एके दिवशी बालमंदिरात एक ५ वर्षाचा मुलगा भोवरा दोरी घेऊन आला. त्या दिवशी खोलीमध्ये कुठल्याच कामाकडे त्याचे लक्ष लागत नव्हते. जरासे इकडे तिकडे हिडून रावसाहेबाने थोड्याच वेळात आपला भोवरा बाहेर काढला व झपदिशी जमिनीवर फेकला. भोवरा भर भर फिरू लागला. खोलीमधील त्या छोट्या विद्यार्थ्यांस ही एक नवलाची गोष्ट वाटली. भोवरा आणणाऱ्या बालकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती, भोवरा फिरवण्याची क्रिया हस्तगत केल्याचा विजयोत्साह होता. आपला विजय मला दाखवून आपल्या आनंदांत मला वाटेकरी करून घेण्याची त्याची इच्छा होती. आपल्या मित्रांना आपले काम दाखवून त्यांनाही वाटेकरी व सहकारी करण्याची त्याची इच्छा होती.
मला विचार पडला की, आता करावे तरी काय ? ही स्वयंस्फुरित क्रिया आहे, बालक तिच्यापासून प्रसन्नता अनुभविते आहे. खुद्द क्रिया निर्दोष आहे. ही थांबवावी किंवा चालू द्यावी ?
मनांत विचार चालला आहे तो खोलीमध्ये खूप गोंगाट सुरू झाला. भोवऱ्याच्या आसपास १०-१५ मुलांचा प्रेक्षकवर्ग जमा झालेला होता. सर्वांची मुखकमले प्रफुल्लित होती. मधून मधून हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता. सर्वांच्या मध्यभागी छोटा मनोहर उभा राहून आपला भोवऱ्याचा खेळ सर्वांस दाखवित होता. प्रेक्षकवर्गही सहृदयतेने मनोहरच्या विजयोत्सवांत भाग घेऊन मित्रकार्य करीत होता.
मला एका रीतीने त्या बालकांची ती प्रसन्नता पाहून त्यांच्या मध्ये एखाद्या राक्षसासारखे जाऊन त्यांचा विरस करणे बरे वाटेना. दुसऱ्या बाजूने असे वाटू लागले की ह्या माँटेसरी बालमंदिराची ही कामाची खोली. हिला जर आपण खेळायचे मैदान होऊ दिले तर येथे शांतपणे चालणारी बाकीची कामे कशी होऊ शकणार? ती पलीकडे कोपऱ्यात तीन वर्षांची विमल ठिकठाकपणे हात धुवून कपड्याच्या तुकड्यावर हात फिरवण्यास बसली आहे. ही नवीन अडीच वर्षाची मुलगी आठ दहा दिवसांच्या अस्वस्थता व अव्यवस्था यानंतर आजच पहिल्या प्रथम जरा शांत झाली आहे व दट्टयाची पेटी घेऊन जणू काय महत्त्वाचे कोडे सोडवीत असावी अशी विचारात बसली आहे. हा दिलीप कपाटापाशी जाऊन रंगांच्या पट्टया हातात घेऊनच डोळे मनोहरच्या भोवऱ्याकडे लावून उभा आहे. मी मनाने ठरविले की हा भोवरा या बाकीच्या काम करणाऱ्या मंडळीस खात्रीने नडणार. तेव्हां त्यास येथे स्थान देता कामा नये. मनोहरचा उत्साह भंग करण्याचेही मन होत नव्हते. पण तशीच हिंमत आणली, मनोबळ एकत्र केले व मनोहरने आपल्या कर्तबगारीने उभे केलेले क्रीडांगण तेथून उठविण्याचा निर्णय केला. हळूच पुढे जाऊन मनोहरच्या कानात म्हटले, “हे पहा मनू, भोवऱ्याचा खेळ बाहेर अंगणात, लिंबाच्या छायेत. इथे दुसरी कामे.” मनोहरने माझ्याकडे पाहिले. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर अनिश्चितपणा दिसला. पुन्हा मी म्हटले, “बाहेर अंगणात पलीकडील लिंबाखाली.”
मनोहर मानेला हिसका देऊन हात वर करून म्हणाला, “चला रे भाऊ, लिंबाखाली.” मनोहर पुढे व मागे त्याची सेना सर्व निघाली.
लिंबाखाली खेळ मोठ्या जोरात चालू झाला. भोवरा गरगर फिरू लागला. मधून मधून हसण्याचा आवाज येई तर मधून शांत असे. मी व्हऱ्यांड्यांतून नजर फेकली तो काय ती खेळाची एकाग्रता व तल्लीनता, किती प्रसन्नता व व्यवस्था! ते पाहून मन कसे आनंदित झाले.
इकडे खोलीत पाच सहा मुलेच राहिली होती. परंतु त्यांचे काम शांतपणे चालले होते. त्यात व्यग्रता आणणारे असे कांही एक नसल्याने त्यांची कामे व्यवस्थित चालली होती.
अर्ध्या एक तासाने मनोहरच्या टोळीतील संख्या कमी होऊ लागली. एक एक करून बहुतेक मुले खोलीत दाखल झाली होती व आपापल्या आवडीचे काम घेऊन आपापल्या आसनावर विराजमान झाली होती. आणखी थोड्या वेळाने मनोहर आत आला, हळूच भोवरा व दोरी माझ्या मांडीवर ठेवली; व माझ्या आसपास फिरू लागला. टेबलावर हात ठेवला. मी त्याच्याकडे पाहिले. त्याने माझ्याकडे पाहिले. आम्ही दोघेही हसलो.
मनोहरने बाहेर जाऊन तोंड धुतले, आरशापाशी जाऊन केस विंचरले व टेबलाजवळ जाऊन चित्र काढण्यास बसला. त्याचेच नाव प्रसन्नतेची शांती!
शिक्षण पत्रिका, वर्ष 1, अंक 8, जानेवारी 1934

Leave a comment