गणित म्हणजे गणणे अथवा मोजणे. गणिताची सुरुवात मोजण्यापासून होते. गणित शिक्षण सफल झाले असे केव्हा म्हणता येईल? गणिताविषयी अभिरुची उत्पन्न झाली, किंवा सहज पडल्या पडल्या अथवा चालता बोलता गणिती प्रश्न मनात घोळू लागले म्हणजे एकंदरीत गणिताची दृष्टी झाली, तरच ते शिक्षण सफल झाले असे म्हणता येईल. आपल्या आसपास स्थळ आहे, काळ आहे, संख्या आहे. पदार्थांना रंग असणे, रूप असणे वगैरे जसे गुणधर्म आहेत तसेच संख्या असणे, संख्येचे भाग पाडणे वगैरे त्यांचे गुणधर्मातीलच एक प्रकार होय; व त्यासंबंधीचे प्रश्न आपल्या नेहमीच्या व्यवहारात रोज आपल्यापुढे उत्पन्न होतात. ते तशा स्वरूपात आपणास दिसणे याचे नाव गणिती दृष्टी. त्या प्रश्नाविषयी विचार करण्याची शक्ती याचेच नाव गणितीक बुद्धी व आपल्या परिस्थितीमधून तशा प्रकारचे प्रश्न हौशीने शोधून काढून त्याचे जबाब देण्याची आवड याचेच नाव गणिताची अभिरुची.

बालक जीवनाची सुरुवात निःपक्षपात बुद्धीने करीत असते. त्याची जगाकडे पाहण्याची दृष्टी नेहमी प्रश्न व उद्गारचिन्हांकितच असते. खाणे, पिणे व कपडे करणे वगैरे जीवनाच्या प्राथमिक गोष्टी उरकल्या म्हणजे लगेच बालकाची जिज्ञासा वृत्ती जागृत होते. त्याच्या डोळ्यास फूल व पानही नवे, डोंगर व नद्याही नव्या आणि दोन कुत्रे, पाच आंबे किंवा अर्धा लाडू या गोष्टी नव्याच. त्यांना अनेक तऱ्हेने वस्तूंना तपासून पाहावयाचे असते व समजून घ्यावयाचे असते. त्यांना काव्यदृष्टीने जगाची सुंदरताही पाहावयास हवी असते. भौगोलिक दृष्टीने नदी, पर्वत असे भूमातेचे चमत्कारही तितकेच आकर्षक असतात. त्यांना वैज्ञानिक दृष्टीने पदार्थाचे व प्राणिमात्रांचे गुणधर्म समजून घेण्याची सुद्धा जिज्ञासा असते व गणिती दृष्टीने वस्तूंमधील एक, अर्धा वगैरे गंमतही जाणण्याची इच्छा असते. अर्थात प्रत्येक दृष्टीचे प्रमाण निरनिराळ्या बालकांत निरनिराळे असू शकते. परंतु सामान्यतः बालकांमध्ये इतर दृष्टीप्रमाणेच गणितीक दृष्टीही दिसून येते व ती गणिती प्रश्न आपल्या जीवनात पुष्कळ आवडीने सोडवताना दिसतात.

बाळ नावाचा एक चार वर्षाचा मुलगा. एक दिवस काही आंबे हातात घेऊन म्हणू लागला, “मी याचे भाग पाडू का?”
मी म्हटले,”पाड”.
थोडासा विचार करून तो म्हणतो, “आपणा सर्वांना किती किती येतील सांगू?
दोन-दोन, दोन-दोन,” असे म्हणून तो आनंदाने नाचू लागला. बाळच्या डोक्यात यावेळी भागाकाराची क्रिया चालली होती व त्याचा जबाब मिळाल्याबरोबर त्यास फार आनंद झाला.

प्रसंग अगदी साधा आहे. शाळेत जाऊन पाढे घोकून, परवचा हाणून, उदाहरणे चुकल्यामुळे मास्तराकडून मिळालेल्या खाऊमुळे ज्यांची गणिती जिज्ञासा मेली नाही, अशी मुले घरोघर अशा प्रकारचे प्रश्न स्वतः पुढे उपस्थित करीत असतील व ते सोडवीतही असतील.

अशीच एक दोन उदाहरणे घरीच पाहिलेली आहेत, ती खाली देत आहे.
(१) धाकटी शारदा अडीच तीन वर्षाची. मी पुऱ्या तळीत होते व ती तिथेच जवळ पाटावर बसून बघत होती. मी एक पुरी तळून परातीत काढली व नंतर दुसरी काढली. शारदा म्हणते,”या किती पुऱ्या झाल्या सांगू?”
“किती झाल्या?”
बोट दाखवून,”एक आणि दोन.” मी तिच्या त्या आनंदी चेहऱ्याकडे पाहातच राहिले. तिच्या त्या लहानशा डोक्यात पडत असलेल्या गणितीय प्रकाशाची चमक तिच्या डोळ्यांत दिसत होती.
(२) चार वर्षांची बाबी जेवताना एक दिवस मला म्हणते, “आई, चार पोळ्या केल्या होत्यास ना?”
मी म्हटले, “हो.”
बाबी म्हणाली, “आता किती राहिल्या असतील सांगू?”
“किती असतील?”
“तीन, कारण मी एक खाल्ली.”
बाबीच्या मनात वजाबाकीचे प्रश्न घोळत होते असे दिसले.

परंतु हीच मुले शाळेत जातात तेव्हा त्यांच्यापुढे जे काव्य, जो भूगोल व जे गणित येते ते बालकांच्या जिज्ञासेच्या प्रदेशाबाहेरचे असते. त्यांच्या मनात उद्भवलेल्या प्रश्नांचे जबाब त्यांस मिळत नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांच्या जीवनामध्ये जो भूगोल किंवा गणित वगैरे आढळून येते ते पाहाण्याची त्यांची शक्ती उलट शाळेत गेल्यावर विकासाच्या ऐवजी मंद पडते. आपण हे विषय शाळांमधून सुरू करतो तेव्हा आपण इतके तर जरूर लक्ष दिले पाहिजे की, त्या विषयात आपल्या शिकवण्याने मुलांची दृष्टी अधिक खुलली पाहिजे. असलेली नाहीशी होता कामा नये. आपला शाळेसंबंधीचा सामान्य अनुभव असा आहे की मुलांची त्या विषयाची स्वाभाविक आवड शाळेत गेल्यानंतर साफ नाहीशी होते.

याचे कारण काय? आपली सदोष शिक्षणपद्धती.

ठराविक वेळात ठराविक ज्ञान मुलाच्या डोक्यात कोंबून देणे.

ज्ञान कोंबण्याच्या आपल्या युक्त्या व प्रयुक्त्या.

ज्ञान लवकर व जास्तीत जास्त भरण्याचा आकांक्षेबरोबरच आपण जास्तीत जास्त मुलांना गणित कुशल बनवण्याची महत्त्वाकांक्षा करतो.

(शिक्षण विचार, वर्ष १, अंक ७, डिसेंबर १९३३)

Leave a comment

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.