवढेच नव्हे, तर संधी सापडली की ती दुसऱ्यांच्या
वस्तू पुरेपूर वापरून घेते आणि पुन्हा नेमक्या इतस्ततः फेकून देते. एकदा एक दुसऱ्याचा कंगवा तिच्या हाती
लागला. तिने घेतला. आपले त्याने केस विंचरले अन नेमका बेदरकारपणे फेकून दिला! मला खूप खेद वाटला.
ह्या सर्व प्रकारामुळे मला एरवी वाटत असलेल्या तिच्या गुणांची किंमत पुष्कळ कमी झाली. वस्तू जपून
ठेवण्याचा उपजत गुण तिच्याजवळ नव्हता. इतक्या कोवळ्या वयात समाजाच्या ‘हे आपले अन हे परक्याचे’ ह्या
वृत्तीला ती एक बळी पडली होती, हे पाहून माझे मन अधिकच विच्छिन्न झाले. मोठ्या मुलांची तर असली किती
तरी उदाहरणे पाहिलेली. पण किती लहान वयात ह्या सामाजिक रोगाने त्या बालमनालाही पछाडले म्हणावे ?
रोग खरे पाहिले तर आपल्यापासून उत्पन्न झालेला आणि त्याकरिता जबाबदार देखील आपणच आणि म्हणून
आपण त्यासंबंधी अधिक विचार करून त्याचे संस्कार आपल्या मनावर दृढ करून घ्यायला हवे आहेत.
गृहस्थाश्रम स्वीकारून बसलेल्या संस्कारिकांना तर त्याची विशेषच जरूर आहे. संसाराचा त्याग करून फिरणाऱ्या
बुवा बैराग्यांचे ठीक आहे, त्यांना हा विचार करावा लागत नाही. तसेच घरीदारी ‘वसुधैव कुटुंबकम्’ असली वृत्ती
झाली आहे, असल्या विभूति पुरुषांचेदेखील ठीक आहे. कारण त्यांनी हे आपले आणि हे दुसऱ्याचे ह्यावर विचार
करण्याची पंचाईतच नसते. ही पंचाईत असते एक संसारिक सामान्य माणसालाच. कारण कुटुंब हे एका अर्थी
स्वत:चे आणि एका अर्थी सामाजिक देखील आहे, आणि एवढ्या पुरते संसारिक माणसाला स्वत:चे आणि
दुसऱ्याचे ह्यातील भेदाभेदाचा विचार करणे अवश्य आहे.

सामान्य संसारिक मनुष्याकडे पाहिले तर तो ह्या प्रश्नाचा मोठा विचार करून घोटाळ्यात पडून गेला आहे असे
दिसत नाही. प्रचलित मान्यता अशी दिसते की सर्वांनी आपापला स्वार्थ साधावा म्हणजे सर्वांचाच स्वार्थ साधू
शकतो. ज्याने त्याने आपापल्या हितार्थ झटले म्हणजे सर्वांच्याच हिताचे रक्षण होते. मार्ग उत्तम आहे, सोपा आहे.
प्रत्येकजण जर स्वत:चे हितच साधू लागला तर समाज सेवकांना समाजसेवाही करायला उरणार नाही. कारण जो
तो आपले हित साधू लागल्यानंतर त्यांनी हित साधाचे कुणाचे ! जो तो स्वतःचे हित साधून पुढे पाऊल टाकायला
तयार, पण ‘आपापले हित साधावे’ ‘आपापले संभाळावे’ ह्याचा किती संकुचित आणि विलक्षण आपण अर्थ करून
ठेवला आहे !

‘ज्याने त्याने स्वार्थ साधावा’ म्हटले तरी दोन प्रश्न उत्पन्न होतात. स्वार्थ साधावा खरे, पण स्वार्थ म्हणजे काय? हा एक, आणि स्वार्थ साधीत असता दुसऱ्याच्या अर्थाप्रत बुद्धी कशी असावी हा दुसरा.

स्वार्थ अथवा स्वत:चे हित साधणे म्हणजे फक्त स्थूल स्वार्थच साधण्याच्या खटपटीत आपण पडलेलो दिसत
आहो. स्वतःचे खरे हित, स्वतःचे अंतिम हित आणि हित-सर्वस्व कशात त्याचा विवेक सुटून त्याचा संकुचित अर्थ करीत गेल्यामुळेच पुष्कळांना संसाराबाबत एक प्रकारचा विराग आणि कंटाळा उत्पन्न झाला आहे. संसार म्हणजे
संकुचित स्वार्थ, संसार म्हणजे माया जंजाळ असा अर्थ होऊन बसला आहे.

