बालकांस गोष्ट सांगताना खालील नियम ध्यानात ठेवण्यासारखे आहेत.

हे करू नका.

  1. वर्गातील प्रत्येक मुलांने गोष्ट ऐकलीच पाहिजे असा आग्रह धरू नका. (ज्यांची इच्छा असेल त्यांनीच गोष्ट ऐकण्यास यावे व बाकीच्यांनी दुसऱ्यांना गडबड होणार नाही असा वाटेल तो उद्योग करावा, असा नियम ठेवावा.)
  2. गोष्ट सांगून झाल्यावर मुलांकडून गोष्ट सांगवून घेऊ नका.
  3. मुलांना गोष्टीचे सार समजावून सांगू नका.
  4. मुलांना गोष्टीचे सार अथवा तात्पर्य विचारू नका.
  5. मुलांना केव्हाही “तुला किती गोष्टी येतात? सांग पाहू ती अमकी,” म्हणून गोष्टी सांगायला लावू नका.
  6. गोष्टीच्या मध्ये मध्ये  माहिती व ज्ञान देण्यास थांबून गोष्टीच्या प्रवाहात व्यत्यय आणू नका. अस्खलित प्रवाह चालू द्या.
  7. गोष्टींना चित्रांची जोड आवश्य आहे असे समजू नका. बहुदा अशा दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी मध्ये आणण्याने रसहानीच होते. (गोष्ट चांगल्या रीतीने सांगणे म्हणजे गोष्टीच्या प्रसंगाचे उत्तम रीतीने चित्र रेखाटणे होय. म्हणून भाषा, शब्दोच्चार, आवाजाचे Modulation, चेहऱ्यावर भावदर्शक व अभिनय यांच्या मदतीने उत्तम चित्र उभे करणे हे तुमचे काम आहे. त्याला रंगाच्या कुंचल्यांची जरुर नाही. दुसरे असे की गोष्टींची चित्रे बहुत करून तुमचे चित्र उठवून दाखवण्याऐवजी तिचे काहीतरी विचित्र चित्र दाखवणारीच असतील.)
  8. गोष्टीस अभ्यासाचा विषय म्हणजे ज्ञान अथवा  माहिती देणारा विषय समजू नका.
  9. गोष्टीच्या तासास नीती शिक्षणाचा तास समजू नका.
  10. गोष्टीच्या तासास भाषा शिक्षणाचा तास समजू नका.

हे जरूर करा.

  1. मुलांच्या वयोमानाप्रमाणे गोष्टींची पसंती करा.
  2. गोष्टीच्या रसाशी तन्मय होऊन गोष्ट सांगा.
  3. गोष्टीचा प्रवाह असा अस्खलित व जोराचा चालू द्या की तुमचे श्रोते स्वत:स विसरून गोष्टीशी समरस होतील.
  4. मुलांना तुमचे जवळ बोलावून त्यांना वर्गाच्या कडक शिस्तीतून  बाहेर निघून  मोकळेपणाने बसू द्या. साधारणपणे सर्वांना ऐकू येईल, सर्वांना दिसेल व लहानांच्या आड मोठी येणार नाहीत एवढे पहावे. तेवढ्या वेळेपुरते आपण शिक्षक आहोत व ही शाळा आहे ही गोष्ट विसरून आपण आजोबा किंवा आजीबाई आहोत व ही पोरं आपल्याकडून गोष्ट सांगवून घेत आहेत असे मोकळे घरगुती वातावरण आपल्या व मुलांच्या मनांत उत्पन्न करावे.
  5. एखादा अभिनयपटू नट जसा आपल्या अभिनयाने अर्धाअधिक भाव श्रोत्यांच्या मनावर ठसवत असतो तसेच गोष्ट सांगताना अभिनयाची योग्य ती मदत घ्या.
  6. मुलांपैकी कोणाला गोष्ट सांगण्याची हौस उत्पन्न झाली तर त्याला गोष्ट सांगू द्या व तुम्ही ऐकावयास बसा.
  7. मुलांना एकच गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकायची इच्छा असेल तोपर्यंत तीच ती जुनी गोष्ट सांगितली असता पुन्हा मुलं आवडीने ऐकतात. म्हणून जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगा.
  8. नवीन नवीन व निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी सांगून पहा. त्यांतील ज्या बालप्रिय होतील त्या पुन्हा पुन्हा सांगत चला, व बाकीच्या बालप्रिय नाहीत म्हणून सोडून द्या.
  9. एकच गोष्ट पुन्हा सांगताना तुम्हाला त्यांतील प्रसंग अधिक खुलवून सांगता येईल. अथवा मुलांच्या वयाप्रमाणे कमी अधिक सांगता येईल. उदा. चिमणी कावळ्याची गोष्ट लहान मुलांना सांगताना,

एक होती चिमणी

आणि एक होता कावळा

चिमणीचं घर होतं मेणाचं

आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं

एके दिवशी खूप पाऊस आला.

