एक चार वर्षाची मुलगी दुपारचे वेळी आपले घरी आपल्या पेन्सिली कागद घेऊन चित्र काढण्यात गढली
होती. दिसण्यात वेड्यावाकड्या रेघोट्या दिसत होत्या. अशी काही बरीचशी चित्रे बराच वेळ काढल्यावर एक
चित्र तिच्या मनाजोगते निघालेले दिसले; कारण तिच्या चेहऱ्यावर मनाजोगे निर्माण केल्याचा संतोष व
आनंद दिसत होता.

ते चित्र घेऊन ती आपल्या आईकडे गेली व तिला सांगू लागली “हे बघ आई. तुला वाटेल की हे हिरवे
गवत आहे, पण ते पाणी आहे बरं का !” आईला पाहून मजा वाटली. पण बसलेल्या इतरांना या
बोलण्याचा अर्थ कळला नाही.

मुलीच्या आईने त्यांना तो समजावून सांगितला. “आम्ही मागच्या महिन्यात कलकत्त्याकडे प्रवासास गेलो
होतो. नुकताच पावसाळा संपला असल्याने तेथे जिकडे तिकडे लहान लहान तळी दिसत असत. कित्येकाचे
पाणी स्पष्ट दिसायचे. कित्येकात कमळे असायची, व कित्येक शेवाळ्यांनी हिरवी गार दिसत. आम्ही
दक्षिणेश्वरास गेलो तेथे असे एक हिरवेगार तळे होते. पाणी मुळीच दिसत नव्हते. आमची वना म्हणाली
की “ते पहा शेत!” मी म्हटले, “ते शेत नाही तळे आहे.” ती म्हणे “नाही गवत आहे. शेत आहे.” तशी मी
काठाशी जाऊन एक लहानसा दगड आत फेकला नी त्यामुळे पाणी उडाले. ते पाहून तिने चारी बाजूने
फिरून दगड टाकून पाहिले व आपली खात्री करून घेतली की गवत नव्हते पण पाणीच होते. आज बऱ्याच
वेळापासून चित्र काढणे चालणे आहे. शेवटी त्या तळ्याचे चित्र मला वाटते तिच्या मनाजोगे निघालेले
दिसते. तेव्हा आता मला समजावते आहे की ते गवत आहे असे तुला वाटेल पण ते खरोखरच पाणी आहे.”

आम्हाला ती हकीकत ऐकून मजा वाटली व त्याबरोबरच विचार आले की बालक चित्र काढीत असते ते
आपल्यालाच काही कल्पना स्पष्ट करण्यासाठी अथवा प्रगट करण्यासाठी, हे अगदी खरे. या मुलीस शाळेत
बसवून काठी, पेन्सिल, चेंडू व भोवऱ्यांची चित्र काढायला लावली असती तर तिने या तळ्याचे स्वत:
नजरेने पाहिलेले दृश्य आपल्या डोळ्यांपुढे उभे करण्याचा आनंद तिला मिळाला असता का ? दिसायला
गवतासारखे दिसत असून आत पाणी असू शकते हा जो सृष्टीचा एक आश्चर्यजनक असा नवाच परिचय
तिला मिळाला तो मनामध्ये वारंवार आणून चित्ररूपाने पक्का करण्याची संधी तिला मिळाली असती का?

One response to “हे पाणी आहे हो!”

  1. Vijaysheela sardesai Avatar
    Vijaysheela sardesai

    an insightful example of an experiential learning.

    Like

Leave a reply to Vijaysheela sardesai Cancel reply

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.