त्याच बरोबर स्वतःचा स्वार्थ साधावा म्हणजे दुसऱ्यांच्या अर्थांतून अधिक अधिक ओढून स्वत:चा स्वार्थ साधणारा
तो अधिक शहाणा, व्यवहारी अथवा संसारकुशल गणला जात आहे. दुसऱ्याचे प्रत्यक्ष ओढणे शक्य न झाल्याने
देखील व्यवहार संसारिकापाशी कमीत कमी इतकी तर अपेक्षा करतोच की दुसऱ्यांच्या अर्थात बेदरकारी, निदान
स्वतःच्या अर्थातून दुसरा काही ओढून न नेवो इतकी खबरदारी ठेवणे इतके स्वार्थाचे रक्षण. अर्थात याचा दधाने
अर्थ असा होतो की दुसऱ्याविषयी अविश्वास आणि असहानुभूती हे तर खरेच.

आजचा आपला सर्व व्यवहार ह्या तत्त्वावर चाललेला आहे. अर्थात आपली बालके त्यापासून अलिप्त कशी राहू
शकणार ? जीवनाचे शिक्षण मिळवीत नाहीत, ते त्यांना आपल्या आसपासच्या वातावरणांतून मिळत असते. शाळेत
शिकूनही व्यवहारांत ज्याला उमज येत नाही त्याला आपण म्हणतोच ना की ‘पढला पण कढला नाही’ म्हणून.
ह्याच कारणामुळे आपला फायदा दुसऱ्याला शक्य तो कमीत कमी देऊन जो दुसऱ्यापासून जास्तीतजास्त काढू
शकेल त्याच्या कलेलाच आपण संसाराची कला म्हणू लागलो आहोत.

आपण ह्याच संसारात राहतो, ह्याच संसाराच्या कलेने आपले जिणे जगतो आहो, आणि त्यामुळे आपल्या
संसारिक कलाकृती पासून “अमानुष” आनंद निर्मित होण्याऐवजी दु:खाची वलयाहून वलये निर्माण करीत आहोत.
संसारांत सुख मिळवण्याऐवजी दुःखाचे कडेच आपणावर कोसळून घेत आहोत.

पण आपले जिणे असे असले तरी आपल्या बालकांच्या हित सर्वस्वासाठी आपण दूर राहायला शिकले पाहिजे.
स्वार्थ म्हणजे खरा परार्थ ह्याप्रमाणे स्वार्थाची सत्यमर्यादा ओळखून संसार शब्दाच्या अर्थाला उंच उंच नेले
पाहिजे. आपणाला संसाराचा खरा अर्थ कळत असला, त्याच्या संबंधीची आपली कल्पना शुद्ध असली तरच
आपण आपल्या बालकांना खरे मार्ग दाखवू शकू.

हे आपले आणि हे दुसऱ्याचे या वृत्तीबाबत आपण खालील नियम नक्की केले पाहिजेत. आपल्या वर्तनाने,
आपल्या मायेने, अंत:करणातील तळमळीने, सुखावरील भावनांच्या छाया प्रकाशनाने आपण त्या नियमानुसार
जीवन पथ आक्रमीत असू तर बालकांना दुसरे शिक्षण देण्याचेच राहात नाही.

१) जेवढे म्हणून आपले, त्याचा योग्य संभाळ व्यवस्था करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याविषयीचा बेफिकीरपणा हे
खरे वैराग्य नसून तो आळस आहे. आपल्याच स्वार्थाचा तसेच आपल्या समाजाचाही तो द्रोह आहे. बेदरकारीमुळे
आपणच समाजाला एक ओझे होऊन बसतो.

२) आपल्या वस्तूंचा काळजीपूर्वक संभाळ करीत असता, दुसऱ्याच्या वस्तूंबद्दल बेदरकार अथवा निष्काळजी
राहण्याची जरूर नसते. जो स्वतःचा स्वार्थ योग्य तऱ्हेने साधतो त्याला दुसऱ्याच्या स्वार्थाबद्दलही मान आणि
आदर असतो. स्वतःवरून दुसऱ्याच्या स्वार्थाची तो किंमत करू शकतो. म्हणूनच तो त्याबद्दल सहानुभूती राखू
शकतो. आपण स्वतः खरा स्वार्थ साधतो आहो किंवा नाही हे तपासून बघायचे असल्यास ही एक सुंदर कसोटी
आहे. आपल्यात दुसऱ्याच्या स्वार्थावद्दल किती अनादर उत्पन्न झाला आहे ह्याची उमज करून घेतल्यास आपण
कुठे आहोत त्याचा खात्रीलायक अंदाज येऊ शकतो.

३) दुसऱ्याचे हित कारणाशिवाय करण्यासाठी धावण्याची जरूरी नाही. त्याने आपलाही स्वार्थ गमावला जातो
आणि दुसऱ्याचा साधू शकत नाहीच.

४) जरूर असेल तेथे दुसऱ्यांकरता येईल तेवढे आपण केलेच पाहिजे. अशा वेळी स्वार्थाचा विचार आड आला तर
आपण स्वार्थ साधनेच्या खऱ्या मार्गामध्ये नाही म्हणून समजावे.

५) कारणाशिवाय दुसऱ्याची मदत घेऊ नये. आणि येथे जरूर असेल तेथे ती घ्यायला कचरू नये अथवा लाजू
नये.

आपल्या कुटुंबातून आणि आपल्या शाळांतून ह्या तत्त्वावर वातावरणा रचना व्हायला पाहिजे. समाज आणि कुटुंब
यांतील आपपर भाव ओळखून स्वत:च्या आचरणांत त्यांचे प्रतिबिंब उमटवणे हे संसारिकांचे कर्तव्य आहे.
स्वार्थासंबंधीच्या चुकीच्या भावनेवर संसाराची उभारणी केल्याने संसारात अनेक दुःखे उत्पन्न होतात व त्यांना
उपाय म्हणून समाजसेवा करण्यासाठी परोपकारी संस्था व समाजसेवक यांची जरूरी उत्पन्न होते. परंतु त्या
सेवाकार्याने संसारिकांचे कायमचे हित साधले जात नाही ते नाहीच. कारण कीड मुळात लागलेली असते व उपाय
वरवर होत असतात. परोपकारी व्यक्ती ह्या आज रुग्णालयाचे काम करतात. परंतु रोगप्रतिबंधाचे संसारिक काम
आपले व परक्याचे अथवा स्वार्थ व परार्थ या संबंधीची योग्य दृष्टि आणि योग्य वागणूक त्यांच्यामध्ये रूढ
झाली, योग्य वागणुकीचा नुसता दंभ नव्हे तर मनाची तळमळ आली, तरच हा रोग नष्ट होणे शक्य आहे. गोष्टी
लहान असतात. मुले अशा प्रकारचा संकुचित स्वार्थ दाखवितात तेव्हा आपण उलट त्यांचे कौतुकही करतो. परंतु
समाजाच्या एक भयंकर रोगाचे ते लक्षण आहे हे आपल्या लक्षात येत नाही.

रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग न होऊ देण्याची तजवीज करणे केव्हाही अधिक श्रेयस्कर आहे.

(शिक्षण पत्रिका, वर्ष ३, अंक १, जून १९३५)

4 responses to “हे आपले अन हे दुसऱ्याचे”

  1. Uday Kedar Avatar
    Uday Kedar

    Thanks to Team QUEST… आपल्यामुळे इतका अमूल्य ठेवा जपला जातोय. Keep it up. Hats off to you Guys.

    Liked by 1 person

  2. Arun Singh Bais Avatar
    Arun Singh Bais

    keep sharing please

    Liked by 1 person

    1. संतोष लुले Avatar
      संतोष लुले

      छान उपक्रम आहे पद्मभूषण ताराबाई मोडक यांचे कार्य सर्वांना परिचित होत आहे

      Like

  3. मारुती माळी Avatar
    मारुती माळी

    सदर लेख हा आजच्या सामाजिक रोगग्रस्त परिस्थितीचा वेध घेऊन वाचणा-या प्रत्येक सामाजिक व्यक्तीला भान निर्माण करून देतो. विवेक संपन्न समाज निर्माण करणारा व घरातील समस्या पडताळून बघण्यास मदत करणारे विचार यात आहेत.आज हे विचारप्रवर्तक आवर्तन आवश्यक आहे.

    मारुती माळी सांगली.

    Liked by 1 person

Leave a reply to संतोष लुले Cancel reply

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.