कावळ्याचं घरटं वाहून गेलं.

आणि चिमणीचं तसंच राहिलं.

अशा रीतीने गोष्ट सांगता येते. त्यांना पाच सात वेळा अशी सांगितल्यावर हळू हळू तीच गोष्ट जरा जास्त वर्णन करून सांगता येईल, अथवा तीच गोष्ट जरा मोठ्या मुलांना सांगत असताना काही वर्णने वाढवून सांगता येतील. उदा.-

एक होती चिमणी

नी एक होता कावळा.

चिमणी असे उद्योगी. रोज गवत काड्या घेऊन येई. मग त्याचं केलं छानसं घरटं. मग किनई तिनं आणलं थोडं मेण आणि आपलं घरटं आतून बाहेरून असं छान सारवून घेतलं की घरटं झालं अगदी मजबूत.

कावळ्याने पण घरटं केलं. इकडून तिकडून काड्या आणल्या. दहा-पाच काड्याबिड्या, केलं कसं तरी एक घरटं, आणि दिलं शेणाने सारवून. कावळा आत जायला लागला की असं हालायचं.

एके दिवशी किनई आभाळ आलं. जिकडे तिकडे अंधार झाला. मग लागली वीज चमकायला. चमचम, चमचम, घडीत इकडे उजेड, घडीत तिकडे उजेड, आणि म्हातारी लागली चणे भरडायला. गड गड गड गड, घर घर घर घर. मध्ये मध्ये तर असा काड काड आवाज व्हायचा की जणू मोठ्या तोफा बंदुका सुटताहेत.

आणि सड सड सड सड, पाऊस सुरु झाला. थोड्या वेळांत तर येऊ लागला धो धो धो.

जिकडे तिकडे पाणी पाणी झालं. नी पाण्यात सर्व वाहून जाऊ लागलं.

इकडे चिमणी बसली आपल्या मेणाच्या घरात, आतून दार लावून घेतल. नी एक थेंबभरही पाणी आत आलं नाही.

पण कावळ्याची झाली फजिती. त्याचं घरटं आधीच हालत होतं, नी नुसत्या शेणानी सारवलेलं ! जोराचा वारा आला, ते गेलं मोडून. नी पावसाच्या पाण्यात भिजून गेलं आणि पाण्याबरोबर सगळ गेलं वाहून.

अशा रीतीने कोणत्या मुलांना किती खुलवून गोष्ट सांगायची ते ठरवून तशी सांगता येते.

2 responses to “गोष्ट सांगणाऱ्यांस”

  1. Balkrishna Bokil Avatar

    फारच उतम लेख !

    पालक आणि शिक्षक यांना योग्य मार्गदर्शन !!

    Like

  2. Gopal Gofane Avatar
    Gopal Gofane

    मुलांना गोष्टी सांगताना त्याचे काय नियम असायला हवे कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी गोष्टी निवडताना कोणत्या घ्यायच्या अगदी सगळ्या बाबी स्पष्ट आहेत. यात अजून काही गोष्टीची काळजी घेता येईल शक्य झाल्यास मुलांना गोल करून बसवावे जेणे करून सगळ्या मुलांकडे गोष्ट सांगणाऱ्याचे लक्ष राहील आणि प्रत्येक मुलाकडे बघता येईल. जर गोष्टी सांगण्याचा उद्देश मुलांमध्ये भाषेचा विकास करण्याचा असेल तर गोष्टी सांगितल्या नंतर मुलांसोबत चर्चा सुद्धा केली जाऊ शकते ज्यात सरळ प्रश्न, अनुभव आधारित प्रश्न, कल्पनात्मक प्रश्न आणि काही रचनात्मक चर्चा केली जाऊ शकते.

    Like

Leave a reply to Gopal Gofane Cancel reply

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.