मूक-वाचन म्हणजे मनात वाचणे व मुख-वाचन म्हणजे मोठ्याने वाचणे होय. या दोघांमध्ये व्यक्तीला स्वत:ला मूक-वाचन अधिक उपयोगी आहे. तरीपण मुख-वाचन म्हणजे मोठ्याने वाचता येण्याचीही जरूर आहेच. मात्र मूकवाचनास  प्रथम स्थान द्यावे व मुखवाचनास त्यानंतर स्थान मिळावे.

माँटेसोरी पद्धतीत योजलेले चिठ्ठी वाचन मूल करू लागले म्हणजे तेथेच त्याच्या मूक-वाचनास सुरुवात होते व तेथेच मुखवाचनासही सुरुवात होते. कारण चिठ्ठी वाचनाचा क्रम असा आहे की मुलाने चिठ्ठी प्रथम मनात वाचायची,  त्याप्रमाणे क्रिया करायची व मग ती शिक्षकास वाचून दाखवायची. याप्रमाणे वाचल्याने मूक-वाचनामध्ये समजल्याशिवाय वाचल्याचा दोष रहात नाही. अर्थ समजल्याशिवाय एका मागून एक शब्द बोलत जाण्याने प्राथमिक शाळांमधून जी एक गळ्यावर वाचण्याची घोकंपट्टीची खोड लागते तशी लागण्याचा चिठ्ठी वाचनात संभव नसतो. कारण मुलाने अक्षरे ओळखायचे काम आधीच केलेले असते. त्या अक्षर समुच्चयात कोणते शब्द आहेत व त्या शब्दांचा काय अर्थ होतो हे त्यांना अगोदर बरोबर माहीत असते. उलटपक्षी प्राथमिक शाळांत जे वाचन घेतले जाते त्यात मुलांस अक्षरे ओळखणे व मोठ्याने वाचणे ही दोन्ही कामे बरोबर करायची असतात. त्यामुळे पुढचे अक्षर लक्षात येईपर्यन्त मागचे अक्षर पुन्हा पुन्हा बोलणे किवा अंSअंS असा गळा काढणे वगैरे प्रकार मुलांकडून सहज होतात. तसे प्रकार होण्यास चिठ्ठी वाचनात अवकाश राहात नाही हे स्पष्ट आहे. चिठ्ठीच्या मुखवाचनात चिठ्ठी समजली असल्यामुळे मुलांस विशेष मज्जा वाटते व त्यामुळे मुले आनंदाने पुन्हा पुन्हा चिठ्ठीचे मुख-वाचन करण्यास प्रवृत होतात. याप्रमाणे प्रथम अर्थासहित मूक-वाचन व नंतर मुख-वाचन केल्याने वाचन सुंदर होते.

मुख-वाचनात शुद्ध उच्चार (intonation), भावासहित शुद्ध उच्चारणे, योग्य ठिकाणी योग्य तितके थांबणे, स्पष्ट आवाज व वाचनाची योग्य ढब इतक्या गोष्टींचा समावेश होतो. मूल जेव्हा अर्थ समजून वाचते तेव्हा भाव, योग्य विराम व उच्चार [intonation] हे स्वाभाविकपणे त्यांत येतात. त्याकरताही मूक-वाचनास मुखवाचनाचा पाया समजावा.

शुध्द उच्चार,स्वच्छ आवाज व मधुर छटा याकरता आदर्शवाचन फार उपयोगी आहे. चुकत चुकत, गडबडीने, किंवा अस्पष्ट असे वारंवार वाचल्याने चांगले वाचण्याची सवय लागत नाही. शिक्षकाने वाईट वाचणारास खाली उतरवले किंवा त्यास ते रागावले अगर त्यास उभे राहण्याची शिक्षा दिली तरी त्याचे वाचन सुधारणार नाही. आजच्या वाचन शिक्षण पद्धतीतच वाचन बिघडविण्याचा गुण आहे. वर्गामध्ये रोज एक तास वाचनशिक्षणास दिला जातो. तो तास म्हणजे बेसूर अशा अनेक वाद्यांचा जलसाच असतो. तासभर अशुद्ध उच्चार, अस्पष्ट उच्चार, अनेक प्रकारचे गळे काढणे, अनेक प्रकारच्या चुका वगैरे वाईट वाचनाचे सर्व प्रकार मुलांच्या कानावर पडत असतात. त्या तासाला सु-वाचनाचा तास म्हणण्यापेक्षा वाईट कसे वाचावे हे शिकविण्याचा तास म्हटले तरी चालेल! एकमेकांचे वाचन ऐकून मुलांचे वाचन सुधारू शकत नाही. उलट वाचनांतील खराब खोडी एकमेकांस लागण्याचा संभव असतो. खरे म्हणजे तोंडातून खराब वाचन आधी निघावे, रूढ छाप मुलांच्या मनांवर पाडावी हे चांगले. त्याकरता वाचनाच्या एक तासाऐवजी अर्धा तास सुद्धा शिक्षक मुलांना सुंदर रीतीने जर स्वतः वाचून दाखवील तर मुलांना सुंदर वाचन म्हणजे काय हे कळू लागेल व हळू हळू वाचनाची कला त्यांच्यातही येईल. याला आम्ही आदर्श वाचन असे नाव दिले आहे.

