पुष्कळ आईबापांना मुलांना अगदी लहान वयात वाईट सवयी कशा लागतात ते लक्षात येत नाही. पुष्कळांचे लक्षच नसते. तर पुष्कळांना कल्पनाच नसते.
माझ्या अनुभवातले एक लक्षवेधक उदाहरण आईबापांच्या माहितीसाठी देते. वाचलेल्या उदाहरणापेक्षा प्रत्यक्ष पाहिलेले उदाहरण मनावर विशेष परिणाम करते. पुस्तकात पूर्वी वाचलेले होते. पण पाहिलेले हे प्रथमच.
एक सव्वादोन अडीच वर्षाचा मुलगा होता. संधी मिळाली की सतरंजीवर किंवा कोठेही पालथा पडून जननेंद्रिय घासू लागायचा. मला पाहून फारच नवल वाटले. मी त्याच्या आईस विचारले. तेव्हा तिचे या गोष्टीकडे लक्ष बरेच दिवसापासून गेले होते असे कळले.
त्यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी वाटली. त्या मुलाला ही सवय कशी व केव्हा लागली म्हणून विचारल्यावर असे कळले की मुलगा वर्षाचा असताना आपल्या एका नातेवाईकांकडे आईबरोबर गेला. तेथे रोज सकाळी मुले देवाला नमस्कार घालीत, म्हणून त्यांच्यावरोवर हाही घालू लागला. प्रथम कोणाच्याच लक्षात आले नाही. पुष्कळ वेळ पडून रहायचा पण ती गंमत म्हणून डोळ्याआड झाली.
मंडळी परत आपल्या घरी आली, तेव्हा प्रथम त्याच्या आईच्या लक्षात आले. घरच्या मंडळीनी त्याला पुष्कळ धाकदपटशा दाखविला; मारलेही. पण मुलाची सवय जास्त जास्त दृढ होत चाललेली दिसली.
अशा सवयी माराने व धाकाने अधिक दृढ होणारच. प्रथम तर मुलांना अशा काही सवयी आहेत की काय किंवा लागण्यास सुरुवात आहे की काय हे लक्षपूर्वक पाहात असायला हवे व आहे असे दिसून आल्यास त्या घालवण्यासाठी शास्त्रीय उपाय केले पाहिजेत.
मुलाला मारणे, वारंवार करू नको म्हणणे, धाक घालणे, तुच्छता दाखविणे, वगैरे करण्याने गुन्हा किंवा न करण्यासारखे काही आहे वगैरे भान करवले तर ती सवय अधिक खोल जाते अथवा रूपांतराने प्रगट होते.
आपल्या गावात मानसशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करून डॉक्टर झालेले प्रशिक्षित डॉक्टर असल्यास, त्यांचा सल्ला व मदत मिळणे शक्य असल्यास या प्रश्नांसंबंधी माहिती मिळवून घ्यावी.
सामान्यतः विशेष खोलात न उतरता खालील नियम ध्यानात ठेवल्यास अन्य प्रतीच्या वाईट सवयी केव्हाही फार दिवस टिकत नाहीत.
- मुलास निरुद्योगात बसू देऊ नये.
- मुलास स्वत:चे विचार, आश्चर्य कुतूहल, जिज्ञासा स्पष्टपणे, मोकळेपणाने मोठ्यांशी बोलण्याची सूट असावी. तशी बोलण्याची रीत ठेवली पाहिजे.
- जी सवय घालवायची असेल तिच्याकडे आपले सारखे लक्ष आहे असे दाखवता कामा नये. त्याचप्रमाणे, त्या सवयीमुळे आपल्याला फार वाईट वाटते, किंवा मनास धक्का [shock] बसतो, असे काहीही दाखवू नये. एकंदरीत ती बाब म्हणजे विशेष गुन्हा आहे किंवा पापमूलक आहे असे काही वाटून घेऊ नये व तशी मुलाची समजूत करून देऊ नये. ‘तोंडात बोट घालू नको’ हे जितक्या सहजपणे आपण सांगू तितक्याच सहजपणे इतरही सवयीसंबंधी सांगावे.
- मुलांची दुसऱ्या बाबतीत काही कुचंबणा होते आहे किंवा काय; त्याचा त्रास किंवा काय चीड येण्यासारखे नेहमी काही घडत असते की काय, त्याला स्वतःस कमीपणा वाटण्यासारखे काही बुद्धीचे, शरीराचे काही व्यंग वाटते किंवा काय वगैरे पहावे व त्याचा जीवन प्रवाह अस्खलितपणे जाण्याच्या आड ज्या काही गोष्टी येत असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा.
- अशा सवयीचे मूल आवेशमय व भावनाप्रधान आहे अथवा ते अधिक मुलांच्यात न मिसळणारे एकलकोंडे अशा स्वभावाचे आहे तेही बघावे. कोणत्याही एका बाजूस विशेष झुकलेले मूल समतोल होईल असे उपाय घेतल्यास वाईट सवयीतून मुक्त होण्याचा संभव असतो.
- मुलांच्या बाल्यावस्थेतही स्वाभाविकपणेच अशी एखादी अवस्था येते की जेव्हा तात्पुरते काही काळ अशा प्रकारच्या सवयीत सापडते व नकळतपणे मुक्तही होते. त्याबाबतीत प्रमाणाच्या बाहेर उगाच काळजी करू नये व फाजील महत्त्व देऊन त्यातच आपले व मुलाचे लक्ष सदैव केंद्रित होऊ देऊ नये.
सामान्यत: मनापासून आवडणाऱ्या अशा सत्प्रवृत्तीमध्ये त्याचे लक्ष व मन पूर्णपणे गुंतून जाऊ लागले की विकृत प्रवृत्ती सहजपणेच नाहीशी होते.
(प्रथम प्रसिद्धी – शिक्षण विचार पत्रिका, वर्ष 9, अंक 1, जून 1941)

Leave a Reply