मुलांवर नेहमी शिक्षकाची छाप खूप पडत असते. मुलांच्या जगात शिक्षकाच्या वाचनाची छाप मुलांच्या मनावर अधिक पडते व मुले स्वाभाविक रीतीने त्यांचे अनुकरण करतात. आदर्श वचन कसे असावे? वाचनाचे विषय काय असावे? वगैरे संबंधी अन्य प्रसंगी लिहिण्यात येईल. येथे मुख वाचनास आदर्श वाचनाची कशी मदत होते हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

मुखवाचनासाठी नेहमी सोपी पुस्तके पसंत करावीत. चौथ्या इयत्तेतल्या मुलांनी दुसऱ्या इयत्तेची पुस्तके व त्या कक्षेची इतर पुस्तके मुख-वाचनास द्यावीत. ती स्वतः आपल्याशीच त्यांनी मोठ्याने वाचून दाखवावे अशी योजना केल्यास अधिक चांगली. अथवा सारख्या सारख्या मुलांच्या तुकड्या पाडून त्यात पाळीपाळीने एक एक मूल बाकीच्यांना एक एक गोष्ट वाचून दाखवते व बाकीची ऐकतात अशी योजनाही करता येण्यासारखी आहे. अशा वेळी शिक्षकाने सर्व तुकड्यांमधून थोडा थोडा वेळ जाऊन यावे व तेथे कधी कधी ऐकावे व कधी वाचून दाखवावे.

मुखवाचनासाठी मुलांना हवी तशी पुस्तके मिळावीत याकरीता शाळेमध्ये लहानसे बाल-पुस्तकालय असले पाहिजे. निरनिराळ्या शब्दपोथ्या, चिठ्ठीपोथ्या, प्रवेशिका(PRIMER) वगैरे पासून तो सर्व क्रमिक पुस्तके, बालमासिके व इतर बालवाचनाची पुस्तके या पुस्तकालयांत असली पाहिजेत. या पुस्तकालयांतून मुलांना वाटेल तेव्हा पुस्तके घेऊन वाचता येतील व घरीही वाचण्यास नेता येतील अशी व्यवस्था असली पाहिजे.

मुखवाचनाचे वेळी कमी आवाज कसा होईल हे आपण वाचताना त्यांना दाखवावे. दुसरे, मुखवाचन अशा स्थळी घ्यावे की जेथे मुले तुकड्या पाडून किंवा जोडीने अगर एकेकटी बसून साधारण आवाजात वाचत असली तर फार गडबड व एकमेकांस त्रास होणार नाही. उदाहरणार्थ, मुखवाचनाचा तास बाहेर व्हरांड्यावर अथवा बगीच्यात असल्यास तेथे निरनिराळ्या झाडांखाली बसून मुलांस वाचावयास लावले म्हणजे मुलांना त्या तासात अधिक मजा वाटते.

मुले जेव्हा स्वयंस्फूर्तीने मुखवाचन करीत असतात तेव्हा वाचताना होणाऱ्या त्यांच्या चुका कधीच सुधारू नयेत. दुसरे, मुखवाचनांत मुलांनी निरनिराळे अधिक वाचण्यापेक्षा तेच तेच पुन्हा पुन्हा पुष्कळदा वाचावे हे धोरण असावे. मूकवाचनात मूल अधिकाधिक नवे नवे वाचण्यास प्रवृत्त होईल व सामान्यतः त्यांच्या इयत्तेच्या पुढची पुस्तकेही क्वचित वाचावयास घेईल तर त्यांत हरकत नाही. अशा प्रकारे मूकवाचन व मुखवाचन यांत फरक आहे.

शिक्षण पत्रिका, वर्ष 1, अंक 3, ऑगस्ट 1933

(फोटो क्वेस्टच्या संग्रहातून)

Leave a Reply

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.

Discover more from शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading